Showing posts with label मुशाफिरी. Show all posts
Showing posts with label मुशाफिरी. Show all posts

Thursday 16 April 2020

'कोंडूर्‍या'क गाऱ्हाणं...




शेवटी वाट वाकडी केलीच मी ! होतच माझं हे असं अधूनमधून !! चैनच पडत नाही मुळी,असं केल्याशिवाय. मग काय, तीन दिवसांचा कोकण दौरा ठरवलाच, तो ही भर मुसळधार पावसात !

तळकोकणातील भोगवे, निवती, खावणे, वायंगणी, सावंतवाडी, तुळस, खानोली, पाडगावकरांचं वेंगुर्ले आणि चि. त्रं. खानोलकरांचं कोंडुरं !! असा सारा प्रवास.

ह्या साऱ्या भटकंतीत मनात भिरभिर होती, ती फक्त आणि फक्त कोंडूऱ्याची ! कानांत साद होती ती कोंडूर्‍याच्या सागर लाटांच्या गाजेची !!

का बोलावलं असेल मला कोंडुऱ्यांनं?
खरं तर मला काही नको होतं कोंडुऱ्याकडून, पण त्यालाच काही द्यायचं होतं का?
खानोलकरांच्या कोंडुरा कादंबरीतल्या 'पद्मनाभ'चं आणि माझं काय नातं लागत होतं?
प्रश्नाचां भुंगा घेऊन मी कोकणात वेड्यासारखा फिरत होतो.

सागरेश्वरचा निर्मनुष्य आणि स्वच्छ सागरकिनारा आवडत होता, पण भावत नव्हता. खेमसावंतांचा सावंतवाडीतला देखणा राजवाडा, भुलवत होता पण खिळवत नव्हता.काय होतंय कळत होतं, पण का कोण जाणे कोंडूऱ्याला जायचं धाडस मात्र होत नव्हतं.

वेंगुर्ल्यात वाजत गाजत गणपती पुजले जात होते गणेश चतुर्थीच्या सकाळी. आणि चर्चमध्ये मी, एकटाच येशूच्या मूर्तीसमोर भ्रमित होऊन उभा ! येशूसमोरची माझी प्रार्थना, त्या वरद विनायका पर्यंत पोचली असेल का? चर्चच्या घंटेने मी भानावर येतो.

सायंकाळच्या अवचित वेळी, तुळस गावच्या जैतीर मंदिरात गाभाऱ्यात असतो मी भारल्यागत !
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा.....व्हय म्हाराजा, मूळचे तुळस गावचे कदम, मुंबईतून खास तुझ्यापायाशी आलेत, गाऱ्हाणं घेऊन.
... व्हय महाराजा !!
साऱ्यांच्या एकसाथ आवाजाने मी भानावर येतो.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सारं फिरून झालेलं असतं. आता मात्र वेळ झालेली असते कोंडूऱ्याची ! मनाची बेचैनी वाढवणारी, असह्य हुरहूर जीवघेणी ! दुपारच्या वेळेचं वेतोबाच गाऱ्हाणं कानात अचानक घोंगवतय !!
देहासक्त असूचीचा मनभवरा, भुंग्याने रुंजी घातल्यागत भिरभिरु लागला अचानकसा !!
शरीरावरची त्वचा ओढ दिल्यागत आकसून ताण असह्य करणारी.
हे असं का व्हावं ?

कोंडुरा गावची रस्त्याच्या कडेलगताची पाटी नजरेने हलकेच वाचलेली असते. सहा सात मिनिटांचा जीवघेणा प्रवास, रस्त्यावरच्या खड्डयांनी अधिकच ताणलेला.गाडीचा दरवाजा आपसूक उघडला जातो, अन नकळत मी गाडीच्या बाहेर पडतो.

बेभान मनानं पावलांना इशारा केलेला असतो. झप झप वेग वाढत जातो. जवळपास धावतच अनामिक ओढीने मी समुद्राच्या दिशेने जाऊ लागतो. अवघ्या काही क्षणांत निसरड्या वाटेवरून आवेगात पोहोचतो कड्याच्या टोकाकडे.

समोरचं अलौकिक दृश्य नजरेत साठवण्यासाठी नजर भिरभिर करू पहात होती. कड्याखाली काळ्याशार दगडांची उतरंड. समुद्राच्या फेसळलेल्या लाटा आवेगात त्यांच्या भेटीला येत होत्या, एकामागोमाग ! पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या थेंबानी त्या दगडांना न्हाऊ माखु घालत होत्या जणू !!

थोडं भानावर आल्यावर, नजर आसपास गेली. इथं तर हिरव्यागार रंगांच्या विविध छटांचा गवती गालिचा !! त्यातून हलकेच डोकावणारी पिवळी धम्मक नाजूकली रानफुले, मनबावरी !!!
किनाऱ्यावरच्या कबऱ्या मऊशार वाळूवर, किंचित काळेशार गर्द हिरव्या माडाच्या झाडांनी, आभाळ पेललेलं !

