Tuesday 11 May 2021

दम लगाके हैशा!

 



 

'झिरो फिगर'ची क्रेझ आता राहिली नाहीये. बघा आजूबाजूला...

'सुंदरा मनामध्ये भरली'ची जाडू लतिका आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला मधील गोडु स्वीटू.

क्रेझ आता ह्यांची आहे. खोटं सांगतो कि काय? जनाब ‘करीना’ आता दोन मुलांची आई झालीय !

हे घडतंय २०२१ मध्ये!

 

‘पण 'दम लगाके हैशा!' आला २०१५ मध्ये!!

तेव्हा अश्या जाडूल्या पण गोडुल्या हिरोईनला घेऊन चित्रपट काढायचा म्हणजे मोठं धाडसाचंच काम! ‘यशराज’च मोठं बॅनर असलं की असा जुगार सहज खेळाला जाऊ शकतो.

 

तर हि कथा आहे प्रेम प्रकाश तिवारी आणि संध्या वर्मा ह्या जोडप्याची. घडतेय हरिद्वारमध्ये. कथेचा काळ आहे ९० च्या दशकाचा. जेव्हा ऑडिओ आणि व्हिडीओ कॅसेटचा जमाना होता.  आणि नाकात गाणारा कुमार शानू जोरात होता. 

 

तर आपला 'प्रेम' आहे, तिवारी कुटुंबाचा कुलदीपक. पढाईत जेमतेम. ती कशीबशी पूर्ण केल्यावर संभाळतोय बापाचा ऑडियो कॅसेटचा धंदा. गिऱ्हाइकांच्या मागणीप्रमाणे त्यानां कॅसेट मध्ये गाणी भरून देण्याचा हा व्यवसाय.

 

इथे आपण नॉस्टॅल्जीक होतो. आपणही अशी गाणी भरून घेतलेली असतात. ती ६० ची, ९० ची कॅसेट. कॅसेटची A साईड, B साईड. ती कॅसेट अडकणं. त्यातली ती टेप बाहेर येणं. तुम्हाला नक्की इथं आठवणार!

 

पण जमाना बदलतो आहे जनाब. ‘कॅसेटची जागा, आता ‘सीडीने घेतली आहे. तिवारी बाप बेटे बदल स्विकारायला अद्याप तयार नाही आहेत. पण ते महत्वाचे नाही. तर महत्वाचे आहे ‘प्रेम की शादी’.

 

जेमतेम शिकलेल्या आणि टुकूटुकू धंदा असणाऱ्या आपल्या कुलदीपकाला कुणी शहजादी मिळणार नाही ह्याची बापाला पूर्ण कल्पना आहे. काही तडजोड करायची त्याची मानसिकता झालेली आहे. हीच बाब तो सगळ्या तिवारी कुटुंबाच्या गळी उतरवतो आणि सगळे निघतात ‘प्रेम’ला दुल्हन बघायला. हा बघण्याचा कार्यक्रम असतो हरिद्वार मधल्याच वर्मा कुटुंबात.

 

वर्मा कुटुंब, सुशिक्षित आणि सधन. आपली दुल्हन ‘संध्या’ चांगली शिकलेली आणि शिक्षिका म्हणून नोकरी करणारी. दिसायला सुंदर, गोड, किंचितशी फटकळ पण चांगलीच वजनदार! पण ह्यामुळेच वर्मा कुटुंबाचीही तयारी असते तडजोडीची. पोरीला उजवायची फिकीर जी त्यांना असते.

 

मग काय ठरतं सगळं रितसर. घाईगडबडीत. पैसे वाचवण्यासाठी शादी होते, सामुदायिक विवाह सोहळ्यात. पण ह्या सगळ्यात 'प्रेम'चा कुणी विचारच केलेला नसतो नीटसा. त्यामुळे तो आहे खट्टू. त्यात ‘सुहागरात’ला बायकोचं अगडबंब रूप पाहून तो हबकतो, नाराज होतो, निराश होतो, तिच्यापासून दूर होतो.

