Showing posts with label सामाजिक राजकीय वगैरे वगैरे. Show all posts
Showing posts with label सामाजिक राजकीय वगैरे वगैरे. Show all posts

Wednesday 5 December 2018

ह्या तेहेत्तीस कोटी देवांचं करायचं तरी काय ?

''धिक गांडीव धिक तृणिर !''
धारातीर्थी पडलेल्या अभिमन्यूचं पार्थिव मांडीवर ठेऊन शोक करणारी पांचाली, अर्जुनाकडे पाहून गरजली होती.
हे अर्जुना, हे धनुर्धारी, तुझ्या निष्णात धनुर्धारी असण्याचा आणि तुझ्या त्या गांडीव धनुष्याचा उपयोग काय ? जो माझ्या पुत्राचे प्राण वाचवू शकला नाही.
चक्रव्युहा मध्ये फसलेल्या अभिमन्यूच्या वीरमरणानंतरचा प्रसंग याद यावा असाच प्रसंग काल-परवा घडला आहे. उत्तरप्रदेशातल्या 'बुलंदशहर' येथे.




कोणा एका शेतकऱ्याच्या शेतात गाईचं मुंडकं सापडल्याची बातमी हा हा म्हणतां साऱ्या शहरात पसरली.
खऱ्या -खोट्याची कोणतीही शहानिशा नं करतां तरुणांची माथी भडकावण्यात आली.
अशा शेकडो माथेफिरुंचा जमाव जमला. जमाव हिंसक झाला, त्याने जाळपोळ सुरु केली.
त्यांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवरच त्या जमावाने हल्ला चढवला.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह ह्यांच्यावर गोळ्या झाडून चक्क हत्या करण्यात आली. आणि...

आणि अचानक, एक हसता-खेळता संसार उजाड झाला.
ही बातमी पाहतांना पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंहच्या पत्नीचा शोक पाहतांना मला त्या पांचालीची सय आली.
हे सगळं महाभारत घडलं त्या गाईमुळे ! पोटात तेहेत्तीस कोटी देव असणाऱ्या !!
शरयू नदीकाठी जन्म घेणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या भूमीत हे असलं गलिच्छ रामायण घडावं ?
रामाला वनवासात धाडण्यास कारणीभूत मंथरेला, अन त्या प्रकांड पंडित रावणाला देखील चीड आणू शकणारी ही घटना !
गाय ही केवळ उपयुक्त पशु आहे, असं पोटतिडकीने सांगणाऱ्या प्रखर हिंदुत्ववादी वीर सावरकरांचं आपण कधी ऐकणार आहोत ?
आणि म्हणूनच मला प्रश्न पडलाय - ह्या तेहेत्तीस कोटी देवांचं करायचं तरी काय ?
तुम्हीच सांगा आता.

anilbagul1968@gmail.com

Monday 26 November 2018

स्वतःच्याच प्रेमात पडलेला सरकारी अधिकारी !!




                                                #tukarammundhe


15 ऑगस्ट 2014 ला लाल किल्ल्यावरून भाषण करतांना पंतप्रधान मोदींनी स्वतःला प्रधानसेवक म्हटलं.
सरकारी पद हे आम जनतेच्या सेवेसाठी आहे, हे त्यांना सुचवायचं असावं, हा माझा समज आहे.

मनपा आयुक्त हे सरकारी पद आणि म्हणजे मनपातला टीम लीडर !
टीम लीडरचं काम हे स्वतःच्या सहकार्यांना आपल्यासोबत कामाला जोडून घ्यायचं असतं हा म्यानेजमेंटचा बेसिक फंडा.

स्वतःच्या सहकाऱ्यांमध्ये जोश भरून, त्यांना सोबत घेऊन त्यांनी भरीव काम करणं हे नाशिककरांनी अपेक्षित धरलं होतं. पण...

पण मुंढे हे स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडले हे वास्तव आहे. ऐकायला कटू वाटेल पण तेच सत्य आहे.
नाशिक, त्याचा विकास, नाशिककर आणि त्यांचं हित ह्या पेक्षा, माझा माईक आणि माझंच ऐक असं चालू होतं, गेले नऊ महिने !

चांगलं असणं हे तेव्हा वाईट ठरतं जेव्हा ते कुणाच्याच हिताचं असत नाही.
इतिहास साक्षी आहे हो ह्याला.

प्रतापराव गुजर पराक्रमी होते, मान्य ! एकनिष्ठ होते मान्य !! दिलदार होते, मान्य !!!
बहलोळखानाला युद्धात मात दिल्यावर, स्वतःच्या अधिकारात माफी देणं स्वतः छत्रपतींनी मान्य केलं नव्हतं.
वेडात मराठे दौडले वीर सात ! गाणं ऐकायला वाटतं छान पण त्याचा स्वराज्याला उपयोग शून्य.
मुंढे हे प्रतापराव गुजर ठरलेत ! अकरा वर्षात अकरा वेळा बदल्या, प्रसिद्धी साठी छान पण महाराष्ट्र देशी उपयोग शून्य !

