Showing posts with label कथेच्या राज्यात. Show all posts
Showing posts with label कथेच्या राज्यात. Show all posts

Tuesday 1 September 2020

मंतरलेला चैत्रबहार

 

मांडीवरच्या तान्हुलीकडे, वैजू कौतुकाने पहात होती, अगदी एकटक. तान्हुली झोपी गेली होती, दूध पिऊन, अगदीतृप्त होऊन. नांव काय ठेवूयात तान्हुलीचं? येत्या आठ दिवसांनी, तान्हुलीचं बारसं करायचंय, आई म्हणत होत्या. 'खानोली'तल्या आपल्या ह्या घरातच करूयात, विजयचा आग्रह होताती विचारात पडते. नकळत ती बोलून जातेसुरंगी’! नाव सुचताच, तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. आता ती विचारात पूर्ण बुडून जाते, भूतकाळात शिरते.

नुकतंच लग्न झालेले ती दोघं, विजय आणि वैजू हनिमूनला गोव्याला आलेले असतात. गोव्याच्या रम्य वातावरणात त्याच्या प्रेमाला भरती आलेली असते. दिवस-रात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ती दोघे, परतायचा दिवस येतो तसे भानावर येतात. येतांना आईने गावच्या घरी, 'खानोली'ला बोलावल्याची त्याला आठवण होते.

घरी पोहोचताच, आई उत्साहाने त्या दोघांच स्वागत करते. मीठ-मिरचीने ओवाळते.

''तुमका संसार सुखाचा होयुयात, रवळनाथा, तुका काळजी असा.'' – आई

वैजू, खरंतर पहिल्यांदाच कोकणात आलेली असते. उत्सुकतेने सारं पहात असते. आई तिला घर दाखवते, आंगण दाखवते. परसदारी घेऊन जाते. विहीर दाखवते. नारळाची -सुपारीची वाडी दाखवते. सारं सारं वैजूला फारआवडून गेलेलं असतं. इथंच राहता आलं तर? तिला नकळत वाटून जातं. त्याच विचारात, रात्री ती विजयच्या कुशीत गाढ झोपून जाते.

 दुसऱ्या दिवशी सकाळी, ती जागी होते तीच विजयच्या आवाजाने.

‘’ वैजू, चल लवकर. काहीतरी खास दाखवायचंय तुला’’! त्याच्या आवाजात कमालीचा उत्साह भरलेला. वैजूला आश्चर्य वाटतं. घाईघाईने आवरुन ती, त्याच्या सोबत निघते. तो तिला परसदारी घेऊन येतो. परसदारी कसलासा घमघमाट पसरलेला. कस्तुरी अत्तर शिंपडल्यागत. तो एका झाडाशी तिला घेऊन जातो, अन तिला त्या, ‘कस्तुरीचा शोध लागलेला असतो

समोरच्या झाडावर पिवळसर सोनेरी, फुलांचे झुपकेच्या झुपके लगडलेले! टपोरी मोत्यासारखे!! विलक्षण सुगंध प्यालेले!!! ती हरखुन जाते. मंतरल्यागत पहात रहाते, त्याकडे! इतक्यात विजय, सफाईने झाडावर चढतो. हलक्या हाताने ते झुपके खुडतो, अन वरूनच तिच्याकडे टाकतो. ती शिताफीने ते झुपके ओंजळीत पकडते. नकळत ओंजळ नाकाशी घेते, अन तो सुगंध भरभरुन ओढून घेते. तिचं मन मोहरून जातं.

''ही 'सुरंगी'! चैत्रात ह्याला असा वेड लावणारा बहर येतो. चैत्रबहर''!! सांगतांना विजयचा उत्साह ओसंडून वहात असतो.

हाच उत्साह ओतप्रेत घेऊन ती दोघं गावाहून निघतात. वैजूने आठवणीने, मोठ्या हौसेने, झाडं बरोबर घेतलेलं असतं, सुरंगीचजणू त्यांच्या संसारसुखाचा सुगंध देणारं!! 

नाशिकला परतल्यावर, सातपूरच्या घरी, रो हाऊसच्या छोट्याश्या अंगणात वैजू ते झाडं लावते.

आता खऱ्या अर्थाने त्यांच्या नव्या नवलाईच्या संसाराची सुरवात झालेली असते. विजय सातपूर 'एमआयडीसी' एका कंपनीत कामाला. दिवसभर तो कंपनीत नोकरी करत असतो अन ती घरी. सुखाचे दिवस झरझर सरत असतात. अन अचानक त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागते, काजळमायेसारखी! वैजूच्या अंगावर सर्रकन काटा येतो. ती दचकून भानावर येते.

