Tuesday 11 December 2018

लाल फितीचा कारभार - अर्थात रेडटेप !!




शासन व्यवस्था आणि तिचा एकूण कारभार, ह्याचं वर्णन एका वाक्यात कसं करता येईल ? 
तर सरकारी काम म्हणजे फायलींचा वर्षानुवर्षे रेंगाळणारा प्रवास  !
म्हणजेच लाल फितीचा कारभार - अर्थात रेडटेप !!

नको असलेल्या फायली, कधी त्यात अडकल्या जातात. कधी जाणीवपूर्वक अडकविल्या जातात.
तर हव्या असलेल्या फायली नको तितक्या जलदगतीने प्रवास करत पुढे दामटल्या जातात.
कारण काय तर ..
लालची  राजकारणी, धनदांडगे व्यापारी आणि भ्रष्ट नोकरशहा ह्यांच्या अभद्र युतीचा 'वेस्टेड इंटरेस्ट' त्यात असतो.

पण त्यांना हवी असलेली फाईल जर कोणी नोकरशहा जाणीवपूर्वक दाबून ठेवत असेल तर ?
तर ... संघर्ष अटळ असतो.  अन कधी कधी तो 'टोकदार'ही होत जातो.

हाच टोकदार संघर्षाच्या, दमदार लढ्याचा विषय आहे, 'रेडटेप' ह्या  पत्रकार अभिजित कुलकर्णी ह्यांच्या नव्या कोऱ्या कादंबरीचा. प्रस्तुत कादंबरी ही लेखकाची पहिलीवहिली साहित्यनिर्मिती आहे, हे पाहून अचंबित व्ह्यायला लागतं, हि वस्तुस्थिती.

मराठी वाडःमयात, एकूणच राजकारण ह्या विषयावरील, त्यातही शहरी राजकारणावर बेतलेल्या कादंबऱ्या तश्या हातावर मोजण्याइतक्या. त्यातही महत्वाच्या, 'आज दिनांक' ,'सिंहासन' आणि पडघम-'अस्वस्थ दशकाची डायरी ह्याच. त्या मांदियाळीत ही रेडटेप ह्यापुढे असेल असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

कादंबरीचा नायक, बांद्र्याचा जिल्हाधिकारी महेश राऊत,  ह्या संघर्ष लढ्यातले मुख्य पात्र. तर दै. प्रखरचा वृत्तसंपादक जया आणि त्याचा सहकारी अभि ह्या लढ्यातले त्याचे साथिदार. ह्यांचा लढा आहे तो प्रामुख्याने महसूल मंत्री कदम, आरोग्यमंत्री घोरपडे, ह्यांच्याशी. मंत्रालयातले चीफ सेक्रेटरींच्या मार्फत महेशला पायबंद करण्याच्या प्रयत्नात ते असतात. जोडीला मुख्यामंत्री, सांस्कृतिक मंत्री रोकडे, कदमांच्या उजवा हात सुरेश नाईक आणि महेशचा बॅचमेट रासकर आणि माहिती जनसंपर्क अधिकारी वर्षा.

प्रत्येक पात्रबरोबरचे संवाद लेखकाने खुमासदारपणे रंगवल्यामुळे ती जिवंत वाटू लागतात. हे सारं इतकं जमून आलंय की वाचकांनी त्या पात्रांना आपल्या आसपास शोधल्यास नवल वाटू नये. त्यातही 'वर्षा ' इतकी फर्मास उभी राहिली आहे त्याला तोड नाही ! तीच अघळ-पघळ अन प्रसंगी लाडिक बोलणं, तिची वेशभूषा, प्रसंग निभावून नेण्याची हातोटी लाजवाब !!  अशी 'वर्षा' जवळपास प्रत्येक ऑफिस मध्ये असू शकते, असं वाटावं इतकी हि 'वर्षा' चपखल उभी राहिली आहे.

बान्द्रातील सरकारी वसाहतींचा पुनर्विकास आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. सदरची फाईल ही जिल्हाधिकारी महेश राऊत ह्यांच्याकडे आहे. ती त्यांनी मंजूर करून लवकर मंत्रालयात पाठवावी ह्यासाठी शासनातील एक लॉबी प्रयत्नशील आहे. चीफ सेक्रेटरी हे महेशवर दबाव आणत आहेत. महसूल मंत्री कदम ह्यंची त्याकरिता चरफड सुरु आहे.  ह्या प्रस्तावातील काळबेरं,  हे महेशने ओळखले आहे. बिल्डरलॉबीचा कावा त्याच्या लक्षात आला आहे. त्याच्या प्रामाणिक मनाला ही गोष्ट पटलेली नाहीये. कोणत्याही परस्थितीत हा डाव त्याला हाणून पाडायचंय. त्यासाठी कोणताही दबाव झुगारून द्यायची त्याची मानसिक तयारी झालीये. आणि मग सुरुवात होते रंगतदार खेळाला...

हा खेळ आहे दोन प्रवृत्ती मधला. पैश्याच्या लालसेपोटी वखवखलेली बिल्डर लॉबी, नीती-अनीतीची कोणतीही चाड नसणारे राजकारणी आणि सहज विकले जाणारे सरकारी बाबू ही अभद्र युती पटाच्या एका टोकाला. तर, प्रामाणिक सरकारी अधिकारी आणि तत्वनिष्ठ पत्रकार पटाच्या दुसऱ्या टोकाला. दोन्हीकडून दुसऱ्याला मात देण्यासाठी चाली खेळल्या जातात. प्याद्यांचा वापर केला जातो. शेवटी बाजी कोण मारतं?

कथा पुढे सरकतांना राजकारण्यामधल्या परस्परांमधला शह-काटशह, नोकरशाही मधला सुप्त संघर्ष ह्याच बरोबरीने वृत्तपत्राजगतातील पत्रकारामधील कुरघोडी ह्या पटलावर नेमकेपणाने येतात.

शेवटच्या क्लायमॅक्समध्ये महेशला जाळ्यात ओढण्यासाठी लावलेल्या 'हनीट्रप'चं वर्णन फारच रंजक झालं आहे. त्यात आपला कथानायक गुंतू नये, अशी भावना वाचताना प्रत्येक वाचकाची होणार ह्यात शंका नाही.

कोणत्याच खेळीला महेश हार पत्करत नसल्याचे पाहून हताश झालेले वरिष्ठ अपेक्षेप्रमाणे महेशची बदली करतात. त्याही परिस्थितीत महेश लढा चालू ठेवतो.  त्या करीता मंत्रालयातल्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांचीही  त्याला साथ मिळते. त्या सर्वांनी मिळून आखलेला  प्लान एका अर्थाने यशस्वी होतो.

मुदलात सशक्त कथाबीज, ओघवती भाषा, घटनांचा वेग, ठसठशीत पात्रे, त्यांच्यातले खुमासदार संवाद, टोकदार संघर्ष, त्याकरीता रचलेले डावपेच ह्या साऱ्यामुळे कादंबरी वाचनीय आणि दर्जेदार झालीये. अभिजित कुलकर्णी ह्यांची हि साहित्यकृती म्हणजे पदार्पणातच ठोकलेले शतक ठरावे. त्यात मेहता पब्लिशिंग सारख्या विख्यात प्रकाशन संस्थेने निर्मिती करतांना कुठेही कसर ठेवली नाहीये. त्यामुळे ही कादंबरी 'बेस्ट सेलर ' ठरल्यास आश्चर्य वाटू नये.

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...