Monday 26 November 2018

स्वतःच्याच प्रेमात पडलेला सरकारी अधिकारी !!




                                                #tukarammundhe


15 ऑगस्ट 2014 ला लाल किल्ल्यावरून भाषण करतांना पंतप्रधान मोदींनी स्वतःला प्रधानसेवक म्हटलं.
सरकारी पद हे आम जनतेच्या सेवेसाठी आहे, हे त्यांना सुचवायचं असावं, हा माझा समज आहे.

मनपा आयुक्त हे सरकारी पद आणि म्हणजे मनपातला टीम लीडर !
टीम लीडरचं काम हे स्वतःच्या सहकार्यांना आपल्यासोबत कामाला जोडून घ्यायचं असतं हा म्यानेजमेंटचा बेसिक फंडा.

स्वतःच्या सहकाऱ्यांमध्ये जोश भरून, त्यांना सोबत घेऊन त्यांनी भरीव काम करणं हे नाशिककरांनी अपेक्षित धरलं होतं. पण...

पण मुंढे हे स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडले हे वास्तव आहे. ऐकायला कटू वाटेल पण तेच सत्य आहे.
नाशिक, त्याचा विकास, नाशिककर आणि त्यांचं हित ह्या पेक्षा, माझा माईक आणि माझंच ऐक असं चालू होतं, गेले नऊ महिने !

चांगलं असणं हे तेव्हा वाईट ठरतं जेव्हा ते कुणाच्याच हिताचं असत नाही.
इतिहास साक्षी आहे हो ह्याला.

प्रतापराव गुजर पराक्रमी होते, मान्य ! एकनिष्ठ होते मान्य !! दिलदार होते, मान्य !!!
बहलोळखानाला युद्धात मात दिल्यावर, स्वतःच्या अधिकारात माफी देणं स्वतः छत्रपतींनी मान्य केलं नव्हतं.
वेडात मराठे दौडले वीर सात ! गाणं ऐकायला वाटतं छान पण त्याचा स्वराज्याला उपयोग शून्य.
मुंढे हे प्रतापराव गुजर ठरलेत ! अकरा वर्षात अकरा वेळा बदल्या, प्रसिद्धी साठी छान पण महाराष्ट्र देशी उपयोग शून्य !

आपलं काय आपण नेहमीच अभिमानाने गातो, वेडात मराठे वीर दौडले सात !! पण साथ कोण देणार ?

anilbagul1968@gmail.com

Saturday 17 November 2018

प्रिय नाना,

                                    #nanapatekar


परवाचा तुझा 'लोकसत्ता'तला लेख म्हंणजे शब्दांची जादूच होती. 
इरसाल कोकणीपणा जपत तू फारच भावूक लिहून गेलास लतादीदींवर ! 
काळीज हललं रे कुठेतरी !
दीदींना यावर्षी वाढदिवसाला मिळालेली हि अप्रतिम भेट असणार !!

तुझं आणि मकरंदचं ते 'नाम'चं काम थक्क करणारं, ह्यात काही शंकाच नाही. 
कित्येक शेतकरी आणि आयाबहिणी तुझ्यावरून जीव ओवाळण्यासाठी उत्सुक असतील.

बाबा आमटेंच्या कार्याने भारावून गेलेला तू. 
ठाकरे बंधूनी एकत्र यावं, अशी आस असणारा तू.

'पुरुष' मधून पुरुषी अहंकाराचा आसूड उगवणारा तू. 
'क्रांतिवीर' मधून देशप्रेमाचं स्फुल्लिंग चेतावणारा तू . 
अभिमानाने ऊर भरून यावा अशी तुझी चित्तरकथा.

प्रत्येक मराठी मन तुझ्यावर फिदा.

एका अवघड वाटेवर भरकटल्यासारखा झालास का रे ?

बॉलीवूड मधे टेचात पाय रोवून, आपल्याच कलंदर थाटात राहणारा तू ... 
त्या 'अग्निसाक्ष' मध्ये झलक दाखवून गेलास रे त्या विक्षिप्तपणाची.

असं काही नसणार असं अजून वाटतं रे मला. 
त्या तनुश्रीनं काही बाही आरोप केले, जीव धास्तावला. 
असं काही नसणार मन कालपर्यंत म्हणत होतं. 
बिग बॉस मध्ये प्रवेश मिळण्यासाठी तिनं हे केलं अशी माध्यमांची स्टोरी सुरु होती दिवसभर !


प्रियांका चोप्रा अन शिल्पा शेट्टी आणि आणखी काही तारकांनी तुझ्याविरोधात उघड भूमिका घेतली. 
आमिर आणि बिग बी नेहमीप्रमाणे गुळमुळीत.
सावंतांच्या राखी नामक महिलेने तुझं जोरदार समर्थन केलही. 
तरीही मन शंका घेतंच होतं.



पण त्या आपल्याचं रेणुका शहाणेची पोस्ट आणि सोबतचा व्हिडीओ पहिला अन ठोका चुकला काळजाचा !! 
रेणुका शहाणीच आहे ना ? ती असा वेडेपणा कसा करू शकेल ?
आपलीच रेणुका तुझ्या विरोधात बोलती झाली आणि तिच्या व्हिडीओने आमची बोलती बंद झाली.

