Thursday 16 April 2020

'कोंडूर्‍या'क गाऱ्हाणं...




शेवटी वाट वाकडी केलीच मी ! होतच माझं हे असं अधूनमधून !! चैनच पडत नाही मुळी,असं केल्याशिवाय. मग काय, तीन दिवसांचा कोकण दौरा ठरवलाच, तो ही भर मुसळधार पावसात !

तळकोकणातील भोगवे, निवती, खावणे, वायंगणी, सावंतवाडी, तुळस, खानोली, पाडगावकरांचं वेंगुर्ले आणि चि. त्रं. खानोलकरांचं कोंडुरं !! असा सारा प्रवास.

ह्या साऱ्या भटकंतीत मनात भिरभिर होती, ती फक्त आणि फक्त कोंडूऱ्याची ! कानांत साद होती ती कोंडूर्‍याच्या सागर लाटांच्या गाजेची !!

का बोलावलं असेल मला कोंडुऱ्यांनं?
खरं तर मला काही नको होतं कोंडुऱ्याकडून, पण त्यालाच काही द्यायचं होतं का?
खानोलकरांच्या कोंडुरा कादंबरीतल्या 'पद्मनाभ'चं आणि माझं काय नातं लागत होतं?
प्रश्नाचां भुंगा घेऊन मी कोकणात वेड्यासारखा फिरत होतो.

सागरेश्वरचा निर्मनुष्य आणि स्वच्छ सागरकिनारा आवडत होता, पण भावत नव्हता. खेमसावंतांचा सावंतवाडीतला देखणा राजवाडा, भुलवत होता पण खिळवत नव्हता.काय होतंय कळत होतं, पण का कोण जाणे कोंडूऱ्याला जायचं धाडस मात्र होत नव्हतं.

वेंगुर्ल्यात वाजत गाजत गणपती पुजले जात होते गणेश चतुर्थीच्या सकाळी. आणि चर्चमध्ये मी, एकटाच येशूच्या मूर्तीसमोर भ्रमित होऊन उभा ! येशूसमोरची माझी प्रार्थना, त्या वरद विनायका पर्यंत पोचली असेल का? चर्चच्या घंटेने मी भानावर येतो.

सायंकाळच्या अवचित वेळी, तुळस गावच्या जैतीर मंदिरात गाभाऱ्यात असतो मी भारल्यागत !
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा.....व्हय म्हाराजा, मूळचे तुळस गावचे कदम, मुंबईतून खास तुझ्यापायाशी आलेत, गाऱ्हाणं घेऊन.
... व्हय महाराजा !!
साऱ्यांच्या एकसाथ आवाजाने मी भानावर येतो.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सारं फिरून झालेलं असतं. आता मात्र वेळ झालेली असते कोंडूऱ्याची ! मनाची बेचैनी वाढवणारी, असह्य हुरहूर जीवघेणी ! दुपारच्या वेळेचं वेतोबाच गाऱ्हाणं कानात अचानक घोंगवतय !!
देहासक्त असूचीचा मनभवरा, भुंग्याने रुंजी घातल्यागत भिरभिरु लागला अचानकसा !!
शरीरावरची त्वचा ओढ दिल्यागत आकसून ताण असह्य करणारी.
हे असं का व्हावं ?

कोंडुरा गावची रस्त्याच्या कडेलगताची पाटी नजरेने हलकेच वाचलेली असते. सहा सात मिनिटांचा जीवघेणा प्रवास, रस्त्यावरच्या खड्डयांनी अधिकच ताणलेला.गाडीचा दरवाजा आपसूक उघडला जातो, अन नकळत मी गाडीच्या बाहेर पडतो.

बेभान मनानं पावलांना इशारा केलेला असतो. झप झप वेग वाढत जातो. जवळपास धावतच अनामिक ओढीने मी समुद्राच्या दिशेने जाऊ लागतो. अवघ्या काही क्षणांत निसरड्या वाटेवरून आवेगात पोहोचतो कड्याच्या टोकाकडे.

समोरचं अलौकिक दृश्य नजरेत साठवण्यासाठी नजर भिरभिर करू पहात होती. कड्याखाली काळ्याशार दगडांची उतरंड. समुद्राच्या फेसळलेल्या लाटा आवेगात त्यांच्या भेटीला येत होत्या, एकामागोमाग ! पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या थेंबानी त्या दगडांना न्हाऊ माखु घालत होत्या जणू !!

थोडं भानावर आल्यावर, नजर आसपास गेली. इथं तर हिरव्यागार रंगांच्या विविध छटांचा गवती गालिचा !! त्यातून हलकेच डोकावणारी पिवळी धम्मक नाजूकली रानफुले, मनबावरी !!!
किनाऱ्यावरच्या कबऱ्या मऊशार वाळूवर, किंचित काळेशार गर्द हिरव्या माडाच्या झाडांनी, आभाळ पेललेलं !

ह्या निसर्गाच्या भावविभोर खेळात, आता भर घालतो तो वरुणराजा ! निळ्याशार आकाशात काळसर ढग अचानक गर्दी करू लागतात. टप्पोरे टप्पोरे पांढरे शुभ्र पाण्याचे थेंब खाली सोडू लागतात. थोड्या वेळाने पावसाचं जमा झालेलं पाणी डोंगरकड्यावरून खाली समुद्राच्या दिशेने येऊ लागतं. जणू हिरव्या शालूवर मोत्यांच्या माळा घातल्यागत !

आता पाळी असते ती सूर्यनारायणाची !!
ऊन सावलीचा त्याचा नेहमीचा हुकमी खेळ आता तो सुरु करतो. सूर्याच्या किरणांनी, खाली पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला मग सोनेरी मुलामा चढला जातो.
एखादं सुंदर निसर्गचित्र पहावं, तसंच काहीसं !

भोवताचं सौंदर्य टिपून गच्च भरलेले डोळे पायावर खिळताच, वीज कोसळावी तसा देह सळसळतो. पाय नकळत मागे खेचला जातो. इतकावेळ कड्याच्या शेवटच्या टोकावर मी उभा असतो ! आणखी एक पुढलं पाऊल, हे खालच्या कातळ खडकावरलं कपाळमोक्ष करणारं ठरलं असतं.

जैतीर मंदिरातलं पुजाऱ्याने घातलेलं गाऱ्हाणं, आता आपसूक ओठावर येत असतं.
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा..... पार नाशिक येथून, मनात रुतून बसलेलं, वर्षनुवर्षीच गाऱ्हाणं घेऊन आले असा. त्यांचा गाऱ्हाणं तू कबूल कर रे म्हाराजा ... व्हय म्हाराजा..... !! ...
व्हय म्हाराजा.....मनातल्या असंख्य कल्लोळानी एकसुरी जयघोष केलेला.

देवी सातेरीने आशीर्वादासाठी पाठीवर हात ठेवल्याचं जाणवतंय आणि रवळनाथानेही प्रार्थनेला स्विकार केल्याचा भास होतोय.

पण... पण खानोलकरांच्या कादंबरीतला कोंडुरा गाऱ्हाणं ऐकून आशीर्वाद दिल्यावर, भक्ताच्या नकळत त्याच्याकडची एखादी गोष्ट काढून घेतो. कोंडुऱ्याने माझं असं काय काढुन घेतलं असेल?
विचाराने आलेल्या काट्याने शहारलेलं अंग अजूनही तसंच आहे !

अजूनही शहारलेलंच आहे.

anilbagul1968@gmail.com

सो व्हॉट ? सो व्हॉट ?




वर्तमानाच्या पाठीला भूतकाळ हा चिकटून असतोच असतो. त्याची 'अनुभवाची काठी' करुन रोजचं जगणं सुखकर करायचं असतं, खरंतर. पण काहींच्या बाबतीत होतं भलतंच. त्यांच्या अनुभवांची काठी न होता, त्याचं होतं भलंमोठ्ठं गाठोडं ! सुखदुःख्खाच्या प्रसंगांनी कोंबून भरलेलं !! त्याच्या ओझ्याखाली दबून जात, ओढग्रस्त जीवन जगत असतात बिच्चारे ! त्यात परत, एखादा चटका लावणारा कटू प्रसंग, होऊन बसलेली असते भळभळणारी जखम. शोभा गुर्टुच्या ''उघड्या पुन्हा जहाल्या... जखमा उरातल्या'' गाण्यासारखी. त्याची खपली निघत असते अधून मधून, वर्तमानाला रक्तबंबाळ करणारी !

