Wednesday 31 October 2018

बाई





अंगणात चालून दमल्यामुळे धाप लागलेल्या बाई, आठवतात मला अजून.
दर गुरुवारी कानिफनाथांची आरती करतांना, बाई कशा तल्लीन व्हायच्या, तेही आठवतंय मला.

नातवांना गोष्टी सांगणाऱ्या बाई. 
बागेत कोणती फुलं, कशी फुलली आहेत ते काळजीनं पाहणाऱ्या बाई.

हिवाळ्यातल्या कित्येक सकाळी, 'स्वीट कॉटेज'च्या अंगणात गप्पा मारत, कित्येक उन्हं, आम्ही घेतलीत अंगावर दोघांनी.

बाई काय नव्हत्या ?
नेरळच्या माध्यमिक शाळेच्या नावाजलेल्या मुख्यपाधिका राहिलेल्या होत्या बाई.
समाजवादी विचारांच्या बाई, संस्कार वर्ग चालवायच्या. 
स्वाध्यायीही होत्या बाई.

पुढे जाऊन नवीन शाळाच काढली बाईंनी !
अहो, बाईंचा एकूण आवाका फार मोठा होता.

अरे मी तुम्हाला सांगितलंच नाही बाईंविषयी जास्तीचं.
त्यांच्या माझ्या नात्याविषयीच.
चुकलंच माझं. बाईंचा विषय आला की होतं माझं असं.  

माझंच काय, माझ्या घरच्या सगळ्यांचंच होत असणार !
खात्रीच आहे मला तशी. 
बाई होत्याच तशा.

बाई म्हणजे धोंगडेबाई.
दादरच्या शिवाजी पार्काजवळ बाईचं माहेर. माहेरचं नाव देवधर.
घरात सेवादलाच वातावरण.
एम. ए. विथ इंग्लिश शिकलेल्या बाई, लग्नानंतर धोंगडे झाल्या.
अन नेरळला आल्या राहायला, कायमच्या.

बाई, आमच्या घराच्या मालकीण.
म्हणजे आम्ही रहात होतो त्यांच्या मालकीच्या घरात.
साधारण पस्तीस वर्ष.

आज सांगावं लागतंय त्या मालकीण होत्या घराच्या ते.
हा, पण बाईंनी कधी जाणवू दिलं नाही ते शेवटपर्यंत.
हेच तर त्याचं  मोठेपण !

बाई सोशल होत्या आणि नव्हत्याही. एकारलेपण आवडायचं त्यांना.
बाई गप्पा मारायच्या खूप पण अबोलही होत्या बाई.

बाई छोट्या छोट्या गोष्टीत रस घ्यायच्या.
तशा बाई विरक्तही होत्या संसारापासून.
बाई कठोर होत्या, पण मनाच्या एका कोपऱ्यात मायेचा ओलावा जपला होता बाईंनी.



बाई, माझ्या आईशिवाय जगू शकल्या असत्या का ?
माहीत नाहीं. पण बाईंमुळे, आई जगू शकली हे मात्र तितकं खरं.

बाईंनी मला काय दिलं?
बाईंनी मला काय नाही दिलं ?

बाईंनी मला वाचायला शिकवलं, अभ्यासाव्यतिरीक्त.
बाईंनी मला विचार करायला शिकवलं. वैचारीक मशागत केली माझी.
लिहिण्याची प्रेरणा दिली मला बाईंनी !

आज बाई असत्या तर मला बघून काय वाटलं असतं  बाईंना ?

अहं, नाही सांगता येणार.
कारण बाईसारखा विचार फक्त बाईच करू जाणे !
बाई, वेगळ्याच होत्या, एव्हढं मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो.

बाकी सगळं, बाईचं जाणोत !!

anilbagul1968@gmail.com

Wednesday 24 October 2018

नानू बामणाचा सदरा


नानू बामणाचा सदरा

नानू म्हणजे नानू गद्रे, आमचा शेजारी. आम्हा बेडेकऱ्यांच्या वाड्याशेजारीच गद्रे वाडा. पूर्ण सावरगावात ही दोनच ब्राह्मणांची घरं. इथल्या कुणब्यांच्या भाषेत बामणांची.

नानू मुका होता, त्याला बोलता येत नसे. कानाने ऐकूही येत नसे. त्याचा जेव्हा कधी आणि जिथे कुठे जन्म झाला असेल, तेव्हापासूनच तो असा असणार. म्हणजे आम्ही गद्र्यांकडे जेव्हापासून त्याला पाहतो आहोत तो असाच आहे.

