Sunday 15 August 2021

बॉलिवूडच्या चष्म्यातून भारतीय स्वातंत्र व देशभक्ती

 



नाशिकच्या श्रीयुत धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके ह्यांनी १९१३ सालीराजा हरिश्चंद्र’, हा मूकपट प्रदर्शित केला. हिंदी चित्रपट सृष्टीचा त्यांनी पाया घातला. स्वातंत्रपूर्व काळातील हा कालखंड. सुरवातीच्या काळात हिंदू संस्कृतीतील पौराणिक कथांवर आधारित चित्रपट तयार होऊ लागले. चित्रपट सृष्टी अजून बाल्यावस्थेतच होती. त्यानंतर मग चित्रपटाचे विषय हे सामाजिक होऊ लागले.डॉ. कोटणीस कि अमर कहाणी’, हा १९४६ साली प्रसिद्ध झालेला चित्रपट हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. 

 

भारतीय स्वातंत्र्याचे स्वप्न अद्याप पूर्ण व्हायचे होते आणि सिनेसृष्टी अजून कुठे रांगतच होती. साहजिकच भारतीय स्वातंत्र, हा तिचा विषय अजून व्हायचा होता. पण १९३१ साली प्रदर्शित झालेल्याआलम आराचित्रपटाने, तिला आपला आवाज जरूर दिला होता.

 

१९६२ साल उजाडले. चेतन आनंदचा 'हकीकत' प्रदर्शित झाला. १९६२ च्या भारत-चीन युद्धावर आधारीत कथानक. 'युध्दस्य कथा रम्या', म्हटल्याप्रमाणे लोकांना कथानक भावलं. चित्रपट हिट झाला. हिंदी चित्रपट सृष्टीनेदेशभक्तीलसीचा पहिला डोस घेतला. 

 

आता बॉलीवूडला हिट चित्रपटाचा-‘देशभक्ती’, हा एक हमखास फॉर्म्युला सापडला होता. मग 'शहीद' ह्या फिल्मच्या रूपाने बॉलिवूडने दुसरा डोस घेतला.मनोजकुमार’, नावाचा देशभक्ती कोळून प्यालेला कलाकार त्यामुळे गवसला. त्याने मग 'क्रांती', घडवली आणि सकल चित्रपट सृष्टीवर जणू 'उपकार' केले. त्याचबरोबर त्याने 'रोटी कापड और मकान' आणि 'पुरब और पश्चिम' आपल्याला बघायला लावलेच होते.

 

मग कधीतरी आला 'सात हिंदुस्थानी'. फिल्म फारशी हिट नाही ठरली पण ... हिट फिल्म्स देणाऱ्या शहेनशाला मात्र तिने पेश केलं. महानायक अमिताभ बच्चनने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं.   

 

१९७३ साली प्रदर्शित झालेला 'हिंदुस्थान कि कसम, म्हणजे चेतन आनंदचा  बुस्टर डोस. भारतीय सैन्याच्या लढायांवर आधारित त्यातलं कथानक. पुढेगदर’, ‘बॉर्डर’, ‘एलओसी’, ‘मिशन काश्मीर’, ‘लक्ष्य’, ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईकतेएयर लिफ्ट’, ह्या आजच्या काळातील चित्रपटांत देखील असाच काहीसा कथानकाचा फॉर्म्युला वापरला आहे.

 

मग मग बॉलीवूडने फॉर्म्युला किंचितसा बदलला. देशभक्तीत 'सामाजिक न्यायाचा' अधिकचा मसाला मिसळला. 'रंग दे बसंती' हे आमिरखान अभिनित, तर 'स्वदेश' सारखा, शाहरुख अभिनित चित्रपट ह्या चष्म्यातून हिट ठरले. 'सरफरोश' आणि 'रोझा' सारख्या चित्रपटांनी भारतीय सीमा आणि त्यानुषंगाने घुसखोरी, ह्या आधारे देशभक्तीचं सुंदर प्रदर्शन घडवलं.

 

देशप्रेम आणि वैयक्तिक प्रेम, हा आणखी एक आगळा वेगळा पैलू देखील बॉलीवूडने पेश केला. द ग्रेट पंचमदा ह्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट, '१९४२ लव्ह स्टोरी'. हे एकच उदाहरण त्याकरीता पुरेसं ठरावं. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. त्यात कथानकापेक्षाही गाण्यांचा वाटा मोठा होता, हि बाब अलाहिदा.

