Friday 30 April 2021

कोरोना भातुकलीतला

 

bhatukali


खोलीतल्या अंधारी कोपऱ्यात पडले होते मी, पाय दुडपून. किती तास झाले असतील? मी विचार करू लागले. तास काय, कितीतरी दिवस झाले असतील ... कितीतरी वर्ष... बहुदा.

खोलीतला काळामिट्ट अंधार माझ्या मनांत गच्च दाटून आला होता. विचार करण्याची शक्ती गोठून गेली होती. जखमेवरचं रक्त गोठल्यागत.

खिडकीच्या पलीकडून sss आवाज येत होता. बहुधा १०८ क्रमांकाची अँब्युलन्स असावी ती. दर अर्ध्या तासाने येत असतो हा आवाज. भीतीने अंगावर शहारा आला. घाईघाईने मी खिडकीची काच ओढायला गेले. बंदच होती ती. तरीही आवाज आंत कसा येतो मग? मी माझ्यावरच चिडले. का, माझ्या मनांत घर करून बसलाय हा अँब्युलन्सचा आवाज? कसलीतरी गूढ अनामिक भीती तयार करणारा?

थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले

कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले

कुठून तरी स्वर कानावर आले sss

कोण बरं गात असेल?

शब्द तर ओळखीचे वाटतायंत!

अचानक गाणं थांबलं.

दोन मिनिटांनी परत सुरु झालं.

 स्वप्न पाखरांचा ठाव तुझ्या माझ्या अंगणात

कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात

 थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले

कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले

अरे हे तर माझ्या खूप आवडीचं गाणं. माझ्या खूप जवळचं. हे तर वादळवाट सिरियलचं टायटल सॉंग! मी पटदिशी भानावर येते. अरे हि तर माझ्या मोबाईलची कॉलर ट्यून!!

माझे मोबाईलकडे लक्ष जाते. बिचारा बेडच्या साईड टेबलवर पडून होता कधीचाच. मी सावकाश हात पुढे करते. किती जड आहे हा हँडसेट? आधीपासूनच आहे का असा जड? का आत्ताच मला जाणवतोय?  

मी कॉल घेते. माझ्या नवऱ्याचाच कॉल.

अगं मनिषा दरवाजा उघड ना. केंव्हाचा ठोठावतोय मी. चहा तयार आहे. थर्मास ठेवलाय बघ दाराजवळ.

मी भानावर येते. मनातले लाईट्स पेटतात पट्कन. सकाळपासूनच, तर आहे मी इथं. आमच्याच बेडरूममध्ये. होम क्वारंटाईन! पाचच तर तास झालेत. कसले किती दिवस? किती वर्ष? माझंच मला खिन्न हसू येतं. ह्या पाच तासांत तर माझ्या मनाने किती किती झोके घेतले. किती किती हिंदोळे अनुभवले. आपण इतका का निगेटिव्ह विचार केला?

माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा रिपोर्ट आला म्हणून? इतके काय घाबरतोय आपण? मृत्यूची दहशत दस्तक देत असल्यासारखे! आजूबाजूला घडणाऱ्या मृत्यूंच्या थैमानाचे तांडव मला जाणवतेय का? परावाचं ते ऑक्सिजन गळतीचं प्रकरण. चोवीस जण गेले म्हणतात त्यात. ‘रेमडेसिव्हर’ औषध मिळालं नाही म्हणून कित्येक जण हॉस्पिटल्सच्या बेडवर दम तोडतायत. हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणून कित्येकांची वणवण होतेय. तर बेड मिळालाय, रेमडेसिव्हर औषधही मिळालंय, पण ऑक्सिजन नाही मिळत म्हणून कित्येकांची तडफड होतेय.

पण ... पण मी का उजळणी करतेय ह्या सगळ्याची? मरणाचे सोहळे दाराशी असल्यागत. फक्त कोव्हीड टेस्टच तर पॉझिटिव्ह आलीय. बाकी सगळं तर,.. तिथल्या तिथेच तर आहे! आपला नवरा आहे आपल्या पाठीशी भक्कमपणे. नातेवाईक, शेजारी पाजारी आहेत जवळ. ते काही नाही आपल्याला असं हताश होता काम नये.   

मी सावकाश दरवाजा उघडते. स्टीलचा थर्मास दिसतोय.

अगं बाई हा थर्मास कुठून सापडला ह्यांना? सात वर्षांपूर्वी, घेतला होता आपण. काश्मिर टूरला गेलो होतो तेव्हा! बरा सापडला ह्यांना. तसे हे, काही काही म्हणून विसरत नाहीत. आतल्या आत सुखद आठवणींचं मोरपीस फिरतं.