रोज सकाळी साधारणतः सहा साडेसहाच्या सुमारास खराट्याने अंगण झाडल्याचा आवाज येई. नानूचा रोजचा दिवस त्याने सुरु होई. अंगणात बाजेवर झोपलेलो आम्ही भावंडे त्या आवाजाने जागे होऊन उठू लागत असू. शेणाने सारवलेल्या अंगणाचा वास घेत आम्ही घरात शिरत असू.

नानूला आमच्या झोपमोडेची फिकी नसे. तशी नानूला कसलीच फिकी नसायची म्हणा.
सकाळी सकाळी अंगण झाडलं, विहिरीवरून सात आठ बदल्याभरून पाणी आणून दिलं, की नानूचा दिवसभराचा कामाचा कोटा संपलेला असे.

मग घराच्या पडवीत, जणू खास त्याच्यासाठीच केलेल्या कट्टयावर, मळखाऊ रंगाचा अभ्रा असलेल्या लोडाला टेकायचं. आजूबाजूचं  जग स्वतःची जहागिरी असल्यासारखं  पहात राहायचं, हा मोठा दीर्घोद्योग त्याच्यासाठी.
धूनमधून धोतराच्या कनवटीला लावलेली खाकी रंगाची चंची काढायची. त्यातून पितळी अडकित्ता काढायचा. किंचित पिवळसर हिरवं विड्याचं पान काढायचं. हलक्या हातानं त्याच्या शिऱ्या ओढून काढायच्या. चुन्याच्या डबीतून अंगठ्याच्या नखांवर चुना घ्यायचा. चुना कोरडा असेल तर जवळच्या पितळी तांब्यातील पाणी लोट्याने घेत, दोन चार थेंब टाकून ओलसर करायचा. तर चुना मनाजोगता लावून झाल्यावर, काथ्याचे  दोन लहानगे तुकडे पानावर घ्यायचे आणि मग सुपारीचा कार्यक्रम व्हायचा.

सुपारी, खास आप्पांच्या दुकानातली, श्रीवर्धनहून मागवलेली. त्यातलं एखादं खांड, पितळी अडकित्यात अल्लद धरून सरसर कातारायचं. कातरता कातरता, उजवा पाय किंचित वर करून एक मोठाला पाद हमखास सोडला जायचा. हे टायमिंग इतकं परफेक्ट की पाद सोडण्यासाठीच जणु सुपारी कातरायचा तो, असं वाटावं.

सुपारीचे तुकडे... कातरलेली सुपारी, त्या पानावर ठेऊन, पानाची छानशी घडी करायची. तोंड पूर्ण उघडून पानाचा तोबरा तोंडात सफाईनं कोंबायचा. मग शून्यवत नजर लावत रवंथ करत राहायचं कित्येक वेळ ! भूत, वर्तमान अन भविष्य कसलाच घोर जीवाला नसल्यागत.
 
तसा गद्र्यांच्या घरात नानू म्हणजे असून नसल्यासारखा. तो मूळचा गद्रे नसून आश्रित असल्याचा आम्हा बेडेकरांना दाट संशय. पन्नाशी पार केलेला नानू अविवाहित ! त्यामुळे कसलाच आगापिछा नसल्यासारखा. गद्र्यांच्या प्रतिभाकाकूंनी दिलेल्या भाकर तुकड्यांवर त्याची गुजराण व्हायची. सरळ स्वभावाच्या प्रतिभाकाकूं, फार काही नं बोलता त्याला खाऊ-पिऊ घालत. असा परिपाठ चालू आहे गेली कित्येक वर्षे.

गद्र्यांची शेतीवाडी भरपूर. शिवाय आंबा, फणस आणि काजूची भरपूर झाडं. सगळं सांभाळायचं तर भरपूर माणसं हवीत. त्यामुळे घरी कुणबी गडी-बायांची कायमच वर्दळ. त्यांच्या नजरेला, कट्ट्यावर रवंथ करत निवांत बसलेला नानू पडायचा. त्यांच्यात कुजबुज चालायची अधून मधून मग नानूवरून. 
एकंदरीतच त्यांच्या दृष्टीने नानू एकदम सुखी माणूस. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. त्यांची हातावरची पोटं. गद्र्यांच्या घरी मोलमजुरी करून जे पदरात पडेल त्यावर त्यांच्या घरांची चूल पेटणार असायची. चरितार्थासाठी आमच्या सावरगावात दुसरं होतंच काय म्हणा. लोडाला टेकून दिवसभर निवांत बसणारा नानू त्यांच्या दृष्टीने एकदम सुखी माणूस !