 

आता बॉलीवूडने देशभक्तीचा कॅनव्हास आणखी विस्ताराला. हॉलिवूडमधील जेम्स बॉण्ड प्रमाणेच, पण भारतीयत्वाची डूब असणारे सिक्रेट एजंट्स पडद्यावर उतरवले. 'रॉ', 'बेबी', 'हॉलिडे', 'मद्रास कॅफे', हे आजच्या जमान्यातले चित्रपट त्यावरच बेतलेले. खिलाडी 'अक्षय कुमार', अश्या भूमिकांत एकदम फिट्ट बसला.

 

हळूहळू विषयाची व्याप्ती वाढत गेली. भारतीय स्वातंत्रलढ्यातल्या क्रांतिवीरांनी ७० एम एम चा पडदा, आता व्यापायाला सुरवात केली. 'मंगल पांडे', ‘द लिजंड भगत सिंग, ‘स्वातंत्रवीर सावरकर, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस-फॉरगॉटन हिरो’, ते काल परवाचा, कंगनाचा मनकर्णिका’, हा झाशीच्या राणीवरचा चित्रपट, ही काही वानगीदाखल उदाहरणे.

 

आता देशभक्तीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघायचे, बॉलीवूडने ठरवले. आणि मग 'मिशन मंगल', 'परमाणू -द स्टोरी ऑफ पोखरण' पडद्यावर सादर झाले. नव्या जमान्याचा नव्या प्रेक्षकांनीही ते उचलून धरले आणि आपल्याही देशभक्तीवर शिकामोर्तब केले.  

 

आता किंचितसं विषयांतर, पण इथं आवश्यक असंच. तर नुकत्याच संपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. बऱ्याच काळानंतर सुवर्णालाही गवसणी घातली. पण त्या पूर्वीच्या काळाकडे आपण पाहुयात. ऑलिम्पिकमधला पदकांचा दुष्काळ पाचवीला पुजलेला. राष्ट्रीय खेळ हॉकीचा सुवर्णकाळ आता धूसर दिसायला लागलेला. सुवर्ण पदकाची सोनेरी झळाळी, ब्रॉन्झच्या रंगापेक्षाही काळी पडलेली. क्रिकेटच्या वेडापायी भारतीयांनी, कुस्तीची दंगल विसरल्यात जमा झालेली. मुष्टीयुद्ध’, हा खेळ देखील असाच दुर्लक्षिलेला.  तर बॅडमिंटनच्या खेळातले फुल कोमेजून गेलेलं.

 

बॉलीवूडने मात्र ह्याकडे थोडं वेगळ्या अँगलने बघितले पाहिजे, असे ठरवलं असावं. आशुतोष गोवारीकरने, 'लगान'ची बोली लावली आणि देशभक्ती आणि खेळ हातात हात घालून पडदा गाजवू लागले. पण ह्यात गंमतीचा भाग हा कि सव्वाशे करोड भारतीयांना वेड लावलेल्या क्रिकेट खेळावरचा, 'लगान' आणि 'एम एस धोनी'चा अपवाद वगळता एकही हिट चित्रपट नाही.

 

ह्या उलट ... लगान वाल्या आमिर खानने मग दंगल आणला, फोगट भगिनींच्या कुस्तीवरचा. त्यापूर्वी 'चक दे इंडिया' म्हणत आलेला शाहरुखचा, हॉकीवरचा. ते ही महिला हॉकीवरचा चित्रपट. ह्या चित्रपटाने पडदा गाजवला. ह्यात खान बंधुतला तिसरा खान कसा मागे राहणार? त्याने आणला सुलतान ! मग 'भाग मिल्खा भाग,' 'मेरी कोम', 'सायना' अशी वेगवेगळ्या खेळांवरच्या चित्रपटांची मालिका सुरु झाली. जणू भारतीयांनी क्रिकेट विसरायला सुरवात केली. आणि आत्ताचं टोकियो ऑलिम्पिकच सूप वाजलेलं. भारतीय पथकाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार ब्रॉन्झ पदकांची लयलुट केलेली. काही संबंध आहे? विचार नक्की व्हायला हवा.

 

जाता जाता प्रेमाची सूचना. उद्या आपण ७५ वा स्वात्यंत्रदिन साजरा करतो आहोत. नाक्यानाक्यावर, रेडिओ-टीव्हीवर लागलेलं, 'मेरे देश के धरती सोना उगले उगले हिरे मोती, हे 'उपकार' चित्रपटातलं गाणं नक्की ऐकायला हवं. मनोजकुमार इतकी नाही, पण किंचितशी आपलीही देशभक्ती आपण दाखवायला नको का?

 

अनिल सुमति बागुल


वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...