Showing posts with label व्यक्ती चित्रण. Show all posts
Showing posts with label व्यक्ती चित्रण. Show all posts

Monday 5 September 2022

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

 


वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी... 

'रम्य ते बालपण किंवा बालपणीचा काळ सुखाचाअसे साधारणतः आयुष्याच्या प्रारंभीकाळाचे वर्णन केले जाते. आपल्या बालपणाविषयी मात्र असे म्हणता येणार नाही, असे अनिल बागुल सांगतात. कठीण काळात एकेकाळी अगदी घरोघरी जाऊन पेपर वाटप करणारा हा मुलगा मग पुढे फॅशनइंटिरिअर डिझायनिंगमधली मानाची समजली जाणारी एक संस्था उभारतो आणि यशस्वीपणे ती पुढेदेखील नेतो. असा हा प्रवास आहे नाशिकच्या अनिल बागुल यांचा...

 लहानपणी पाहिलेल्या खडतर काळात आईने अनिल व त्यांच्या भावांना जिद्दीने आणि कष्टाने वाढवले. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना आयुष्य आपली परीक्षा पाहते. आपण मात्र कायम सकारात्मकतेने पुढे जायचे असते, हे आपण आपल्या आईकडून व रा. स्व. संघाच्या शाखेतील शिस्तीमुळे शिकलो, असे ते आवर्जून सांगतात. कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये प्राथमिक शिक्षण घेणार्‍या अनिल यांनी इयत्ता सातवीत स्कॉलरशिपमिळवली, दहावीत भरघोस यश संपादन केले. पेपर वाटप करताना त्यांना वाचनाची गोडी, तर लागलीच. परंतु, अग्रलेख वाचताना त्यांची वैचारिक घडणदेखील होत गेली. व्हीजेटीआयया संस्थेतून अनिल यांनी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगपूर्ण केले व पुढे बीकॉमएमबीएदेखील केले. त्यांच्या क्षेत्रात सुरुवातीला रेमंड्स’, ‘हिंदुस्थान स्पिनिंग मिल्स’, ‘नॅशनल रेऑन कॉर्पोरेशनअशा ठिकाणी नोकरी करत त्यांनी अनुभव घेतला.

एका नोकरीच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये आले आणि पक्के नाशिककर झाले. इथेच पुढे त्यांचा विवाहदेखील झाला. उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे म्हणून शिक्षण घेण्याकडे साधारणतः अनेकांचा कल दिसतो. सभोवताली मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये वाढताना दिसतात अशा वेळेस आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करत विद्यार्थ्यांसाठी नवीन क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी निर्माण करता यायला हवी, असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. मुलतः असणारी डिझायनिंग’, ‘फॅब्रिक्स’, ‘टेक्स्टाईलची आवड यातून मुहूर्तमेढ रोवली गेली ती डीआयडीटीया फॅशनइंटिरिअर डिझायनिंगया संस्थेची. सकाळी १० ते ६ नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा पण वेगळेपण राखून हे त्यांनी ठाम ठरवले होते. फॅशन डिझायनिंगम्हणजे केवळ टेलरिंगनव्हे, घर-ऑफिसेसमध्ये उत्तम तसेच विचारपूर्वक केलेल्या सजावटीमुळे तिथले वास्तव्य अधिक सुखकर होत कार्यक्षमतेत वाढ होते, हे विचार रुजवण्यासाठी २००६ मध्ये संस्था उभी राहिली. विद्यार्थ्यांसाठी एका नव्या क्षेत्रामध्ये आपल्यातील कलेला वाव देणारी नवीन वाट निर्माण करण्याचा ध्यास आपल्या मनामध्ये होता, असे अनिल सांगतात.

संस्थेची उत्तमरित्या सुरुवात झाली तरीही सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. संस्थेतर्फे होणारे फॅशन शोचे आयोजन, संस्थेतून नोकरी करणारी, स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभारणारी काही उदाहरणे निर्माण झाली तिथून पुढे विद्यार्थ्यांनी संस्थेला आपलेसे केले. लवकरच पुण्या-मुंबईचा दबदबा असणार्‍या क्षेत्रात नाशिकचे नाव नव्याने येऊ लागले. शहराचा विस्तार होत आहे. बांधकाम क्षेत्रातही नवनवे प्रोजेक्ट्स सातत्याने उभे राहत आहेत. इंटिरिअरची आवश्यकता पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढू लागली. अशावेळी डीआयडीटीने कायमच बदल स्वीकारण्याची तयारी ठेवलेली असल्याचे ते सांगतात. आज नाशिकमध्ये मालिकांचे चित्रीकरण होऊ लागलेले आहे. अशावेळी कॉस्च्युम डिझायनरहा एक महत्त्वाचा घटक ठरतो.

