Showing posts with label जिरा बटर. Show all posts
Showing posts with label जिरा बटर. Show all posts

Thursday 16 April 2020

या सुखांनो या ...






फेसबुकाच्या भिंतीवरती खरडायचो काही-बाही. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया यायच्या, लिखाण आवडल्याच्या. मग एक दिवशी 'कोंडूर्‍याक गाऱ्हाणं' लिहिलं. माझ्या आवडत्या, तळकोकणातील प्रवासावरचं लिखाण होतं ते. खूप सारे लाईक्स मिळाले त्याला. माझं गाऱ्हाणं, कोंडूर्‍यापर्यंत पोहचलं की नाही कोणास ठाऊक? पण, 'महाराष्ट्र टाईम्स'पर्यंत मात्र नक्की पोहचलं. संपादक शैलेंद्रजी तनपुरे ह्यांचा अचानक फोन आला, ‘’सदर लिहायचंय तुम्हाला.’’

मी उडालो. खरं तर सुखावलो होतो, खोटं का बोला. आता प्रश्न होता, काय लिहायचं? सदराला नाव काय द्यायचं? एक मात्र नक्की होतं, जे लिहायचं ते हलकं फुलकं आणि खुसखुशीत हवं. त्यातून नाव सुचलं, जीरा बटर !

मग लिहिता झालो. लिहिता लिहिता सुचू लागलं. पण, माझ्या पक्क लक्षात होतं, लोकं आज-काल फारसं वाचत नाहीत म्हणून. मग ठरवलं हे लिहिलेलं टाकायचं, फेसबुकाच्या भिंतीवर. ‘नाशिक टूडे’ ग्रुपवर शेअर देखिल केलं. लाईक्स आणि कमेंट्स यायला लागले.

पण माझ्या आईची तक्रार होती, तिच्या पर्यन्त हे जात नाही अशी. माझ्या आईला वयोमानांनुसार अंधुक दिसू लागले आहे. तिचे वाचन त्यामुळे थांबले आहे. तिच्यासारखीच बहुतेक सार्‍या ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिति आहे. माझं लेखन त्यांच्या पर्यन्त पोहचवं, त्यांना वाचंनांनंद मिळवा म्हणून, निरनिराळ्या स्नेहींकडून वाचन करवून घेवून, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचे माझ्या आईसह, सार्‍यांनी कौतुक केले. माझी पत्नी मनिषा, स्नेही प्रज्ञा भोसले–तोरसेकर, मनिषा कोलते, आर्कि. स्मिता लहारे-कुलकर्णी, प्रा. सिद्धार्थ धारणे, नेहा खरे, मनिषा रतीलाल बागुल ह्या सार्‍यांचे त्याकरीता आभार. संगणक तज्ञ ओंकार गंधे सर आणि त्यांच्या टीमने हे सारे रेकॉर्डिंग केले होते, त्यांचेही आभार.

करियर यशस्वी होण्यासाठी योग्यवेळी ‘ब्रेक’ मिळणं, आवश्यक असतं. उशिरा का होईना, पण तो मिळाला, हेही नसे थोडके. त्याकरिता महाराष्ट्र टाईम्स, नाशिक, त्याचे संपादक शैलेन्द्रजी तनपुरे सर, क्रिएटिव्ह हेड, प्रशांत भरविरकर ह्यांचे खूप खूप आभार. लिखाणाला सतत प्रोत्साहन देणार्‍या, संतोष आणि चैत्रा हुदलीकर, विनायक रानडे ह्यांचेही आभार. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या वाचक स्नेहींचे मनापासून धन्यवाद !!

ह्या आभाराच्या कार्यक्रमात, ‘मूळ कथानका’चा शेवट सांगायचा राहिलाच ...

एकुलत्या एका लेकीचं-स्वरालीचं लग्न, यथासांग पार पडलं आहे. त्यामुळे नवरा–बायकोच्या संसाराची कहाणी सुफळ-संपूर्ण झाली आहे. पण बायकोला आता वेध लागलेत नातीच तोंड पाहायचे ! तर नवरोबाला त्याच्या गावी जायचंय !! सिंधुदुर्गातील, वेंगुर्ल्याजवळच्या ‘भोगव्या’ला, त्याला राहायचंय. तिथल्या लाल मातीचा मृद्गंगध, त्याला आता व्याकूळ करतोय. लाल जांभा खडकाचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटतोय. नारळी–पोफळीच्या बागा, आंबा–फणसाची, काजू करवंदाची झाडं, त्याला खुणावतायत. सकाळच्या न्याहारीला पांढरीफेक ‘घावानं’ त्याला खावीशी वाटतायत. पापलेट, रावस, बांगडा त्याच्या स्वप्नात येतात. ‘कोंबडीवडा’ खाण्याचे डोहाळे त्याला सुचतायत. कोकम सरबताची, सोलकढीची त्याला आताशा, तहान लागलीय. कुठल्याश्या अनामिक ओढीने, किनाऱ्याकडे सतत धाव घेण्याऱ्या लाटांची गाज, त्याला ऐकायची आहे. त्या निळ्या-हिरव्या पाण्यात त्याला डुंबायचंय, अगदी मनसोक्त ! पांढर्‍याशार वाळूंचे किल्ले त्याला बांधायचेत. त्याचं ‘स्वप्नातलं राज्य’ निर्माण करण्यासाठी !!

त्याच्या ह्या ‘स्वप्नाच्या राज्यात’, कुणीच दुःखी-कष्टी नसेल. ‘चार घास खाण्यासाठी कुणीच तरसत नसेल. आनंदाच्या चार क्षणांनी मग आनंदभुवन तयार होईल. मग तुम्ही-आम्ही सारे गाऊ लागू ...
या सुखांनो या !

anilbagul1968@gmail.com

मोठं व्हायची घाई






क्राऊनिंग ग्लोरी :
‘अंदरसूल’च्या माळरानावर बाया बापड्यांची तोबा गर्दी लोटली होती. पिटातल्या तंबूत, उत्साह ओसंडून वहात होता. टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांचा पाऊस पडत होता. कार्यक्रमही तसाच होता म्हणा. 'पॅन एशिया पॅसिफिक सौंदर्य स्पर्धा' घेण्यात आली होती राव. असा कार्यक्रम घेणं म्हंजे, येऱ्या बगाळ्याचं कामच नाही. मौजे बुद्रुक अंदरसूल ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. सरपंच बकुळाताई आणि उपसरपंच बबनराव ह्यांचा मोठा पुढाकार होता त्यात. साऱ्या पंचक्रोशीत म्हणजे नगरसूल, कोल्पेवाडी, गुळवंच, दापूर, नांदूरशिंगोटे, इथे प्राथमिक फेर्‍या घेण्यात आल्या होत्या. आज तर ‘ग्रँड फिनाले’ होता. नामदार झोडगे-पाटील आणि नृत्यबिजली मंदाताई सातारकर जातीने हजर होते, प्रमुख पाहुणे म्हणून. नाशिकच्या ‘खर्जुले मळा’ इथं राहणार्‍या ‘मिसेस वर्ल्ड २०१९,’ ‘प्रियंका’ ह्या सेलेब्रिटी गेस्ट होत्या. स्पर्धेच्या शेवटी, विजेत्या तरुणींना मानाचा चंदेरी मुकुट, त्यांच्याच हस्ते प्रदान करण्यात आला.

पळा पळा कोण पुढे पळे तो :
डिसेंबर महिन्यातील एका रविवारची सकाळ. हवेत प्रचंड गारठा. त्याला न जुमानता शेकडो स्त्री-पुरुषांची सातपूरच्या महापालिकेच्या मैदानावर उपस्थिती. साऱ्यांच्या अंगावर पिवळ्या रंगाचे टी शर्ट्स. स्टेजवर मोठ्ठा फ्लेक्स, 'यलोथॉन रन' ! आठ जणींचा एक ग्रुप झुम्बा करतोय. समोरचे सारे त्याला 'फॉलो' करतायत. मग सूत्रसंचालक खूप साऱ्या सूचना देतो. कुठल्या 'एज ग्रुप' करीता, किती किलोमीटरची 'रन' आहे. सेल्फी पॉईंट कुठे आहे. सर्टिफिकेट्स आणि मेडल्स कुठून घ्यायची आहेत. मग ढोलपथक सलामी देतं. सेलेब्रिटी हिरवा झेंडा दाखवतात. मग पळापळ होते. सेल्फी पॉईंट्सवर मेडल आणि सर्टिफिकेट्ससह सेल्फी काढल्या जातात. ग्रुप फोटोसेशन होते. पटापट फेसबुकावर स्टेटस अपडेट होते. लाईक्स अन कमेंट्सचा मित्रपरिवाराकडून वर्षाव होतो.