लग्नानंतर पहिल्यांदाच आपण इथं कोकणातल्या घरी आलो होतो, तेव्हाच तर मनोमन वाटत होतं की आपल्याला, इथंच रहावं असं. मग आत्ता का दचकलो आपण? ती परत भूतकाळात जाते.

विजय, मोठ्या हिरीहिरीने पिवळ्या बावटायुनियनचं काम करत असायचा. त्याच्याच कंपनीत, बोनस वाटपाचा तिढा तयार होतो. कंपनीत त्याची युनियन संप पुकारते. मालक आणि युनियन, दोघांपैकी कुणीही नमतं घ्यायची तयारी दाखवत नाहीत. संप चिघळतो. अखेर टाळेबंदी जाहीर होते. युनियनचे वरिष्ठ पुढारी, जरा जास्तच ताणू पाहतायत असं विजयचं मत असतं. सुरवातीला उत्साहाने पुढे झालेला विजय, युनियन लीडरच्या हेकेखोर स्वभावाने निराश होतो. निराशेतून त्याला दारूचं व्यसन जडतं. रोज रात्री आठ वाजता त्यांच पिणं सुरु होतं.

वैजूला तो जणू विसरून जात असे, त्या वेळी. त्यामुळे त्यांच्या संसारातल्या शृंगाराला जणू ओहोटी लागलेली. हे होत्याच नव्हतं होतांना, वैजूचा जीव तीळतीळ तुटत असतो. ती खूप प्रयन्त करते, विजयला समजवायचा. आपण कोकणात खानोलीला तुमच्या गावी जाऊयात. सुदैवाने शेतीवाडी आहे आपली. हे इथे असं दुसऱ्याकडे चाकरी करण्यापेक्षा, कष्टाची भाकरी खावूयात. ती त्याला समजावत असते.  

ह्याच दरम्यान 'करोना व्हायरस' जगभर हाहाकार माजवतो. चीन देशापासून सुरु झालेली संक्रमणाची लागण हा हा म्हणता, इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन आणि साऱ्या अमेरीकेत पसरते. लाखो जीव त्यात बळी जातात. भारतात देखील त्याचा आता शिरकाव झालेला असतो. सरकार पूर्ण देशात, एकवीस दिवसांचे लॉकडाऊन’, घोषित करते. आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायची, वैजू मनाची तयारी करते.

पण लॉकडाऊनमुळे भाजीपाला आणि किराणा माल सोडून बाकी सारं बंद होतं. रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप सगळं बंद. विजयचा मद्याचा घरातला स्टॊक संपतो. तो अस्वस्थ होतो. रात्र काढणं त्याला असह्य होऊ लागतं. अशावेळी वैजू, त्याला धीर द्यायचा प्रयत्न करते. त्याला जवळ घेऊन समजावयाचा, त्याचं मन राखायचा प्रयत्न करत राहते. गावी कोकणात जाण्याचं सुचवून पहाते. व्यसनापासून दूर राहण्याची त्याची मनाची तयारी ती करत राहते.

फाल्गुन संपून, एव्हाना चैत्राचा महिना सुरु होतो. निसर्ग जणू कात टाकत असतो. झाडं वेलींना नवी पालवी फुटू लागते, अन वैजूच्या आशेला देखिल. ती वाट पहात असते, चैत्र बहर येण्याची! अन तो दिवस उजाडतो. अंगणातील सुरंगीला कमालीचा बहर येतो. मंतरल्यासारखी ती भल्या पहाटे, सुरंगीच्या कळ्या खुडून आणते. त्याचा छानसा वळेसर (गजरा) केसात माळते. त्याला उठवायला जाते. तो सुरंगीच्या मादक सुवासाने जागा होतो. नकळत तिला मिठीत घेतो. दोघांच्या शृंगाराला देखील बहर येतो, खूप दिवसांच्या दुष्काळानंतर! ह्या चैत्र बहराने त्यांच्या आयुष्यात नव्याने पालवी फुटते.

आठवणीतून जागे होतांना ती नकळत बोलून जाते सुरंगी नाव ठेवायचं. त्याच्याच मंतरलेल्या,चैत्र बहराचाच तर प्रसाद आहे, आपली तान्हुली !


anilbagul1968@gmail.com

 



वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...