‘’स्पर्धा वाढती असली तरी महत्त्वाची असते. त्यातूनच आपण नवनवीन प्रयोग करत व स्वीकारत असतो. ध्येयाप्रती सच्चा निष्ठेने आणि कठोर परिश्रमांनी कालसुसंगत वर्तन केल्यास यशप्राप्ती सुकर होते,” असे अनिल सांगतात. आपल्या आवडीनिवडी व छंदांनादेखील आपणच सजगपणे वेळ द्यायचा असतो, असे त्यांना वाटते. लहानपणी वृत्तपत्र वाचनाबरोबरीनेच वाचनालयात जाऊनही अनिल यांचे वाचन सुरू होते. त्यातूनच आपण लेखनही करावे, अशी उर्मी दाटून येऊ लागली. आयुष्याची, करिअरची सुरुवात, मुंबईत नोकरी निमित्ताने होणारा प्रवास यातून लेखनाची आवड पुढे जाऊ शकली नसली तरी आज मात्र त्यांचा स्वतःचा ब्लॉगआहे. वृत्तपत्रांमधून सदर लेखन, ‘सायबरसुरक्षा या विषयावरील लेखन, तसेच त्यांचे एक पुस्तकदेखील प्रकाशित झालेले आहे.

विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. संस्थेची उभारणी एक वेळ सोपी पण दर्जा राखणे, नवनवीन शिक्षण पद्धतींचा अवलंब करणे, नवनवीन कोर्सेसची आखणी करणे अनिल यांना महत्त्वाचे वाटते. आयुष्याचे जरदारी वस्त्र विणताना सुखदुःखाच्याधाग्यांची सांगड होणारच असली तरी कलाकुसर आपल्या हातात असते, असा विश्वास अनिल बागुल यांना वाटतो.

 

 ------- प्रवर देशपांडे 

#तन्वीअमित 

Thursday 17 September 2020

माही वे - अनटोल्ड स्टोरी

 


साधारणतः चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी दुबईतल्या भावाकडे गेलो होतो.

एके दिवशी, माझ्या पुतणीशी छान गप्पा सुरु होत्या क्रिकेटवरून.

तिने मला विचारले तुला कोणता क्रिकेटर आवडतो ?

मी म्हणालो लेडीज फर्स्ट ! तूच सांग.

ती लगेच उत्तरली नो डाउट, सचिन !!

हं काका आता तू सांग ? मीही लगेच उत्तरलो नो डाउट, धोनी !!

तिला खूपच आश्चर्य वाटले.

धोनी नुकताच उदयाला आला होता. गांगुली अजूनही कप्तान होता.

धोनी युग सुरु व्हायचं होत. मग ह्याला धोनी इतका का आवडतो.

तिने मला कारण विचारले.

मी लगेच यादी दिली, बायको मला जशी किराणा आणण्यासाठी देते तशी.

धोनी ७ नंबर टीशर्ट वापरतो. माझी बर्थडेट ही ७ आहे.

तो विकेटकिपर आहे, मी पण माझ्या लहानपणी विकेटकिपरच होतो.

तो रांची सारख्या निमशहरी भागातून आला मी पण.

त्याच्या डोक्यावरचे केस गेले, दाढी पांढरी झाली.

माझी केस काय वेगळी आहे का?

ती हसायला लागली खो खो ...

माझं काम झालं होतं.

मी सहजपणे कुणाला तरी आनंद देऊन गेलो होतो.

धोनी गेली अनेक वर्षे तेच तर करत होता.

सव्वासो करोड भारतीयांना आनंद देण्याचे !

मला क्रिकेटच्या आकडेवारीत अजिबात रस नाही. कुणी किती रन्स केल्या, किती विकेट घेतल्या. काय करायचाय असला हिशेब?

आपलं कसं, सगळंच बेहिशेबी !

पण धोनीच्या बाबतीत मी एकच आकडा लक्षात ठेवलाय.

रतन खत्रीच्या मटक्यासारखा, ओपन क्लोज- १

icc क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव (१) कॅप्टन, ज्याने भारतासाठी सगळ्या ट्रॉफ्या उचलल्यात !