पुरस्कार फिरस्कार :
जुन्या नाशकातील ‘तिळभांडेश्वर लेन’ इथलं, ‘दुर्गा मंगल कार्यालय’ आज तुडुंब भरलं होतं. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, अखिल भारतीय विविध लघुत्तम उद्योग संघटनेच्यावतीने, नऊ यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. ‘नवलघुत्तम उद्योजिका पुरस्कार’ असं पुरस्काराच नाव. एक पिटुकला मुमेंटो, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं पुरस्काराचं स्वरुप. एका पाठोपाठ, नऊ ‘पुरस्कारप्राप्त’ महिलांची घोषणा होते. त्यांच्याबद्दलची माहिती सूत्रसंचालक देत जाते. पूजनीय ‘अमुक महाराज’ पुरस्कार प्रदान करत जातात. महिला सक्षमीकरण, जेंडर इक्व्यलिटी, निर्भया, नारीशक्ती अशा शब्दांना घेऊन सारे भाषणे ठोकतात. 'सन्मानित नवदुर्गा'सोबत आयोजक छानसा फोटो काढून घेतात. मंडळाचा सेक्रेटरी, एक हुकमी बातमी तयार करतो. सगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयाकडे, एखादा उत्साही कार्यकर्ता ती पोहोचवतो.

पहिल्या प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे, अशा सौंदर्यस्पर्धा गल्लोबोळीत, होवू लागल्या आहेत. अतिशय सुमार दर्जाचं आयोजन, आणि आर्थिक देवाण-घेवाणावर आधारीत स्पर्धेचे निकाल. अपवाद सोडल्यास सगळीकडे हेच चित्र. दुसर्‍या प्रसंगात लिहिल्याप्रमाणे, अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या बहुतांशी उत्सवी प्रकारच्या असतात. खेळाचा प्रसार वगैरे दुय्यम, तर चमकोगिरीच अधिक. त्यातही आर्थिक नफ्याचं गणित सामवलेलं. तिसरा प्रसंग म्हणजे हमखास खेळला जाणारा हातखंडा प्रयोग. शहरात, जवळपास प्रत्येक सभागृहात रंगवला जात असतो अधून मधून. अशी पारितोषिके वाटतांना, अभ्यास करून निवड, वगैरे भानगडच नाही. हा, पण काही प्रतिष्ठेची पारितोषिके मात्र याला अपवाद.

वरील तीनही प्रसंग, थोड्याबहुत फरकानुसार, आपल्या आजूबाजूला घडतांना, आज दिसतात. मात्र अशा प्रसंगात एक साम्य असते, ‘मागणी तसा पुरवठा’ ! आज प्रत्येकाला, सर्वांच्या अधिक पुढे जायचं आहे. सर्वांपेक्षा अधिक मोठं व्हायचं आहे. तेही अगदी 'हुक ऑर क्रूक' !! मग त्यासाठी, काहीही मोजायची प्रत्येकाची तयारी !!! मग याचा फायदा, आयोजक उचलतात, आर्थिक हितसंबंध जोपासतात. फसवणुकीचे अनेक प्रकार यात घडतात.

यशस्वी होण्याच्या स्पर्धेत, सर्वस्व पणाला लावून धावतांना, थांबायची गरज असेल तर, ते नेमकं कधी आणि कुठे? हे कळायला हवं. काय मिळवायचंय? हयापेक्षा ते का मिळवायचंय? ह्याचा सजगतेने विचार, हा व्हायलाच हवा.

anilbagul1968@gmail.com

लेक माझी अभिमानाची




हैदराबादच्या ‘डॉ. प्रियांका रेड्डी’ प्रकरणाची बातमी सगळीकडे फ्लॅश होते. बायकोच्या पोटात धस्स होतं. स्वराली, सध्या हैदराबाद इथंच राहते. हैदराबादच्या एका आयटी कंपनीत ‘प्रोग्रॅमर’ म्हणून, नुकतीच ती जॉइन झाली होती. तिच्या सुरक्षेच्या काळजीने, बायकोची घालमेल सुरू होते. ती तातडीने, स्वरालीला फोन लावते. तिचा मोबाईल ‘स्विच ऑफ’ असतो. ती आणखी अस्वस्थ होते. ती लगेच नवरोबाला कॉल करते. नवरोबाही ‘त्या’ बातमीने, किंचितसा हललेला होताच, पण वरकरणी काळजीचं कारण नसल्याचं तो बायकोला भासवतो. तू चिंता करू नकोस, मी कंपनीच्या नंबरवर कॉल करतो. तो तिला दिलासा देतो. कंपनीच्या गेटमधून शिरतानांच, मोबाईल जमा करण्याची ‘कंपनी पॉलिसी’ असल्याचे नवरोबाला, फोनवर कळते.

मग संध्याकाळी, ते दोघे स्वरालीला फोन करतात. फोन लागतो पण कॉल घेतला जात नाही. व्होडाफोनवाली बाई काहीतरी, 'तेलगू’त सांगत राहते. ऑफिसमधल्या नायडू मॅडमला 'त्याचा' अर्थ, नवरा फोन करून लगेच विचारतो.
''अहो, तुमची मुलगी कॉल घेत नाहीये, नंतर कॉल करा, असं ‘तेलगू’त सांगत असतील. '' इति नायडू मॅडम.
आता मात्र, नवरा-बायकोचा धीर सुटतो. दोघेही थेट हैदराबाद गाठण्याची तयारी करतात. इतक्यात नवरोबाला फोन येतो.

‘’इज इट मि. शिरीष? आय अॅम महेश बाबू–पोलिस कमिशनर ऑफ हैदराबाद. टॉक विथ यूवर ब्रेव्ह डॉटर. शी हॅज डन अ ग्रेट जॉब !’’

काय चाललंय काहीच कळेना नवरोबाला. बायको तर अधिकच धास्तावलेली, पोलिसांचा फोन आहे कळल्यावर.
‘’पपा मी स्वराली बोलतेय. काळजी करु नका, मी सुखरुप आहे. मम्मीला लगेच सांगा. ती काळजीत असेल.'' स्वराली.

''अगं पण झालंय तरी काय? तू पोलीसस्टेशनला कशी? ते पोलिस कमिशनर, तुला ब्रेव्ह डॉटर का म्हणाले?'' आणि तू फोन का नाही घेतलास? नवरोबाची घाईघाईने प्रश्नांची सरबत्ती.

पुढे अर्धा तास, स्वराली बोलत होती आणि नवरा-बायको, मोबाईल स्पिकरवर ठेवून ऐकत होते.

झालं होतं असं ...
स्वराली, संध्याकाळी कंपनीतून घरी येतांना टॅक्सिवाल्याने तिची छेड काढण्याचा प्रयन्त केला होता. स्वराली, टॅक्सित एकटीच होती. पण ती घाबरली नाही. प्रसंगावधान राखून तिने हुशारीने, टॅक्सिवाल्याला टॅक्सी थांबवायला भाग पडली. टॅक्सी थांबताच, तिने खाली उतरून त्याची धुलाई करायला सुरवात केली. धुलाई करतांनाच ती ‘हेल्प हेल्प’ असं ओरडत राहिली. ते ऐकून गर्दी गोळा झाली. इतक्यात पोलीस आले. आणि साऱ्यांची वरात पोलीस स्टेशनला. ‘पोलिस कमिशनर’ महेश बाबू ह्यांना सारी हकीकत कळली. त्यांनी स्वरालीचं तोंड भरुन कौतुक केलं. तिच्यासारखं प्रसंगावधान आणि धाडस इतरांनी दाखवलं, तर ‘महिला अत्याचार’ नक्कीच कमी होतील, असंही ते म्हणाले.