प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला आमच्या सावरगावच्या देवीचा उत्सव असे. दुर्गादेवीच्या मंदिरात रात्री कीर्तन हमखास असायचे. झाडून सारे गांवकरी कीर्तनाला हजर असत मात्र एक सोडून. मूकबधिर नानूला कीर्तनाचा काय उपयोग. तो आपला गद्र्यांचा पहारेकरी असायचा त्या दिवशीचा.यंदाच्या वर्षी सदानंद बुवा कोरेगावकर कीर्तन सांगणार होते. बुवा पंचक्रोशीत प्रसिद्ध. साहजिकच रात्री गर्दी झाली होती. पूर्व रंग झाला. अबीर बुक्याची ताटे फिरली. आपा गद्र्यांनी बुवांच्या कपाळी  बुक्का लावला. झेंडूच्या फुलांचा हार घातला. श्रीफळ आणि बिदागीचं पाकीट त्यांच्या हातात देऊन अदबीने नमस्कार केला. 
बुवांनी उत्तररंगाला सुरुवात केली.

जगी सर्व सूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधून पाहे
मना त्वाची रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले

तर मंडळी  संपूर्ण जगात असा सुखी माणूस शोधूनही सापडणार नाही. नाहीतर अश्या सुखी माणसाचा सदरा घालून आपणही सुखी झालो असतो. ‘’आहे काहो असा कोणी सुखी ?’’ बुवांनी लोकांना प्रश्न विचारला. कोपऱ्यातल्या सदूच्या नजरेसमोर नानू आठवला.

बुवा कोणी सुखी नाही म्हणतात खरे, पण नानूच ह्या जगातला सुखी आहे. दिवस रात्र कष्ट करून रापलेल्या अशिक्षित सदूच्या नजरेत आरामात बसून खाणारा नानू सुखीच होता.  नानुचा सदरा आपण पळवायचा, सदूने मनातल्या मनात नक्की केलं. तो घातला की बुवा सांगतायत तसं आपणही सुखी होऊ. त्याने विचार पक्का केला. 

 ‘’जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला.’’ त्यामुळे लोकहो, चांगली कर्मे करा, कुणाशी कपट करू नका. कुणाला दुखः देऊ नका. बुवांनी उपदेश करत कीर्तन संपवले. लोकांनी टाळ्या वाजवल्या. सदू उठला.

नानूच्या विचारात चालत चालत तो गद्र्यांच्या घराजवळ केव्हा पोहोचला हे त्याचे त्यालाच कळले नाही. आता नानुला सांगून त्याचा सदरा घ्यायचा आणि घालायचा, एव्हढंच त्याच्या मनात घोळत होतं.

गद्र्यांच्या घराच्या अंगणात पिवळा दिवा थोडाफार उजेड देत होता. त्याने अधिरतेने नानूच्या कट्याकडे पाहिलं. नानू काही दिसला नाही. सदू अस्वस्थ झाला. इकडे तिकडे पाहू लागला. पूर्वेच्या कोपऱ्यात तांदळाच्या गोणींच्या जवळ अस्ताव्यस्त पसरलेला नानू त्याला दिसला. सदूने घाई केली. नानूजवळ तो पोहोचला. नानूचा चेहरा काळा-निळा पडला होता. तोंडातून फेस गळत होता, त्याने ओकारी देखिल केली असावी. त्याचा सदरा माखला होता.

किंचित शुद्धीत नानू हातवारे करत होता. नानुने केलेल्या इशाऱ्याच्या दिशेने सदूने पाहीले. अंगणातल्या झुडूपांमध्ये सळसळ झाली. सदूने ताडले, विषारी नाग असावा. सदूला काय करावे ते काही कळेना.

अप्पा गद्र्यांच्या नावे तो जोरजोरात हाका मारू लागला. नानुचे हातवारे हळूहळू कमी होऊ लागले. त्याने सदूचा पाय पकडला अन त्याने मान टाकली. सदू घाबरला. इतक्यात अप्पा गद्रे, प्रतिभाकाकू अंगणात शिरल्या.
‘’सद्या काय रे हे ?’’ अप्पांनी मोठ्यांदा विचारले.

सदू भानावर आला.  पुटपुटल्यासारखं म्हणाला,  ‘’जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला.’’
नानुचा सदरा घ्यायचा विचार सुद्धा आता त्याला भीतीदायक वाटू लागला होता. 

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...