1 नंबर माणूस!!

माही, निवृत्तीनंतरचा तुझा पुढचा वेसुखाचा जावो ह्याच शुभेच्छा ... माही वे

anilbagul1968@gmail.com


खळ्यादार’ कल्याणी

 खळ्यादार’ कल्याणी

ती कॉलेजच्या ऑफिसमध्ये शिरली, की स्टाफची धांदल उडायची.
बापरे ... कल्याणी मॅम आल्या.
मला कळायचे नाही, हे लोक तिला एव्हढे वचकून का राहतात?
मग कुणीतरी सांगितले की तिने सगळ्यामध्ये धाक निर्माण केलाय, ती मॅनेजमेंटची जवळची नातेवाईक आहे म्हणून. आणि तिला वाटलं तर ती तक्रार करू शकते.
बहुधा दहा वर्षे झाली असतील ह्या गोष्टीला.
हा असा 'गाजवे'पणा तिच्यात अगदी ठासून भरलेला.
मनस्वी, स्वछंदी जगण्याची पुरेपूर आवड, त्याला चंचलतेची किनार.
'पॅथॉलॉजी' क्षेत्रातील शिक्षण आणि त्यातील कामाचा प्रदीर्घ अनुभव.
आजच्या 'करोना महामारी'च्या काळात हा अनुभव पणाला लावून आज ती उभी आहे 'कोविड योध्या'च्या रुपात ! महापालिकेच्या 'टेस्टिंग डिपार्टमेंट'मध्ये चाळीसहुन अधिक स्टाफ सोबत ती लढते आहे लढाई !! जीवाची बाजी लावून आपली 'कमिटमेंट' पूर्ण करतांना ती विसरलेली असते घरसंसार.
पण मला खात्री आहे,
कामाच्या धबडग्यात वेळ मिळाला की डबा खातांना ती मनातल्या मनात नक्की गुणगुणत असणार,
‘वारदात’ चित्रपटातल्या, तिच्या आवडत्या गाण्याच्या ओळी...
तू मुझे जानसे भी प्यारा है !
तेरे बीन जग सारा सुना है !
अशा वेळी कपाळावर येणाऱ्या कुरळ्या केसांच्या बटांना दूर सारतांना, गालावरच्या खळ्यांचे सौंदर्य अधिकच खुलत असणार !!
अशा ह्या 'खळ्यादार’ कल्याणीस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

anilbagul1968@gmail.com




Like
Comment
Share

Thursday 16 April 2020

अलकाताई





''काय कुशाग्रबुद्धी?'' - अलकाताई
''बोल मंदबुद्धी! - मी

आमच्या प्रत्येक दिवसाच्या भेटीची सुरवात, ह्याच संवादाने ठरलेली असायची. अलकाताईचं घर आमच्या शेजारचंच. म्हणजे तसं, आम्ही त्यांच्याच घरात रहात असू, भाडेकरु म्हणुन ! पण घरमालकीणीची मुलगी, असल्याचा रुबाब तिने कधी दाखवलाच नाही. तसा तिने कसलाच रुबाब दाखवला नाही म्हणा.
वयाने १२-१५ वर्षाने बहुदा ती मोठी असावी ती. न चुकता दरवर्षी राखी बांधायची ती मला. पण मला ती माझी मैत्रीणच वाटायची. ह्याच कारण तीच वागणं ! माझ्या वयाची होऊन ती खेळायची माझ्याबरोबर! आमच्या स्वीट कॉटेजच्या घराभोवती प्रशस्त आंगण होतं, बाग होती छान फुललेली. अंगणात झोपाळा. हे सारं, आमचं दोघांच विश्व असायचं. मग झोपाळ्यावर खेळणं. अंगणात किल्ला बनवणं व्हायचं. लगोरी कधी, तर कधी लंगडी-कबड्डी व्हायची. थंडीच्या दिवसांत सकाळी सकाळी निवांत गप्पा व्हायच्या ऊन खात खात.
खाण्याच्या बाबतीत अलकाताई खूप चोखंदळ.
'' काय मामी, आज गूळपोळीचा बेत वाटतं.'' असं म्हणत अलकाताई आमच्या घरात, थेट स्वयंपाक घरात घुसायची. मग तव्यावरची गरम गरम पहिली गुळपोळी कोणी खायची? यावरून तिचं नि माझं भांडण व्हायचं. मग आई, तव्यावरून पोळी उतारावतांनाच दोन भाग करून आम्हा दोघांना वाढायची, भांडण नको म्हणून. तर कोणाच्या वाट्याला मोठी पोळी? यावरून आमचं भांडण व्हायचं!