‘’पपा थँक्स. हे तुमच्या दोघांमुळे शक्य झालं. तुम्ही आणि ममीने माझ्यावर जे संस्कार केलेत, मला वागण्याची मोकळीक दिलीत, मुलगी म्हणून बंधनात नाही ठेवलत, माझ्यावर विश्वास ठेऊन एकटीला हैदराबाद इथं राहू दिलंत, त्यामुळे मला आत्मविश्वासाचं बळ मिळालं. आणि मग, आत्मसन्मासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. आणि पपा ह्या सगळ्या भानगडीत फोन नाही घेऊ शकले.’’ स्वराली.

ते सारं ऐकताच नवरा-बायकोचा जीव भांड्यात पडतो. अभिमानाने उर भरुन येतो. ''बघ, आपली लेक किती धाडसी आहे ते. आणि तू, विनाकारण तिची काळजी करत राहतेस !!'' नवरा, स्वरालीचं कौतुक करत बायकोला म्हणाला.

इतक्या वेळ लेकीच्या काळजीने, रडकुंडीस आलेली बायको, एकदम वेगळाच पवित्रा घेते.
''हूं SSS आहेच मुळी माझी लेक धाडशी. अभिमान आहे मला तिचा ! गुणांची पोर ती !!
हो, पण तुम्ही नका फुशारक्या मारु. ती तुमच्यावर नाही, माझ्यावर गेलीय म्हणून अशी आहे. तुम्ही ते ‘अळूचं फदफदं’ खाणारे, तुम्हाला मेला, एक उंदीर मारता येत नाही.'' बायको फणकारते.

anilbagul1968@gmail.com

सुखी संसाराचा मंत्र




तुमचं लग्न झालय? हो, मग हा लेख तुमच्यासाठीच.
काय म्हणता? तुमचं लग्न व्हायचय अजून? मग हा लेख तर तुमच्याचसाठी.
खानदेशी आहात? वर्‍हाडी? माणदेशी? मराठ्वाड्याकडचे? घाटावरचे की कोकणातले? तुम्ही कुठचेही असा, हा लेख खास तुमच्याचसाठीच !
असं काय करताय राव? ‘सुखी संसाराचा मंत्र’ सांगतोय की !!
सोळा आणे सत्य. चुकीचा ठरलो ना, तर सांगाल त्याच्या ढेंगे खालून जायची तयारी आहे आपली.
तर ऐका आणि तुम्हीच ठरवा.

शनिवारी रात्री, यथासांग ‘कार्यक्रम’ झालेला असल्याने, नवरोबा पलंगावर ‘सुशेगात’ होता. रविवारचे सकाळचे दहा झाल्याचे त्याच्या गावीही नव्हते. स्वैपाकघरात बायकोची लगीनघाई. पहाटे पाच वाजताच तिचे ‘मिशन ए पंगतभोजन’ सुरू झालेलं. त्यामुळे नवर्‍याचे अद्याप लोळत पडणं, तिला असह्य होत होतं. दर मिनिटागणिक तिच्या चिडचिडीला फोडणी मिळत होती. गॅसवर मटण रटरटत होतं, आणि तिच्या मनात संताप. ‘रश्या’ला शेवटची उकळी देऊन ती गॅस बंद करते आणि बेडरूमकडे मोर्चा वळवते.
‘’संसार सांभाळण्याचा ठेका जसा माझ्या एकटीचाच आहे. सण-वार, रीत-भात मीच पहायचे. पै-पाहुणे मीच जोडून ठेवायचे. तुम्ही मात्र खुशाल लोळत पडा.’’ बायको एका हाताने लाटणे फिरवत, तावातावाने बोलत होती. रणचंडिकेच्या अवतारातील तिच्या रूपात, जिभेवर मात्र सरस्वती खेळत होती.
आता नवरोबाची झोप, गोधडीच्या घडीतून अलगत कपाटात. घाईने तो बाथरूमचा आश्रय घेतो. शत्रूपक्षपासून बचाव करण्याकरीता, खंदकाचा आसरा घेतल्यागत. आजवरच्या अंनुभवातून बराच गनिमीकावा, नवरोबाने आत्मसात केलेला. शॉवरचं थंडगार पाणी त्याच्या डोक्यावर पडताच त्याच्या ‘डोस्क्यात’ प्रकाश पडतो. बायकोच्या ह्या अवतारामागच्या रहस्याचा, त्याला झटदीशी उलगडा होतो. आपली चूक त्याला उमगते. सपशेल माघार ! त्याचं धोरण ठरतं.
आजचा दिवस, बायकोच्या दृष्टीने खास होता. तिचा मावसभाऊ, बायका-मुलांसह दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित पाहुणा होता. भाऊ तिच्या हातच्या मटणाचा, फार चाहता होता. आणि अशा दिवशी नेमके आपण लोळत पडतो. आपल्यावर तर खास जबाबदारी होती, बाजारातून, ‘राणे डेअरीतून एक किलो आम्रखंड आणून द्यायची. ‘या खुदा, मै निकला गधा’, नवरोबा मनातल्या मनात, स्वतःला शिव्या घालतो. पैशाचं पाकीट, गाडीची किल्ली आणि कापडी पिशवी घेऊन सुमडीत कलटी मारतो.
त्याची ही नेहमीची खेळी, बायको चांगलीच ओळखून असते. तर तिकडे, ‘राणे डेअरी’तून आम्रखंड घेतल्यावरच, नवरोबा सुटकेचा निश्वास सोडतो. बायकोला खुश करण्यासाठी अजून काय करता येईल? तो विचार करतो आणि ‘मघई’ पान घेतो खास चांदीचा वर्ख लावलेलं.
इकडे घरी, बायकोच्या मावसभावाचं, त्याची बायको, मोठी मुलगी आणि धाकट्या मुलाचं आगमन झालेलं. बायको मोठ्या खुशीत त्यांचं स्वागत करते. ख्याली खुशाली होते. थोड्या वेळाने भाऊ नवरोबाची चौकशी करतो. मग काय बायकोची तक्रारीची ‘सीडी’ सुरू होते.
‘’मी आहे म्हणून हा संसार टिकून आहे. दुसरी कोणी असती ना, तर काही खरं नव्हतं.’’ अरे दादा तूच काही तरी समजावून सांग ह्यांना.’’
इतक्यात धापा टाकत नवरोबा हजर.
‘’सालेसाहेब आपले स्वागत असो.’’ आपल्यासाठीच खास आम्रखंड आणायला गेलो होतो. आपल्याच ताईच्या आज्ञेवरून ! आणि आपल्या ताईसाहेबांसाठी खास मघई पान. नवरोबा, मधाळ स्वरात बोलका पोपट होऊन जातो.

नवरोबाची ही ‘गेम चेंजर’ खेळी, ‘काफी असरदार’ साबीत होते. घरातलं वातावरण एकदम बदलून जातं. मावसभावाला नवरोबाच्या कौतुकाचं कोण भरतं येतं.
‘’काही म्हण पण ताई, तू नशिब काढलंस. किती करतात तुझ्यासाठी दाजी !’’
नवरोबा मिश्किल नजरेने बायकोकडे कटाक्ष टाकतो. नवर्‍याच्या झालेल्या अनपेक्षित कौतुकाने तिचा चेहरा पाहण्यासारखा होतो.

तेव्हा, संसार सुखाचा होणं फारसं अवघड नाही. फक्त मौनात केव्हा राहायचं आणि केव्हा बोलका पोपट व्हायचं हे समजायला हवं !
हाच तर आहे, सुखी संसाराचा मंत्र !!

anilbagul1968@gmail.com

लॉन्ग ड्राईव्ह



रविवारची रम्य सकाळ. हवेत गुलाबी थंडी. वातावरण अगदी प्रसन्न ताजे. तोच ताजेपणा बायकोच्या टवटवीत चेहेर्‍यावर. प्रेमगीताची प्रफुल्ल गुणगुण. मनापासून स्वैपाक चाललेला. लसणीचं लाल तिखट, करून झालेलं. बटाटे उकडून त्याचा कुस्कुरा करून, निगुतीने त्यात आलं-मिरचीचा ठेचा घालून बारीकसे गोळे करून ठेवलेले. नवऱ्याने न्याहारीची फर्माईश करण्याचीच फक्त वाट. अखेर नवरोबा तिला विचारतोच.
''अगं बायको, दे पटकन काहीतरी. खूप भूक लागलीय.''