तर, आजच्या कथेतली आपली नायिका आहे नामांकित वकील. पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित स्त्रियांची बाजू घेऊन त्यांना न्याय मिळू देऊ पाहणारी. दारुड्या नवऱ्यामुळे संसार उघडा पडलेल्या, उच्चभ्रू, यशस्वी उद्योजक पतीच्या बाहेरख्यालीपणामुळे त्रस्त झालेल्या, नपुंसक, नामर्द जोडीदारामुळे वैफल्य ग्रस्त झालेल्या. अशा साऱ्या सख्यांच्या, घटस्फोटाच्या केसेस यशस्वीपणे लढणारी.

पण हाय रे दैवा ! तिच्याही पाठीवर असतं, ते वर वर्णन केलेलं गाठोडं. त्यातली तीच्या बालपणीची, स्वतःवरचा बलात्काराच्या प्रसंगाची जखम भळभळत असते. त्यामुळे तिचं आणि पर्यायाने तिच्या नवऱ्याचं, अर्थात आपल्या कथानायकाचं 'सेक्सलाईफ' ही समस्या बनलेलं. सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट सुरु असते. झालेल्या बलात्काराचा प्रसंग तिनेच तपशीलवार लिहून काढणे, मनावर तीव्र आघात केलेल्या प्रसंगातली धार बोथट होईपर्यंत ! हि असते ट्रीटमेंट !!
ह्या सगळ्यात नवऱ्याची होणारी मनाची घालमेल, शारीरिक उपासमार ह्यावर उपाय म्हणजे नवऱ्याने घटस्फोट घेणे, असा तीच सुचवते पर्याय. त्याला अर्थातच, नायकाचा नकार. ''प्रेम आणि सेक्सलाईफ ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मी मनापासून प्रेम करतो तुझ्यावर.'' नायकाचं तिला ठाम उत्तर.

मग चार-आठ दिवस दोघांनी वेगळं राहण्याचं ठरतं त्यांचं. आपला नायक त्याच्या गावी जातो रहायला. तिला जेव्हा वाटेल, तेव्हाच तिने त्याला फोन करून बोलवायचं असंही ठरतं. चार दिवसांनीच, तिचा त्याला फोन येतो. त्याच्या शिवाय करमत नसल्याचा. असं काय घडतं चार दिवसात?

दरम्यान, तिची एक केस सुरु असते कोर्टात, घटस्फोटाची. हाय प्रोफाइल केस. नवरा मोठ्या जाहिरात कंपनीचा मालक, तर बायको असते, एकेकाळची 'मिस इंडिया' !! पदरी एकूलतीएक मुलगी, मात्र ती असते गतिमंद. तिच्या जन्मानंतर पत्नी वैफल्यग्रस्त बनलेली.

नायिका केस हरते. विरोधात निकाल गेल्याने, ती बायको नायिकेच्या अंगावर धावून जाते. तिला धक्काबुक्की करते. तो नवरा तिला कसंबसं सोडवतो. थकून भागून नायिका घरी येते. बिछान्यावर अंग टाकते. सारं अंग ठसठसत असतं, मानेची वेदना असह्य होत असते. इतक्यात दरवाजा ठोठावला जातो. दारात, आजची केस जिंकलेला तो नवरा ! ती आश्चर्यचकीत !!

बोलता बोलता तो तिची मान ठीक करतो ... हलका मसाज करुन. शरीरावर असा हलका हात फिरवूंन, त्याला कुरवाळून दुखरा भाग बरा होतो. मनातल्या जखमेचं काय ? ती त्याला विचारते.

जाता जाता तो उपाय देऊन जातो. मनाच्या जखमेला असं कुरवाळत बसायचं नसतं. त्या जखमेला सहज झटकून टाकायचं, प्रश्न विचारून...
सो व्हॉट ? सो व्हॉट ?

आपलं मनच, मग बोलतं अशा कटू आठवणींना ... चल हट, चल फूट !!
गोष्ट तर आवडलेली असेलच तुम्हाला. पण ही कथा पडद्यावर तितकीच जिवंत उभी राहते आपल्यासमोर, 'फायरब्रॅन्ड’ ह्या मराठी चित्रपटातून ! कथा, दिग्दर्शन सबकुछ अरुणा राजे असलेला 'फायरब्रॅन्ड', नेटफ्लिक्सवर नक्की पहा.

anilbagul1968@gmail.com

अलकाताई





''काय कुशाग्रबुद्धी?'' - अलकाताई
''बोल मंदबुद्धी! - मी

आमच्या प्रत्येक दिवसाच्या भेटीची सुरवात, ह्याच संवादाने ठरलेली असायची. अलकाताईचं घर आमच्या शेजारचंच. म्हणजे तसं, आम्ही त्यांच्याच घरात रहात असू, भाडेकरु म्हणुन ! पण घरमालकीणीची मुलगी, असल्याचा रुबाब तिने कधी दाखवलाच नाही. तसा तिने कसलाच रुबाब दाखवला नाही म्हणा.
वयाने १२-१५ वर्षाने बहुदा ती मोठी असावी ती. न चुकता दरवर्षी राखी बांधायची ती मला. पण मला ती माझी मैत्रीणच वाटायची. ह्याच कारण तीच वागणं ! माझ्या वयाची होऊन ती खेळायची माझ्याबरोबर! आमच्या स्वीट कॉटेजच्या घराभोवती प्रशस्त आंगण होतं, बाग होती छान फुललेली. अंगणात झोपाळा. हे सारं, आमचं दोघांच विश्व असायचं. मग झोपाळ्यावर खेळणं. अंगणात किल्ला बनवणं व्हायचं. लगोरी कधी, तर कधी लंगडी-कबड्डी व्हायची. थंडीच्या दिवसांत सकाळी सकाळी निवांत गप्पा व्हायच्या ऊन खात खात.
खाण्याच्या बाबतीत अलकाताई खूप चोखंदळ.
'' काय मामी, आज गूळपोळीचा बेत वाटतं.'' असं म्हणत अलकाताई आमच्या घरात, थेट स्वयंपाक घरात घुसायची. मग तव्यावरची गरम गरम पहिली गुळपोळी कोणी खायची? यावरून तिचं नि माझं भांडण व्हायचं. मग आई, तव्यावरून पोळी उतारावतांनाच दोन भाग करून आम्हा दोघांना वाढायची, भांडण नको म्हणून. तर कोणाच्या वाट्याला मोठी पोळी? यावरून आमचं भांडण व्हायचं!

मग पुढे ती कर्जतला जाऊ लागली, बी एड करण्यासाठी. अन अचानक तिच लग्न ठरलं! माझ्यापेक्षा मोठी, ती इतक्या लवकर कशी झाली मला कळलंच नाही!! आमचं स्वीट कॉटेज सोडून ती गेली थेट कोकणात, मुरुडला. मला मग आमचं घर-आंगण, तो झोपाळा, ती बाग परकी वाटू लागली.
लग्नानंतर ही, दरवर्षी, न चुकता तिची राखी यायची. आम्ही नेरळला असेतो!
नंतर कधीतरी माझं नेरळ सुटलं. नाशिकला आलो. घर-संसार, उद्योग-व्यवसायात व्यस्त होत गेलो. आताशा पत्रव्यवहारच एकूण थांबलेले, अन तिचा फोन नंबर नव्हता माझ्याकडे. त्यामुळे संपर्क तुटलेला होता काल-परवापर्यंत.

मागच्याच आठवड्यात ‘कोकणात’ जायचा प्लान ठरला, अन मला अलकाताई आठवली. विचार केला तिला सरप्राईज भेट देउयात.
मुरुडला गेलो. लोकांना विचारत विचारत तिचं घर शोधलं.
''अलकाताई sss'' फाटकातून आत शिरतांना मी हाळी दिली.
‘’कोण? कुशाग्रबुद्धी का?’’ घरातून आवाज आला.

‘सरप्राईज’ व्हायची पाळी माझ्यावरच आली होती.

anilbagul1968@gmail.com

एका लग्नाची पुढची गोष्ट ...






