Showing posts with label हलकं फुलकं. Show all posts
Showing posts with label हलकं फुलकं. Show all posts

Thursday 16 April 2020

एका लग्नाची पुढची गोष्ट ...






ही गोष्ट आहे मनिषाची, अहं मोरुच्या मनिषाची.
आता तुम्ही म्हणाल, ''हा मोरु कोण?''
अहो हा मोरु आहे आपला नेहमीचाच आवडता, गेल्या २९ वर्षांपासून अधून मधून भेटत राहणारा. फार पूर्वी 'मोरूच्या मावशी' बरोबर भेटलेला, 'टूरटूर करणारा 'ब्रह्मचारी'. 'गेला माधव कुणीकडे' विचारणारा, ‘चार दिवस प्रेमाचे’ गात, 'एका लग्नाची गोष्ट' सांगणारा. आजवर, जवळपास ११००० वेळा आपल्याला भेटला आहे तो ! 'साखर खाल्लेला माणूस', लब्बाड कुठचा !! बघा ना कसा 'गारुड' घालतो समोरच्यावर ! लग्नाच्या पुढच्या गोष्टीविषयी सांगायचं, तर त्याचीच गोष्ट सांगत बसलो. असो.

तर ही आहे, 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. तिसरी घंटा वाजली वाटतं. पडदा तर उघडतो, एका घराचा सेटही दिसतो, पण घरात कुणीच नाही !
आपली कविता मेढेकर (च्या मारी, हिचं वय वाढतच नाही का काय?) याहीवेळी 'मनिषा' बनून चक्क प्रेक्षकांमध्ये दिसते. परसदारी फिरत फिरत, गप्पा मारल्यासारखी संवाद साधतेय, तिच्या लाडक्या प्रेक्षकांशी ! अशा संवादातून कथानक पुढे न्यायची आयडीया भन्नाटच !!

नाटकाचा विषय खरं तर विनोदी नाही. तो आहे स्त्रियांच्या 'मेनॉपोझ' विषयीचा. चाळीशी ओलांडली की, सर्व स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या 'त्या' फेजनंतर, तिच्या भावविश्वात होणारी उलाघाल, स्त्रीत्व हरवून दुर्लक्षित पडल्याची भावना. नवऱ्याचं आपल्याविषयी आकर्षण संपणार, त्याचं आसपास लक्ष जाणार, ह्या विचारांनी, तिची होणारी चिडचिड. अशा काळात आपल्या जोडीदाराची साथ मिळायला हवी अशी तिची अपेक्षा. पण नवरा त्याच्या ऑफिसच्या ‘वर्कप्रेशर’ने कावलेला. संसाराच्या नव्या नवलाईच्या काळात तिच्या विषयी असणारं आकर्षण आता उरलेलं नाही. ह्यावर कळस म्हणजे, त्या घरात राहणारी मनिषाची, घटस्फोटीत मोठी बहीण ! आयुष्यात राम उरला नाही, त्यामुळे ‘दुखीकष्टी’ असल्याचं बेअरिंग छान पकडून राहणारी. हे बेअरिंग मात्र गळून पडतं ‘बियर’ची अक्खी बॉटल रिचवल्यावर ! असो. घटस्फोट ही आपल्या घराण्याची खानदानी परंपरा आहे, आणि ती आपल्याप्रमाणे मनिषानेही जतन करावी अशी तिची धारणा. तुमच्या घरात असं वातावरण असतांना, जे घडलं असतं ते इथे घडत नाही. कुठेही रडारड नाही, आदळआपट नाही.

लग्नाचा विसावा वाढदिवस, नवरा नेमका विसरतो. तो ऑफिस मधून घरी येतो तोचमुळी संतापून. मनीषाने ‘सेलेब्रेशन’ची केलेली तयारी वाया जाते. तिचा मूडऑफ होतो. बंगलोरला शिकण्यासाठी राहणारा मुलगा, तीला हयावरचा उपाय सांगतो. तो उपाय अमलात आणण्यासाठी ती मोरूच्याच ऑफिसात काम करणार्‍या सहकाऱ्यांकडून ‘गेमप्लॅन’ करते. तिच्या ह्या खेळीत मोरु अलगद अडकतो, आणि आपण नाटकात. प्रशांत दामले म्हटलं की गाणं ओघाने आलंच. तो ते हुकमीपणे गाऊन घेतो. संवादाच्या अचूक टायमिंगने तो हशा आणि टाळ्या भरपूर वसूल करून घेतो. अतुल तोडणकर देखिल ह्यात कमी पडत नाही. घरातली बायको म्हणजे चारचाकी गाडी. तिच्याबरोबर एखादी 'ऍक्टिव्हा' अर्थात एखादी मैत्रिण सोबत ठेवायची. मग माणूस बोअर होत नाही. तर 'ऍक्टिव्हा' मुळे सगळा भार एकट्या गाडीवर मग पडत नाही. मग बायकोही’ रीलॅक्स. अशी त्याची थेअरी.