मी पुरती भानावर आलीय का आता? हलकेच चहाचा कप भरते मी. अगं बाई, माझा आवडता कप ठेवलाय ह्यांनी. गोल्डन नक्षीची बॉर्डर असलेला, मिल्की व्हाईट! कधी कधी ना, कित्ती काळजी करतात माझी!! एरवी सतत चिडचिड सुरु असते, थोडं मनाविरुद्ध झालं की. काही कळत नाही बाई ह्यांचं.  

चहाचा कप घेऊन मी खिडकीपाशी येते. खिडकीचा पडदा हलकेच बाजूला करते.

सोसायटीच्या पार्किंग मध्ये किलबिलाट ऐकू येतोय. चहाच घुटका घेत घेत मी लक्ष देऊन ऐकू लागतेय.

''ए मीनल नेहमीची भातुकली नै काही! आपल्याला किनई, आज कोरोनाची भातुकली खेळायचीय!!'' सई

''अगं सई sss कोरोनाची भातुकली म्हणजे गं काय?'' मीनल

''अगं हे बघ ही गाथा, समजूया हिला कोरोना झालाय!'' सई

''चालेल मला कोरोना झाला तरी. आता काही होत नाही त्याने, डॉक्टरकाकांनी सांगितलेलं ऐकलं तर.'' गाथा   

''ए मग आपण तिला लांब ठेवुयात, माझ्या पप्पांना ठेवलं होतं तसं!'' सई

''हो हो गाथा ते काय असतं तसं होम कोरण्ट असणार.'' मीनल

''अगं सई त्याला होम क्वारंटाईन म्हणतात. माझ्या आईच्या तोंडून मी ऐकलंय गं.'' गाथा

''बरं बरं गाथा, तू ते होम क्वारंटाईन. तुझ्या बेडरूमपाशी आम्ही तुझं जेवण ठेवणार. तू कुण्णाला कुण्णाला शिवायचं नाही. कळलं का? नाहीतर कोरोना स्प्रेड होतो.'' मीनल

चहाचे घुटके घेत घेत मी दंग झाले होते त्यांच्या खेळण्यात. 

 इतक्यात अँब्युलन्सचा आवाज येतो. तिच ती! १०८ क्रमांकाची!! आवाज आता आणखी तीव्र होतोय. मी दचकतेय. घाबरतेय. आता अँब्युलन्स सोसायटीच्या गेटमधून आत येऊ लागलीय. कुणाकडे आली असावी अँब्युलन्स? नक्की कोण गेलं असेल? त्या 'बी विंग' मधल्या सुमनच्या सासूबाईं तर नाही? ना sss ही. गेल्याच आठवड्यात त्यांना ऍडमिट केलं होत. सिटी हॉस्पिटलला. आय सी यू मध्ये होत्या म्हणे त्या. त्या तर नसतील? अंगाला नुसता कंप सुटलाय. दरदरून घाम पण येतोय. अरे बापरे घशाला कोरड पण पडलीय. मला श्वास घ्यायला त्रास होतोय का? ऑक्सिमीटर कुठंय? पहिले ऑक्सिजन लेव्हल चेक करूयात. हं ठीक आहे.

माझ्या मनाचा खेळ सुरु झाला. हल्ली ना असंच होतं. मन चांगला विचार करतच नाही. मी तरी काय करणार? आजूबाजूला जे घडतंय, तेच तर आपलं मन टिपतं. टिपकागदासारखं!  ह्या टीव्हीवर, पेपरात ज्या बातम्या सततच्या येतायंत त्यांनीच तर पसरलीय ही सगळी निगेटिव्हिटी!!  हे हे सगळे टीव्ही चॅनेल्स बंद केले पाहिजेत. त्यापेक्षा आपणच नाही बघू, त्या बातम्या फितम्या.

मनात विचारांचे चक्र भिरभिरतंय? का आपल्याया गरगरतंय? छे पहिले मोकळा श्वास घेवूयात. अचानक मी भानावर येते, खालच्या पोरींच्या गलक्याने.

हे काय? त्या अँब्युलन्स मधून कोण उतरतंय?