ही गोष्ट आहे मनिषाची, अहं मोरुच्या मनिषाची.
आता तुम्ही म्हणाल, ''हा मोरु कोण?''
अहो हा मोरु आहे आपला नेहमीचाच आवडता, गेल्या २९ वर्षांपासून अधून मधून भेटत राहणारा. फार पूर्वी 'मोरूच्या मावशी' बरोबर भेटलेला, 'टूरटूर करणारा 'ब्रह्मचारी'. 'गेला माधव कुणीकडे' विचारणारा, ‘चार दिवस प्रेमाचे’ गात, 'एका लग्नाची गोष्ट' सांगणारा. आजवर, जवळपास ११००० वेळा आपल्याला भेटला आहे तो ! 'साखर खाल्लेला माणूस', लब्बाड कुठचा !! बघा ना कसा 'गारुड' घालतो समोरच्यावर ! लग्नाच्या पुढच्या गोष्टीविषयी सांगायचं, तर त्याचीच गोष्ट सांगत बसलो. असो.

तर ही आहे, 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. तिसरी घंटा वाजली वाटतं. पडदा तर उघडतो, एका घराचा सेटही दिसतो, पण घरात कुणीच नाही !
आपली कविता मेढेकर (च्या मारी, हिचं वय वाढतच नाही का काय?) याहीवेळी 'मनिषा' बनून चक्क प्रेक्षकांमध्ये दिसते. परसदारी फिरत फिरत, गप्पा मारल्यासारखी संवाद साधतेय, तिच्या लाडक्या प्रेक्षकांशी ! अशा संवादातून कथानक पुढे न्यायची आयडीया भन्नाटच !!

नाटकाचा विषय खरं तर विनोदी नाही. तो आहे स्त्रियांच्या 'मेनॉपोझ' विषयीचा. चाळीशी ओलांडली की, सर्व स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या 'त्या' फेजनंतर, तिच्या भावविश्वात होणारी उलाघाल, स्त्रीत्व हरवून दुर्लक्षित पडल्याची भावना. नवऱ्याचं आपल्याविषयी आकर्षण संपणार, त्याचं आसपास लक्ष जाणार, ह्या विचारांनी, तिची होणारी चिडचिड. अशा काळात आपल्या जोडीदाराची साथ मिळायला हवी अशी तिची अपेक्षा. पण नवरा त्याच्या ऑफिसच्या ‘वर्कप्रेशर’ने कावलेला. संसाराच्या नव्या नवलाईच्या काळात तिच्या विषयी असणारं आकर्षण आता उरलेलं नाही. ह्यावर कळस म्हणजे, त्या घरात राहणारी मनिषाची, घटस्फोटीत मोठी बहीण ! आयुष्यात राम उरला नाही, त्यामुळे ‘दुखीकष्टी’ असल्याचं बेअरिंग छान पकडून राहणारी. हे बेअरिंग मात्र गळून पडतं ‘बियर’ची अक्खी बॉटल रिचवल्यावर ! असो. घटस्फोट ही आपल्या घराण्याची खानदानी परंपरा आहे, आणि ती आपल्याप्रमाणे मनिषानेही जतन करावी अशी तिची धारणा. तुमच्या घरात असं वातावरण असतांना, जे घडलं असतं ते इथे घडत नाही. कुठेही रडारड नाही, आदळआपट नाही.

लग्नाचा विसावा वाढदिवस, नवरा नेमका विसरतो. तो ऑफिस मधून घरी येतो तोचमुळी संतापून. मनीषाने ‘सेलेब्रेशन’ची केलेली तयारी वाया जाते. तिचा मूडऑफ होतो. बंगलोरला शिकण्यासाठी राहणारा मुलगा, तीला हयावरचा उपाय सांगतो. तो उपाय अमलात आणण्यासाठी ती मोरूच्याच ऑफिसात काम करणार्‍या सहकाऱ्यांकडून ‘गेमप्लॅन’ करते. तिच्या ह्या खेळीत मोरु अलगद अडकतो, आणि आपण नाटकात. प्रशांत दामले म्हटलं की गाणं ओघाने आलंच. तो ते हुकमीपणे गाऊन घेतो. संवादाच्या अचूक टायमिंगने तो हशा आणि टाळ्या भरपूर वसूल करून घेतो. अतुल तोडणकर देखिल ह्यात कमी पडत नाही. घरातली बायको म्हणजे चारचाकी गाडी. तिच्याबरोबर एखादी 'ऍक्टिव्हा' अर्थात एखादी मैत्रिण सोबत ठेवायची. मग माणूस बोअर होत नाही. तर 'ऍक्टिव्हा' मुळे सगळा भार एकट्या गाडीवर मग पडत नाही. मग बायकोही’ रीलॅक्स. अशी त्याची थेअरी.

आपल्याला बुवा ही थेअरी पक्की पटली. तुमचं काय?

anilbagul1968@gmail.com

या सुखांनो या ...






फेसबुकाच्या भिंतीवरती खरडायचो काही-बाही. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया यायच्या, लिखाण आवडल्याच्या. मग एक दिवशी 'कोंडूर्‍याक गाऱ्हाणं' लिहिलं. माझ्या आवडत्या, तळकोकणातील प्रवासावरचं लिखाण होतं ते. खूप सारे लाईक्स मिळाले त्याला. माझं गाऱ्हाणं, कोंडूर्‍यापर्यंत पोहचलं की नाही कोणास ठाऊक? पण, 'महाराष्ट्र टाईम्स'पर्यंत मात्र नक्की पोहचलं. संपादक शैलेंद्रजी तनपुरे ह्यांचा अचानक फोन आला, ‘’सदर लिहायचंय तुम्हाला.’’

मी उडालो. खरं तर सुखावलो होतो, खोटं का बोला. आता प्रश्न होता, काय लिहायचं? सदराला नाव काय द्यायचं? एक मात्र नक्की होतं, जे लिहायचं ते हलकं फुलकं आणि खुसखुशीत हवं. त्यातून नाव सुचलं, जीरा बटर !

मग लिहिता झालो. लिहिता लिहिता सुचू लागलं. पण, माझ्या पक्क लक्षात होतं, लोकं आज-काल फारसं वाचत नाहीत म्हणून. मग ठरवलं हे लिहिलेलं टाकायचं, फेसबुकाच्या भिंतीवर. ‘नाशिक टूडे’ ग्रुपवर शेअर देखिल केलं. लाईक्स आणि कमेंट्स यायला लागले.

पण माझ्या आईची तक्रार होती, तिच्या पर्यन्त हे जात नाही अशी. माझ्या आईला वयोमानांनुसार अंधुक दिसू लागले आहे. तिचे वाचन त्यामुळे थांबले आहे. तिच्यासारखीच बहुतेक सार्‍या ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिति आहे. माझं लेखन त्यांच्या पर्यन्त पोहचवं, त्यांना वाचंनांनंद मिळवा म्हणून, निरनिराळ्या स्नेहींकडून वाचन करवून घेवून, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचे माझ्या आईसह, सार्‍यांनी कौतुक केले. माझी पत्नी मनिषा, स्नेही प्रज्ञा भोसले–तोरसेकर, मनिषा कोलते, आर्कि. स्मिता लहारे-कुलकर्णी, प्रा. सिद्धार्थ धारणे, नेहा खरे, मनिषा रतीलाल बागुल ह्या सार्‍यांचे त्याकरीता आभार. संगणक तज्ञ ओंकार गंधे सर आणि त्यांच्या टीमने हे सारे रेकॉर्डिंग केले होते, त्यांचेही आभार.

करियर यशस्वी होण्यासाठी योग्यवेळी ‘ब्रेक’ मिळणं, आवश्यक असतं. उशिरा का होईना, पण तो मिळाला, हेही नसे थोडके. त्याकरिता महाराष्ट्र टाईम्स, नाशिक, त्याचे संपादक शैलेन्द्रजी तनपुरे सर, क्रिएटिव्ह हेड, प्रशांत भरविरकर ह्यांचे खूप खूप आभार. लिखाणाला सतत प्रोत्साहन देणार्‍या, संतोष आणि चैत्रा हुदलीकर, विनायक रानडे ह्यांचेही आभार. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या वाचक स्नेहींचे मनापासून धन्यवाद !!