नवरोबा मुडात असला की तो तिला 'अगं बायको' अशी हाक मारतो. बायको मनातल्या मनांत अधिक खुश होते. ती ख़ुशी तिच्या हालचालीत दिसू लागते. सफाईने ती पहिला घाणा काढते. लालसर पिवळे चार बटाटवडे प्लेट मध्ये येतात. सोबत लाल तिखटाची चटणी.
''घ्या तुमचे आवडीचे बटाटवडे. संडे स्पेशल.’’ बायको.
नवरोबाची कळी खुलते. बटाटवडे म्हणजे त्याचा जीव की प्राण. अधाशासारखे तो खात राहतो. सातवा वडा चेपल्यावर तो तृप्तीचा ढेकर देतो.
‘’व्वा ss बायकोबा मजा आला.‘’ नवरोबा.
तो खूपच रंगात आला की बायकोला हमखास ‘बायकोबा’ म्हणतो.

‘हीच ती वेळ.’ बायको मनात म्हणते.
‘’अहो, ऐका ना. वातावरण कित्ती छान आहे ना. असं वाटतय ना, कुठेतरी मस्त फिरायला जावं. ए शिरू, जावूयात लॉन्ग ड्राईव्हला?’’ बायको लाडीक आवाजात विचारते.
सात बटाटावड्यांच्या आस्वादाने, सुखाच्या सातव्या ‘आसमान’वर असलेला नवरोबा, लगेच मान डोलावतो.

जव्हार घाटाचा निसर्गरम्य परिसर. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ. मधूनच कुठे कुठे रानफुले डोकावतायत. कधी पांढरी कधी पिवळी. कुठे रंगीत तेरडा फुलून आलेला. दूर कुठे डोंगरावर, मोत्याच्या माळा मिरवल्यासारखा एखादा पाण्याचा ओघोळ. निसर्गाच्या ह्या अनुपम रूपाने मूड खुलत गेलेला.

‘’चांदण्यात फिरतांना माझा धरिलास हात’’... आशाचा मखमली स्वर ‘होंडा सिटी’त डेकवर ऐकू येऊ लागला. नवरा-बायकोच्या मनात दिवसा-उजेडी चांदण्यांनी प्रेमाची पखरण घालायला सुरवात केली. सुमन कल्याणपुरकर सुमधुर आवाजात गात होत्या. ‘’केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर हा’’... दोघ्यांच्याही मनात संसारसुखाच्या गोड आठवणींचा मोर थुई थुई नाचू लागला. मग कधी लता, कधी किशोर येऊन गाऊ लागले. जगजीत सिंह स्वतः आले. ‘होशवालोंको खबर क्या’… गझल पेश करून गेले. दोघेही त्यात दंगून गेले. मग आठवणींची मैफल रंगू लागली. एक एक रम्य आठवणी अलगद उलगडू लागल्या.

दोघांची झालेली पहिली भेट, त्याला आठवली. तिला, त्याने दिलेली पहिली भेट आठवली. मग साधेपणाने झालेले लग्न आठवले. जातीभिन्नतेमुळे नातेवाइकांनी फिरवलेली पाठ आठवली. मोजकेच, पण भक्कमपणे जवळ उभे राहिलेले स्नेही आठवले. कोकणात, त्याच्या गावी झालेला हनिमून दोघांना आठवला. पहिल्या रात्री वीज गेल्यावर, तिने हासडलेली शिवी आठवली. मग दोघेही मनमुराद हसले. त्यावेळी हसले होते अगदी तस्से. लग्नांनंतरचे, नव्या नवलाईचे दिवस आठवले. त्याने तिला, अपरिचित असलेलं कोकण दाखवलं. त्याने नंतर नाशिक पहिलं, अनुभवलं, आणि आपलंसही केलं. पुढे, स्वरालीच्या जन्माचा क्षण त्यांना आठवला. दोघांनाही भरून आलं. लाडाकोडात वाढलेली स्वराली, आता मोठी झालीय. तिच्या लग्नाचं आता बघायचय. विचाराने बायकोचे डोळे पाणावले. नवरोबाने हलक्या हातांनी बायकोला थोपटले. तिचे डोळे पुसले.

स्वरालीला कुठल्या जातीचा मुलगा पाहुयात? नवरोबाने तिला हलकेच प्रश्न केला. तिने त्याच्या चेहर्‍याकडे फक्त पहिलं. त्याने, तिच्या डोळ्यातलं वाचलं. जणू ती म्हणत होती, आपण पहिली होती का जात? सुखाने संसार करतोच आहोत ना? देवाने जन्माला घालताना, माणूस म्हणून घातले. तुम्ही, आम्ही, ह्या समाजाने, जाती-धर्माच्या, भेदाभेदाच्या भिंती उभ्या केल्या. त्या अमंगळ विचारांनी माणसामाणसात गट-तट पडले. उच्चनीचतेचे गंभीर कोडे तयार झाले. कधीही न उलगडणारे. आपण का अडकायचं त्यात?

आपल्याला फक्त, स्वरालीला समजून घेणारा, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा हवा. तिच्या संसाराचा प्रत्येक क्षण, सोहळा करणारा हवा. मग असुदे, कुठलीही त्याची जात !!

anilbagul1968@gmail.com

सोमवार पासून...


सोमवार पासून...


गोविंदनगरच्या ’चैत्र संतोष’ सोसायटीच्या आवारात बायको घामाघूम होत शिरते. पाठोपाठ नवरोबा. लिफ्ट बंद असल्याची ‘सुवार्ता’ सोसायटीचा वॉचमन तत्परतेने देतो. बायकोच्या चेहऱ्यावर लगोलग आठ्यांचं जाळं पसरतं. आता तीन मजले चढायचे. म्हणजे साठ पायऱ्या. सुखवस्तू झालेल्या बायकोला लिफ्टची सवय. व्यायाम, योगा, डायट, जॉगिंग आदी शब्द बायकोच्या शब्दकोषातून केव्हाच गायब झालेले. त्यामुळे वीस वर्षाच्या संसारानंतर संसारसुख देहावर व्यापून होतं. साठावी पायरी चढेतो तिची कोण फे फे उडालेली. हाश हूश करत, कपाळावरचा घाम पुसत ती सोफ्यावर फतकल मारते. तर रोजच्या जिने चढण्याच्या सवयीने नवरोबा अगदी आरामात तीन मजले चढून केव्हाच घरात आलेला.
‘’ह्या ''सोसायटीवाल्यांना कामं नकोत करायला. फुकटचे चेअरमन, सेक्रेटरी झालेत लेकाचे. आम्ही पैसे मोजतो मेंटेनन्सचे. चिंचोके नई काई !'' बायको भलतीच उखडली होती.
सावज आता शिकारीच्या टप्य्यात आलंय, नवरोबाने अचूक हेरलं.
''त्या सोसायटीवाल्याना दोष देते आहेस, पण स्वतःच्या देहाकडे पहा जरा. सगळीकडंनं, सुटली आहेस मैद्याच्या पोत्यासारखी ! चालण्याची सवय नाही राहिली, तीन जिने चढतांना फा फू होते आहे. चांगलं नाही लक्षण !!'' नवरोबाने अचूक बाण सोडून सावज जेरीस आणलं.
‘’माझ्याबरोबर रोज ‘आकाशवाणी’ शेजारच्या जॉगिंग ट्रॅकवर यायचं.’’
नवरोबाने दूसरा बाण सोडला. सावज आता पुरते गारद. मग संध्याकाळी दोघेही 'डिकॅथलॉन'मध्ये. दोन ट्रॅक सूट, एक स्पोर्ट शूज, टॉवेल, वॉटर बॉटलची उत्साहात खरेदी होते.