''ए पुष्करची आज्जी आली, पुष्करची आज्जी आली.'' सई

''ए माझी आज्जी बरी झाली, माझी आज्जी बरी झाली.'' पुष्कर

''ए पुष्कर, तू हि ये आता आमच्यात खेळायला.'' गाथा

''ए पण सई, आता कोरोनाची भातुकली नाही खेळायची.'' मीनल

''मग काय खेळायचं?'' गाथा

''ए पण आता डॉक्टर डॉक्टर खेळुयात.'' मीनल 

''चालेल, आपण कोव्हीड सेंटर चालवूयात, माझी आज्जी ऍडमिट होती तसं.'' पुष्कर 

''ए अगं मी ऐकलंय कोव्हीड सेंटरमध्ये ऑक्सिजनचे बेड्स नसतात. आणि हॉस्पिटल्सना ऑक्सिजन सिलेंडर्स नाही मिळत. पुष्कर खरं आहे का?'' गाथा

''अगं पण ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स का लागतात? माझी सायन्सची टीचर सांगायची की झाडांमधून ऑक्सिजन मिळतो. मग आपण भरपूर झाडं लावली पाहिजेत, आपल्या सोसायटीच्या अंगणात.'' सई

''आपण त्यापेक्षा व्हॅक्सिनेशन सेंटर चालवूयात का? माझ्या डॅडनी आजच व्हॅक्सिनचं इंजेक्शन घेतलंय. ते म्हणत होते, सगळ्यांनी घेतलं तर कोरोना फिरोना जाईल कुठल्या कुठे पळून.'' मीनल

''त्या चायना फियनाला देऊ पाठवून!'' पुष्कर

सगळे खो खो हसतात, एकमेकांना टाळी देत.

खेळ त्या वेळापुरता संपतो. मुले पांगतात. आपापल्या घरी जातात. माझ्याही मनातले निगेटिव्ह विचार पांगलेले असतात. मी उत्साहाने माझ्या घरात परत येते. आता न्यू नॉर्मल व्हायचं. फ्रेश जगायचं. मी मनोमन ठरवते. उत्साहाने मी ह्यांना फोन करते.

''अहो व्हॅक्सिनसाठी पहिले तुमचा नंबर लावा आणि मी बरी झाले कि माझा पण. त्या कोरोनाला चायना फियनाला पाठवून द्यायचंय आपल्याला.''

anilbagul1968@gmail.com


Monday 26 April 2021

अंगेटी


 

angeeti

तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात, एक 'फिरदोस' असतेच असते. आणि बहुधा प्रत्येक फिरदोसच्या मनात देखील. आपल्या मनातली 'फिरदोस' नाही गवसली... तर देतो आपण सोडून तिला. अन कालांतराने विसरूनही जातो. राख होते आठवणींची त्या.

 

पण त्या फिरदोसच्या मनातल्या फिरदोसचं काय?

ती शोध घेतंच राहते. कारण तिच्या मनात, तोवर त्या शोधाची आग तयार झालेली असते.

तीच ही अंगेटी - विस्तव, जाळ, फायर वा शेकोटी

 

जगायचं कशासाठी? हे जितकं महत्वाचं, तितकंच तर महत्वाचं असतं, ते जगायचं कसं?

कविवर्य मंगेश पाडगावर तर छान सांगून गेलेत... 

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?

 

आपल्या ह्या कथेतल्या ‘फिरदोस’ला देखील कण्हत कण्हत जगायचं नाहीये. तिला आनंदात गाणं गात गात जगायचंय. हि फिरदोस राहतेय जम्मूतल्या कुठल्याश्या खेड्यात. एका मुस्लिम कुटुंबात. नवरा, सासरा आणि लहानग्या मुलीसह.

 

कथा घडतेय नव्वदीच्या दशकात. स्त्री स्वातंत्र्याचा डंका तितकासा जोरात वाजलेला नाहीये. आणि मुस्लिम कुटुंबातल्या स्त्रीचा बुरखा तर किंचितही बाजूला झालेला नाहीये. त्यात फिरदोसचा सासरा, मौलवी आणि गावच्या मशिदीच्या कमिटीचा मेम्बर. स्वाभाविकच पुराणमतवादी. स्त्री स्वातंत्र म्हणजे स्वैराचार ह्याची पक्की खूणगाठ बाळगणारा. त्यामुळे साधा टिव्ही देखील आणू देत नाहीये तो घरात.

 

तर नवरा त्याच्या अबूच्या शब्दाबाहेर जाण्याची जुर्रत नसलेला. साहजिकच फिरदोसची कुतरओढ होतेय. तिला आस लागली आहे, बाहेरच्या मोकळ्या आकाशाची. त्या आकाशात तिला मुक्त विहार करायचाय. तिच्या नवऱ्याला, हमीदला मात्र, तिचे हे विचार बालिश वाटत असतात.

 

अशातच घरी येतो शाहिद. हमीदचा जुना मित्र. पंजाब प्रांतात ठेकेदार असणारा. बऱ्यापैकी श्रीमंत शाहिद, थोडंफार जग पाहिलेला. त्यामुळे विचाराने परीपक्व. जीवन जगण्याची कला अवगत असलेला.

