Thursday 27 August 2020

‘९६’ - Cinema Review

 

९६



'व्हाट्स ऍप' वर तुमचा 'री युनियन' ग्रुप हा असणारच, दहावीच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींचा.

त्यातलं एखादा / एखादी असं असणारंच कोणीतरी खास !

मला नक्की माहित्येय तुम्ही जाहीर कबुली देणार नाहीत, पण...

पटत असेल तर तुम्ही पहायलाच हवा असा आहे ९६ !!

 

साऊथचा हिंदीत डब केलेला हा सिनेमा.

माझ्या मुलाने खास आग्रह करून पहायला लावला.

त्यामुळे काल मी 'यू ट्युब' वर पाहीला. 

साऊथचे सिनेमे हे बटबटीत, लाऊड, मेलोड्रॅमॅटिक वगैरे वगैरे असतात, हा  माझा  आजवरचा समज. 

ह्या समजाला मोडीत काढत, '९६' मनाच्या एका हळुवार कप्प्यात आपसूक दाखल झाला.

 

राम हा एक कुशल 'ट्रॅव्हलर फोटोग्राफर'.

कलावंत जसा असायला हवा तसाच हळुवार मनाचा !

पण, आजवर अविवाहित राहिलेला.

 

एके दिवशी फिरता फिरता त्याच्या मूळगावी पोहचतो.

गाव पहाताच आपसूक 'नॉस्टॅल्जीक' होतो.

इतक्यात शाळेची इमारत दिसते.

गेटवर तर तोच वॉचमन असतो, त्याच्या लहानपणीचा.

त्याच्याशी गप्पा मारता मारता तो शाळाभर फिरतो, मित्र मैत्रिणींच्या आठवणींसह !

बावीस वर्ष उलटून गेलेली आहेत, इतक्या वर्षात हे पहिल्यांदा होतंय.

विलक्षण भावुक होतो राम !!

 

वॉचमन त्याला, त्याच्या एका मित्राचा मोबाईल नंबर देतो.

मित्र त्याला, त्यांच्या 'व्हाट्स ऍप' ग्रुप मध्ये ऍड करतो.

मग काय गप्पांचा धो धो पाऊस.

ग्रुपचा 'री युनियन' बेतही मग ठरतो.

 

एक एक करुन सगळे गोळा होतात.

पण थोड्या वेळाने, राम अस्वथ होतो.

हि अस्वस्थता तिच्या वाट पहाण्यातुन आलेली.

तिची ओढ त्याला कातर करते.

 

अखेर तो क्षण येतो.

'ती' येते.  

'जानकी' त्याची जानू.

भेटीत नजरानजर होते.

अबोलपणे खूप काही बोलून जाणारी.

आठवणींचा फ्लॅशबॅक’, एक एक क्षण ताजा करत जातो. 

दोघेही सुखावतात.

 

सहवासाची भूक, त्यांना पूर्ण रात्र झोपू देत नाही.

तिला त्यावेळी पडलेला प्रश्न, ती विचारते.

तू अचानक सांगता शाळा सोडून दुसऱ्या गावी का गेलास?

उत्तर मिळतं.

मग तो विचारता होतो.

तुझ्या कॉलेजला मी आलो होतो भेटायला, त्यावेळी तू का नाकारलंस भेटायला.

ती उत्तर देते. 

 

मग रुखरुख लागते,नियतीने घडवलेल्या ताटातुटीची.

क्षणभर शांतता.

 

थोड्या वेळाने ती भानावर येते.

तो काल’, आज नाही.

तिचा संसार, तिचा संसार साथी, तिची लेक तिला आठवू लागते.

तिचं घर, तिला खुणावू लागतं.

ती निघते, त्या आजमध्ये परत जाण्यासाठी.

 

पण तो मात्र अजूनही 'काल' मध्ये.

कारण तो कायमच कालमध्ये वावरणारा.

 

अव्यक्त प्रेमाची हि अलगूज कथा.

तुमच्या मनाचा ठाव घेते, अगदी हळुवार !

नकळत तुम्ही हि नॉस्टॅल्जीक होता !!

आठवणींचं मोरपीस, अंगावर अलगद फिरून जातं !!


anilbagul1968@gmail.com

 

 

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...