ह्या निसर्गाच्या भावविभोर खेळात, आता भर घालतो तो वरुणराजा ! निळ्याशार आकाशात काळसर ढग अचानक गर्दी करू लागतात. टप्पोरे टप्पोरे पांढरे शुभ्र पाण्याचे थेंब खाली सोडू लागतात. थोड्या वेळाने पावसाचं जमा झालेलं पाणी डोंगरकड्यावरून खाली समुद्राच्या दिशेने येऊ लागतं. जणू हिरव्या शालूवर मोत्यांच्या माळा घातल्यागत !

आता पाळी असते ती सूर्यनारायणाची !!
ऊन सावलीचा त्याचा नेहमीचा हुकमी खेळ आता तो सुरु करतो. सूर्याच्या किरणांनी, खाली पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला मग सोनेरी मुलामा चढला जातो.
एखादं सुंदर निसर्गचित्र पहावं, तसंच काहीसं !

भोवताचं सौंदर्य टिपून गच्च भरलेले डोळे पायावर खिळताच, वीज कोसळावी तसा देह सळसळतो. पाय नकळत मागे खेचला जातो. इतकावेळ कड्याच्या शेवटच्या टोकावर मी उभा असतो ! आणखी एक पुढलं पाऊल, हे खालच्या कातळ खडकावरलं कपाळमोक्ष करणारं ठरलं असतं.

जैतीर मंदिरातलं पुजाऱ्याने घातलेलं गाऱ्हाणं, आता आपसूक ओठावर येत असतं.
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा..... पार नाशिक येथून, मनात रुतून बसलेलं, वर्षनुवर्षीच गाऱ्हाणं घेऊन आले असा. त्यांचा गाऱ्हाणं तू कबूल कर रे म्हाराजा ... व्हय म्हाराजा..... !! ...
व्हय म्हाराजा.....मनातल्या असंख्य कल्लोळानी एकसुरी जयघोष केलेला.

देवी सातेरीने आशीर्वादासाठी पाठीवर हात ठेवल्याचं जाणवतंय आणि रवळनाथानेही प्रार्थनेला स्विकार केल्याचा भास होतोय.

पण... पण खानोलकरांच्या कादंबरीतला कोंडुरा गाऱ्हाणं ऐकून आशीर्वाद दिल्यावर, भक्ताच्या नकळत त्याच्याकडची एखादी गोष्ट काढून घेतो. कोंडुऱ्याने माझं असं काय काढुन घेतलं असेल?
विचाराने आलेल्या काट्याने शहारलेलं अंग अजूनही तसंच आहे !

अजूनही शहारलेलंच आहे.

anilbagul1968@gmail.com

Wednesday 12 September 2018

'अजि म्या कर्नाटकू पाहीला' (भाग दुसरा)








आज आता हंपी सोडायचं होतं. बदामी खुणवत होतं. हंपीला जे पाहिलं ते अद्भुत होतंच. पण त्याहून अधिक पुरातन अशा लेण्यांचं लावण्य नजरेत साठवण्याची ओढ लागली होती.

सकाळी भरपेट नास्ता केला आणि गाडीत बसलो. गाडीने वेग घेतला. होस्पेट मार्गे मुनिराबाद, हिंतलं, बुडुगुम्पा, मेथगल, बेवूर, येलबुर्गा, मुधोळ, मुशीगेरी, जालिहाल अशा छोट्या गावांमधून गाडी धावू लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दमदार शेती दिसत होती. ऊस, ज्वारी, बाजरी मोठ्या प्रमाणात होती. मधूनच पिवळा पट्टा लागायचा. मोठ्ठाली पिवळी धमक सूर्यफुले आनंदाने डोलत होती.


हंपीला चौकशी केली होती पावसाबद्दल. यंदा पाऊस फारसा पडला नसल्याचं कळलं होतं. मग हि अशी शेती कशी? बारकाईनं पाहू लागलो. मधूनच वॉटर स्प्रिंकल्स दिसू लागले, कुठे बोअरवेलच्या खुणा दिसू लागल्या. आता उलगडा होत होता.

इतक्यात रस्त्यावर बदामी गावाची पाटी लागली. ड्रायव्हरनं मुकामाच्या ठिकाणी गाडी थांबवली. बदामीत मुक्काम दोन दिवस होता. पहिल्या दिवशी 'हॉटेल क्लर्क इन' तर दुसऱ्या दिवशी, 'हेरिटेज रिसॉर्ट' येथे. मुद्दामहून दोन ठिकाणं, दोन दोन अनुभवांसाठी.  हो, उगीच रिस्क नको.

बदामीतलं क्लर्क इनहंपीतल्यापेक्षा लहानसं. खोलीचा ताबा घेतला आणि खिडक्यांतून डोकावू लागलो. गाव कसं असावं ह्याचा अंदाज घेण्यासाठी. जवळपास छोटी छोटी बैठी घरं होती. कौलारू कमीच, पत्र्याच्या शेडची जास्त. घराजवळच्या मोकळ्या जागेवर, डुक्करांचा मुक्त वावर सुरु. तर छपरांवर माकडे उड्या मारत हिंडत होती. म्हटलं वा वराह अवतारात विष्णू आणि मर्कटरूपात हनुमान दोघांचंही दर्शन झालं तर.

दुपारी रणरणत्या उन्हात लेणी दर्शनाला निघालो. दीडेकशे उभ्या पायऱ्या चढून वर आलो. इथेही माकडांचा वावर होता. त्यांच्या मर्कटलीलांनी पर्यटक हैराण तर सुरक्षारक्षक हतबल!