मग पुढे ती कर्जतला जाऊ लागली, बी एड करण्यासाठी. अन अचानक तिच लग्न ठरलं! माझ्यापेक्षा मोठी, ती इतक्या लवकर कशी झाली मला कळलंच नाही!! आमचं स्वीट कॉटेज सोडून ती गेली थेट कोकणात, मुरुडला. मला मग आमचं घर-आंगण, तो झोपाळा, ती बाग परकी वाटू लागली.
लग्नानंतर ही, दरवर्षी, न चुकता तिची राखी यायची. आम्ही नेरळला असेतो!
नंतर कधीतरी माझं नेरळ सुटलं. नाशिकला आलो. घर-संसार, उद्योग-व्यवसायात व्यस्त होत गेलो. आताशा पत्रव्यवहारच एकूण थांबलेले, अन तिचा फोन नंबर नव्हता माझ्याकडे. त्यामुळे संपर्क तुटलेला होता काल-परवापर्यंत.

मागच्याच आठवड्यात ‘कोकणात’ जायचा प्लान ठरला, अन मला अलकाताई आठवली. विचार केला तिला सरप्राईज भेट देउयात.
मुरुडला गेलो. लोकांना विचारत विचारत तिचं घर शोधलं.
''अलकाताई sss'' फाटकातून आत शिरतांना मी हाळी दिली.
‘’कोण? कुशाग्रबुद्धी का?’’ घरातून आवाज आला.

‘सरप्राईज’ व्हायची पाळी माझ्यावरच आली होती.

anilbagul1968@gmail.com

मन मनास उमगत नाही, आधार कुठे शोधावा



कुठून सुरवात करायची ह्या सुन्न मनाने?
अंतरा आणि मुखडा तर सर्वांनाच याद असतो गाण्याचा. जन्म आणि मृत्यु लक्षात असल्यासारखा. पण जगण्याच्या मधल्या ओळींचं काय? त्या तुम्ही कश्या म्हटल्या त्यावरच तर ठरतं, तुमच्या वन्समोअरचं.

पण मला पूर्ण खात्री आहे, आज जरी तुझं गाणं थांबलं असलं, तरी गाण्याचा आणि जगण्याचा वन्स मोअर तुला नक्की मिळणार आहे. जगण्याची तुझी मैफिल पूर्ण भरात आली असतांना, रसिकांचा रसभंग करण्याची इच्छा त्या नियतीला तरी कशी असणार?

काल परवाचीच तुझी पोस्ट, फेसबुकवरची. विचारत होतीस साऱ्या दोस्तांना, कोणते चॉकलेट्स आणू अमेरिकेतून तुमच्यासाठी? मी नकळत लिहून गेलो,त्या पैकी काही नको मला, तुझा आवाज देता आला तर बघ.आज माझं मन मलाच खातय. आवाज असा कुणी कुणाला देऊ शकतो का? किती हा माझा मूर्खपणा.

तुझा मखमली आवाज, हे नियतीने तुझ्या पदरात टाकलेलं अमूल्य दान होतं. माझ्या फाटक्या झोळीत ती भेट कशी मावणार होती?
जगण्यातली तुझी सळसळ, स्वतःला सिद्ध करण्याची प्रचंड उर्मी, अफाट परिश्रमाची तयारी, आणि झोकून देण्याची वृत्ती. ह्या साऱ्या गोष्टी कुठल्या कुठे घेऊन गेल्या तुला. तुझ्या मधुर आवाजाची गोडी, रसिक मनांत पाझरायला आताशा सुरवात झाली होती. मन धागा धागा म्हणत किती माणसं जोडलीस सहजपणे.

कितीकांची मने रिझवलीस तू मेंदीच्या पानावर गाऊन. पिंगा ग पोरी पिंगा गात कित्येक रसिकांना तुझ्या गाण्याभोवती पिंगा घालायला तू भाग पाडलस.
अशी जीवन गाण्याची मैफील ऐन भरात असतांना, तानपुऱ्याची तार तुटल्यासारखी तू अचानक, मैफिल सोडून का जावस?
बघ कुठून तरी दूरवरून तुझेच स्वर माझ्या कानात रुंजी घालतायत.
रात बाकी, बात बाकी, होना है क्या... हो जा ने दो!!