आपलं काय आपण नेहमीच अभिमानाने गातो, वेडात मराठे वीर दौडले सात !! पण साथ कोण देणार ?

anilbagul1968@gmail.com

Saturday 17 November 2018

प्रिय नाना,

                                    #nanapatekar


परवाचा तुझा 'लोकसत्ता'तला लेख म्हंणजे शब्दांची जादूच होती. 
इरसाल कोकणीपणा जपत तू फारच भावूक लिहून गेलास लतादीदींवर ! 
काळीज हललं रे कुठेतरी !
दीदींना यावर्षी वाढदिवसाला मिळालेली हि अप्रतिम भेट असणार !!

तुझं आणि मकरंदचं ते 'नाम'चं काम थक्क करणारं, ह्यात काही शंकाच नाही. 
कित्येक शेतकरी आणि आयाबहिणी तुझ्यावरून जीव ओवाळण्यासाठी उत्सुक असतील.

बाबा आमटेंच्या कार्याने भारावून गेलेला तू. 
ठाकरे बंधूनी एकत्र यावं, अशी आस असणारा तू.

'पुरुष' मधून पुरुषी अहंकाराचा आसूड उगवणारा तू. 
'क्रांतिवीर' मधून देशप्रेमाचं स्फुल्लिंग चेतावणारा तू . 
अभिमानाने ऊर भरून यावा अशी तुझी चित्तरकथा.

प्रत्येक मराठी मन तुझ्यावर फिदा.

एका अवघड वाटेवर भरकटल्यासारखा झालास का रे ?

बॉलीवूड मधे टेचात पाय रोवून, आपल्याच कलंदर थाटात राहणारा तू ... 
त्या 'अग्निसाक्ष' मध्ये झलक दाखवून गेलास रे त्या विक्षिप्तपणाची.

असं काही नसणार असं अजून वाटतं रे मला. 
त्या तनुश्रीनं काही बाही आरोप केले, जीव धास्तावला. 
असं काही नसणार मन कालपर्यंत म्हणत होतं. 
बिग बॉस मध्ये प्रवेश मिळण्यासाठी तिनं हे केलं अशी माध्यमांची स्टोरी सुरु होती दिवसभर !


प्रियांका चोप्रा अन शिल्पा शेट्टी आणि आणखी काही तारकांनी तुझ्याविरोधात उघड भूमिका घेतली. 
आमिर आणि बिग बी नेहमीप्रमाणे गुळमुळीत.
सावंतांच्या राखी नामक महिलेने तुझं जोरदार समर्थन केलही. 
तरीही मन शंका घेतंच होतं.



पण त्या आपल्याचं रेणुका शहाणेची पोस्ट आणि सोबतचा व्हिडीओ पहिला अन ठोका चुकला काळजाचा !! 
रेणुका शहाणीच आहे ना ? ती असा वेडेपणा कसा करू शकेल ?
आपलीच रेणुका तुझ्या विरोधात बोलती झाली आणि तिच्या व्हिडीओने आमची बोलती बंद झाली.

कारमधे धास्तावलेली तनुश्री आणि बॉनेटवर नाचणारा तो कुठलासा कार्यकर्ता ... 
अक्षम्य अपराध !!
शिवबा असते तर काय शिक्षा दिली असती त्या राजाने ?
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आदराने पाठवणी करणाऱ्या माझ्या राजाच्या वारसांनी एका अबलेला असं भयभीत करावं ? 
आपल्या पुरुषी अहंकाराचा कंड शमवण्यासाठी ??

माझ्या नाशिकच्या मातीतल्या सारस्वतांच्या राजाने, अर्थात कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट मधला तो डायलॉग आठवला ... अन शहारलो.
''तू नट म्हणून वाईटच होतास पण माणूस म्हणूनही भिकारडा आहेस !!''

नाही , नाही तू तसा नक्कीच नाहीस.
हे नटसम्राटा, हे .. हे अखेर नाटकंच असेल ना ? 
भोळी भाबडी मराठमोळी आशा ...

anilbagul1968@gmail.com

Tuesday 11 September 2018

मोरू मिनी आणि गुढीपाडवा…



रविवारच्या सकाळी नेहमीप्रमाणे मोरू अंथरुणात लोळत पडला होता. मोरूच्या लाथांनी पांघरून चोळामोळा होऊन पलंगाच्या खाली केव्हाच पडले होते. उशाशी ठेवलेला चष्मा, फ़ुटबाँलची किक मिळाल्यासारखा लांब फेकला गेला होता. तर मोबाईलचा अलार्म त्याला जागे करण्याचा कसोशीने प्रयत्न करू पाहत होता.