कारमधे धास्तावलेली तनुश्री आणि बॉनेटवर नाचणारा तो कुठलासा कार्यकर्ता ... 
अक्षम्य अपराध !!
शिवबा असते तर काय शिक्षा दिली असती त्या राजाने ?
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आदराने पाठवणी करणाऱ्या माझ्या राजाच्या वारसांनी एका अबलेला असं भयभीत करावं ? 
आपल्या पुरुषी अहंकाराचा कंड शमवण्यासाठी ??

माझ्या नाशिकच्या मातीतल्या सारस्वतांच्या राजाने, अर्थात कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट मधला तो डायलॉग आठवला ... अन शहारलो.
''तू नट म्हणून वाईटच होतास पण माणूस म्हणूनही भिकारडा आहेस !!''

नाही , नाही तू तसा नक्कीच नाहीस.
हे नटसम्राटा, हे .. हे अखेर नाटकंच असेल ना ? 
भोळी भाबडी मराठमोळी आशा ...

anilbagul1968@gmail.com

Saturday 3 November 2018

‘हुदलीकर’





''सर  ! इझी आहात  का बिझी आहात ?''
फोनवर हुदलीकर प्रसन्न आवाजात विचारात होते.
''बोला किती वाजता भेटायचं !''

माझं तत्परतेचं उत्तर; साऱ्या औपचारीकारात बाजूला सारत !
ह्यापूर्वी दोन भेटी झाल्या होत्या, आणि हुदलीकरांनी आपल्या मोकळया - ढाकळ्या  स्वभावाने आता त्याची गरजही ठेवली नव्हती.

 ''संध्याकाळी ७ वाजता भेटूयात, आमच्या फार्महाऊस वर जाऊयात", हुदलीकर.
ठरल्याप्रमाणे हुदलीकरांची गाडी घ्यायला आली, मी गाडीत शिरलो. गाडीत शिरताच, एका वेगळ्याच वासाची तीव्र जाणीव झाली. झटकन खिशातून रुमाल काढला आणि नाकाला लावला.

सर, तुम्ही कोकणातले, माशांचा वास सहन होत नाही? सुके बोंबील आहेत 'इव्हा'साठी ! 'इव्हा'ला बोंबील फार प्रिय. फार्म हाऊसवर जातांना प्रत्येक वेळी न्यावेच लागतात. आणि ही हाडकं 'लुसी'साठी. दुपारी घरी मटणाचा बेत होता. त्यातलीच काही ठेवलीत. हुदलीकरांच्या ह्या खुलाशाने 'इव्हा' आणि 'लुसी' ह्या प्राणिमात्रांचा मी लगेच अंदाज बांधला.

एव्हाना गाडी सातपूर पर्यंत आली होती. ड्राइव्हरला त्यांनी गाडी, भाजी बाजारापाशी घ्यायला सांगितली.

चला, असे मला म्हणत, हुदलीकर एक मोठी कापडी पिशवी घेऊन उतरले. पाठोपाठ मी. सातपूरच्या भाजीबाजारात, सायंकाळच्या त्या गर्दीत ते शिरले, झटपट चालत एका दुकानापाशी थांबले.

“मावशे, कशी आहेस?” असे सलगीने विचारात, कांदे -बटाटे, कोथींबीर, आलं, लसूण, कढीपत्ता असे असंख्य जिन्नस त्यांनी अवघ्या सात-आठ मिनिटात पिशवीत जमा केले.चला, असे मला परत म्हणत, हुदलीकर गाडीच्या दिशेने चालू लागले, पाठोपाठ मी. 

पुढच्या दहा मिनिटांत गाडी दुडगाव फाट्यावर पोहचली. फार्महाऊसवर खत मारावं लागणार आहे. एक गोणी २१-३९ युरिया आणि एक पिशवी फॉस्फेट घेऊन ये, 'खांदवे'च्या दुकानातून, हुदलीकरांनी ड्रायव्हरला सांगितले. असा सारा जामानिमा गोळा करत गाडी फार्म हाऊस वर पोहचली. 

गेटपाशी गाडीचा आवाज ऐकून 'इव्हा' आणि 'लुसी' जोडीचे मोठमोठ्या आवाजात भुंकणे ऐकू यायला लागले. ड्रायव्हरने हॉर्न वाजवायला सुरवात केली. हुदलीकर खाली उतरून 'हणम्या, हणम्या असा पुकारा करू लागले. गेटच्या पलीकडून एका लहान मुलगा हातातली काठी गेटवर आपटत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण ह्या सगळ्या ‘आवाजी लगीनघाईत’ तो काय सांगतोय ते कळेनासे झाले होते. न राहवून मी हुदलीकरांच्या खांद्यावर थापटत, त्यांचे त्या मुलाकडे लक्ष वेधले. त्याने कुलुपाची चावी दिली. ड्राइव्हरने कुलूप खोलून गेट उघडले आणि आम्ही आत गेलो. त्या मुलाचा बाप - हुदलीकरांचा हणम्या - दारू पिऊन 'फीस' होऊन पडला होता.