दुसर्‍या दिवशी, पहाटे नवरोबा तयार होतो, जॉगिंग ट्रॅकवर जाण्यासाठी. बायको मात्र आळसावून लोळत पडलेली. जॉगिंगला जाण तिच्या चांगलच जिवावर आलेलं.
‘’शिरू तू जा, माझं आणि माझ्या मैत्रिणीचं-स्मिताचं ठरलंय. आम्ही रोज संध्याकाळी जाणार आहोत.'' लाडीक आवाजात बायको.
संध्याकाळी बायको ट्रॅक सूट चढवून, स्पोर्ट शूज घालून ऐटीत लिफ्टने खाली येते. खाली स्मिता तिच्या होंडा सिटीत, गाणी ऐकत वाट बघत असते.
‘’ए रूपाली, ऐक ना, ‘इंद्रप्रस्थं हॉल’ मध्ये साड्यांचा सेल लागलाय, उद्याचाच दिवस आहे. आत्ता जाऊयात? '' स्मिता.
रूपालीला देखिल मोह आवरत नाही. ‘इंद्रप्रस्थं हॉल’मध्ये बायकांची तुडुंब गर्दी. गर्दीत शिरून दोघी चार चार साड्या खरेदी करतात. ‘कित्ती फायद्याचा झालाय सौदा’ अशा अविर्भावात दोघांची पावलं तिथल्या फूड स्टॉलकडे आपसूक वळतात. एक एक प्लेट रगडा पॅटीस, एक एक प्लेट पाणीपुरी हादडून होते. मग दोघींना आपण जॉगिंगला जाण्यासाठी निघालो होतो ह्याची जाणीव होते.
‘’ए, स्मिता, ऐक ना. तशी ही कुठल्याही कामाची सुरवात शनिवारी करूच नाही. उद्या रविवारच आहे. आपण सोमवार पासून जाऊयात जॉगिंगला’’. बायको.
‘’ हो हो नक्की जावुयात सोमवार पासून.’’ स्मिता.
सोमवारी सकाळीच नवरोबा ऑफिस टूरवर निघून जातो, आणि जॉगिंगची ‘टूम’ बोंबलते.

एके शनिवारी बायकोच्या घरी मैत्रीणिंची किटी पार्टी असते.
''अय्या लिना कसली बारीक झालीयस, करतेस काय?'' शलाका विचारते.
‘’ए लिना, सांग ना, सांग. सगळ्या जणी गलका करतात.’’
‘’अगं मी ना, कीनई ‘कीटो डाएट’ फॉलो करते. दहा दिवसात सहा किलो वजन उतरवलं.’’ लिना.
मग लिना, ‘कीटो डायट प्लान’ आणि त्याचे फायदे, सगळ्यांना समजावते. एव्हाना बायकोने सातवा गुलाबजाम मटकावलेला असतो.
‘’ए रूपाली, आपण ही फॉलो करायचं ‘कीटो डाएट’?’’ स्मिता.
‘’हो नक्की करुयात, सोमवार पासून.’’ इति बायको.
असे अनेक सोमवार येतात नी जातात. कधी ‘कीटो डाएट’, कधी ‘जि. एम’ डायट तर कधी ‘दिक्षित डायट’, असे अनेक फंडे मार्केटमध्ये हवा करून असतात.
असे अनेक सोमवार येतात नी जातात. कधी ‘झुंबा’, कधी ‘पिलाटे’ तर कधी ‘योगा’ ह्याची क्रेझ मार्केटमध्ये जोरात असते. पण रूपाली सारखच बहुतांशी लोकांचं पक्क ठरलेलं असतं.
सोमवार पासून ...

--- अनिल सुमति बागुल

येडा है पर मेरा है




''तुम्हाला व्यवहारातलं कवडीचं कळत नाही. केलेत ना लाखाचे बारा हजार ! तरी बरं, मी नेहमी तुमच्या कानी-कपाळी ओरडत असते, झटपट श्रीमंतीच्या मागे लागू नका.’’
'स्टॉपलॉस' हीट झाल्यासारखी अचानक बायको नवर्‍यावर सुटली होती. बायकोच्या आवाजात तीव्र चढ-उतार होत होता. शेअर्सच्या चढ-उतारीत लाख रुपये गमावून बसलेला नवरोबा, मुकाट ऐकून घेत होता.

त्यानंतर बरेच दिवस, नवरोबा गप्पं गप्पं असायचा घरी असला की. पण झटपट पैसे कमवण्याची त्याची 'खाज' त्याला फार काळ चूप ठेवेना. एके दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली 'ती' जाहिरात त्याने पाहिली. ’दोन वर्षात दामदुप्पट.' त्वरीत भेटा, श्रि. जिग्नेश ठक्कर - समृद्धी फायनान्स. नवरोबाचे डोळे लकाकतात. पन्नास हजार जर आपण गुंतवले तर दोन वर्षात लाख रुपये होतील. शेअर मार्केटमध्ये झालेला लॉस भरून काढता येईल. बायकोची बोलती बंद करण्याचा चांगला चान्स आहे, नवरोबा विचार करतो.

‘समृद्धी फायनान्स’च्या कार्यालयात नवरोबा भर दुपारी, रणरणत्या उन्हात पोहोचतो. दरवाज्यावरचा गुरखा, ‘सलाम शाब जी’ असं म्हणत, कमरेत झुकून त्याला कुर्निसात करतो. मग मोठ्या अदबीने काचेचा भला मोठा दरवाजा उघडून देतो. नवरोबाला इथंच जाम भारी वाटलेलं असतं. ‘एसी’ची थंडगार झुळूक त्याला भलतीच सुखावून जाते. तिथल्या पांढर्‍या शुभ्र गुबगुबीत सोफ्यावर तो विराजमान होतो.
‘’नमस्कार सर, मी मिस पारूल, मी आपली काय सेवा करू शकते?’’
रिसेप्शन काउंटरवरची तरुणी, मधाळ आवाजात नवरोबाला विचारते. अंगावरून मोरपीस फिरल्याचा त्याला भास होतो. तो तिला ’दोन वर्षात दामदुप्पट’ या जाहिरातीचं कात्रण दाखवतो. ती हसून मान डोलवते.

‘’या माझ्याबरोबर.’’ असं म्हणत मिस पारूल, नवरोबाला एका ऐसपैस आणि पॉश केबिनमध्ये घेऊन जाते. तिथे त्याची ओळख मायरा मॅडमशी करून देऊन निघून जाते.
‘’अगदी योग्य जागी आलात सर !, लोकं, शेअर मार्केटमध्ये लाखाचे बारा हजार करतात, पण आम्ही बारा हजाराचे लाख रुपये करतो. आमचे जिग्नेश सर फार एक्स्पर्ट आहेत शेअर मार्केट मधले. ही इज जिनियस जेम ! डोन्ट वरी मि. शिरीष, जस्ट इन्वेस्ट टेन लैखस अँड जस्ट फर्गेट ! आम्ही चेकने पैशे घेतो आणि चेकने परत देतो तेही डबल !! टोटल ट्रान्स्परन्सी !!! नवरोबाची अवस्था ‘हिप्नोटाइज’ झाल्यासारखी. आपसूक तो लाख रुपयाचा चेक, सही करून मायरा मॅडमकडे सोपवतो.

नवरोबा रात्रभर, पैसे दामदुप्पट झाल्याचे स्वप्न पाहत असतो. सकाळी मोठ्या उत्साहाने उठतो. चहा पिता पिता समोरचे दैनिक वाचायला घेतो. पेपरमधल्या हेड लाइनने तो जाम हादरून जातो. त्याचं अंग थरथरतं हीव भरल्यागत. त्याची ही अवस्था बायको मघापसून बघत असते. बायको त्याच्या जवळ येते. त्याच्या कपाळावर हात ठेवते. तिच्या हाताला चटका जाणवतो. नवरोबाला सटसटून ताप भरलेला असतो. ती त्याला जवळ घेताक्षणी तो स्फुंदून स्फुंदून रडायला लागतो. बराच वेळ ती त्याला रडू देते अन थोड्या वेळाने कारण विचारते. नवरोबा रडता रडता तो पेपर पुढे करतो आणि बोटाने ‘ती’ बातमी दाखवतो.
‘समृद्धी फायनान्स’ कार्यालयाला टाळे, संचालक फरार. हजारो लोकांचे गुंतवलेले कोट्यवधी रुपये बुडाले.
आता बायकोला उलगडा होतो. झटपट पैशाच्या मोहापाई, नवरोबाने पुन्हा ‘लाखाचे बारा हजार’ केले तर ! ती नवरोबाकडे रागाने पहाते. त्याच्या भोळ्या भाबड्या चेहेर्‍यावर अपराधी भाव पसरलेला, आणि डोळ्यांत मूर्तीमंत कारुण्य !! तिला भडभडून येतं. अचानक तिला ‘कुरकुरे’ची जाहिरात आणि त्याची टॅगलाईन आठवते, ‘’तेढा है पर मेरा है.’’

