Saturday 3 November 2018

‘हुदलीकर’





''सर  ! इझी आहात  का बिझी आहात ?''
फोनवर हुदलीकर प्रसन्न आवाजात विचारात होते.
''बोला किती वाजता भेटायचं !''

माझं तत्परतेचं उत्तर; साऱ्या औपचारीकारात बाजूला सारत !
ह्यापूर्वी दोन भेटी झाल्या होत्या, आणि हुदलीकरांनी आपल्या मोकळया - ढाकळ्या  स्वभावाने आता त्याची गरजही ठेवली नव्हती.

 ''संध्याकाळी ७ वाजता भेटूयात, आमच्या फार्महाऊस वर जाऊयात", हुदलीकर.
ठरल्याप्रमाणे हुदलीकरांची गाडी घ्यायला आली, मी गाडीत शिरलो. गाडीत शिरताच, एका वेगळ्याच वासाची तीव्र जाणीव झाली. झटकन खिशातून रुमाल काढला आणि नाकाला लावला.

सर, तुम्ही कोकणातले, माशांचा वास सहन होत नाही? सुके बोंबील आहेत 'इव्हा'साठी ! 'इव्हा'ला बोंबील फार प्रिय. फार्म हाऊसवर जातांना प्रत्येक वेळी न्यावेच लागतात. आणि ही हाडकं 'लुसी'साठी. दुपारी घरी मटणाचा बेत होता. त्यातलीच काही ठेवलीत. हुदलीकरांच्या ह्या खुलाशाने 'इव्हा' आणि 'लुसी' ह्या प्राणिमात्रांचा मी लगेच अंदाज बांधला.

एव्हाना गाडी सातपूर पर्यंत आली होती. ड्राइव्हरला त्यांनी गाडी, भाजी बाजारापाशी घ्यायला सांगितली.

चला, असे मला म्हणत, हुदलीकर एक मोठी कापडी पिशवी घेऊन उतरले. पाठोपाठ मी. सातपूरच्या भाजीबाजारात, सायंकाळच्या त्या गर्दीत ते शिरले, झटपट चालत एका दुकानापाशी थांबले.

“मावशे, कशी आहेस?” असे सलगीने विचारात, कांदे -बटाटे, कोथींबीर, आलं, लसूण, कढीपत्ता असे असंख्य जिन्नस त्यांनी अवघ्या सात-आठ मिनिटात पिशवीत जमा केले.चला, असे मला परत म्हणत, हुदलीकर गाडीच्या दिशेने चालू लागले, पाठोपाठ मी. 

पुढच्या दहा मिनिटांत गाडी दुडगाव फाट्यावर पोहचली. फार्महाऊसवर खत मारावं लागणार आहे. एक गोणी २१-३९ युरिया आणि एक पिशवी फॉस्फेट घेऊन ये, 'खांदवे'च्या दुकानातून, हुदलीकरांनी ड्रायव्हरला सांगितले. असा सारा जामानिमा गोळा करत गाडी फार्म हाऊस वर पोहचली. 

गेटपाशी गाडीचा आवाज ऐकून 'इव्हा' आणि 'लुसी' जोडीचे मोठमोठ्या आवाजात भुंकणे ऐकू यायला लागले. ड्रायव्हरने हॉर्न वाजवायला सुरवात केली. हुदलीकर खाली उतरून 'हणम्या, हणम्या असा पुकारा करू लागले. गेटच्या पलीकडून एका लहान मुलगा हातातली काठी गेटवर आपटत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण ह्या सगळ्या ‘आवाजी लगीनघाईत’ तो काय सांगतोय ते कळेनासे झाले होते. न राहवून मी हुदलीकरांच्या खांद्यावर थापटत, त्यांचे त्या मुलाकडे लक्ष वेधले. त्याने कुलुपाची चावी दिली. ड्राइव्हरने कुलूप खोलून गेट उघडले आणि आम्ही आत गेलो. त्या मुलाचा बाप - हुदलीकरांचा हणम्या - दारू पिऊन 'फीस' होऊन पडला होता.

हुदलीकर आत शिरताच 'इव्हा' आणि 'लुसी' दोघीनीं त्यांच्याकडे धाव घेतली. एकीने त्यांना चाटायला सुरवात केली. एक त्यांच्या छातीवर पाय टेकवू लागली. मग हुकलीकरांनी सुके बोंबील, हाडकं त्यांना यथेच्छ खाऊ घातलं. एकीकडे त्यांचं त्यांना कुरवाळणे, लाड करणे त्यांच्याशी गप्पा मारणे सुरु होतेच.उसंत मिळताच हुकलीकरांनी 'हणम्याच्या बायकोला 'जिजा’ला भाजीची पिशवी सोपवत, स्वैपाक बनविण्यास सांगितले.