 

बदामी पूर्वी वातापी नावाने ओळखली जायची. इ.स. ५४० ते ७५७ या काळात चालुक्य राजांची राजधानी होती. त्याच काळात तांबड्या -पिवळ्या सॅण्डस्टोन खडकात, हि लेणी मंदिर कोरण्यात आली. 'सर्वधर्म समभावा'चं सूत्र त्याकाळात जपलं गेलं होतं. बौद्ध, हिंदू आणि जैन ह्या तीनही तेव्हा अस्तित्वात असलेल्या धर्मची प्रत्येकी एक लेणीमंदिरं इथं आहेत. इथं एकूण चार लेणी होती. त्यापैकी दुसरं लेण भव्य आणि देखणं.

उंचावरून बदामी गाव दिसत होतं, अगदीच रखरखीत. थोड्या उजवीकडे नजर गेली आणि खरा नजारा दिसू लागला. विस्तीर्ण असा अगस्ती तलाव. एव्हढ्या रखरखाटातही बऱ्यापैकी पाणी. पाण्याला लागून तीन सुंदर देवळं. भूतनाथ मंदिरे त्याचं नाव. समोरचं दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यास अगदी योग्य. फटाफट फोटो काढले.





ह्या सगळ्यात स्वतःकडे पहायला वेळ कुठे दिला होता. आता घशाला कोरड पडली होती. प्रखर उन्हाचे चटके जाणवू लागले होते. चालून चालून पायाला पेटके आले होते. गेले तीन दिवस आम्ही चालतो आहोत. खरं तर ऊन मला अजिबात सोसत नाही. त्यामुळे चेहरा लालबुंद झाला होता. मुक्कामी पोहचण्याचा मनिषा आग्रह धरत होती. अर्थात तीही कधी नव्हे ते एव्हढी चालत होती. तिचं बरोबरच होतं. पण तलाव आणि भूतनाथ टेम्पल बघण्याचा मोह टाळता येणं शक्यच नव्हत. शेवटी थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा केली.

मंदिर अतिशय देखणे होते. पण त्याच्या सभामंडपात बसून समोरचा अगस्ती तलाव पाहणं, अहा हा! आता उन्हाची तीव्रता कमी होत जात होती, आग ओकून ओकून सुर्यनारायण विश्रांतीला निघाला होता. तलावातल्या निळ्याशार पाण्यात सूर्यकिरणे हलकेच मिसळली गेली होती. त्या मिलनाने तलावाला सुरेख लाली आली होती. हे दृश्य टिपण्यासाठी आतुर झालेल्या फिरंगी पर्यटकांनी धडाधड फ्लॅश मारले. त्यात आमच्या दोघांच्या कॅमेऱ्यांची भर पडली. इतका वेळ झालेले श्रम कारणी लागले होते. तृप्त मनांनी दोघांनी हॉटेल गाठले आणि बेडवर अंगे झोकून दिली.

आज भल्या पहाटे जाग आलेली. तहानेने आणि भुकेने जीव व्याकूळ झालेला. भरकन पाण्याची बाटली तोंडाला लावली. थोडं बरं वाटलं. खायला काही सापडतंय का म्हणून अंधारात शोधाशोध करू लागलो. माझ्या खुडबुडीने मनिषा जागी झाली. तिलाही भूक लागली होतीच. तिने पर्स मधून बिस्किटे काढली. दोन मिनिटांत दोघांनी पुडा फस्त केला. आता कुठे जीवात जीव आला होता. मग दोघांच्या लक्षात आल, काल रात्री आपण न जेवता झोपलो होतो.

थोड्यावेळाने हॉटेलला जाग आली. घाईघाईने खाली गेलो. चार-चार इडल्या चेपल्या, वर कॉफी ढोसली तेव्हा कुठे पोटातला खड्डा भरून निघाला.

खरं तर माझा हा लेख लिहून पूर्ण झाला असं वाटून मी थांबलो होतो. पण मनिषाने तो बारकाईने वाचला आणि मला दोन गोष्टी राहिल्याचं माझ्या लक्षात आणून दिलं. त्यातली एक खूप भावलेली आणि एक खूप आवडीची. एक भौतिक सुखाची तर दुसरी आत्मिक सुखाची. दोघांची अनुभूती अनुभवणं विलक्षण आनंदाचं.

झालं असं की, बदामीतला आज दुसरा दिवस होता. आज मुक्काम मगाशी उल्लेख केल्याप्रमाणं,'हेरिटेज रिसॉर्ट'मध्ये असणार होता. पण तिथे आधी न जाता आधी ऐहोळे आणि पट्टडकल पाहुयात असं ड्राईव्हर म्हणाला. आम्ही म्हणालो, 'तू माझा सांगाती'. निघालो.