ह्या आभाराच्या कार्यक्रमात, ‘मूळ कथानका’चा शेवट सांगायचा राहिलाच ...

एकुलत्या एका लेकीचं-स्वरालीचं लग्न, यथासांग पार पडलं आहे. त्यामुळे नवरा–बायकोच्या संसाराची कहाणी सुफळ-संपूर्ण झाली आहे. पण बायकोला आता वेध लागलेत नातीच तोंड पाहायचे ! तर नवरोबाला त्याच्या गावी जायचंय !! सिंधुदुर्गातील, वेंगुर्ल्याजवळच्या ‘भोगव्या’ला, त्याला राहायचंय. तिथल्या लाल मातीचा मृद्गंगध, त्याला आता व्याकूळ करतोय. लाल जांभा खडकाचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटतोय. नारळी–पोफळीच्या बागा, आंबा–फणसाची, काजू करवंदाची झाडं, त्याला खुणावतायत. सकाळच्या न्याहारीला पांढरीफेक ‘घावानं’ त्याला खावीशी वाटतायत. पापलेट, रावस, बांगडा त्याच्या स्वप्नात येतात. ‘कोंबडीवडा’ खाण्याचे डोहाळे त्याला सुचतायत. कोकम सरबताची, सोलकढीची त्याला आताशा, तहान लागलीय. कुठल्याश्या अनामिक ओढीने, किनाऱ्याकडे सतत धाव घेण्याऱ्या लाटांची गाज, त्याला ऐकायची आहे. त्या निळ्या-हिरव्या पाण्यात त्याला डुंबायचंय, अगदी मनसोक्त ! पांढर्‍याशार वाळूंचे किल्ले त्याला बांधायचेत. त्याचं ‘स्वप्नातलं राज्य’ निर्माण करण्यासाठी !!

त्याच्या ह्या ‘स्वप्नाच्या राज्यात’, कुणीच दुःखी-कष्टी नसेल. ‘चार घास खाण्यासाठी कुणीच तरसत नसेल. आनंदाच्या चार क्षणांनी मग आनंदभुवन तयार होईल. मग तुम्ही-आम्ही सारे गाऊ लागू ...
या सुखांनो या !

anilbagul1968@gmail.com

मोठं व्हायची घाई






क्राऊनिंग ग्लोरी :
‘अंदरसूल’च्या माळरानावर बाया बापड्यांची तोबा गर्दी लोटली होती. पिटातल्या तंबूत, उत्साह ओसंडून वहात होता. टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांचा पाऊस पडत होता. कार्यक्रमही तसाच होता म्हणा. 'पॅन एशिया पॅसिफिक सौंदर्य स्पर्धा' घेण्यात आली होती राव. असा कार्यक्रम घेणं म्हंजे, येऱ्या बगाळ्याचं कामच नाही. मौजे बुद्रुक अंदरसूल ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. सरपंच बकुळाताई आणि उपसरपंच बबनराव ह्यांचा मोठा पुढाकार होता त्यात. साऱ्या पंचक्रोशीत म्हणजे नगरसूल, कोल्पेवाडी, गुळवंच, दापूर, नांदूरशिंगोटे, इथे प्राथमिक फेर्‍या घेण्यात आल्या होत्या. आज तर ‘ग्रँड फिनाले’ होता. नामदार झोडगे-पाटील आणि नृत्यबिजली मंदाताई सातारकर जातीने हजर होते, प्रमुख पाहुणे म्हणून. नाशिकच्या ‘खर्जुले मळा’ इथं राहणार्‍या ‘मिसेस वर्ल्ड २०१९,’ ‘प्रियंका’ ह्या सेलेब्रिटी गेस्ट होत्या. स्पर्धेच्या शेवटी, विजेत्या तरुणींना मानाचा चंदेरी मुकुट, त्यांच्याच हस्ते प्रदान करण्यात आला.

पळा पळा कोण पुढे पळे तो :
डिसेंबर महिन्यातील एका रविवारची सकाळ. हवेत प्रचंड गारठा. त्याला न जुमानता शेकडो स्त्री-पुरुषांची सातपूरच्या महापालिकेच्या मैदानावर उपस्थिती. साऱ्यांच्या अंगावर पिवळ्या रंगाचे टी शर्ट्स. स्टेजवर मोठ्ठा फ्लेक्स, 'यलोथॉन रन' ! आठ जणींचा एक ग्रुप झुम्बा करतोय. समोरचे सारे त्याला 'फॉलो' करतायत. मग सूत्रसंचालक खूप साऱ्या सूचना देतो. कुठल्या 'एज ग्रुप' करीता, किती किलोमीटरची 'रन' आहे. सेल्फी पॉईंट कुठे आहे. सर्टिफिकेट्स आणि मेडल्स कुठून घ्यायची आहेत. मग ढोलपथक सलामी देतं. सेलेब्रिटी हिरवा झेंडा दाखवतात. मग पळापळ होते. सेल्फी पॉईंट्सवर मेडल आणि सर्टिफिकेट्ससह सेल्फी काढल्या जातात. ग्रुप फोटोसेशन होते. पटापट फेसबुकावर स्टेटस अपडेट होते. लाईक्स अन कमेंट्सचा मित्रपरिवाराकडून वर्षाव होतो.

पुरस्कार फिरस्कार :
जुन्या नाशकातील ‘तिळभांडेश्वर लेन’ इथलं, ‘दुर्गा मंगल कार्यालय’ आज तुडुंब भरलं होतं. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, अखिल भारतीय विविध लघुत्तम उद्योग संघटनेच्यावतीने, नऊ यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. ‘नवलघुत्तम उद्योजिका पुरस्कार’ असं पुरस्काराच नाव. एक पिटुकला मुमेंटो, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं पुरस्काराचं स्वरुप. एका पाठोपाठ, नऊ ‘पुरस्कारप्राप्त’ महिलांची घोषणा होते. त्यांच्याबद्दलची माहिती सूत्रसंचालक देत जाते. पूजनीय ‘अमुक महाराज’ पुरस्कार प्रदान करत जातात. महिला सक्षमीकरण, जेंडर इक्व्यलिटी, निर्भया, नारीशक्ती अशा शब्दांना घेऊन सारे भाषणे ठोकतात. 'सन्मानित नवदुर्गा'सोबत आयोजक छानसा फोटो काढून घेतात. मंडळाचा सेक्रेटरी, एक हुकमी बातमी तयार करतो. सगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयाकडे, एखादा उत्साही कार्यकर्ता ती पोहोचवतो.

पहिल्या प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे, अशा सौंदर्यस्पर्धा गल्लोबोळीत, होवू लागल्या आहेत. अतिशय सुमार दर्जाचं आयोजन, आणि आर्थिक देवाण-घेवाणावर आधारीत स्पर्धेचे निकाल. अपवाद सोडल्यास सगळीकडे हेच चित्र. दुसर्‍या प्रसंगात लिहिल्याप्रमाणे, अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या बहुतांशी उत्सवी प्रकारच्या असतात. खेळाचा प्रसार वगैरे दुय्यम, तर चमकोगिरीच अधिक. त्यातही आर्थिक नफ्याचं गणित सामवलेलं. तिसरा प्रसंग म्हणजे हमखास खेळला जाणारा हातखंडा प्रयोग. शहरात, जवळपास प्रत्येक सभागृहात रंगवला जात असतो अधून मधून. अशी पारितोषिके वाटतांना, अभ्यास करून निवड, वगैरे भानगडच नाही. हा, पण काही प्रतिष्ठेची पारितोषिके मात्र याला अपवाद.

वरील तीनही प्रसंग, थोड्याबहुत फरकानुसार, आपल्या आजूबाजूला घडतांना, आज दिसतात. मात्र अशा प्रसंगात एक साम्य असते, ‘मागणी तसा पुरवठा’ ! आज प्रत्येकाला, सर्वांच्या अधिक पुढे जायचं आहे. सर्वांपेक्षा अधिक मोठं व्हायचं आहे. तेही अगदी 'हुक ऑर क्रूक' !! मग त्यासाठी, काहीही मोजायची प्रत्येकाची तयारी !!! मग याचा फायदा, आयोजक उचलतात, आर्थिक हितसंबंध जोपासतात. फसवणुकीचे अनेक प्रकार यात घडतात.

