Saturday 17 November 2018

प्रिय नाना,

                                    #nanapatekar


परवाचा तुझा 'लोकसत्ता'तला लेख म्हंणजे शब्दांची जादूच होती. 
इरसाल कोकणीपणा जपत तू फारच भावूक लिहून गेलास लतादीदींवर ! 
काळीज हललं रे कुठेतरी !
दीदींना यावर्षी वाढदिवसाला मिळालेली हि अप्रतिम भेट असणार !!

तुझं आणि मकरंदचं ते 'नाम'चं काम थक्क करणारं, ह्यात काही शंकाच नाही. 
कित्येक शेतकरी आणि आयाबहिणी तुझ्यावरून जीव ओवाळण्यासाठी उत्सुक असतील.

बाबा आमटेंच्या कार्याने भारावून गेलेला तू. 
ठाकरे बंधूनी एकत्र यावं, अशी आस असणारा तू.

'पुरुष' मधून पुरुषी अहंकाराचा आसूड उगवणारा तू. 
'क्रांतिवीर' मधून देशप्रेमाचं स्फुल्लिंग चेतावणारा तू . 
अभिमानाने ऊर भरून यावा अशी तुझी चित्तरकथा.

प्रत्येक मराठी मन तुझ्यावर फिदा.

एका अवघड वाटेवर भरकटल्यासारखा झालास का रे ?

बॉलीवूड मधे टेचात पाय रोवून, आपल्याच कलंदर थाटात राहणारा तू ... 
त्या 'अग्निसाक्ष' मध्ये झलक दाखवून गेलास रे त्या विक्षिप्तपणाची.

असं काही नसणार असं अजून वाटतं रे मला. 
त्या तनुश्रीनं काही बाही आरोप केले, जीव धास्तावला. 
असं काही नसणार मन कालपर्यंत म्हणत होतं. 
बिग बॉस मध्ये प्रवेश मिळण्यासाठी तिनं हे केलं अशी माध्यमांची स्टोरी सुरु होती दिवसभर !


प्रियांका चोप्रा अन शिल्पा शेट्टी आणि आणखी काही तारकांनी तुझ्याविरोधात उघड भूमिका घेतली. 
आमिर आणि बिग बी नेहमीप्रमाणे गुळमुळीत.
सावंतांच्या राखी नामक महिलेने तुझं जोरदार समर्थन केलही. 
तरीही मन शंका घेतंच होतं.



पण त्या आपल्याचं रेणुका शहाणेची पोस्ट आणि सोबतचा व्हिडीओ पहिला अन ठोका चुकला काळजाचा !! 
रेणुका शहाणीच आहे ना ? ती असा वेडेपणा कसा करू शकेल ?
आपलीच रेणुका तुझ्या विरोधात बोलती झाली आणि तिच्या व्हिडीओने आमची बोलती बंद झाली.

कारमधे धास्तावलेली तनुश्री आणि बॉनेटवर नाचणारा तो कुठलासा कार्यकर्ता ... 
अक्षम्य अपराध !!
शिवबा असते तर काय शिक्षा दिली असती त्या राजाने ?
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आदराने पाठवणी करणाऱ्या माझ्या राजाच्या वारसांनी एका अबलेला असं भयभीत करावं ? 
आपल्या पुरुषी अहंकाराचा कंड शमवण्यासाठी ??

माझ्या नाशिकच्या मातीतल्या सारस्वतांच्या राजाने, अर्थात कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट मधला तो डायलॉग आठवला ... अन शहारलो.
''तू नट म्हणून वाईटच होतास पण माणूस म्हणूनही भिकारडा आहेस !!''

नाही , नाही तू तसा नक्कीच नाहीस.
हे नटसम्राटा, हे .. हे अखेर नाटकंच असेल ना ? 
भोळी भाबडी मराठमोळी आशा ...

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...