आताचे ऐहोळे म्हणजे चालुक्य पूर्व काळातील आर्यपुरा. इ.स. ४५० ते ५०० (म्हणजे सुमारे पंधराशे वर्षा पूर्वीचा काळ) या काळातील द्रविड, नागरा, कदंबा ह्या स्थापत्यापध्दतीने बांधलेली मंदिरे इथं आहेत. ह्यांचा उल्लेख कवी कालिदासाच्या काव्यातही आढळतो. ह्यातलं दुर्गा मंदिर तर अप्रतिम! आश्चर्य म्हणजे ह्याच्या सभामंडपाच्या रचनेचं आणि दिल्लीतल्या लोकसभेच्या वास्तूशी साम्य आढळते. इथल्या बहुतांशी मंदिराच्या गाभाऱ्यात आता मूर्ती आढळत नाहीत आणि आहेत त्या मूर्ती पुजल्या जात नाहीत.

ASI (आरकॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) हा सगळा पुरातन ठेवा छान जपला आहे. प्रत्येक वास्तूच्या ठिकाणी कंपाउंड आहे. भोवती बगीचा फुलविलेला आहे. हिरवीगार लॉन निगुतीने राखली आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी केअर टेकर नेमला आहे.



असाच एक केअर टेकर भेटला आम्हाला, बहुदा 'हुच्चीमली टेम्पल'पाशी. साधारणतः पंचेचाळीस पार केलेला असावा. साधाच पण स्वछ पांढरा सुती पेहराव. रवीकुमार नाव त्याचं. स्वतःहून बोलला आमच्याशी. ओळख-पाळख झाली. गप्पा सुरु झाल्या. जमतंय असं वाटल्यावर मी त्याला प्रश्न विचारायला सुरवात केली. हंपीहून बदामीच्या वाटेवर दिसलेल्या, भरघोस पिकांच्या शेतीबद्दलचे, शेतकऱ्यांविषयीचे. त्यानेही मनमोकळी उत्तरे दिली. त्याचं बोलणं भाबडेपणाचं वाटलं. या वर्षी फारसा पाऊस जरी नसला तरी इथं बोअरवेल आहेत. त्यांना बऱ्यापैकी पाणी आहे. त्याच्या जीवावर शेती होते.

इथं शेतकरी आत्महत्या होत नाहीत का? तर म्हणाला इथला शेतकरी सधन नसला तरी खाऊन-पिऊन सुखी आहे. इथली लोक हांथरुण पाहून पाय पसरणारी आहेत. फारसा बडेजाव नसतो लग्नात. हुंडा पद्धत नाही. लोकं फारसे राजकारण करत न बसणारे आहेत. आणि घरची ज्वारीची भाकरी आणि भाजी खाणारे असल्यामुळे सूदृढही आहेत. ऐकलं आणि खूप बरं वाटलं. मनात हिशेब केला, इथून महाराष्ट्राची सीमा फार तर तीनशे मैलांवर आहे, असो.

रवीकुमारचा छानसा फोटो मी माझ्या मोबाईलमध्ये बंदिस्त केला आणि त्याचा निरोप घेतला.





आता 'रावनफाडी' पाहायचं होतं. नाव फार विचित्र वाटत होतं. गाव संपता संपता ही 'रावनफाडी' लागली. ही छोट्याश्या चढावर कोरलेली दोन लेणीमंदिरं. इथंही एक केअर टेकर होता. हा मात्र रवीकुमारपेक्षा वयानं कितीतरी लहान. पोरसवदा. नुकताच लागला असावा. लेण्यांमध्ये एका टोकाला पाय पसरून बसला होता. जीन्स टीशर्ट आणि डोक्यावर टोपी. हातात मोबाईल आणि कानात पांढरी वायर. काहीतरी ऐकत असावा, बहुदा मोबाईल मधली गाणी. त्याला तसं पर्यटकांशी सोयरसुतक असल्याचं वाटलं नाही. आम्हीही त्याच्याकडे दुर्लक्ष करून लेणी पहिली. निघालो. 
 
आता चलो पट्टडकल. 'ऐहोले ज्युनिअर स्कुल, बदामी सिनिअर स्कुल, तर पट्टडकल कॉलेज'. कंप्लीट मंदीर. द बेस्ट. असं इथल्या मंदिर स्थापथ्यकलेचं वर्णन रवीकुमारनं केलं होतं. त्यामुळं उत्सुकता वाढली होती.

अर्ध्या तासात आम्ही पट्टडकलला पोहोचलो. साधारणतः तीन एकरचा परिसर. शांत, साफ-स्वच्छ. फुलझाडं-वेली, हिरवळ छान राखलेली. एकाच परिसरात बारा-तेरा देवळं. काडसिद्धेश्वर, गगलनाथ, संगमेश्वर, पापनाथ, मल्लिकार्जुन आणि विरुपाक्ष इ.
ह्यातली दोन मंदिरं तर, चालुक्य नरेश विक्रमादित्य-द्वितीयच्या पत्नीने, महाराणी लोकमहादेवीने आणि तिच्या बहिणीने बांधलेली आहेत. आपापल्या पतींच्या पराक्रमाची आठवण म्हणून. त्यापैकी विरुपाक्ष मंदिर आजही वापरात आहे, रोज पूजा आरती होते नित्यनेमाने. हे असं गेले पंधराशे वर्षे चालू आहे, अव्याहत! हे ऐकून, प्रत्यक्ष पाहून अवाक झालो. अचानक माझी तंद्री लागली, ट्रान्स मध्ये गेल्यागत...