तुझी अखेरची पालखी निघतांना, तिचे भोई होतांना मी मात्र नकळत गुणगुणतोय....
मन मनास उमगत नाही
आधार कुठे शोधावा?

anilbagul1968@gmail.com

Saturday 3 November 2018

‘हुदलीकर’





''सर  ! इझी आहात  का बिझी आहात ?''
फोनवर हुदलीकर प्रसन्न आवाजात विचारात होते.
''बोला किती वाजता भेटायचं !''

माझं तत्परतेचं उत्तर; साऱ्या औपचारीकारात बाजूला सारत !
ह्यापूर्वी दोन भेटी झाल्या होत्या, आणि हुदलीकरांनी आपल्या मोकळया - ढाकळ्या  स्वभावाने आता त्याची गरजही ठेवली नव्हती.

 ''संध्याकाळी ७ वाजता भेटूयात, आमच्या फार्महाऊस वर जाऊयात", हुदलीकर.
ठरल्याप्रमाणे हुदलीकरांची गाडी घ्यायला आली, मी गाडीत शिरलो. गाडीत शिरताच, एका वेगळ्याच वासाची तीव्र जाणीव झाली. झटकन खिशातून रुमाल काढला आणि नाकाला लावला.

सर, तुम्ही कोकणातले, माशांचा वास सहन होत नाही? सुके बोंबील आहेत 'इव्हा'साठी ! 'इव्हा'ला बोंबील फार प्रिय. फार्म हाऊसवर जातांना प्रत्येक वेळी न्यावेच लागतात. आणि ही हाडकं 'लुसी'साठी. दुपारी घरी मटणाचा बेत होता. त्यातलीच काही ठेवलीत. हुदलीकरांच्या ह्या खुलाशाने 'इव्हा' आणि 'लुसी' ह्या प्राणिमात्रांचा मी लगेच अंदाज बांधला.

एव्हाना गाडी सातपूर पर्यंत आली होती. ड्राइव्हरला त्यांनी गाडी, भाजी बाजारापाशी घ्यायला सांगितली.

चला, असे मला म्हणत, हुदलीकर एक मोठी कापडी पिशवी घेऊन उतरले. पाठोपाठ मी. सातपूरच्या भाजीबाजारात, सायंकाळच्या त्या गर्दीत ते शिरले, झटपट चालत एका दुकानापाशी थांबले.

“मावशे, कशी आहेस?” असे सलगीने विचारात, कांदे -बटाटे, कोथींबीर, आलं, लसूण, कढीपत्ता असे असंख्य जिन्नस त्यांनी अवघ्या सात-आठ मिनिटात पिशवीत जमा केले.चला, असे मला परत म्हणत, हुदलीकर गाडीच्या दिशेने चालू लागले, पाठोपाठ मी. 

पुढच्या दहा मिनिटांत गाडी दुडगाव फाट्यावर पोहचली. फार्महाऊसवर खत मारावं लागणार आहे. एक गोणी २१-३९ युरिया आणि एक पिशवी फॉस्फेट घेऊन ये, 'खांदवे'च्या दुकानातून, हुदलीकरांनी ड्रायव्हरला सांगितले. असा सारा जामानिमा गोळा करत गाडी फार्म हाऊस वर पोहचली. 

गेटपाशी गाडीचा आवाज ऐकून 'इव्हा' आणि 'लुसी' जोडीचे मोठमोठ्या आवाजात भुंकणे ऐकू यायला लागले. ड्रायव्हरने हॉर्न वाजवायला सुरवात केली. हुदलीकर खाली उतरून 'हणम्या, हणम्या असा पुकारा करू लागले. गेटच्या पलीकडून एका लहान मुलगा हातातली काठी गेटवर आपटत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण ह्या सगळ्या ‘आवाजी लगीनघाईत’ तो काय सांगतोय ते कळेनासे झाले होते. न राहवून मी हुदलीकरांच्या खांद्यावर थापटत, त्यांचे त्या मुलाकडे लक्ष वेधले. त्याने कुलुपाची चावी दिली. ड्राइव्हरने कुलूप खोलून गेट उघडले आणि आम्ही आत गेलो. त्या मुलाचा बाप - हुदलीकरांचा हणम्या - दारू पिऊन 'फीस' होऊन पडला होता.