आपल्याला बुवा ही थेअरी पक्की पटली. तुमचं काय?

anilbagul1968@gmail.com

Sunday 27 October 2019


टेक्नोसॅव्ही होतांना ...


नव्वदीच्या वा नंतरच्या काळात जन्मलेल्या पिढीचं मस्त चालू असतं, नवनवीन 'गॅझेट्स' हाताळणं. नवनवीन ऍप वापरणं, नवीन टेक्नॉलॉजिशी जमवून घेणं. इ- कॉमर्सचे व्यवहार सफाईने करणं. पेटीएम, पे-फोन, गुगल-पे, ओला, उबर, स्वीग्गी, अमेझॉन इ. साऱ्या ठिकाणी डिजिटल मनी अगदी 'इझ'मध्ये फिरवत असतात. नेट बँकिंग, ऑन लाईन बिल भरणे, मनी ट्रान्स्फर इ. बँकेच्या माध्यमातून होणारे व्यवहार म्हणजे त्यांच्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ !

आताची 'जनरेशन' जन्माला आल्यावर, पीसी, लॅपि, पीडी, किंडल असे सारे शब्द अंगाईगीतासारखे ऐकत असते. त्यांच्या आयांना म्हणा, कुठलं अंगाईगीत यायला. पण ह्याच साऱ्या गोष्टी, सत्तरीच्या, ऐशीच्या दशकात जन्मलेल्या पिढीच्या दृष्टीने 'टफ टास्क'. वयाच्या पंचविशीत पहिल्यांदा कोंपुटर पाहिलेला. तो ही भला मोठा डेस्कटॉप. त्यापूर्वी कधीच कॉम्पुटरशी संबंध आलेला नाही. त्यानंतर आला 'पेजर'. नवीन जनरेशनला हा प्रकार, बहुधा माहिती नसणार ! मग ते ते फ्लॅट स्क्रीन मॉनिटर, टीव्ही आले. पूर्वीचे साधे मोबाईल, 'नोकिया' कंपनीचे, ह्या जनरेशननी मात्र पहिल्यांदा हाताळले. त्याचा उपयोग फक्त कॉल करणे व स्वीकारणे इतकाच. रेंजची फारच बोंब असायची.

मग खूप वर्षांनी ते 'नोकिया' कंपनीचे हँडसेट जाऊन, आधुनिक 'अन्ड्रॉईड' तंत्रज्ञानाचे 'सॅमसंग' वगैरे कंपनीचे हँडसेट बाजारात आले. आणि नोकीया कंपनी हे नवीन तंत्रज्ञान वापरात नसल्याने इतर कंपन्यांच्या स्पर्धेत बरीच मागे पडली, मार्केटमध्ये आऊटडेटेड तंत्रज्ञान वापरल्याने. जगण्याच्या मार्केटमध्ये आऊटडेटेड होऊन गायब व्हायचं नसेल तर, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावेच लागेल. त्याला आपलंसं करावंच लागेल, टेक्नोसॅव्ही व्हावं लागेल, हाच ह्या जुन्या जनरेशन करता धडा.
 
पण हे टेक्नोसॅव्ही होतांना ... थोडं काळजीपूर्व, थोडं सावधपणे. सोशल अकाउंट हॅक होणं, बँकेच्या अकाउंट मधून पैसे काढून घेतले जाणं, असे प्रकार आजूबाजूला घडतांना आढळतात. मागच्यास ठेच, पुढचा शहाणा ह्या न्यायाने काही गोष्टीत सजग असणं खूप आवश्यक. 'डूज आणि डोन्ट डूज' ह्यातली नियमावली नेमकेपणाने 'फॉलो' करणे हा पहिला नियम! जस की आपला ई-मेल अकाउंटचा पासवर्ड कुणाशी शेअर न करणं. एटीएम पिन कुणालाही नं सांगणं. मोबाईल सेट वऱ अपरिचित ऍप डाउनलोड न करणं. इ. गोष्टी प्राथमिक गरजेच्या.

शेवटी एकचं सांगणं, टेक्नोसॅव्ही होतांना ...
सावध हरणी सावध गं
करील कुणीतरी पारध गं
हे आपणाला सर्वांना परिचित असलेलं गाणं लक्षात असू द्या, म्हणजे झालं.


-----अनिल सुमति बागुल
anilbagul1968@gmail.com


Tuesday 22 January 2019

तुम्ही कधी निघणार अशा फेरफटक्याला ?