यशस्वी होण्याच्या स्पर्धेत, सर्वस्व पणाला लावून धावतांना, थांबायची गरज असेल तर, ते नेमकं कधी आणि कुठे? हे कळायला हवं. काय मिळवायचंय? हयापेक्षा ते का मिळवायचंय? ह्याचा सजगतेने विचार, हा व्हायलाच हवा.

anilbagul1968@gmail.com

लेक माझी अभिमानाची




हैदराबादच्या ‘डॉ. प्रियांका रेड्डी’ प्रकरणाची बातमी सगळीकडे फ्लॅश होते. बायकोच्या पोटात धस्स होतं. स्वराली, सध्या हैदराबाद इथंच राहते. हैदराबादच्या एका आयटी कंपनीत ‘प्रोग्रॅमर’ म्हणून, नुकतीच ती जॉइन झाली होती. तिच्या सुरक्षेच्या काळजीने, बायकोची घालमेल सुरू होते. ती तातडीने, स्वरालीला फोन लावते. तिचा मोबाईल ‘स्विच ऑफ’ असतो. ती आणखी अस्वस्थ होते. ती लगेच नवरोबाला कॉल करते. नवरोबाही ‘त्या’ बातमीने, किंचितसा हललेला होताच, पण वरकरणी काळजीचं कारण नसल्याचं तो बायकोला भासवतो. तू चिंता करू नकोस, मी कंपनीच्या नंबरवर कॉल करतो. तो तिला दिलासा देतो. कंपनीच्या गेटमधून शिरतानांच, मोबाईल जमा करण्याची ‘कंपनी पॉलिसी’ असल्याचे नवरोबाला, फोनवर कळते.

मग संध्याकाळी, ते दोघे स्वरालीला फोन करतात. फोन लागतो पण कॉल घेतला जात नाही. व्होडाफोनवाली बाई काहीतरी, 'तेलगू’त सांगत राहते. ऑफिसमधल्या नायडू मॅडमला 'त्याचा' अर्थ, नवरा फोन करून लगेच विचारतो.
''अहो, तुमची मुलगी कॉल घेत नाहीये, नंतर कॉल करा, असं ‘तेलगू’त सांगत असतील. '' इति नायडू मॅडम.
आता मात्र, नवरा-बायकोचा धीर सुटतो. दोघेही थेट हैदराबाद गाठण्याची तयारी करतात. इतक्यात नवरोबाला फोन येतो.

‘’इज इट मि. शिरीष? आय अॅम महेश बाबू–पोलिस कमिशनर ऑफ हैदराबाद. टॉक विथ यूवर ब्रेव्ह डॉटर. शी हॅज डन अ ग्रेट जॉब !’’

काय चाललंय काहीच कळेना नवरोबाला. बायको तर अधिकच धास्तावलेली, पोलिसांचा फोन आहे कळल्यावर.
‘’पपा मी स्वराली बोलतेय. काळजी करु नका, मी सुखरुप आहे. मम्मीला लगेच सांगा. ती काळजीत असेल.'' स्वराली.

''अगं पण झालंय तरी काय? तू पोलीसस्टेशनला कशी? ते पोलिस कमिशनर, तुला ब्रेव्ह डॉटर का म्हणाले?'' आणि तू फोन का नाही घेतलास? नवरोबाची घाईघाईने प्रश्नांची सरबत्ती.

पुढे अर्धा तास, स्वराली बोलत होती आणि नवरा-बायको, मोबाईल स्पिकरवर ठेवून ऐकत होते.

झालं होतं असं ...
स्वराली, संध्याकाळी कंपनीतून घरी येतांना टॅक्सिवाल्याने तिची छेड काढण्याचा प्रयन्त केला होता. स्वराली, टॅक्सित एकटीच होती. पण ती घाबरली नाही. प्रसंगावधान राखून तिने हुशारीने, टॅक्सिवाल्याला टॅक्सी थांबवायला भाग पडली. टॅक्सी थांबताच, तिने खाली उतरून त्याची धुलाई करायला सुरवात केली. धुलाई करतांनाच ती ‘हेल्प हेल्प’ असं ओरडत राहिली. ते ऐकून गर्दी गोळा झाली. इतक्यात पोलीस आले. आणि साऱ्यांची वरात पोलीस स्टेशनला. ‘पोलिस कमिशनर’ महेश बाबू ह्यांना सारी हकीकत कळली. त्यांनी स्वरालीचं तोंड भरुन कौतुक केलं. तिच्यासारखं प्रसंगावधान आणि धाडस इतरांनी दाखवलं, तर ‘महिला अत्याचार’ नक्कीच कमी होतील, असंही ते म्हणाले.

‘’पपा थँक्स. हे तुमच्या दोघांमुळे शक्य झालं. तुम्ही आणि ममीने माझ्यावर जे संस्कार केलेत, मला वागण्याची मोकळीक दिलीत, मुलगी म्हणून बंधनात नाही ठेवलत, माझ्यावर विश्वास ठेऊन एकटीला हैदराबाद इथं राहू दिलंत, त्यामुळे मला आत्मविश्वासाचं बळ मिळालं. आणि मग, आत्मसन्मासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. आणि पपा ह्या सगळ्या भानगडीत फोन नाही घेऊ शकले.’’ स्वराली.

ते सारं ऐकताच नवरा-बायकोचा जीव भांड्यात पडतो. अभिमानाने उर भरुन येतो. ''बघ, आपली लेक किती धाडसी आहे ते. आणि तू, विनाकारण तिची काळजी करत राहतेस !!'' नवरा, स्वरालीचं कौतुक करत बायकोला म्हणाला.

इतक्या वेळ लेकीच्या काळजीने, रडकुंडीस आलेली बायको, एकदम वेगळाच पवित्रा घेते.
''हूं SSS आहेच मुळी माझी लेक धाडशी. अभिमान आहे मला तिचा ! गुणांची पोर ती !!
हो, पण तुम्ही नका फुशारक्या मारु. ती तुमच्यावर नाही, माझ्यावर गेलीय म्हणून अशी आहे. तुम्ही ते ‘अळूचं फदफदं’ खाणारे, तुम्हाला मेला, एक उंदीर मारता येत नाही.'' बायको फणकारते.

anilbagul1968@gmail.com

सुखी संसाराचा मंत्र




तुमचं लग्न झालय? हो, मग हा लेख तुमच्यासाठीच.
काय म्हणता? तुमचं लग्न व्हायचय अजून? मग हा लेख तर तुमच्याचसाठी.
खानदेशी आहात? वर्‍हाडी? माणदेशी? मराठ्वाड्याकडचे? घाटावरचे की कोकणातले? तुम्ही कुठचेही असा, हा लेख खास तुमच्याचसाठीच !
असं काय करताय राव? ‘सुखी संसाराचा मंत्र’ सांगतोय की !!
सोळा आणे सत्य. चुकीचा ठरलो ना, तर सांगाल त्याच्या ढेंगे खालून जायची तयारी आहे आपली.
तर ऐका आणि तुम्हीच ठरवा.

