Thursday 16 April 2020

'कोंडूर्‍या'क गाऱ्हाणं...




शेवटी वाट वाकडी केलीच मी ! होतच माझं हे असं अधूनमधून !! चैनच पडत नाही मुळी,असं केल्याशिवाय. मग काय, तीन दिवसांचा कोकण दौरा ठरवलाच, तो ही भर मुसळधार पावसात !

तळकोकणातील भोगवे, निवती, खावणे, वायंगणी, सावंतवाडी, तुळस, खानोली, पाडगावकरांचं वेंगुर्ले आणि चि. त्रं. खानोलकरांचं कोंडुरं !! असा सारा प्रवास.

ह्या साऱ्या भटकंतीत मनात भिरभिर होती, ती फक्त आणि फक्त कोंडूऱ्याची ! कानांत साद होती ती कोंडूर्‍याच्या सागर लाटांच्या गाजेची !!

का बोलावलं असेल मला कोंडुऱ्यांनं?
खरं तर मला काही नको होतं कोंडुऱ्याकडून, पण त्यालाच काही द्यायचं होतं का?
खानोलकरांच्या कोंडुरा कादंबरीतल्या 'पद्मनाभ'चं आणि माझं काय नातं लागत होतं?
प्रश्नाचां भुंगा घेऊन मी कोकणात वेड्यासारखा फिरत होतो.

सागरेश्वरचा निर्मनुष्य आणि स्वच्छ सागरकिनारा आवडत होता, पण भावत नव्हता. खेमसावंतांचा सावंतवाडीतला देखणा राजवाडा, भुलवत होता पण खिळवत नव्हता.काय होतंय कळत होतं, पण का कोण जाणे कोंडूऱ्याला जायचं धाडस मात्र होत नव्हतं.

वेंगुर्ल्यात वाजत गाजत गणपती पुजले जात होते गणेश चतुर्थीच्या सकाळी. आणि चर्चमध्ये मी, एकटाच येशूच्या मूर्तीसमोर भ्रमित होऊन उभा ! येशूसमोरची माझी प्रार्थना, त्या वरद विनायका पर्यंत पोचली असेल का? चर्चच्या घंटेने मी भानावर येतो.

सायंकाळच्या अवचित वेळी, तुळस गावच्या जैतीर मंदिरात गाभाऱ्यात असतो मी भारल्यागत !
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा.....व्हय म्हाराजा, मूळचे तुळस गावचे कदम, मुंबईतून खास तुझ्यापायाशी आलेत, गाऱ्हाणं घेऊन.
... व्हय महाराजा !!
साऱ्यांच्या एकसाथ आवाजाने मी भानावर येतो.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सारं फिरून झालेलं असतं. आता मात्र वेळ झालेली असते कोंडूऱ्याची ! मनाची बेचैनी वाढवणारी, असह्य हुरहूर जीवघेणी ! दुपारच्या वेळेचं वेतोबाच गाऱ्हाणं कानात अचानक घोंगवतय !!
देहासक्त असूचीचा मनभवरा, भुंग्याने रुंजी घातल्यागत भिरभिरु लागला अचानकसा !!
शरीरावरची त्वचा ओढ दिल्यागत आकसून ताण असह्य करणारी.
हे असं का व्हावं ?

कोंडुरा गावची रस्त्याच्या कडेलगताची पाटी नजरेने हलकेच वाचलेली असते. सहा सात मिनिटांचा जीवघेणा प्रवास, रस्त्यावरच्या खड्डयांनी अधिकच ताणलेला.गाडीचा दरवाजा आपसूक उघडला जातो, अन नकळत मी गाडीच्या बाहेर पडतो.

बेभान मनानं पावलांना इशारा केलेला असतो. झप झप वेग वाढत जातो. जवळपास धावतच अनामिक ओढीने मी समुद्राच्या दिशेने जाऊ लागतो. अवघ्या काही क्षणांत निसरड्या वाटेवरून आवेगात पोहोचतो कड्याच्या टोकाकडे.

समोरचं अलौकिक दृश्य नजरेत साठवण्यासाठी नजर भिरभिर करू पहात होती. कड्याखाली काळ्याशार दगडांची उतरंड. समुद्राच्या फेसळलेल्या लाटा आवेगात त्यांच्या भेटीला येत होत्या, एकामागोमाग ! पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या थेंबानी त्या दगडांना न्हाऊ माखु घालत होत्या जणू !!

थोडं भानावर आल्यावर, नजर आसपास गेली. इथं तर हिरव्यागार रंगांच्या विविध छटांचा गवती गालिचा !! त्यातून हलकेच डोकावणारी पिवळी धम्मक नाजूकली रानफुले, मनबावरी !!!
किनाऱ्यावरच्या कबऱ्या मऊशार वाळूवर, किंचित काळेशार गर्द हिरव्या माडाच्या झाडांनी, आभाळ पेललेलं !

ह्या निसर्गाच्या भावविभोर खेळात, आता भर घालतो तो वरुणराजा ! निळ्याशार आकाशात काळसर ढग अचानक गर्दी करू लागतात. टप्पोरे टप्पोरे पांढरे शुभ्र पाण्याचे थेंब खाली सोडू लागतात. थोड्या वेळाने पावसाचं जमा झालेलं पाणी डोंगरकड्यावरून खाली समुद्राच्या दिशेने येऊ लागतं. जणू हिरव्या शालूवर मोत्यांच्या माळा घातल्यागत !

आता पाळी असते ती सूर्यनारायणाची !!
ऊन सावलीचा त्याचा नेहमीचा हुकमी खेळ आता तो सुरु करतो. सूर्याच्या किरणांनी, खाली पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला मग सोनेरी मुलामा चढला जातो.
एखादं सुंदर निसर्गचित्र पहावं, तसंच काहीसं !

भोवताचं सौंदर्य टिपून गच्च भरलेले डोळे पायावर खिळताच, वीज कोसळावी तसा देह सळसळतो. पाय नकळत मागे खेचला जातो. इतकावेळ कड्याच्या शेवटच्या टोकावर मी उभा असतो ! आणखी एक पुढलं पाऊल, हे खालच्या कातळ खडकावरलं कपाळमोक्ष करणारं ठरलं असतं.

जैतीर मंदिरातलं पुजाऱ्याने घातलेलं गाऱ्हाणं, आता आपसूक ओठावर येत असतं.
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा..... पार नाशिक येथून, मनात रुतून बसलेलं, वर्षनुवर्षीच गाऱ्हाणं घेऊन आले असा. त्यांचा गाऱ्हाणं तू कबूल कर रे म्हाराजा ... व्हय म्हाराजा..... !! ...
व्हय म्हाराजा.....मनातल्या असंख्य कल्लोळानी एकसुरी जयघोष केलेला.

देवी सातेरीने आशीर्वादासाठी पाठीवर हात ठेवल्याचं जाणवतंय आणि रवळनाथानेही प्रार्थनेला स्विकार केल्याचा भास होतोय.

पण... पण खानोलकरांच्या कादंबरीतला कोंडुरा गाऱ्हाणं ऐकून आशीर्वाद दिल्यावर, भक्ताच्या नकळत त्याच्याकडची एखादी गोष्ट काढून घेतो. कोंडुऱ्याने माझं असं काय काढुन घेतलं असेल?
विचाराने आलेल्या काट्याने शहारलेलं अंग अजूनही तसंच आहे !

अजूनही शहारलेलंच आहे.

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...