महाशिवरात्रीचा आजचा पवित्र दिवस. महाराज विक्रमादित्य, महाराणी लोकमहादेवी, महामंत्री, दरबारातील झाडून सारे मानकरी मोठ्या लवाजामासह राजधानी बदामीहून इथं हजर आहेत. नगरीतील सारे सारे प्रजाजन आले आहेत. उत्सवाची धामधूम सुरु आहे. सनई-चौघडे, हार-तुरे, पताका-तोरणे सारी सज्जता आहे. वातावरण मंगलमय झालं आहे. आता मुख्य पुजाऱ्याने महाराजांना महाराणीसह पुजेकरीता आवाहन केले. पूजेला यथासांग सुरुवात झाली. महादेवीच्या पिंडीवर गोमातेच्या दुधाचा अभिषेक केला जातोय. यथासांग पूजा होते. टाळ-मृदूंगाच्या गजरात आरत्या म्हटल्या जातात. पूजेच्या समाप्तीला महादेवाचा जयकार केला जातो. महाप्रसादाचं वाटप होतं. माझ्याही हातावर कुणीसं प्रसाद ठेवतं अन मी भानावर येतो...

हातातल्या खोबऱ्याच्या तुकड्याकडे पहात राहतो एकटक. आता मन शांत झालेलं असतं. इतके वर्षाचं मनातलं विचारांचं द्वंद्वव संपलेलं असतं. मनानं स्पष्ट कौल दिलेला असतो. 'जग मिथ्या...ब्रह्म सत्य'. तो आहे, चराचरात आहे. घरच्या फोटोतल्या प्रतिमेत आहे. इथल्या दगडाच्या देवळात देखिल आहे. त्याचं अस्तित्व एकदा मान्य केल्यावर आस्तिक-नास्तिक असला वितंडवाद राहत नसतो. उरलाच तर तो फक्त आणि फक्त माणसाचा अहंकार असतो!

हा विचक्षण अनुभव नेणिवेच्या पलीकडला होता. आत्मिक सुखाचा हा अद्भुत ठेवा मी जपून ठेवणार आहे कायमचा. वर्षानुवर्षे ... अव्याहत!!

अगदी आनंदात पोहचलो, आजच्या मुक्कामाच्या जागी. हेरिटेज रिसॉर्ट! मोजकेच आठ कॉटेजेस. सगळीकडे फुलझाडं. स्वच्छता, टापटीप. मालकच स्वतः पाहत असल्याने आवर सावर चांगली होती. मालक आनंद विजयने छान हसून स्वागत केलं. कॉटेजची चावी हातात सुपूर्द केली. कॉटेज अगदी ऐसपैस होती. बाहेर बसायला पडवीवजा जागा होती. तिथेच जेवण केलं. गुबगुबीत बिछान्यावर पडल्यापडल्या दोघंही निद्राधीन झालो.
  
आज अगदी शांततेत होतं सगळं. आज काही खास करायचं नव्हतं. बदामीहून निघून फक्त हुबळीला मुक्कामी राहायचं होतं. सोबतीला छान नवीकोरी पांढरी स्विफ्ट डिझायर. ड्राईव्हर स्वतः गाडीचा मालक. रस्ताही छान. दोन अडीच तासात हुबळीला पोहोचलो. 'हॉटेल नवीन', इथं आज वास्तव्य असणार होतं. हॉटेल नवीन, पूर्वी हॉटेल गेट वे, हुबळी होतं, अर्थात ताज ग्रुपचं. त्यामुळे दर्जा चांगला असणार ह्यात शंकाच नव्हती. कुतूहल हॉटेल नवीन...लेकसाईड व्हू अशा टॅगलाईनचं होतं.




'उनीकले' तलाव हा दोनशे एकरावर पसरलेला भव्य तलाव आहे. मध्यभागी स्वामी विवेकानंदांचा देखणा पुतळा. विस्तीर्ण अशा उनीकले तलावाशेजारी हे प्रशस्त हॉटेल आहे. हॉटेलला पोहोचलो. सहा मजली टुमदार पांढरीशुभ्र वास्तू. वरच्या बाजूला निळ्या रंगात हॉटेल नवीन अशी नावाची पाटी. आजूबाजूला छानसा बगीचा. पाहताचक्षणी 'दिल गार्डन गार्डन हो गया'.

रिसेप्शन काउंटर वर छानसं स्वागत झालं, वेलकम ड्रिंक दिलं गेलं. रुममधे शिरलो आणि समोरचा नजारा पाहून थक्क झालो. लेक व्हू, लेक व्हू म्हणतात तो हाच. मनिषा आणि मी, रूम - त्यातल्या फॅसिलिटी, काही काही न पाहताच बाल्कनीकडे धावलो.

खाली हिरवळ आणि रंगीत फुलांचा बगीचा आणि समोर निळंशार पाणीच पाणी. तिथून हलण्याचा विचारच होईना. जोडीला वातावरण पावसाळी. हवेत कुंद गारवा. कधी लक्ख ऊन, तर कधी सावलीचा खेळ. मधूनच पावसाच्या भूरुभूरु धारा. 'मौसम सुहाना और दिल अशिकाना', अशी स्थिती.