शनिवारी रात्री, यथासांग ‘कार्यक्रम’ झालेला असल्याने, नवरोबा पलंगावर ‘सुशेगात’ होता. रविवारचे सकाळचे दहा झाल्याचे त्याच्या गावीही नव्हते. स्वैपाकघरात बायकोची लगीनघाई. पहाटे पाच वाजताच तिचे ‘मिशन ए पंगतभोजन’ सुरू झालेलं. त्यामुळे नवर्‍याचे अद्याप लोळत पडणं, तिला असह्य होत होतं. दर मिनिटागणिक तिच्या चिडचिडीला फोडणी मिळत होती. गॅसवर मटण रटरटत होतं, आणि तिच्या मनात संताप. ‘रश्या’ला शेवटची उकळी देऊन ती गॅस बंद करते आणि बेडरूमकडे मोर्चा वळवते.
‘’संसार सांभाळण्याचा ठेका जसा माझ्या एकटीचाच आहे. सण-वार, रीत-भात मीच पहायचे. पै-पाहुणे मीच जोडून ठेवायचे. तुम्ही मात्र खुशाल लोळत पडा.’’ बायको एका हाताने लाटणे फिरवत, तावातावाने बोलत होती. रणचंडिकेच्या अवतारातील तिच्या रूपात, जिभेवर मात्र सरस्वती खेळत होती.
आता नवरोबाची झोप, गोधडीच्या घडीतून अलगत कपाटात. घाईने तो बाथरूमचा आश्रय घेतो. शत्रूपक्षपासून बचाव करण्याकरीता, खंदकाचा आसरा घेतल्यागत. आजवरच्या अंनुभवातून बराच गनिमीकावा, नवरोबाने आत्मसात केलेला. शॉवरचं थंडगार पाणी त्याच्या डोक्यावर पडताच त्याच्या ‘डोस्क्यात’ प्रकाश पडतो. बायकोच्या ह्या अवतारामागच्या रहस्याचा, त्याला झटदीशी उलगडा होतो. आपली चूक त्याला उमगते. सपशेल माघार ! त्याचं धोरण ठरतं.
आजचा दिवस, बायकोच्या दृष्टीने खास होता. तिचा मावसभाऊ, बायका-मुलांसह दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित पाहुणा होता. भाऊ तिच्या हातच्या मटणाचा, फार चाहता होता. आणि अशा दिवशी नेमके आपण लोळत पडतो. आपल्यावर तर खास जबाबदारी होती, बाजारातून, ‘राणे डेअरीतून एक किलो आम्रखंड आणून द्यायची. ‘या खुदा, मै निकला गधा’, नवरोबा मनातल्या मनात, स्वतःला शिव्या घालतो. पैशाचं पाकीट, गाडीची किल्ली आणि कापडी पिशवी घेऊन सुमडीत कलटी मारतो.
त्याची ही नेहमीची खेळी, बायको चांगलीच ओळखून असते. तर तिकडे, ‘राणे डेअरी’तून आम्रखंड घेतल्यावरच, नवरोबा सुटकेचा निश्वास सोडतो. बायकोला खुश करण्यासाठी अजून काय करता येईल? तो विचार करतो आणि ‘मघई’ पान घेतो खास चांदीचा वर्ख लावलेलं.
इकडे घरी, बायकोच्या मावसभावाचं, त्याची बायको, मोठी मुलगी आणि धाकट्या मुलाचं आगमन झालेलं. बायको मोठ्या खुशीत त्यांचं स्वागत करते. ख्याली खुशाली होते. थोड्या वेळाने भाऊ नवरोबाची चौकशी करतो. मग काय बायकोची तक्रारीची ‘सीडी’ सुरू होते.
‘’मी आहे म्हणून हा संसार टिकून आहे. दुसरी कोणी असती ना, तर काही खरं नव्हतं.’’ अरे दादा तूच काही तरी समजावून सांग ह्यांना.’’
इतक्यात धापा टाकत नवरोबा हजर.
‘’सालेसाहेब आपले स्वागत असो.’’ आपल्यासाठीच खास आम्रखंड आणायला गेलो होतो. आपल्याच ताईच्या आज्ञेवरून ! आणि आपल्या ताईसाहेबांसाठी खास मघई पान. नवरोबा, मधाळ स्वरात बोलका पोपट होऊन जातो.

नवरोबाची ही ‘गेम चेंजर’ खेळी, ‘काफी असरदार’ साबीत होते. घरातलं वातावरण एकदम बदलून जातं. मावसभावाला नवरोबाच्या कौतुकाचं कोण भरतं येतं.
‘’काही म्हण पण ताई, तू नशिब काढलंस. किती करतात तुझ्यासाठी दाजी !’’
नवरोबा मिश्किल नजरेने बायकोकडे कटाक्ष टाकतो. नवर्‍याच्या झालेल्या अनपेक्षित कौतुकाने तिचा चेहरा पाहण्यासारखा होतो.

तेव्हा, संसार सुखाचा होणं फारसं अवघड नाही. फक्त मौनात केव्हा राहायचं आणि केव्हा बोलका पोपट व्हायचं हे समजायला हवं !
हाच तर आहे, सुखी संसाराचा मंत्र !!

anilbagul1968@gmail.com

लॉन्ग ड्राईव्ह



रविवारची रम्य सकाळ. हवेत गुलाबी थंडी. वातावरण अगदी प्रसन्न ताजे. तोच ताजेपणा बायकोच्या टवटवीत चेहेर्‍यावर. प्रेमगीताची प्रफुल्ल गुणगुण. मनापासून स्वैपाक चाललेला. लसणीचं लाल तिखट, करून झालेलं. बटाटे उकडून त्याचा कुस्कुरा करून, निगुतीने त्यात आलं-मिरचीचा ठेचा घालून बारीकसे गोळे करून ठेवलेले. नवऱ्याने न्याहारीची फर्माईश करण्याचीच फक्त वाट. अखेर नवरोबा तिला विचारतोच.
''अगं बायको, दे पटकन काहीतरी. खूप भूक लागलीय.''

नवरोबा मुडात असला की तो तिला 'अगं बायको' अशी हाक मारतो. बायको मनातल्या मनांत अधिक खुश होते. ती ख़ुशी तिच्या हालचालीत दिसू लागते. सफाईने ती पहिला घाणा काढते. लालसर पिवळे चार बटाटवडे प्लेट मध्ये येतात. सोबत लाल तिखटाची चटणी.
''घ्या तुमचे आवडीचे बटाटवडे. संडे स्पेशल.’’ बायको.
नवरोबाची कळी खुलते. बटाटवडे म्हणजे त्याचा जीव की प्राण. अधाशासारखे तो खात राहतो. सातवा वडा चेपल्यावर तो तृप्तीचा ढेकर देतो.
‘’व्वा ss बायकोबा मजा आला.‘’ नवरोबा.
तो खूपच रंगात आला की बायकोला हमखास ‘बायकोबा’ म्हणतो.

‘हीच ती वेळ.’ बायको मनात म्हणते.
‘’अहो, ऐका ना. वातावरण कित्ती छान आहे ना. असं वाटतय ना, कुठेतरी मस्त फिरायला जावं. ए शिरू, जावूयात लॉन्ग ड्राईव्हला?’’ बायको लाडीक आवाजात विचारते.
सात बटाटावड्यांच्या आस्वादाने, सुखाच्या सातव्या ‘आसमान’वर असलेला नवरोबा, लगेच मान डोलावतो.

जव्हार घाटाचा निसर्गरम्य परिसर. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ. मधूनच कुठे कुठे रानफुले डोकावतायत. कधी पांढरी कधी पिवळी. कुठे रंगीत तेरडा फुलून आलेला. दूर कुठे डोंगरावर, मोत्याच्या माळा मिरवल्यासारखा एखादा पाण्याचा ओघोळ. निसर्गाच्या ह्या अनुपम रूपाने मूड खुलत गेलेला.

‘’चांदण्यात फिरतांना माझा धरिलास हात’’... आशाचा मखमली स्वर ‘होंडा सिटी’त डेकवर ऐकू येऊ लागला. नवरा-बायकोच्या मनात दिवसा-उजेडी चांदण्यांनी प्रेमाची पखरण घालायला सुरवात केली. सुमन कल्याणपुरकर सुमधुर आवाजात गात होत्या. ‘’केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर हा’’... दोघ्यांच्याही मनात संसारसुखाच्या गोड आठवणींचा मोर थुई थुई नाचू लागला. मग कधी लता, कधी किशोर येऊन गाऊ लागले. जगजीत सिंह स्वतः आले. ‘होशवालोंको खबर क्या’… गझल पेश करून गेले. दोघेही त्यात दंगून गेले. मग आठवणींची मैफल रंगू लागली. एक एक रम्य आठवणी अलगद उलगडू लागल्या.