हुदलीकर आत शिरताच 'इव्हा' आणि 'लुसी' दोघीनीं त्यांच्याकडे धाव घेतली. एकीने त्यांना चाटायला सुरवात केली. एक त्यांच्या छातीवर पाय टेकवू लागली. मग हुकलीकरांनी सुके बोंबील, हाडकं त्यांना यथेच्छ खाऊ घातलं. एकीकडे त्यांचं त्यांना कुरवाळणे, लाड करणे त्यांच्याशी गप्पा मारणे सुरु होतेच.उसंत मिळताच हुकलीकरांनी 'हणम्याच्या बायकोला 'जिजा’ला भाजीची पिशवी सोपवत, स्वैपाक बनविण्यास सांगितले.

 मग त्या काळोख्या रात्री, विजेरीच्या प्रकाशात, हुदलीकरांनी मोठ्या उत्साहात संपूर्ण फार्म हाऊस, दाखवला; अगदी बारीक सारीक तपशिलांसह. एव्हाना हणम्याच्या पोरानं टेबल खुर्च्या मांडल्या आणि सरते शेवटी आमची गप्पांची बैठक सुरु झाली. हुदलीकरांनी बरोबर एक मोठीशी चामडी पिशवी आणली होती. असंख्य कागदांनी ओसंडून वाहत होती ती. त्यातील एक एक कागद बाहेर काढत एकाहून एक सरस कविता ते ऐकवत राहिले. कविता अर्थपूर्ण तर होत्याच, पण हुकलीकर त्या साभिनय गाऊन म्हणत होते. त्यांची शब्दांवरची हुकमत जाणवत होती. आता हुदलीकरांची ही ओळख नव्याने होत होती.

बऱ्याच वेळाने जेवण ताटांमध्ये वाढून जिजा घेऊन आली. ज्वारीच्या चुलीवरच्या गरमागरम  भाकऱ्या- पिठलं, कांदा आणि मिरचीचा ठेचा असा फक्कड बेत. आता रात्र बरीच झाली होती. हवेतला गारवा वाढला होता. कान आणि पोट दोन्हीही तृप्त झाले होते. विलक्षण भारावून मी घरी परतलो होतो.

त्यानंतर, अशा अनेक रात्री हुदलीकर फार्म हाऊस वर नेत गेले. तृप्त मैफिलीचा अनुभव प्रत्येक वेळी देत गेले.

‘कुटुंबवत्सल’ हुदलीकर व्यवसायाने बिल्डर. सिव्हिल इंजिनीरिंगच रीतसर शिक्षण घेतलं त्यांनी. एकूण बिल्डर जमात 'कर्तृत्वाने' बदनाम असली तरी हुदलीकर सचोटीने व्यवसाय करत आलेले. ‘इंदिरानगर’ भागा मध्ये अनेक ईमारती त्यांनी उभारलेल्या. प्रत्येक इमारतीचं नामकरण वैशिष्ठ्यपूर्ण, सुरवात त्यांच्या पत्नीच्या नावाने. चैत्र दीप, चैत्र नक्षत्र, चैत्र अमुक चैत्र तमुक.कोणतंही पाठबळ नसतांना, गरीब घरातल्या, वडिलांविना वाढलेल्या माणसाने स्वकर्तुत्वाने मिळवलेलं हे यश अद्भुतच !
पण एवढ्यावर थांबतील तर ते हुकलीकर कसले ?

दिवसभर रेती विटांमध्ये बुडालेले हुदलीकर, सायंकाळनंतर प्रतिभेचे अद्भुत रंग भरत असतात. कविता, चित्रपट गीते, लावण्या, कथालेखन, कथाकथन इतकंच काय तर मराठी गझला ! साहित्य विश्वातली त्यांची हि भरारी थक्क करून जाते !! सर्वाधिक लांबीच्या मराठी गझलेचं रेकॉर्ड-गिनीज बुकमध्ये त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १० डिसेंबर २०१० ला १० वाजून १० मिनिटांनी स्वतःच्या १० पुस्तकांचं प्रकाशन करणं. मृत्यूवरच्या कविता संग्रहाचं, स्मशानभूमीत प्रकाशन करणं. खुनाबद्दल जन्मठेप भोगून आलेल्या कैद्याला स्वतःच्या फार्महाऊसवर बोलावून आत्मकथन करवून घेणं...  अशा अनेक काहीशा विक्षिप्त वाटणाऱ्या कल्पना त्यांच्या मेंदूत सतत घोळत असतात !

 परवा बोलता बोलता मी त्यांना सहज डिवचत म्हटलं, एव्हढं सगळं करून मिळवायचं काय तुम्हाला?
एका क्षणात हुदलीकर तडफेने म्हणाले होते, " ह्यापुढचं ज्ञानपीठ माझ्या नावाचं असेल !"
त्यावेळच्या त्यांच्या चष्म्याआडच्या काळ्याशार डोळ्यातली चमक मला असह्य झाली होती.
नुसत्या आठवणीने आत्ताही अंगावर सर्रकन काटा आला.

anilbagul1968@gmail.com
   
   

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...