दुपारी बारा वाजेपासून, सायंकाळी सात वाजेतो, आम्ही दोघे खिळल्यासारखे तिथेच ठाण मांडून होतो. अशा ह्या रम्य वातावरणात सोबतीला, माझी सहचारीणी तरुणी होती. मग वारुणीचा आस्वादबात तो बनता ही है! सारं काही मनसोक्त. सुख-सुख म्हणताच ते हेच. सारं संपवून केव्हा झोपी गेलो कळलंच नाही.

भौतिक सुखाचा हा अलौकीक अनुभव आयुष्यभर याद देणारा. अशा प्रकारे आत्मिक आणि भौतिक अशी दोन्ही सुखे मी पाठोपाठ अनुभवली होती. त्यामुळे आणखी थोडा समृद्ध झालो होतो.

आज जोगचा प्रसिद्ध धबधबा पाहणं होतं. एक अनामिक ओढ लागली होती. एकदाची गाडी आली आणि आम्ही निघालो. तीन तासाचा एकूण प्रवास. त्यापैकी निम्मा जंगल वाटेचा. थोड्या वेळाने रस्त्यावर वाहनांची वर्दळ जाणवली. ठिकाण जवळ आल होतं. पाण्याचा रोरावणारा आवाज कानांनी टिपला होता. आम्ही उतरलो धबधब्याच्या दिशेने चालू लागलो.




हा जोग फॉलहा भारतातला दुसऱ्या नंबरचा धबधबा. शरावती नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असते. वसुंधरेच्या अनामिक ओढीने, प्रचंड आवेगाने, दोनशे फुटावरून सहस्त्रधारांनी धरणीवर कोसळते. तो नजरा डोळयात साठवण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी झुंबड असते.

धबधबा पाहण्यासाठी व्हू पॉईंटतयार केला आहे, त्यापाशी पोहोचलो. समोर जे दिसत होतं, त्याने डोळे विस्फारून गेले. कानावर धडकी भरवणारा पाण्याचा आवाज येत होता. खालच्या कातळावर पडणाऱ्या पाण्याचे शुभ्र तुषार अंगावर उडत होते.




राजा, राणी, रो रो रारा आणि रॉकेट असे पाण्याचे चार स्त्रोत. चारही वेगळ्या प्रकारचे. अजस्त्र लोट बनुन, निष्काम कार्मयोग्यासारखा एकसारखा अविरत कोसळणारा, ‘राजा. त्याला पाहील्यावर अबाबा तोय आदळे, नाही आठवलं तर नवलंच. हिरवा शालू नेसलेल्या नवविवाहितेच्या गळ्यातली मोत्याची माळ म्हणजे राणी. एक एक मोती टप्पोरा. नावाप्रमाणे रोरावत कड्यावरून खाली येणारा, ‘रो रो रारा. आणि सर्वात वेगाने आदळणारा, ‘रॉकेट. चारही एकापेक्षा एक सरस.

कानांवर पाण्याचा आवाज आदळत होता, डोक्यावर श्रावणधारा रिमझिम बरसत होत्या. नजरेसमोर स्फटिकासारख्या शुभ्र, निर्मळ जलधारा कोसळत होत्या. पण मन भरत नव्हतं, पाय निघत नव्हता. पण वेळेकाळेची टोचणी लागली अन नाईलाजाने निघालो.

आजचा मुक्काम गोकर्णाला होता, 'कुडले बीच व्हू रिसॉर्ट' इथं. आजपर्यंतचे सगळे दिवस नजरसुखाचे होते. त्याला दृष्ट लागायला नको, असं मन सारखं सांगत होतं. गोकर्ण बद्दल खूप काही वाचून झालं होतं. पण झालं भलतंच...




खोलीत सामान टाकून सरळ बीचवर पोहोचलो. जमिनीचा भाग जेमतेम. तो ही बराचसा खडकाळ. बीचभोवती हॉटेल्सचा विळखा. प्रत्येक हॉटेलच्या किचनमधून सांडपाण्याचा प्रवाह समुद्राच्या खाऱ्या पाण्याला नवी चव देत होता. पुढे पाऊल टाकण्याची इच्छा होईना. भयंकर शिसारी आली. एक फिरंगी जोडपं, त्या पाण्यात आनंदात खुशाल लोळत होतं. पण आमच्या आनंदाचा झरा केव्हाच लुप्त झाला होता. हताशपणे खोलीवर पोहचलो. एकूणच गोकर्ण म्हणजे ओढूनताणून बनवलेलं पर्यटन स्थळ आहे, असा आमचा निष्कर्ष निघाला. लोकही फारशी चांगली वाटली नाहीत, वागायला बोलायला. दोन दिवसांच्या इथल्या मुक्कामाचा प्लान बदलत सकाळी सकाळी इथून निघालो.

आता एक पूर्ण दिवस आणि रात्र बाकी होती. कालपर्यंत सगळं छान झालं होतं, गोकर्णचा अनुभव वगळता. पण शेवट गोड व्हायला हवा होता. तसंही परतीचा प्रवास गोव्याच्या दाबोलीम एअरपोर्ट वरूनच करायचा होता. मग थेट गोव्याला जायचं की मधेच कारवारला थांबायचं? माझा कल अर्थात गोवा हाच होता. कर्जाच्या खाईत बुडालेल्या किंगफिशर मल्ल्याला थोडी मदत करावी, हाच उदात्त हेतू आपला. पण माझ्या समाजसेवेच्या मनसुब्याला मनिषाने खो दिला आणि आमचा ताफा कारवारला पोहोचला. वाटेतच ऑनलाईन हॉटेल बुकींग केलेलं. तिथं पोहोचेतो रात्र झालेली. त्यामुळे जेवून सरळ झोपलो.