त्याचा तो गबाळा अवतार पाहून मिनीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती मोठ्यांदा  किंचाळली, ''अहो उठा, आज तरी उठा लवकर !'' तिच्या त्या तारस्वरातील आवाजाने किंचितसं दचकल्यासारखे करत मोरू पुटपुटला. मीने अगं  मीने, आज तरी झोपू दे. आज रविवार आहे.

त्याचे ते बोल ऐकून मिनीने एव्हाना रुद्रावतार धारण केला.
अरे मोऱ्या उठ, आज पाडवा आहे पाडवा ! हिंदू नववर्ष दिन !!  ह्यामेल्यावर आईबापांनी काही संस्कार म्हणून केले नाहीतआईबापाचा उद्धार मिनीच्या तोंडून ऐकल्यामुळे नाईलाजाने मोरूने एकदाचे डोळे उघडले. मोबाईल मधला अलार्म बंद केला. आळोखे पिळोखे देत स्वारी पलंगाबाहेर  आली.

अरे, जरा उठून अंघोळीपांघोळ करून घरा बाहेर पड. चारचौघात मिसळ. सगळीकडंच वातावरण बघ कसं आनंदाचं, उत्साहाचं आहे. सगळीकडे रांगोळ्या , पताका अशी सजावट. नऊवारी नेसून, भगवे फेटे घालून महिला आणि भगवे झेंडे नाचवत , सोनेरी झब्बे, कोल्हापुरी चपला घातलेले पुरुष. शिवगर्जना, नवक्रांती, भवानी, तालरूद्र अशी ढोलपथकं. लेझीम पथकं, आदिवासी नृत्य पथकं अशी सारीजण  सज्ज झाली आहे. आता 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा' सुरु होईल ! आहे किनई मज्जा ?

बाथरूममध्ये गार पाण्याचे तांबे घाईघाईने अंगावर ओततांना मोरूला मिनीची ही कॉमेंट्री ऐकू येत होती. एकदाची अंघोळ उरकून, खसाखस टॉवेलला अंग पुसत मोरू बाहेर आला. मिनीने नवाकोरा अबोली रंगाचा झब्बा आणि पांढरी सुरवार  त्याच्यापुढे धरली. मोठ्या ऐटीने ते अंगावर चढवत , पायात नव्याकोऱ्या कोल्हापुरीघालून मोरू सोसायटीच्या गेट बाहेर पडला.

अंदाजे एक प्रहाराने मोरूराजे आपल्या राजवाड्याच्या दिशेने परत आले. ते आल्याची खबर 'अलार्म' दासीने राणी मिनीताई राजेंना दिली. हातातील प्लास्टिक पिशवीतील नजराणा राजेंनी राणीकडे सुपूर्त केला. मुदपाकखान्यात ताटे करण्याची खबर गेली. राजा राणीने पाडव्याच्या खास शाही भोजनाचा आस्वाद घेतला. यंदाचे 'चितळेंकडचे' श्रीखंड फारच उत्तम होते. वेलदोडे, केशर आणि जि एस टी.’ छान चव जमून आली होती.

तब्येतीत जेवण झाल्याने राजा राणींना झोप अनावर झाली, अन दोघेही निद्रादेवीच्या स्वाधीन झाले.
एव्हढ्या सगळ्या गडबडीत ते गुढी वगैरे उभाराचे राहून गेले वाटतं !!

anilbagul1968@gmail.com




अजिंक्यताऱ्याला जेव्हा, तेव्हाही जाग येत नाही ...













मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही नासूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना ? सांगा, सांगा ना आबासाहेब !

. संभाजी राजें मालिकेतील वाक्य मनाशी घोळवत मी त्या रात्री, त्या ऐतिहासिक क्षणी, इकडे झोपेच्या आधीन झालो.

इकडे नवरात्रीच्या नऊ रात्री सरल्या होत्या. . टा. बरहुकूम नमूद केलेले नऊ रंग दौलतीच्या सुवासिनींनी यथासांग साजरे करून झाले. उद्या दसरा अर्थात विजयादशमी ! हेमलंबी नाव सांवत्सरे अश्विन शुद्ध अमुक शके तमुक ....

सायंकाळी राजवाड्याच्या मुख्य चौकात प्रथेनुसार सोने लुटायचे अन ... सीमोल्लंघनाकरिता राजवाड्याबाहेर पडून कूच करायचे ...