ती नवरोबाला आणखी जवळ घेते आणि त्याच्या कानात पुटपुटते,’’ येडा है पर मेरा है !!’’

anilbagul1968@gmail.com

Saturday 9 November 2019

फॅशनची ऐशी की तैशी



‘सुशेगात’ सुरू असतो दोघांचा, अहं, स्वरालीच्या जन्मानंतर आता तिघांचा संसार. लग्नानंतर आपल्या बायकोला ‘मॉडर्न’, फॅशनेबल बनवायचंच, असं नवरोबाने केव्हाच ठरवलेलं. पण संसार सोईला लागता लागता, तब्बल बारा वर्षे उलटून गेलेली. ‘हीच ती वेळ’ असं नवरोबा आता ठरवतो. प्रथम सेट अप बॉक्स मध्ये ‘f’ चॅनेल सुरू करतो. ‘फेमिना’, ‘फिल्म फेयर’ मॅगझिन्स घेऊन येतो. शहरात कुठे एखादा ‘फॅशन शो’ असेल तर बायकोला घेऊन जातो. एकुणात तिच्यात ‘फॅशन सेन्स’ कसा तयार करता येईल, ह्यासाठीचा त्याचा आटापिटा सुरू असतो.

एखाद्या रविवारी, मग बायकोला घेऊन मॉलमध्ये खरेदीला जाणं ठरलेलं. तिच्यासाठी गॉगल्स, वेगवेगळ्या लिपस्टिक्स, नेल्पेंट्स, आर्टिफिशल ज्वेलरी, असं काही खरेदी, अगदी उत्साहात करणं आलच. एव्हढं करूनही बायको तिच्या भूमिकेवर ठाम. स्लीवलेस कपडे घालणं, जीन्स पॅंट घालणं म्हणजे तिच्या लेखी घोर पाप ! हाय हिल्स सँडल्स घातल्या की लोकं नावे ठेवतील हे तिचं मत.

आज आपण जोर लावून शेवटचा प्रयत्न करुयात, असं नवरा एके दिवशी ठरवतो. बायको आंघोळीला बाथरूममध्ये असते. बेडवर नेसायची साडी-ब्लाऊजची जोडी ठेवलेली असते. नवरा कातरीने ब्लाऊजचे हात कलम करून टाकतो आणि बायकोला जबरदस्तीने ते घालायला लावतो. मग ‘हाय हिल्स सँडल्स’ची जबरदस्ती. मग 'रॅम्प वॉक' करत नवरा बायकोची जोडी खरेदीसाठी मेन रोडवर ! हाय हिल्सची सवय नसल्याने बायकोची तारांबळ उडालेली. तर डार्क काळ्या रंगाच्या गॉगलमुळे समोरचे अंधुक दिसत असावे. एव्हढ्यात धपकन बायको रस्त्यावर आपटते. त्या दिवसापासून नवरोबाचा कानाला खडा ! 

एके दिवशी नवरोबाचा भाऊ विवेक त्याची पत्नी अंजली त्यांच्या घरी नाशिकला येणार असतात. नवरोबाला कोण आनंद होतो. उत्साहाने तो बायकोशी चर्चा करतो, ते आल्यावर काय काय करायचं त्याबद्दल. मग दुसर्‍या दिवशी सकाळी नवरोबाची लगबग सुरू होते. घाईघाईने तो आवरून तयार होतो. बायकोची मात्र अद्याप सकाळ झालेली नसते. नवरोबाची मनातून चिडचिड सुरू होते, मात्र तो चकार शब्द काढत नाही.

इतक्यात दरवाजाची बेल वाजते. नवरोबा दरवाजा उघडतो. भाऊ आणि वाहिनी उत्साहाने घरात शिरतात. नवरोबा चटकन एका बदलाची मनोमन नोंद घेतो. एरवी पुण्यात सदाशिवपेठीच्या घरात शिस्तीत राहणारे, वागणारे ते, इथं वेगळ्याच मूड मध्ये ! पेहरावापासून बोलण्यात एक वेगळाच सैलपणा. विवेक पानाफुलांच्या डिझाईन्स असलेल्या रंगेबेरंगी हाफ शर्टमध्ये. खाली चक्क बर्मुडा, तीही लाल भडक रंगाची. आणि वहिनीची तर आणखी कमाल, थ्रि–फोर्थ ग्रीन लेगिन्स आणि वर लेमन यलो कलरचा टॉप, हाल्टर नेकचा ! नवरोबा आश्चर्याने पाहू लागतो, बायको तर अवाक !!
‘’अरे शिरीष, दिवाळीत गोव्याला गेलो होतो, तिथूनच येतोय !’’
त्या दोघांचे असे चेहरे पाहून विवेक घाईघाईने खुलासा करतो.
‘’आणि वाहिनी, जेवण बनवायच्या भानगडीत पडू नकोस, आपण सुला वाईन्सला जावूयात, अंजलीला कधीची वायनरी पहायचीय !’’ इति विवेक.

हे सगळं बघून, ऐकून नवरोबा एका वेगळ्याच धुंदीत जातो. जीन्स–टीशर्ट घालून, वरुन छानसा सेंटचा फवारा उडवून, तयार होऊन बाहेर हॉलमध्ये येतो. भाऊ आणि वाहिनीसोबत गप्पा मारू लागतो. थोड्यावेळाने बायको बेडरूम मधून तयारी करून बाहेर येते. हिरव्या रंगाची काठपदरी सेमी सिल्क पैठणी, केसांचा अंबाडा, कपाळावर लालचुटुक चंद्रकोर. ‘हळदी कुंकुवा’ला निघल्यासारखी तिची ती तयारी पाहून नवरोबाची चरफड होते. बायको त्याच्याकडे पहाते, कशी दिसते आहे ते सांग ह्या अर्थाने. नवरोबा नाइलाजाने होकारार्थी मान हलवतो. पण ही ‘फॅशनची ऐशी की तैशी’ पाहून मनातल्या मनांत हासडतो, एक खास कोकणी शिवी!

anilbagul1968@gmail.com



Tuesday 5 November 2019

सुख म्हणजे नक्की काय असतं ?



बालाजी मंदिरात पोहोचेतो अंधार दाटून आला होता. पण घड्याळी काटा तर सायंकाळचे पाच वाजल्याचे सांगत होता. अचानक जोराचा वारा सुटला अन आभाळात वीजा चमकू लागल्या. झिम्माड पाऊस येणार हे सांगायला, कोणा ज्योतिष्याची आता गरज नव्हती. होतही तसंच ! थोड्या वेळानं पावसाचा जोर किंचित कमी होतो. मग दोघं कसबसं मंदीर गाठतात.

व्यंकट रमणा हर गोविंदा ! व्यंकट रमणा हर गोविंदा !! उजव्या हाताने धूप-आरतीचे तबक फिरवत, डाव्या हाताने सफाईने घंटा हलवत पुजारी बालाजीच्या नावाचा गजर करीत असतो. बाहेर धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे त्याला भान नसावे, इतका तो तल्लिन झालेला असतो. दर्शन घेऊन दोघही तिथं असणाऱ्या बोर्डाकडे वळतात.

दिवाळी निमित्ताने दहा दिवस वेगवेगळ्या पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या. कुंकुमार्चन, पुष्पांजली, फलार्पण वगैरे. शेवटच्या दिवशी काय? दोघही ते उत्सुकतेने पाहू लागले. मिष्टान्नार्पण...