सकाळी सकाळी कारवार शहराला चक्कर मारली. शांत, समंजस, धाकट्या बहिणीसारखं वाटलं गाव. परिसर स्वच्छ होता, लोकं सुसंकृत वाटली. घाई, गडबड, गोंधळ कसलाही मागमूस नव्हता.

जेवण्याकरिता कुठे जायचं? कारवार ट्रीप प्लॅनमध्ये नव्हतं. त्यामुळे आधी काही ठरवलं नव्हतं. गुगलगुरुला विचारलं. हॉटेल अमृतत्याने सुचवलं. फिश मेनूकरीता खूप प्रसिद्ध असल्याची खास माहिती देखिल त्याने पुरवली. यथेच्छ ताव मारला.

सायंकाळी फ्रेश होऊन कारवार बीच पाहायला निघालो. अगदी गावाला लागून पण शेवटच्या टोकाला हा बीच होता. उन्ह उतरत होती. सूर्यास्त व्हायचा क्षण जवळ आला होता. बीचवर बऱ्यापैकी कारवारी ग्रामस्थ दिसत होते. कुठे सिनिअर सिटीझनचा ग्रुप तर कुठे महिला मंडळ. दिवसभराचा शिणवटा, आपल्या गाववाल्यांबरोबर गप्पा मारत दूर करू पाहत होते सारे. चार सहा ठिकाणी कुटुंब बसली होती आपापल्या लहानग्यांशी खेळत. कुणी वाळूचा किल्ला करतंय, कुणी खालच्या मऊशार सोनेरी वाळूत शिंपले गोळा करतंय. आम्ही ते सारं सारं हलकेच टिपत होतो. अखेर सूर्यनारायण त्या लाटांच्या आड खोल खोल बुडाला आणि आम्ही परतलो.

कारवारी भोजनाने आणि पाहुणचाराने शेवट सुखांत झाला होता. सकाळी आनंदाचे झाड कारवाराच्या अंगणात लावून प्रसन्न निरोप घेतला. गोवा गाठण्याची आता घाई झाली होती.




तासभराने गाडीने गोव्याची वाट धरली होती. कोकणची लाल माती आणि जांभ्या खडकांच दर्शन सुखावह होतं. एकाएकी हवेत बदल झालेला जाणवू लागला. वातावरण कुंद झालं, काळोखी पसरली आणि इतक्यात एक मोर गाडीसमोरून उडून पलीकडे गेला. त्याचा निळसर सोनेरी पिसारा, डोईवरचा तुरा, मन मोहवून गेला. लगेचच श्रावणधारा सुरु झाल्या. अडीच तासाचा हा प्रवास. अगदी वेळेत आम्ही आम्ही एअर पोर्ट गाठले होते. अधीर मनांनी आम्ही विमानात बसलो. विमानाने टेक ऑफ घेतला.

मुंबईला पोहचेपर्यंत दुपार झाली होती. पण जेवणाचा प्रश्न नव्हता. विमानात मॅगी नूडल्सचा फन्ना उडवला होता. त्यामुळे पोटे टम्म होती तडक टॅक्सी घेतली आणि थेट नाशिकला निघालो.

गाडीने कसारा घाट ओलांडला. आता अवघा दीड तास उरला होता. मी अधाशासारखा गाडीबाहेर पहात होतो. कसारा, इगतपुरी, घोटी, गोंदे, वाडीव्हरे, यापूर्वी कितीतरी वेळा हि गावं पहिली असतील. पण आज ती परत परत पहावीशी वाटत होतं. गेले नऊ दिवस आम्ही घरापासून दूर, कर्नाटकात मनमुराद भटकंती करत होतो. घरची, ऑफिसची कसलीही चिंता न करता. गोकर्णचा अपवाद वगळता सगळीकडे छान आनंद घेता आला. कारवारचा मुक्काम तर अनपेक्षित पण सुखाचा होता. आता घरची, गावची ओढ वाटू लागली होती.

गाडीत बाजुला झोपलेल्या मनीषाने झोपेत खांद्यावर डोके ठेवले. माझ्या हातांनी नकळत तिच्या कपाळावर हलकेच स्पर्श केला. अलगद तिच्या केसांतून बोटे फिरवू लागलो. तिच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव पाहून माझा नऊ दिवसांचा शिणवटा दूर झाला. बाहेर जलधारांनी भुईला तृप्त केले होते आणि आमची दोघांची सुखाने भरून पावलेली मने, प्रवास सफल झाल्याचं सांगत होती.

anilbagul1968@gmail.com



Tuesday 11 September 2018

'मुंबई' - आठवणीत तुंबलेली ! (भाग एक)



मुंबापुरी मी पहिल्यांदा पहिली १९८३ मध्ये. त्यानंतर पुढची दहा वर्षे तिला जवळून पाहत आलो, अनुभवत आलो. अनेक बऱ्या वाईट आठवणींनी ती दहा वर्षे मुंबापुरीत वावरलो. मस्तीत चैन करत जीवाची 'मुंबई' केली कधी, कधी मुंबईने जीवाची जिंदगी हराम केली. घेतले खूप सारे अनुभव, बरे - बुरे, अगदी ऐन जवानीचा काळ होता तो.