दोघांची झालेली पहिली भेट, त्याला आठवली. तिला, त्याने दिलेली पहिली भेट आठवली. मग साधेपणाने झालेले लग्न आठवले. जातीभिन्नतेमुळे नातेवाइकांनी फिरवलेली पाठ आठवली. मोजकेच, पण भक्कमपणे जवळ उभे राहिलेले स्नेही आठवले. कोकणात, त्याच्या गावी झालेला हनिमून दोघांना आठवला. पहिल्या रात्री वीज गेल्यावर, तिने हासडलेली शिवी आठवली. मग दोघेही मनमुराद हसले. त्यावेळी हसले होते अगदी तस्से. लग्नांनंतरचे, नव्या नवलाईचे दिवस आठवले. त्याने तिला, अपरिचित असलेलं कोकण दाखवलं. त्याने नंतर नाशिक पहिलं, अनुभवलं, आणि आपलंसही केलं. पुढे, स्वरालीच्या जन्माचा क्षण त्यांना आठवला. दोघांनाही भरून आलं. लाडाकोडात वाढलेली स्वराली, आता मोठी झालीय. तिच्या लग्नाचं आता बघायचय. विचाराने बायकोचे डोळे पाणावले. नवरोबाने हलक्या हातांनी बायकोला थोपटले. तिचे डोळे पुसले.

स्वरालीला कुठल्या जातीचा मुलगा पाहुयात? नवरोबाने तिला हलकेच प्रश्न केला. तिने त्याच्या चेहर्‍याकडे फक्त पहिलं. त्याने, तिच्या डोळ्यातलं वाचलं. जणू ती म्हणत होती, आपण पहिली होती का जात? सुखाने संसार करतोच आहोत ना? देवाने जन्माला घालताना, माणूस म्हणून घातले. तुम्ही, आम्ही, ह्या समाजाने, जाती-धर्माच्या, भेदाभेदाच्या भिंती उभ्या केल्या. त्या अमंगळ विचारांनी माणसामाणसात गट-तट पडले. उच्चनीचतेचे गंभीर कोडे तयार झाले. कधीही न उलगडणारे. आपण का अडकायचं त्यात?

आपल्याला फक्त, स्वरालीला समजून घेणारा, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा हवा. तिच्या संसाराचा प्रत्येक क्षण, सोहळा करणारा हवा. मग असुदे, कुठलीही त्याची जात !!

anilbagul1968@gmail.com

सोमवार पासून...


सोमवार पासून...


गोविंदनगरच्या ’चैत्र संतोष’ सोसायटीच्या आवारात बायको घामाघूम होत शिरते. पाठोपाठ नवरोबा. लिफ्ट बंद असल्याची ‘सुवार्ता’ सोसायटीचा वॉचमन तत्परतेने देतो. बायकोच्या चेहऱ्यावर लगोलग आठ्यांचं जाळं पसरतं. आता तीन मजले चढायचे. म्हणजे साठ पायऱ्या. सुखवस्तू झालेल्या बायकोला लिफ्टची सवय. व्यायाम, योगा, डायट, जॉगिंग आदी शब्द बायकोच्या शब्दकोषातून केव्हाच गायब झालेले. त्यामुळे वीस वर्षाच्या संसारानंतर संसारसुख देहावर व्यापून होतं. साठावी पायरी चढेतो तिची कोण फे फे उडालेली. हाश हूश करत, कपाळावरचा घाम पुसत ती सोफ्यावर फतकल मारते. तर रोजच्या जिने चढण्याच्या सवयीने नवरोबा अगदी आरामात तीन मजले चढून केव्हाच घरात आलेला.
‘’ह्या ''सोसायटीवाल्यांना कामं नकोत करायला. फुकटचे चेअरमन, सेक्रेटरी झालेत लेकाचे. आम्ही पैसे मोजतो मेंटेनन्सचे. चिंचोके नई काई !'' बायको भलतीच उखडली होती.
सावज आता शिकारीच्या टप्य्यात आलंय, नवरोबाने अचूक हेरलं.
''त्या सोसायटीवाल्याना दोष देते आहेस, पण स्वतःच्या देहाकडे पहा जरा. सगळीकडंनं, सुटली आहेस मैद्याच्या पोत्यासारखी ! चालण्याची सवय नाही राहिली, तीन जिने चढतांना फा फू होते आहे. चांगलं नाही लक्षण !!'' नवरोबाने अचूक बाण सोडून सावज जेरीस आणलं.
‘’माझ्याबरोबर रोज ‘आकाशवाणी’ शेजारच्या जॉगिंग ट्रॅकवर यायचं.’’
नवरोबाने दूसरा बाण सोडला. सावज आता पुरते गारद. मग संध्याकाळी दोघेही 'डिकॅथलॉन'मध्ये. दोन ट्रॅक सूट, एक स्पोर्ट शूज, टॉवेल, वॉटर बॉटलची उत्साहात खरेदी होते.

दुसर्‍या दिवशी, पहाटे नवरोबा तयार होतो, जॉगिंग ट्रॅकवर जाण्यासाठी. बायको मात्र आळसावून लोळत पडलेली. जॉगिंगला जाण तिच्या चांगलच जिवावर आलेलं.
‘’शिरू तू जा, माझं आणि माझ्या मैत्रिणीचं-स्मिताचं ठरलंय. आम्ही रोज संध्याकाळी जाणार आहोत.'' लाडीक आवाजात बायको.
संध्याकाळी बायको ट्रॅक सूट चढवून, स्पोर्ट शूज घालून ऐटीत लिफ्टने खाली येते. खाली स्मिता तिच्या होंडा सिटीत, गाणी ऐकत वाट बघत असते.
‘’ए रूपाली, ऐक ना, ‘इंद्रप्रस्थं हॉल’ मध्ये साड्यांचा सेल लागलाय, उद्याचाच दिवस आहे. आत्ता जाऊयात? '' स्मिता.
रूपालीला देखिल मोह आवरत नाही. ‘इंद्रप्रस्थं हॉल’मध्ये बायकांची तुडुंब गर्दी. गर्दीत शिरून दोघी चार चार साड्या खरेदी करतात. ‘कित्ती फायद्याचा झालाय सौदा’ अशा अविर्भावात दोघांची पावलं तिथल्या फूड स्टॉलकडे आपसूक वळतात. एक एक प्लेट रगडा पॅटीस, एक एक प्लेट पाणीपुरी हादडून होते. मग दोघींना आपण जॉगिंगला जाण्यासाठी निघालो होतो ह्याची जाणीव होते.
‘’ए, स्मिता, ऐक ना. तशी ही कुठल्याही कामाची सुरवात शनिवारी करूच नाही. उद्या रविवारच आहे. आपण सोमवार पासून जाऊयात जॉगिंगला’’. बायको.
‘’ हो हो नक्की जावुयात सोमवार पासून.’’ स्मिता.
सोमवारी सकाळीच नवरोबा ऑफिस टूरवर निघून जातो, आणि जॉगिंगची ‘टूम’ बोंबलते.

एके शनिवारी बायकोच्या घरी मैत्रीणिंची किटी पार्टी असते.
''अय्या लिना कसली बारीक झालीयस, करतेस काय?'' शलाका विचारते.
‘’ए लिना, सांग ना, सांग. सगळ्या जणी गलका करतात.’’
‘’अगं मी ना, कीनई ‘कीटो डाएट’ फॉलो करते. दहा दिवसात सहा किलो वजन उतरवलं.’’ लिना.
मग लिना, ‘कीटो डायट प्लान’ आणि त्याचे फायदे, सगळ्यांना समजावते. एव्हाना बायकोने सातवा गुलाबजाम मटकावलेला असतो.
‘’ए रूपाली, आपण ही फॉलो करायचं ‘कीटो डाएट’?’’ स्मिता.
‘’हो नक्की करुयात, सोमवार पासून.’’ इति बायको.
असे अनेक सोमवार येतात नी जातात. कधी ‘कीटो डाएट’, कधी ‘जि. एम’ डायट तर कधी ‘दिक्षित डायट’, असे अनेक फंडे मार्केटमध्ये हवा करून असतात.
असे अनेक सोमवार येतात नी जातात. कधी ‘झुंबा’, कधी ‘पिलाटे’ तर कधी ‘योगा’ ह्याची क्रेझ मार्केटमध्ये जोरात असते. पण रूपाली सारखच बहुतांशी लोकांचं पक्क ठरलेलं असतं.
सोमवार पासून ...