हुदलीकर आत शिरताच 'इव्हा' आणि 'लुसी' दोघीनीं त्यांच्याकडे धाव घेतली. एकीने त्यांना चाटायला सुरवात केली. एक त्यांच्या छातीवर पाय टेकवू लागली. मग हुकलीकरांनी सुके बोंबील, हाडकं त्यांना यथेच्छ खाऊ घातलं. एकीकडे त्यांचं त्यांना कुरवाळणे, लाड करणे त्यांच्याशी गप्पा मारणे सुरु होतेच.उसंत मिळताच हुकलीकरांनी 'हणम्याच्या बायकोला 'जिजा’ला भाजीची पिशवी सोपवत, स्वैपाक बनविण्यास सांगितले.

 मग त्या काळोख्या रात्री, विजेरीच्या प्रकाशात, हुदलीकरांनी मोठ्या उत्साहात संपूर्ण फार्म हाऊस, दाखवला; अगदी बारीक सारीक तपशिलांसह. एव्हाना हणम्याच्या पोरानं टेबल खुर्च्या मांडल्या आणि सरते शेवटी आमची गप्पांची बैठक सुरु झाली. हुदलीकरांनी बरोबर एक मोठीशी चामडी पिशवी आणली होती. असंख्य कागदांनी ओसंडून वाहत होती ती. त्यातील एक एक कागद बाहेर काढत एकाहून एक सरस कविता ते ऐकवत राहिले. कविता अर्थपूर्ण तर होत्याच, पण हुकलीकर त्या साभिनय गाऊन म्हणत होते. त्यांची शब्दांवरची हुकमत जाणवत होती. आता हुदलीकरांची ही ओळख नव्याने होत होती.

बऱ्याच वेळाने जेवण ताटांमध्ये वाढून जिजा घेऊन आली. ज्वारीच्या चुलीवरच्या गरमागरम  भाकऱ्या- पिठलं, कांदा आणि मिरचीचा ठेचा असा फक्कड बेत. आता रात्र बरीच झाली होती. हवेतला गारवा वाढला होता. कान आणि पोट दोन्हीही तृप्त झाले होते. विलक्षण भारावून मी घरी परतलो होतो.

त्यानंतर, अशा अनेक रात्री हुदलीकर फार्म हाऊस वर नेत गेले. तृप्त मैफिलीचा अनुभव प्रत्येक वेळी देत गेले.

‘कुटुंबवत्सल’ हुदलीकर व्यवसायाने बिल्डर. सिव्हिल इंजिनीरिंगच रीतसर शिक्षण घेतलं त्यांनी. एकूण बिल्डर जमात 'कर्तृत्वाने' बदनाम असली तरी हुदलीकर सचोटीने व्यवसाय करत आलेले. ‘इंदिरानगर’ भागा मध्ये अनेक ईमारती त्यांनी उभारलेल्या. प्रत्येक इमारतीचं नामकरण वैशिष्ठ्यपूर्ण, सुरवात त्यांच्या पत्नीच्या नावाने. चैत्र दीप, चैत्र नक्षत्र, चैत्र अमुक चैत्र तमुक.कोणतंही पाठबळ नसतांना, गरीब घरातल्या, वडिलांविना वाढलेल्या माणसाने स्वकर्तुत्वाने मिळवलेलं हे यश अद्भुतच !
पण एवढ्यावर थांबतील तर ते हुकलीकर कसले ?

दिवसभर रेती विटांमध्ये बुडालेले हुदलीकर, सायंकाळनंतर प्रतिभेचे अद्भुत रंग भरत असतात. कविता, चित्रपट गीते, लावण्या, कथालेखन, कथाकथन इतकंच काय तर मराठी गझला ! साहित्य विश्वातली त्यांची हि भरारी थक्क करून जाते !! सर्वाधिक लांबीच्या मराठी गझलेचं रेकॉर्ड-गिनीज बुकमध्ये त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १० डिसेंबर २०१० ला १० वाजून १० मिनिटांनी स्वतःच्या १० पुस्तकांचं प्रकाशन करणं. मृत्यूवरच्या कविता संग्रहाचं, स्मशानभूमीत प्रकाशन करणं. खुनाबद्दल जन्मठेप भोगून आलेल्या कैद्याला स्वतःच्या फार्महाऊसवर बोलावून आत्मकथन करवून घेणं...  अशा अनेक काहीशा विक्षिप्त वाटणाऱ्या कल्पना त्यांच्या मेंदूत सतत घोळत असतात !