नवरोबाने पुजाऱ्याला विचारले, हे कसं असतं?
‘’हजार लाडवांचा भोग बालाजीला अभिषेक म्हणून चढवायचा ! लाडू मात्र साजूक तुपातले हवेत !!’’ पुजारी उत्तरला.
त्याने पत्नीकडे पाहिले तर तिने मानेनेच नकार दर्शवला. मग दोघेही निघाले, तो विषय तिथेच सोडून.

पत्नीचा वाढदिवस जवळ आला होता. नवरोबा दरवर्षी तिला सरप्राईज गिफ्टदेत आला आहे. पण ह्या वर्षी कसं करायचं? त्याला काहीच सुचत नव्हतं. मित्र मंडळींना जमवून, छानशी पार्टी तर नेहमीचीच. पण ह्यावेळी काहीतरी वेगळं व्हावं, असं सारखं त्याला वाटत होतं.
    
अचानक नवरोबाला नितीनचा फोन येतो. नितिन सोनावणे एक एनजीओचालवतो. पेठसुरगाणा भागात, त्याची संस्था, आदिवासी लोकांकरिता काम करते. त्याच्याशी नवरोबाचं बोलणं होतं, सहज इकडचं-तिकडचं. फोन खाली ठेवल्यावर त्याला एकदम क्लिक होतं.  बायकोच्या वाढदिवशी, आपण जाऊयात का एखाद्या आदिवासी पाड्यावर? दुर्गम अशा भागात, जिथे सहसा मदत पोहचत नाही अशा ठिकाणी !

वा sss ही आयडिया, त्याची त्यालाच भारी आवडलेली असते. नितिनशी परत बोलणं होतं. हरसूलपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या वांदरपाडाइथं जा असं त्याचं सांगणं. तिथला माणूस जोडीला द्यायची व्यवस्था, तो करून देऊ शकत असतो.

चला, काहीतरी चांगलं आणि हटके करायाची संधी मिळाली होती. तो उत्साहाने कामाला लागतो. तो बायकोला ही कल्पना सांगतो. घरात वापरात नसलेले बरेच कपडे असतील, ते घेऊन जाऊ तिथे. बायको म्हणते, दिवाळीचा फराळ आणि काहीतरी गोडधोड घेऊन जावूयात. अनायासे दिवाळी आहे, सण साजरा करूयात त्यांच्यासोबत.

हरसूलला नितिनने सांगितलेला माणूस उत्तम बोरसेत्यांना भेटतो. त्याला जोडीला घेऊन ते निघतात. वांदरपाडाहरसूल पासून पाच किलोमीटर अंतरावर. पोहोचेतो दुपारचा एक वाजतो. ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच जाणवत असतो. पण दोघेही उत्साहात असतात. घामाघूम होत ते पाड्यावर पोहचतात. उत्तमच्या घरापाशी बाया-बापड्या, पोरासोरांची ही गर्दी !

बरोबरचे कपडे उत्तमच्या ताब्यात वाटपासाठी देतात. आणि खायचे फरळाचे जिन्नस, घाईघाईने बाहेर काढून वाटू लागतात. लहानगी लेकरं अगदी तुटून पडतात त्यावर. फार भुकेलेली असावीत. मग बायको केशरी रंगाचे बुंदीचे लाडू बाहेर काढते, छान साजूक तुपातले. त्या लाडवांची रास पाहून साऱ्यांचे डोळे विस्फारतात ! पटापट सगळ्यांना दोन दोन लाडू देतात. लाडवाच्या प्रत्येक घासागणिक त्या लहानग्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद द्विगुणित होतांना त्यांना जाणवतो. नवरोबा बायकोकडे पाहून विचारतो, कसं वाटतंय?

‘’बालाजीला मिष्टान्नार्पण... केल्यासारखं वाटतंय ! साजूक तुपातल्या लाडवांचा ह्याच्याहून काय वेगळा असतो अभिषेक !!’’ बायकोच्या चेहर्‍यावरचे समाधानाचे प्रसन्न भाव पाहून नवरोबा सुखावतो. वाढदिवस सत्कारणी लागल्याच्या आनंदात, मग बायकोही सुखाने नवरोबाचा हात हाती धरते.

anilbagul1968@gmail.com



Sunday 27 October 2019

फराळ, फटाके आणि चटके



लग्नाला आता दहा वर्षे झालीत. घरात 'स्वराली'च्या, मुलीच्या रूपाने सुख नांदते आहे. दिवाळी दाराशी आलेली आहे. 'गोविंदनगर'च्या ऐसपैस फ्लॅटमध्ये साफसफाई जोरात सुरु आहे. त्यात परत फराळ करायची धांदल ! नवरोबाला चिवडा, चकली आवडते, तर स्वरालीला करंज्या. खरं तर स्वरालीचा हट्ट होता फटाके आणण्याचा. पण नवरोबा पडले पर्यावरण प्रेमी. 'ग्लोबल वार्मिंग', 'कार्बन उत्सर्जन', 'इ -दिवाळी' असे मोठे मोठे शब्द वापरून तो स्वरालीला दिवसभर समजावत राहिला. शेवटी 'पिंक कलर'चा एक ड्रेस आणि किंडल ह्यावर तह आटोपला.

सायंकाळी बायको दरवाजात रांगोळी काढत असतांना, शेजारी 'मेहतां'च्या घरी लगबग सुरु झालेली तिला जाणवली. आनंदीबेनने बडोद्यावरून पाहुणे-तिचा भाऊ, भावजय आणि भाची आल्याची माहीती दिली. यावेळी भाऊबीजेला त्या बडोद्याला जाणार नव्हत्या, त्यामुळे भाऊंचं इथं आला होता.

दुसरा दिवस उजाडला, आज 'धनत्रयोदशी'. आज पासून खरी दिवाळी सुरु होणार. बायकोने चिवडा चकली आणि करंजीचे डबे काढले फराळाला, आणि नवरोबा आणि स्वरालीला आवाज दिला. दोघेही तुटून पडले. फराळावर, ते पाहून बायको समाधानी. इतक्यात आनंदीबेन घरात शिरतात. पाठोपाठ आनंदीबेनची भाची. आनंदीबेनने ओळख करून देतात, ''ही काव्या''.

''भाभी हैप्पी दिवाली, जिजू हैप्पी दिवाली'', इति काव्या.
नुकतीच विशी पार केलेली, काव्या फारच बोलकी वाटत होती. काळ्याभोर टप्पोऱ्या डोळ्यांची, गोरीपान काव्या, ब्लू जिन्स आणि वाईन कलरच्या टीशर्टमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
''हॅलो स्वराली, लोनी असं म्हणून, तिने स्वरालीच्या हातात भली मोट्ठी 'कॅडबरी' टेकवली.
''जिजू, ये लोनी, स्पेशल फाफडा, फॉर यू. '' असं म्हणत एक छान पॅक केलेला डब्बा, नवरोबाच्या हातात दिला. तिच्याकडे डोळे फाडून पाहणाऱ्या नवरोबाची नजर, बायकोला काहीतरी सांगून गेली.

संध्याकाळी तिघे, दरवर्षीप्रमाणे कपालेश्वर मंदिरात दर्शनाला जाऊन आले. सोसायटीच्या गेट मधून शिरतानांच, ‘काव्याचा खिदळण्याचा, आनंदाने चित्कारण्याचा आवाज येत होता. ती फटाके उडवण्यात दंग होती. बायकोने स्वरालीकडे आणि नवरोबाकडे पाहीले, दोघांचंही लक्ष काव्याकडे !

दिवाळीचा आज तिसरा दिवस, आज लक्ष्मीपूजन. नेहमीप्रमाणे तिने, स्वरालीला आणि नवरोबाला फराळाला बोलावले. तर दोघेही काव्याने दिलेला 'फाफड्या'चा डबा उघडून खाण्यात दंग. आज स्वरालीला, करंजी नकोशी झालेली आणि नवरोबाला चिवडा,चकली ! बायको काय समजायचे ते समजून चुकली.