--- अनिल सुमति बागुल

येडा है पर मेरा है




''तुम्हाला व्यवहारातलं कवडीचं कळत नाही. केलेत ना लाखाचे बारा हजार ! तरी बरं, मी नेहमी तुमच्या कानी-कपाळी ओरडत असते, झटपट श्रीमंतीच्या मागे लागू नका.’’
'स्टॉपलॉस' हीट झाल्यासारखी अचानक बायको नवर्‍यावर सुटली होती. बायकोच्या आवाजात तीव्र चढ-उतार होत होता. शेअर्सच्या चढ-उतारीत लाख रुपये गमावून बसलेला नवरोबा, मुकाट ऐकून घेत होता.

त्यानंतर बरेच दिवस, नवरोबा गप्पं गप्पं असायचा घरी असला की. पण झटपट पैसे कमवण्याची त्याची 'खाज' त्याला फार काळ चूप ठेवेना. एके दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली 'ती' जाहिरात त्याने पाहिली. ’दोन वर्षात दामदुप्पट.' त्वरीत भेटा, श्रि. जिग्नेश ठक्कर - समृद्धी फायनान्स. नवरोबाचे डोळे लकाकतात. पन्नास हजार जर आपण गुंतवले तर दोन वर्षात लाख रुपये होतील. शेअर मार्केटमध्ये झालेला लॉस भरून काढता येईल. बायकोची बोलती बंद करण्याचा चांगला चान्स आहे, नवरोबा विचार करतो.

‘समृद्धी फायनान्स’च्या कार्यालयात नवरोबा भर दुपारी, रणरणत्या उन्हात पोहोचतो. दरवाज्यावरचा गुरखा, ‘सलाम शाब जी’ असं म्हणत, कमरेत झुकून त्याला कुर्निसात करतो. मग मोठ्या अदबीने काचेचा भला मोठा दरवाजा उघडून देतो. नवरोबाला इथंच जाम भारी वाटलेलं असतं. ‘एसी’ची थंडगार झुळूक त्याला भलतीच सुखावून जाते. तिथल्या पांढर्‍या शुभ्र गुबगुबीत सोफ्यावर तो विराजमान होतो.
‘’नमस्कार सर, मी मिस पारूल, मी आपली काय सेवा करू शकते?’’
रिसेप्शन काउंटरवरची तरुणी, मधाळ आवाजात नवरोबाला विचारते. अंगावरून मोरपीस फिरल्याचा त्याला भास होतो. तो तिला ’दोन वर्षात दामदुप्पट’ या जाहिरातीचं कात्रण दाखवतो. ती हसून मान डोलवते.

‘’या माझ्याबरोबर.’’ असं म्हणत मिस पारूल, नवरोबाला एका ऐसपैस आणि पॉश केबिनमध्ये घेऊन जाते. तिथे त्याची ओळख मायरा मॅडमशी करून देऊन निघून जाते.
‘’अगदी योग्य जागी आलात सर !, लोकं, शेअर मार्केटमध्ये लाखाचे बारा हजार करतात, पण आम्ही बारा हजाराचे लाख रुपये करतो. आमचे जिग्नेश सर फार एक्स्पर्ट आहेत शेअर मार्केट मधले. ही इज जिनियस जेम ! डोन्ट वरी मि. शिरीष, जस्ट इन्वेस्ट टेन लैखस अँड जस्ट फर्गेट ! आम्ही चेकने पैशे घेतो आणि चेकने परत देतो तेही डबल !! टोटल ट्रान्स्परन्सी !!! नवरोबाची अवस्था ‘हिप्नोटाइज’ झाल्यासारखी. आपसूक तो लाख रुपयाचा चेक, सही करून मायरा मॅडमकडे सोपवतो.

नवरोबा रात्रभर, पैसे दामदुप्पट झाल्याचे स्वप्न पाहत असतो. सकाळी मोठ्या उत्साहाने उठतो. चहा पिता पिता समोरचे दैनिक वाचायला घेतो. पेपरमधल्या हेड लाइनने तो जाम हादरून जातो. त्याचं अंग थरथरतं हीव भरल्यागत. त्याची ही अवस्था बायको मघापसून बघत असते. बायको त्याच्या जवळ येते. त्याच्या कपाळावर हात ठेवते. तिच्या हाताला चटका जाणवतो. नवरोबाला सटसटून ताप भरलेला असतो. ती त्याला जवळ घेताक्षणी तो स्फुंदून स्फुंदून रडायला लागतो. बराच वेळ ती त्याला रडू देते अन थोड्या वेळाने कारण विचारते. नवरोबा रडता रडता तो पेपर पुढे करतो आणि बोटाने ‘ती’ बातमी दाखवतो.
‘समृद्धी फायनान्स’ कार्यालयाला टाळे, संचालक फरार. हजारो लोकांचे गुंतवलेले कोट्यवधी रुपये बुडाले.
आता बायकोला उलगडा होतो. झटपट पैशाच्या मोहापाई, नवरोबाने पुन्हा ‘लाखाचे बारा हजार’ केले तर ! ती नवरोबाकडे रागाने पहाते. त्याच्या भोळ्या भाबड्या चेहेर्‍यावर अपराधी भाव पसरलेला, आणि डोळ्यांत मूर्तीमंत कारुण्य !! तिला भडभडून येतं. अचानक तिला ‘कुरकुरे’ची जाहिरात आणि त्याची टॅगलाईन आठवते, ‘’तेढा है पर मेरा है.’’

ती नवरोबाला आणखी जवळ घेते आणि त्याच्या कानात पुटपुटते,’’ येडा है पर मेरा है !!’’

anilbagul1968@gmail.com

मन मनास उमगत नाही, आधार कुठे शोधावा



कुठून सुरवात करायची ह्या सुन्न मनाने?
अंतरा आणि मुखडा तर सर्वांनाच याद असतो गाण्याचा. जन्म आणि मृत्यु लक्षात असल्यासारखा. पण जगण्याच्या मधल्या ओळींचं काय? त्या तुम्ही कश्या म्हटल्या त्यावरच तर ठरतं, तुमच्या वन्समोअरचं.

पण मला पूर्ण खात्री आहे, आज जरी तुझं गाणं थांबलं असलं, तरी गाण्याचा आणि जगण्याचा वन्स मोअर तुला नक्की मिळणार आहे. जगण्याची तुझी मैफिल पूर्ण भरात आली असतांना, रसिकांचा रसभंग करण्याची इच्छा त्या नियतीला तरी कशी असणार?

काल परवाचीच तुझी पोस्ट, फेसबुकवरची. विचारत होतीस साऱ्या दोस्तांना, कोणते चॉकलेट्स आणू अमेरिकेतून तुमच्यासाठी? मी नकळत लिहून गेलो,त्या पैकी काही नको मला, तुझा आवाज देता आला तर बघ.आज माझं मन मलाच खातय. आवाज असा कुणी कुणाला देऊ शकतो का? किती हा माझा मूर्खपणा.

तुझा मखमली आवाज, हे नियतीने तुझ्या पदरात टाकलेलं अमूल्य दान होतं. माझ्या फाटक्या झोळीत ती भेट कशी मावणार होती?
जगण्यातली तुझी सळसळ, स्वतःला सिद्ध करण्याची प्रचंड उर्मी, अफाट परिश्रमाची तयारी, आणि झोकून देण्याची वृत्ती. ह्या साऱ्या गोष्टी कुठल्या कुठे घेऊन गेल्या तुला. तुझ्या मधुर आवाजाची गोडी, रसिक मनांत पाझरायला आताशा सुरवात झाली होती. मन धागा धागा म्हणत किती माणसं जोडलीस सहजपणे.

कितीकांची मने रिझवलीस तू मेंदीच्या पानावर गाऊन. पिंगा ग पोरी पिंगा गात कित्येक रसिकांना तुझ्या गाण्याभोवती पिंगा घालायला तू भाग पाडलस.
अशी जीवन गाण्याची मैफील ऐन भरात असतांना, तानपुऱ्याची तार तुटल्यासारखी तू अचानक, मैफिल सोडून का जावस?
बघ कुठून तरी दूरवरून तुझेच स्वर माझ्या कानात रुंजी घालतायत.
रात बाकी, बात बाकी, होना है क्या... हो जा ने दो!!

तुझी अखेरची पालखी निघतांना, तिचे भोई होतांना मी मात्र नकळत गुणगुणतोय....
मन मनास उमगत नाही
आधार कुठे शोधावा?

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...