रविवारची आळसटलेली सकाळ असावी.
गोधडीत पहुडलेला देह असाच उबेला घट्ट धरून असावा.
बऱ्याच उशिराने अखेर मनानी तयारी दाखवावी, उगवलेल्या दिवसाला कवेत घ्यायला .
मग वाफळलेल्या कडक चहाचा मनासारखा आस्वाद घेऊन झालेला असावा.
अन न्याहारीला तर्रीदार झणझणीत मिसळ पेश व्हावी.
जिभेचे असे चोचले पुरवून हात धुतांना...
फुग्याला पिन टोचविच नां !
"आज रविवार आहे, आज मला कुठेतरी फिरवून आणच."
आठवडाभर मी घरातच आहे तू बिझी असतोस म्हणून.
खूप कंटाळलीय रे मी !
मातोश्रींचं म्हणणं वाजवी होतंच.
आता मला, माझा रविवारचा खास मूड, माझ्या 'होंडा सिटी'च्या डिक्कीत टाकावा लागणार तर...
आई कुठं जायचं तूच सांग, चॉईस तुझा.
चांदवडला जाऊ शकतो, रेणुका मातेचं मंदिर पहायला !
अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला 'रंगमहाल' पण आपण तिथे पाहू शकतो.
दुसरं ऑप्शन आहे सिन्नरचा.
इथं पाहता येईल बाराव्या शतकांतील गोंदेश्वर मंदिर, आणि गारगोटी संग्रहालय... दगडगोट्यांच.
रंगमहालाचं कसलं कौतुक मला मेलीला, आईने खास कोकणी सूर लावला होता तर.
इथं मला मेलीला डोळ्यांनी धड दिसत नाही अन रंगमहाल काय डोंबल बघायचं?
आणि तुझं म्हणशील तर खुप रंग उधळून झालेत की रे तुझे आजवर !
आता पन्नाशीत आजून काय उधळायचं, त्यापेक्षा दगडं बघाला जाऊ !!
मातोश्रीचा आदेश कोण डावलणार ?
अशावेळी सोबतीला कोण असावं?
विजय असला तर जास्त चांगलं.
त्याला फोन केला अन तो ही लगेच तयार झाला.
मग काय निघालो की !


























सिन्नरच्या अलीकडे माळेगाव 'MIDC' त आहे हे 'गारगोटी' संग्रहालय !
'MIDC'च्या प्लॉट मधे हे कसं काय?
असला शंकेखोर प्रश्न, पायातले बूट काढतानाचं डोक्यातून काढून टाकला.
प्रथमदर्शनीच 'भारतमाते'चं शिल्प मन मोहवणार !
डायनसोरची हाडं, कित्येक लाख वर्षापूर्वीचे हत्तीचे दात, पंधरा हजार वर्षापूर्वीचे लोह !!
लोणार सरोवराच्या निर्माणावेळाचे !!!
मग नऊ नवरत्ने, त्यांची उपरत्ने... सारी अद्भुत दुनिया !
'गारगोटी'... के. सी. पांडे ह्या अवलियाने जमवलेली ही अनमोल दगडांची दुनिया.
डोळे विस्फारणारी, अन अचंबित करणारी !
चालून चालून वृद्ध आईचं शरीर दमून गेलं होतं.
विजयनी सुचवलं मस्त चहा घेऊ आपण "वैशालीत".
इथे हा असा 'विजय' हुकमी वाटतो.
मग काय गरमा गरम चहानी ऊर्जा दिली हवीहवीशी.
निघालो मग 'गोंदेश्वर' जणू सर करायला.



सुमारे आठशे वर्षांपूर्वीची ही मंदिरं !
दख्खनी शैलीतली.
इतके वर्षे दुर्लीक्षित, पण आता गर्दीने व्यापलेली.
जणू 'प्री वेडिंग शूट'साठीच निर्मिती झाली की काय असं वाटावं.
गोन्देश्वरच्या विस्तीर्ण प्रांगणात सूर्य अस्ताला आलेला.
हलकेच कॅमेऱ्याने टिपला अन आईला विचारलं,
माते छान झालं ना सगळं ? निघायचं आता?
चला निघुयात. तसं तू चांगलं काहीतरी दाखवलं आहेस म्हणायचं !
तिच्या तृप्तीच्या सुरांनी, मीही सुखावलो.
एकुणात 'गब्बर खुस हुवा तो' !!
तुम्ही कधी निघणार अशा फेरफटक्याला ?

anilbagul1968@gmail.com

Friday 4 January 2019

जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है!