'VJTI '
माझं कॉलेज. सकाळी ६. ४७ ची लोकल पकडायची 'नेरळ'हुन. उतरायचं दादरला. फास्ट लोकल असल्यामुळे माटुंगाला स्टॉप नसायचा. मग दादर पूर्व ते कॉलेज निघायची पदयात्रा. हिंदू कॉलनीजवळुन,'रुईया' कॉलेजला वळसा घालून चालत जायचं. वाटेत 'मणीस' लंच होमचा अघोषित थांबा. तो मस्त दाक्षिणात्य सांबारचा दरवळ हुंगत, खिशाला चाचपडत, आज परवडेल का असा अंदाज घेत; इडली - वडा, सांबार अलगसे ! मग ती खास फिल्टर कॉफी !! महिन्यातून एकदाच. तिथून फाईव्ह गार्डन लागेस्तोवर, टीप न देता घेतलेली बडीशेप पुरायची. क्वचित प्रशांत दामलेच दर्शन व्हायचं तिथेच. खादाड दामले 'मणीस'चा आश्रय दाता होता जणू. फाईव्ह गार्डनपाशी 'रविंद्र महाजनी' हमखास दर्शन द्यायचा. तो नाही तर कधी 'ती'. नाव नाही आठवत आता, पण चेहरा नाही जात पुसला.



कॉलेज गेटपाशी ' ओम शिवपुरी' चा बंगला होता. दिसला नाही कधी तो, पण ऐकून होतो. मग यायचं माझं कॉलेज -VJTI ....

anilbagul1968@gmail.com

'मुंबई' - आठवणीत तुंबलेली ! (भाग - दोन )



मुंबईला लोक मायानगरी म्हणतात. खरंच आहे ते. मी vjti म्हणजे माझ्या कॉलेज मध्ये कमी आणि ह्या मायानगरीतच जास्त रमायचो.
नेरळ सारख्या खेड्यातून आलेला मी कॉलेज कुमार तरुण, मुंबाबापुरीत हरवून गेलो नसतो तर नवलंच. त्यात मला लहानपणापासूनच चित्रपटांचं आकर्षण. नेरळला रस्त्यावर चित्रपट दाखवले जायचे त्या वेळी. थिएटर वगैरे नसायचे, आजकालचे multi flex वगैरे कोसो दूर.


मुंबईत दादर जवळपास, चित्रा, शारदा मंदिर, आणि प्लाझा ही थिएटर्स असायची. त्यात प्लाझा म्हणजे लै भारी. ३० -३५ रुपये तिकीट असायचं बाल्कनीचं. 
प्लाझात पिक्चर बघणं खूप भारी वाटायचं त्यावेळी. मला आठवतंय 'हिंमतवाला' चित्रपट लागला होता, प्लाझात. ब्लॅक मध्ये ७० रुपये देऊन पहिला होता.


'हिंमतवाला' खरा तर साऊथचा हिंदीत रिमेक केलेला. मेलोड्रॅमॅटिक, बटबटीत. असं आज वाटतंय. पण जाम आवडला होता त्यावेळी. जितेंद्र आणि श्रीदेवी ही सुपरहिट जोडी. जितेंद्रचे पांढरे शुभ्र कपडे आणि पांढरे शुभ्र बूट. आज अंगावर काटा येतो, पण एकदा तरी घालावा असं कायम वाटायचं त्यावेळी. पण आईशपथ आजपर्यंत डेरिंग झाली नाही कधी पांढरी शुभ्र प्यान्ट घालायची, पांढरे बूट ... छे .. छे .

त्यानंतर ह्याच जोडीचा तद्दन बाजारू - 'जस्टीस चौधरी आला होता'; किमान ७ वेळा पाहीला असेल.
ते हंडे - तपेल्यांचे सेट, एकूणच बटबटीत सजावट, त्यात श्रीदेवीचा पिवळ्या, पांढऱ्या तंग कपड्यातला ओलेता पेहराव, मती गुंग व्हायची. 

मग एकदा, एका सिनिअर बरोबर गेलो होतो 'मेट्रो थियेटर' ला कोणता तरी इंग्लिश मुव्हीला. adult होती ती. डोरकीपर घेतंच नव्हता. आयकार्ड दाखव वगैरे खूप उद्योग केले तेव्हा त्याने आत सोडलं होतं.

एकूणच चित्रपट बघणं हा उद्योग तेव्हापासूनचा. आज बघतो फक्त मराठी .. ते हि multiflex मधे. त्यावेळी आठवतंय ... कॉलेज डेजला हॉस्टेल रोड वर पडद्यावर 'कारवा' पहिला होता - ब्लॅक न व्हाईट !!
एकूणच त्यावेळच्या चित्रपट पाहण्याच्या आवडीने आज, एक वेगळीचं प्रगल्भ जाणीव दिली म्हणा आयुष्याला !!!

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...