पुढे नेमकें करायचे काय ?
हाच तिढा, अजिंक्यताऱ्याच्या दोन टोकांवरील, दोन राजवाड्यातील, प्रत्येकी एका शयनगृहातील, प्रत्येकी एका राजाला सोडवता येत नव्हता. विचारांची चक्रे चंदेरी चषकांच्या वाढत्या संख्येनुसार अधिक जोरांत फिरत होती. दसऱ्याच्या दिवशी सोनंही लुटलं गेलं पाहिजे. (बाजारभाव बत्तीस हजारांवर पोहोचल्याची खाजगी दालनांतून पक्की खबर होती.) अन सीमोल्लंघन ही झालं पाहिजे. यावर्षीही हातून काही घडलं नाही तर काही खरं नाही. रयतेची आणखी नाराजी आता परवडणार नाही.

दोघाही राजांनी चंदेरी चषक दाणकन खाली लाकडी मेजावर आदळला. स्वतःशीच पुटपुटले बस आता ठरलं  आणि ओरडले ...  चला आताच कूच करायचं ! दोघांचेही सेवक चपापले. त्यांनी भिंतीवरील घड्याळाकडे पाहून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. आजच सकाळी खुद्द थोरल्या बारामतीकर साहेबानी चावी देऊनही घड्याळ नेहमीप्रमाणेच बंद होते. मग त्यांनी चषकांच्या संख्येनुसार अंदाज बांधला. परिस्थितीचं 'गांभीर्य' एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होतं.

मग हाकारे दिले गेले, पुकारे झडले. निष्ठावंतांची जमवाजमव झाली. लाठ्या-काठ्या, सोडावॉटरच्या बाटल्या, हौकीस्टिक आदी शस्त्रे जमवण्यात आली. शेकडोंच्यावर समर्थक जमले. झिंदाबाद-मुर्दाबादच्या घोषणा झाल्या. एव्हाना खुद्द राजे शयनगृहाच्या बाहेर ताठ मानेने, दमदार पावले टाकीत आले. मग राजांच्या विजयाच्या घोषणा झाल्या. राजांनी हात उंचावला, बरं कारे .. हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे. आपल्याला तो पकडयायच हवा ! हवा का नाय ? सारे भरवल्यागत एकसुरात ओरडले, होय राजे होय !! अन बघता बघता धुराळा उडाला. 'टाटा सफारी' म्हणू नका. 'फॉर्च्युनर' म्हणू नका. ताफा निघाला. फौजा कूच करत्या झाल्या. प्रत्येक मावळ्याच्या डोक्यात एकच विचार, बहलोलखानास गर्दीस मिळवण्याविना राजांना तोंड दाखवायचं नाही.

इकडच्या वाड्यातील दृश्यांचं रिपीट टेलिकास्ट तिकडच्या वाड्यात देखील. मग काय तिकडचाही फौजफाटा निघाला.

सातारा शहराच्या दक्षिणेकडे, दिल्ली दरवाज्या जवळील 'टोल नाक्या'वर दोनही फौजा आपसांत भिडल्या. तुंबळ युद्ध सुरू झाले. गर्दीत कुणाचाच पायपोस कुणाला लागेना. अखेर दोनही फौजातींल दोन स्मार्ट मावळ्यांनी आपसांत मांडवली केली. टोलनाक्यावरील प्रत्येकी एक संगणक आणि एक खुर्ची आणि काही चिल्लर ताब्यात घेतली. (अर्थात रोकड दोघांच्याही जनधन खात्यात जमा होणार हे सुज्ञास सांगणे हवे काय?) मग दोघांनीही आपापल्या सेनेच्या विजयाच्या घोषणा दिल्या. फत्ते झाली. राजांची जीत झाली.
दोनही फौजा विजयी आवेशात अजिंक्यताऱ्याच्या दिशेने रवाना झाल्या. दोनही राजांनी ख़ुशी जाहीर केली.
सेवकांना, कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहाराची सोय करण्याचे फर्मान सोडले. मग दोघेही मोठ्या आनंदात शयनकक्षात निघून गेले.

इकडे त्याच ऐतिहासिक क्षणी झोपी गेलेल्या माझ्या स्वप्नात ... थोरल्या महाराजांच्या सुरतेवरील स्वारीचं रिपीट टेलिकास्ट सुरु होतं. महाराजांच्या  त्या पराक्रमाने भारावून मी त्यांना मुजरा घालणार इतक्यात ... मी जागा झालो, टीव्ही वरच्या ब्रेकिंग न्यूजने ...

काल रात्री साताऱ्याच्या टोलनाक्यावर दोन टोळक्यात राडा ! टोलनाक्याच्या ताब्यावरून, दोन राजे समर्थक आपसांत भिडले !!
खबर ऐकून अवघा महाराष्ट्र जणू धन्य धन्य होत होता अन ...
अजिंक्यताऱ्याला तेव्हाही जाग आलेली नव्हती.

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...