दिलबर... दिलबर...
गाडी निघाली होती नाशिकच्या दिशेने.
आणि वाजत होतं हे गाणं गाडीत !
जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है !
तोच तर अनुभव मनाच्या एका कोपऱ्यात गोळा करून निघालो होतो मी!!
तो माझा बालपणीचा काळ नव्याने ओतप्रोत अनुभवून तर झालं आज !!!
माझं घर, माझं गावं, माझे जिवाभावाचे मैतर, माझं आसपास, माझं भोवताल, सारं, सारं, नव्याने अनुभवून आज निघालो परतीला माझ्या कर्मभूमीकडे.
सासरी निघालेल्या माहेरवशीणीसारखं...
एका डोळ्यात समाधानाचे आसू अन एका डोळ्यात विरहाचे आसू .
माझं जुनं घर, 'स्वीट कॉटेज',पाडून तिथे चार मजली इमारत उभी पहिली. विस्थापित झाल्याचं फील जणू आला.
खरंच हा विकास असू शकतो? कित्येक मनांना, किती एक स्वप्नांना हे असं भकास करून??
कोकणातल्या त्या नाणार प्रकल्पातल्या माझ्या जीवलगांच्या उरातली सल जणू आज अनुभवली मी. 

ती नेरळ विद्या मंदिर शाळा, ते कुसुमेश्वर मंदिर, ती शितळादेवी, त्याबाजूचं ते विस्तीर्ण तळं, ती चक्री, ती मोटारटेकडी सारं सारं फिरलो.

पॅनोरमा पॉईंट आणि पेब किल्याचा तो प्रसिद्ध 'व्ही'ही कॅमेऱ्यात कैद केला. बटाटावडा खाण्यासाठी पार डिकसलला जाऊन आलो. 
जुन्या जीवलगांच्या संगतीने नवी शिदोरी बांधून घेतली. नव्या वर्षांला सामोरे जाण्यासाठी !
काय असेल नव्या वर्षात माझ्यासाठी?
सटविने काय लिहिलंय माझ्या भाळी...
हा पण... तिथल्या स्मशानभूमीत जाऊन दोन फोटो आणि एक सेल्फी पण काढला सेल्फीश होऊन. तिथला 'तो' बोर्ड वाचून शहारालोहीं किंचितसा !
अहं...

मगाशीच ऐकवलं ना गाणं ते तुम्हाला...
दिलबर ...दिलबर
जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है!
म्हणून तर जणू भेटून आलो होतो.
जीवन गाणं नव्याने गाण्यासाठी !!










Thursday 27 September 2018

थोडासा रुमानी हो जाये...


थोडासा रुमानी हो जाये...

रोज मरा कि जिंदगी जिते जिते थोडासा रुमानी हो जाओ, जिंदगी में सकून मिलेगा तुम्हे.

रुमानी होणायसाठी ‘विक्रम सरंजामे’ सारखी प्रेमिका असावीच लागते असं थोडीच आहे ?

रिक्षामधून जातांना प्रेमाचे दोन शब्द बोला त्या ड्रायव्हरशी . बसमधे तिकिटासाठी सुट्टे पैसे राहुद्यात कंडक्टरच्या सुखासाठी. मोलकरणीला आलं घातलेला एक कप चहाचा पुरेसा आहे तिच्या उत्साहासाठी. संसारात भांड्याला भांडे लागण्यानंतर, आमटीचा भुरका मारतांना कौतुकाचे दोन बोल पुरेसे आहेत बायकोला सुखावण्यासाठी.

दो बुंद जिंदगीके जाहीरात करतो अमिताभ पल्स-पोलियो साठी.
मी म्हणतो दोन शब्द प्रेमाचे आयुष्यभराच्या सुखासाठी.

आसपास अनेक वाद विवाद सुरु असतात. भाऊबंदकीपोटी, एकमेकांचे जीव प्यारे होतात.
इथे प्रेमाचे दोन शब्द आले तर? सात बाऱ्यावरचे पोटहिस्से नक्की कमी होतील. हुंड्यापोटीची भांडणं, ऑनर किलिंगचे टोकाचें पाऊल एक घटका विश्रंती घेईल. घरच्या आजारी म्हाताऱ्याला दोन पावलं टाकायला बळ मिळेल. ऑफिस मधले सहकारी जेवतांना टिफिन शेअर करतील. दूर दूर राहणार तरुण मुलगा तुमच्यासाठी भेळपुरी घेऊन येईल.

विश्वास नाही म्हणता ? करून तर बघा.
अहो केलंत तर तुमच्याही आयुष्यात येईल बारीश. सुंदर सस्ती टिकाऊ बारीश ...
नाना पाटेकर म्हणाला तशी ...
हा मेरे दोस्त वहिवाली बारीश
जो आस्मान से आती हैं बुंदो में गाती हैं
ये पानी आख से ढलता हैं तो आसू कहलता हैं
लेकिन चरहरेपे चढ जाता हैं तो रुबाब कहलाता हैं

तो मेरे दोस्तो अभी थोडासा मुस्कुराहो.
यही तो शुरवात है रुमानी होनेकी !

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...