 मग त्या काळोख्या रात्री, विजेरीच्या प्रकाशात, हुदलीकरांनी मोठ्या उत्साहात संपूर्ण फार्म हाऊस, दाखवला; अगदी बारीक सारीक तपशिलांसह. एव्हाना हणम्याच्या पोरानं टेबल खुर्च्या मांडल्या आणि सरते शेवटी आमची गप्पांची बैठक सुरु झाली. हुदलीकरांनी बरोबर एक मोठीशी चामडी पिशवी आणली होती. असंख्य कागदांनी ओसंडून वाहत होती ती. त्यातील एक एक कागद बाहेर काढत एकाहून एक सरस कविता ते ऐकवत राहिले. कविता अर्थपूर्ण तर होत्याच, पण हुकलीकर त्या साभिनय गाऊन म्हणत होते. त्यांची शब्दांवरची हुकमत जाणवत होती. आता हुदलीकरांची ही ओळख नव्याने होत होती.

बऱ्याच वेळाने जेवण ताटांमध्ये वाढून जिजा घेऊन आली. ज्वारीच्या चुलीवरच्या गरमागरम  भाकऱ्या- पिठलं, कांदा आणि मिरचीचा ठेचा असा फक्कड बेत. आता रात्र बरीच झाली होती. हवेतला गारवा वाढला होता. कान आणि पोट दोन्हीही तृप्त झाले होते. विलक्षण भारावून मी घरी परतलो होतो.

त्यानंतर, अशा अनेक रात्री हुदलीकर फार्म हाऊस वर नेत गेले. तृप्त मैफिलीचा अनुभव प्रत्येक वेळी देत गेले.

‘कुटुंबवत्सल’ हुदलीकर व्यवसायाने बिल्डर. सिव्हिल इंजिनीरिंगच रीतसर शिक्षण घेतलं त्यांनी. एकूण बिल्डर जमात 'कर्तृत्वाने' बदनाम असली तरी हुदलीकर सचोटीने व्यवसाय करत आलेले. ‘इंदिरानगर’ भागा मध्ये अनेक ईमारती त्यांनी उभारलेल्या. प्रत्येक इमारतीचं नामकरण वैशिष्ठ्यपूर्ण, सुरवात त्यांच्या पत्नीच्या नावाने. चैत्र दीप, चैत्र नक्षत्र, चैत्र अमुक चैत्र तमुक.कोणतंही पाठबळ नसतांना, गरीब घरातल्या, वडिलांविना वाढलेल्या माणसाने स्वकर्तुत्वाने मिळवलेलं हे यश अद्भुतच !
पण एवढ्यावर थांबतील तर ते हुकलीकर कसले ?

दिवसभर रेती विटांमध्ये बुडालेले हुदलीकर, सायंकाळनंतर प्रतिभेचे अद्भुत रंग भरत असतात. कविता, चित्रपट गीते, लावण्या, कथालेखन, कथाकथन इतकंच काय तर मराठी गझला ! साहित्य विश्वातली त्यांची हि भरारी थक्क करून जाते !! सर्वाधिक लांबीच्या मराठी गझलेचं रेकॉर्ड-गिनीज बुकमध्ये त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १० डिसेंबर २०१० ला १० वाजून १० मिनिटांनी स्वतःच्या १० पुस्तकांचं प्रकाशन करणं. मृत्यूवरच्या कविता संग्रहाचं, स्मशानभूमीत प्रकाशन करणं. खुनाबद्दल जन्मठेप भोगून आलेल्या कैद्याला स्वतःच्या फार्महाऊसवर बोलावून आत्मकथन करवून घेणं...  अशा अनेक काहीशा विक्षिप्त वाटणाऱ्या कल्पना त्यांच्या मेंदूत सतत घोळत असतात !

 परवा बोलता बोलता मी त्यांना सहज डिवचत म्हटलं, एव्हढं सगळं करून मिळवायचं काय तुम्हाला?
एका क्षणात हुदलीकर तडफेने म्हणाले होते, " ह्यापुढचं ज्ञानपीठ माझ्या नावाचं असेल !"
त्यावेळच्या त्यांच्या चष्म्याआडच्या काळ्याशार डोळ्यातली चमक मला असह्य झाली होती.
नुसत्या आठवणीने आत्ताही अंगावर सर्रकन काटा आला.

anilbagul1968@gmail.com
   
   

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...