 परवा बोलता बोलता मी त्यांना सहज डिवचत म्हटलं, एव्हढं सगळं करून मिळवायचं काय तुम्हाला?
एका क्षणात हुदलीकर तडफेने म्हणाले होते, " ह्यापुढचं ज्ञानपीठ माझ्या नावाचं असेल !"
त्यावेळच्या त्यांच्या चष्म्याआडच्या काळ्याशार डोळ्यातली चमक मला असह्य झाली होती.
नुसत्या आठवणीने आत्ताही अंगावर सर्रकन काटा आला.

anilbagul1968@gmail.com
   
   

Wednesday 31 October 2018

बाई





अंगणात चालून दमल्यामुळे धाप लागलेल्या बाई, आठवतात मला अजून.
दर गुरुवारी कानिफनाथांची आरती करतांना, बाई कशा तल्लीन व्हायच्या, तेही आठवतंय मला.

नातवांना गोष्टी सांगणाऱ्या बाई. 
बागेत कोणती फुलं, कशी फुलली आहेत ते काळजीनं पाहणाऱ्या बाई.

हिवाळ्यातल्या कित्येक सकाळी, 'स्वीट कॉटेज'च्या अंगणात गप्पा मारत, कित्येक उन्हं, आम्ही घेतलीत अंगावर दोघांनी.

बाई काय नव्हत्या ?
नेरळच्या माध्यमिक शाळेच्या नावाजलेल्या मुख्यपाधिका राहिलेल्या होत्या बाई.
समाजवादी विचारांच्या बाई, संस्कार वर्ग चालवायच्या. 
स्वाध्यायीही होत्या बाई.

पुढे जाऊन नवीन शाळाच काढली बाईंनी !
अहो, बाईंचा एकूण आवाका फार मोठा होता.

अरे मी तुम्हाला सांगितलंच नाही बाईंविषयी जास्तीचं.
त्यांच्या माझ्या नात्याविषयीच.
चुकलंच माझं. बाईंचा विषय आला की होतं माझं असं.  

माझंच काय, माझ्या घरच्या सगळ्यांचंच होत असणार !
खात्रीच आहे मला तशी. 
बाई होत्याच तशा.

बाई म्हणजे धोंगडेबाई.
दादरच्या शिवाजी पार्काजवळ बाईचं माहेर. माहेरचं नाव देवधर.
घरात सेवादलाच वातावरण.
एम. ए. विथ इंग्लिश शिकलेल्या बाई, लग्नानंतर धोंगडे झाल्या.
अन नेरळला आल्या राहायला, कायमच्या.

बाई, आमच्या घराच्या मालकीण.
म्हणजे आम्ही रहात होतो त्यांच्या मालकीच्या घरात.
साधारण पस्तीस वर्ष.

आज सांगावं लागतंय त्या मालकीण होत्या घराच्या ते.
हा, पण बाईंनी कधी जाणवू दिलं नाही ते शेवटपर्यंत.
हेच तर त्याचं  मोठेपण !

बाई सोशल होत्या आणि नव्हत्याही. एकारलेपण आवडायचं त्यांना.
बाई गप्पा मारायच्या खूप पण अबोलही होत्या बाई.

बाई छोट्या छोट्या गोष्टीत रस घ्यायच्या.
तशा बाई विरक्तही होत्या संसारापासून.
बाई कठोर होत्या, पण मनाच्या एका कोपऱ्यात मायेचा ओलावा जपला होता बाईंनी.



बाई, माझ्या आईशिवाय जगू शकल्या असत्या का ?
माहीत नाहीं. पण बाईंमुळे, आई जगू शकली हे मात्र तितकं खरं.

बाईंनी मला काय दिलं?
बाईंनी मला काय नाही दिलं ?

बाईंनी मला वाचायला शिकवलं, अभ्यासाव्यतिरीक्त.
बाईंनी मला विचार करायला शिकवलं. वैचारीक मशागत केली माझी.
लिहिण्याची प्रेरणा दिली मला बाईंनी !

आज बाई असत्या तर मला बघून काय वाटलं असतं  बाईंना ?

अहं, नाही सांगता येणार.
कारण बाईसारखा विचार फक्त बाईच करू जाणे !
बाई, वेगळ्याच होत्या, एव्हढं मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो.

बाकी सगळं, बाईचं जाणोत !!

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...