Monday 5 September 2022

सुंदरी गार्डन- हळुवार प्रेमाची अलवार गोष्ट

#SUNDARIGARDEN


मध्य केरळमधील कुठलंसं गाव. उंचावर वसलेलं. छोट्या छोट्या टेकड्यांनी सजलेलं. नागमोडी रस्त्यानी नटलेलं. टेकड्यांनी हिरव्याशार दुलईचे पांघरूण लपेटलेलं. गावात छोटी छोटी बंगलीवजा घरे. असाच एक थोडासा मोठा पण टुमदार बंगला. बंगल्यासमोर अंगण. अंगणात हिरवळ अन सभोवती पानाफुलांची दरवळ. बगिच्याच्या पलीकडे नक्षीदार गेट. गेटवर नावाची लाकडी पाटी. ऐटीत बसवलेली. पाटीवर नक्षीदार अक्षरे - सुंदरी गार्डन !

हे नाव बंगल्याचं आणि ह्या मल्याळम सिनेमाचं देखील !!

सुंदरी, तिशीची. घटस्फोटित. गर्भाशयाच्या कॅन्सरमधून बरी होऊन नव्याने आयुष्य जगणारी. ऐन तारुण्यात आलेल्या ह्या कटू अनुभवांमुळे तिने आपली एक जगण्याची चौकट आखून घेतलेली. त्या बाहेर न पडण्याची काळजी घेत तिचं रुटीन आयुष्य मजेत जगायला आता ती शिकलीय. पेशाने लायब्ररीयन. गावातल्याच एका मोठ्या शाळेच्या लायब्ररीची. सुंदरी, शाळेच्या इतर स्टाफ पासून काहीशी अलिप्त राहणारी. पण हुशार विद्यार्थ्यांच्या जवळची. आणि कामात चोख.

तुम्ही पुस्तकाचं फक्त नाव सांगायचा अवकाश. पुढच्या मिनिटाला ती सांगणार .... उजवीकडून सातवे कपाट, वरून तिसरा कप्पा अन डावीकडून पाचवे पुस्तक. आणि तुम्ही तेथून ते पुस्तक काढतांना अचंबित झालेले.

शाळेत नवीन शिक्षक रुजू होतो. इंग्रजी विषयकरीता. तरुण आणि देखणा. तो अविवाहित असणार हे तुम्ही ओळखलं असणारच. सुंदरला तो आवडू लागलाय, कदाचित ती त्याच्या प्रेमात आहे. पण 'त्या' चौकटीचा ट्यबूतिला पुढे जाऊ देत नाही.

 लेखा हि दुसरी टीचर. गोरी गोमटी देखणी तरुणी. तीही अविवाहित. व्हिक्टर आणि तिचं बऱ्यापैकी सूत जुळत आलेलं. शाळेच्या ट्रिपच्या पहिल्या दिवशी सुंदरीने ते जवळून पाहिलेलं.

त्यामुळे सुंदरीची घालमेल होतेय. त्या रात्री ती वैफल्याने व्होडका पित बसते. तिथे नेमका व्हिक्टर येतो. मद्याचा अंमल झाला असल्याने सुंदरा किंचित सैलावते. तिने आखलेली चौकट किंचितशी किलकिली होते. व्हिक्टरला काहीसं आश्यर्य वाटणारं, पण बहुधा सुखावणारं.

काही दिवसांनी शाळेतल्या लायब्ररीत एका हुशार मुलीवर एक प्रसंग ओढवतो. त्या प्रसंगातलं सुंदरीचं कणखर भूमिका घेणं. आउट ऑफ द वे जाऊन त्या मुलीला मदत करणं, व्हिक्टरला भावतं. लक्ष्मीकडून तो सुंदरीकडे हळूहळू जाऊ लागतो.

 अशी हि हळुवार प्रेमाची अलवार गोष्ट. सरळपणे आपल्यासमोर मांडली जाते. कुठेही आडवळण नाहीत, मेलोड्रामा, मादकता, आक्रसताळेपणा नाही. आयटम सॉंग नाही. खलनायक वा खलनायिका देखील नाही. आणि हो मुख्य म्हणजे प्रेमकथा असली तरी नृत्य नाट्य नाही. मात्र हळुवार संगीत असलेली मल्याळमटच गाणी आहेत.

 दिग्दर्शक चार्ली डेव्हीसन ने आपले काम चोख बजावलंय. अपर्णा बालमुद्री आणि नीरज माधव हे सुंदरी आणि व्हिक्टर ह्या प्रमुख भूमिका अक्षरशः जगलेत. 'सोनी लिव्ह' वर रिलीज झालेला सिनेमा नक्की पाहावा असाच आहे.

---- अनिल सुमति बागुल  

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...