फराळ होताच स्वराली, नवरोबा आणि काव्या बाहेर पडले बाजारात जाण्यासाठी. तिघांच चांगलच गूळ-पीठ जमल्यासारखं ! साधारण दोन तासांनी ते येतात तेच मुळी, हसत-खिदळत. तिघांच्याही हातात मोठ्ठाल्या प्लस्टिक पिशव्या !! फटाक्यांची मोट्ठी खरेदी झालेली. भुईचक्र, फुलबाज्या, भुईनळे, कारंजे, बाण, लवंगी फटाके आणि लक्ष्मी बॉम्ब ! मनाजोगते फटाके मिळाल्यामुळे स्वराली खुशीत. बायको नवऱ्याकडे पहाते.
''अगं स्वरालीचा खुपच हट्ट होता, म्हणून आणले. ते ग्लोबल वार्मिंग वगैरे ठीक आहे पण आपली संस्कृती टिकवणंही महत्वाचं. आणि मुलांचा आनंद का म्हणून आपण हिरावून घ्यायचा ? आणि तसही वर्षाच्या शेवटी, थर्टी फर्स्टला, नवीन वर्षाच्या स्वागताला, संपूर्ण जगात फटाके वाजतातच की?’’ नवरोबाचा भला मोठा खुलासा.

आज 'भाऊबीज'. बायको आणि आनंदीबेननी, ओवाळण्याचा कार्यक्रम एकत्र ठरवलेला. त्याप्रमाणे संध्याकाळी सगळे जण त्यांच्या घरी जमतात. आनंदीबेन त्यांच्या धाकट्या भावाला ओवाळतात. इतक्यात बायको नवरोबाला पाटावर बसायला सांगते, आणि 'काव्याला' चक्क गुजरातीत म्हणते,
‘’काव्या, तने तारा भाईने ओवाळू नथी के? ... तुला तुझ्या मोठ्या भावाला ओवाळायचं नाही का?’’
नवरोबा अवाक होऊन बायकोकडे पहातो. बायको मिश्किलपणे हसत असते. इतक्यात आनंदीबेन, काव्याच्या हातात ओवाळणीचं ताट ठेवतात. काव्या पुढे होते आणि नवरोबाला ओवाळते. ओवाळणी म्हणून पाचशेची नोट, ताटात ठेवतांना नवरोबाचा चेहरा, फटाक्यांचे चटके लागल्यासारखा अपराधी झालेला असतो. 

anilbagul1968@gmail.com






माजे राणी माजे मोगा



आंतरजातीय लग्नानंतरची आणखी एक गंमत ...

लग्नाला आता तीन वर्षे होऊन गेलीत. नव्या नवलाईची भरती संपून वादाच्या ओहोटीला सुरवात झालेली. दिवसाआडच्या चकमकी ठरलेल्या. एके दिवशी तर धुमशान घडून गेलं. एकमेकांच्या आई-बापाच्या नावाने उद्धार आणि एकमेकांच्या जातीवरुन वस्त्रहरणचा दशावतारी खेळ ! 
‘’तुझ्या आवशीचा घो!’’ नवरोबाने मालवणीचा आधार घेतला.
‘’दोन बापचा तू!! बायकोचा अस्सल नाशिक ठसका.  
वस्त्रहरण नाट्यातली ही दोन शेवटची वाक्ये !!!

बायकोने त्यानंतर अबोला धरला, घाईघाईने बॅग भरली आणि माहेरची वाट धरली. नवरोबा गुश्यातच होते. त्याने तिला अडवायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. रात्रभर नवरोबा विचार करत राहिला. आंतरजातीय लग्न करून आपण मोठी चूक केली का काय ? असं त्याला वाटू लागले. दोन दिवस झाले, तीन -चार दिवस उलटले. बायको घरी येईना आणि फोन पण घेईना. एव्हाना नवरोबाचा तो विचार कुठल्याकुठे गायब झाला. 'जमदग्नी' अवतारातून 'नवरोबा' अवतारात त्याचा ससा होऊन बसला. सासुरवाडीकडून तरी बोलावणं येईल ह्या अपेक्षेत तो होता. तो ही अपेक्षाभंग झाला. त्याच्या जीवाची घालमेल सुरु झाली. बायको आपली चांगलीच रिसवांन आहे, हे तो तीन वर्षांच्या सहवासात ओळखून गेला होता. अखेर त्याने मनाचा हिय्या केला आणि सासुरवाडी जवळ केली.

सासरी जावईबापूच थंड स्वागत झालेलं.
‘’जावईबापु, असं वागणं आमच्या बुद्धीला पटत नाही.’’ सासरेबुवा गुरगुरले.
इतक्यात स्वयंपाक घरातून भांड्याच्या आवाजाच्या तीन फैरी सासुबाईंनी झाडल्या. पाठोपाठ चहाचा कप, समोरच्या टीपॉय आदळून बायको तरातरा निघून गेली. नवरोबा मनातून जाम हादरून गेला. 

तुम्ही व्हा फुडं, तिची आई लेकीला पोहोचवून देईल उद्याच्याला’’ सासरेबुवांच्या ह्या शब्दांनी त्याला थोडा धीर मिळाला. त्याने मोका साधला आणि काढता पाय घेतला. दुसर्‍या दिवशी सासुबाईंनी लेकीची पाठवणी केली पण जातांना नवरोबाची चांगली शिकवणी घेतली. घरी बायको कामे सारी करीत राहिली पण अबोला कायम. तिला तसं गूश्यातच पाहून नवरोबा चक्रवला. शेवटी त्याने त्याच्या पुण्याच्या भावाचा सल्ला घ्यायच ठरवलं. घाईघाईने मोठ्या भावाला, विवेकला फोन केला, घडलेलं सारं कीर्तन गायलं.

''शिरीष, अरे काहीही विशेष घडलेलं नाही, उगाच टेन्शन घेऊ नकोस. घरोघरी असेच कार्यक्रम 'व्यवस्थित' होत असतात. तुझाही 'यथासांग' पार पडलाय. ''
नवरोबा अवाक होऊन ऐकतच राहिला.
''दादा, अरे ह्याच्यातून मार्ग कसा निघणार ते सांग ना? थोड्याश्या नाराजीने नवरोबाने विचारले.
‘’अरे शिरीष, तुमच्या प्रेमाची गोडी कमी झालीय, ती वाढव फक्त. थोडासा रुमानी हो जाय!’’ विवेक त्याला म्हणाला.

रविवार असून नवरोबा दुसर्‍या दिवशी सकाळी, लवकर उठले. आळोखे पिळोखे देत त्याने शेजारी पहिले. बायको पलंगावर घोरत पडलेली. घाईघाईने त्याने तोंड धुतले आणि लिव्हिंग रूम तडक गाठली. सफाईने  म्युझिक सिस्टम सुरू केली.
असा बेभान हा वारा sss.’ लतादिदींचा मखमली सुर घरात पसरू लागला.
आता नवरोबाने किचन गाठलेलं. चहाच पातेलं गॅस वर ठेऊन गाणे गुणगुणू लागला.

''गुड मॉर्निंग डार्लिंग. चाय ईज रेडी!'' टेरेस मध्ये झोपाळ्यावर बसून गाणे गुणगुणत बसलेल्या बायकोला उद्देशून नवरोबा म्हणाले. बायकोचे चकार शब्द नाहीत, मात्र चहा पिऊन कप खाली ठेवतांना मात्र बायकोने दाद दिली चहाला.
‘’मस्त झाला होता चहा, थॅंक यू डार्लिंग!’’

ते ऐकताच नवरोबा पार विरघळून गेला. झटक्यात पुढे झाला, तिला जवळ घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून मोकळा झाला. म्युझिक सिस्टम वर एव्हाना गाणं बदललं होतं.

लतादीदी आता गोड कोकणी गीत गात होत्या 
माजे राणी, माजे मोगा, तुजे डोळ्यात सोधता ठाव
माजे राजा, माजे मोगा, तुझे नावाक जोडता नाव
फुलाफुलांक पुशीत आयलो, तुजे माजे प्रीतीचो गाव

anilbagul1968@gmail.com




वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...