 

आपली व्यथा तो उघड करतो शाखाप्रमुखाकडे, संध्याकाळच्या शाखेत! संघाची शाखा, त्यांचा गणवेश, त्यांची मानसिकता, अगदी हुबेहूब. कुठेही नौटंकी नाही. आपल्याला भास व्हावा खरंच आपण संघाच्या शाखेत आहोत कि काय! शाखाप्रमुख आणि इतर त्याला सबुरीचा, तडजोडीचा, परिस्थिती स्विकारण्याचा स्वाभाविक सल्ला देतात. ‘प्रेम’ला तो सल्ला काही रुचत नाही.

 

माझा कुणीच विचार करत नाही ही त्याची घट्ट भावना. संध्या शिकलेली आहे, त्याचा रुबाब करत्येय. आपण फारसं शिकलेलो नाही हा त्याला न्यूनगंड. तर, आपल्या नवऱ्याने, आहे ती परिस्थिती समजून घ्यावी, आपला मनापासून स्वीकार करावा. हि संध्याची भावना. तिला कमी शिकलेला, फारसं कर्तृत्व नसलेला असला, तरी नवरा हवा आहे. संसार करायचा आहे.

 

सुहागरातला काहीच न घडलेलं पाहून वर्मा आणि तिवारी कुटुंबीय परेशान. सगळ्याचं मत 'प्रेम'ने संध्याचा स्वीकार करावा. संध्याची आई फोनवरून तिला सल्ला देते ... तसल्या व्हिडीओ कॅसेट आणून रात्री एकत्र बघण्याचा! ती तसं करूनही पहाते. आणखी काय काय करते. हे सगळं वाचण्यापेक्षा पडद्यावर पहाणं अधिक रंजक!

 

पण कुठलाच ‘नुसका लागू पडत नाही. संसारात, हळूहळू भांडी आपटायला लागतात. धुसफूस वाढू लागते. एक दिवस संध्या बॅग भरते आणि माहेर गाठते. प्रकरण थेट कोर्टात, घटस्फोटाकरीता. पेटून उठलेल्या संध्याचा, हा अट्टाहास! तर दोघांच्या घरचे मात्र हतबल. निकाल लागतो. दोघांनी सहा महिने एकत्र राहायचं.  मग मिळणार घटस्फोट हवा असलाच तर!

 

इथं येतो कहानी में ट्विस्ट!!

आता एकत्र राहायचंच आहे, तर न भांडता प्रेमाने राहूयात की, संध्या विचार मांडते. प्रेम होकारा भरतो नाइलाज असल्या सारखा. हळूहळू कथेला, प्रीतीचे रंग भरले जातात. दोघांच्या सहवास फुलू लागतो हळुवारपणे.  प्रेमला तो सहवास हवाहवासाही वाटू लागतो, न कळत. तरीही तो अव्यक्त. संध्या मात्र ते जाणून आहे.

मोह मोह के धागे हम्म ये मोह मोह के धागे ह्या गाण्याने इथं छान वातावरण निर्मिती होते. न कळत आपलाही धागा गुंतत जातो दोघांच्या प्रेमात. आपण प्रेमात पडतो कथेच्या!

प्रेम झालेल्या आयुष्यमान खुराणाचीच खरीखुरी कथा असल्यासारखं, तो इथं वावरलाय. अन संध्या झालेली भूमी पेडणेकरचा अभिनय अगदी सहज आणि सुखद वाटतोय. विशेष हे की ह्या भूमिकेबद्दल तर तिला फिल्मफेअर ऑवार्ड मिळालंय!

 

चित्रपटाचा क्लायमॅक्स? 'दम लगाके हैशा', नावाचा इथं काय संबंध?

ऊ sss हू ..

अमेझॉन प्राईमवर नक्की पहा. आणि तुम्हीच सांगा मला. पाहिला असेल तर, परत एकदा पहा. एक तास पन्नास मिनिटे वाया नाही जाणार! ये आपुन की गॅरेंटी!!

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...