सुरवातीला फ़िरदोसला तो तितकासा आवडत नाही. विशेषतः तिला अर्धवस्त्र पाहिल्यावर त्याचं अंगचटीला येणं, ह्याचा तिला तिटकारा आलेला. त्याचे तिला सततचे येणारे फोन, तिला नकोसे वाटणारे. त्याला विरोध करता करता, तिला त्याच्या बरोबर फिरण्याची उर्मी होते. हि इच्छा वासनेचा लवलेश नसणारी. स्त्री स्वातंत्रतेच्या शोधातली. मुक्ततेचा मार्ग शोधू पाहणारी.

 

अखेर एकदाचा ती मनाचा हिय्या करते. ती त्याच्याबरोबर घराबाहेर पडते. त्याच्या गाडीतून फिरून येते. मोकळा श्वास घेते. मनमोकळं खळखळून हसून घेते.  एवढंच नाही तर त्याच्याबरोबर सिगारेटचा कश देखील अनुभवते. 

 

तिच्या वागण्यातला बदल हमीदने टिपलेला. अबूच्या दबावाखाली त्याची होणारी घुसमट. त्यातून त्याला आलेली असह्यता. हि त्याचीही एक बाजू. तो आत्महत्येचा प्रयत्न करू पाहतो. पण बायको-मुलीवर, संसारावर असणारं प्रेम त्याला ते करू देत नाही.

 

मग तो सरळ शाहिदकडे जातो. त्याच्या संसारातुन त्याने निघून जावं, असं शांतपणे शाहिदला विनवतो. परिपक्व शाहिद त्याला तसं वचन देतो. त्याप्रमाणे तो पंजाबला निघून जातो. पण हे का घडलं? ह्यावर विचार नक्की कर, असं जातांना आग्रहाने सांगून जातो.

 

आता हमीद फ़िरदोसबरोबर नव्याने संसार मांडू पाहतोय. तिला अधिकचा वेळ देऊ लागतोय. तिला हवी असणारी स्पेस देऊ पाहतोय.

 

आणि एके दिवशी त्याने बाजारात जाऊन टीव्ही खरेदी करून आणलाय, अबूच्या विरोधाला न जुमानता. ते पाहून फ़िरदोसच्या चेहऱ्यावर ख़ुशी आहे. तिची फिरदोस तिला आता गवसणार ह्याची तिला खात्री झालेली असते!

 

नव्वदीच्या दशकातली हि कथा, आजच्या प्रत्येक स्त्रीनं पडद्यावर अवश्य पहावी अशीच. अन प्रत्येक स्त्रीने का पाहावी? हे समजून घेण्यासाठी, प्रत्येक पुरुषाने देखील पाहावी अशीच. लेखक दिग्दर्शकाने कोणताही अभिनावेश न आणता अतिशय शांतपणे, सरळ धोपटपणे, सहजपणे, पण प्रवाहीपणे मांडलेली आहे.

 

मुस्लिम समाजातल्या सामाजिक आणि धार्मिक बंधनांमुळे स्त्रीच्या आयुष्याची होणारी घुसमट दाखवणारा हा चित्रपट. मुस्लिम समाजातल्या स्त्रीला आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्याचा मुक्त विचार मांडणारा. विशेष नमूद करण्याची बाब ही की, ह्याचे लेखक, दिग्दर्शक आणि काम करणारे बरेचसे कलाकार हे मुस्लिम धर्मिय आहेत. सर्व प्रमुख पात्रांची कामे यथायोग्य. 'फिरदोस', रितू राजपूत तर लाजवाब.  

जाता जाता थोडंसं:

सिनेमाच्या पोस्टरवरून आणि नावावरून अधीर होऊन, आज रात्रीच कोणी हा चित्रपट पाहणार असेल तर ... नंतर माझ्यावर खापर फोडू नका.

मी हि पोस्टर बघुनच शेमारूवर सिनेमा पहिला होता, खोटं का बोला.

 

anilbagul1968@gmail.com

#Shemaroome #angitheemoviereview  

Thursday 22 April 2021

अंकुर अरोरा मर्डर केस

 

#ankuraroramurdercasereview

‘’क्योकी आप भगवान नही है!’’

‘’आय एम गॉड! मौत के मुहं से निकाला मैने ऐसे हजारो लोगोंको, जिन्हें तुम्हारा भगवान अपने पास बुला रहा था. मुझ मे उतनीही शक्ती है, जितनी उनमे है. 

‘’क्योकीं उस गॉड की गलती कि वजह से हजारो मरीज बिमार होते है और मैं उन्हे ठीक करता हूं. फिर भी आप उसे गॉड कहते हो और मैं एक ब्लडी डॉक्टर?’’

‘’नही. आय एम गॉड! हा मै ही गॉड हू!!’’

 

डॉ आस्थाना, डॉ रिया ह्या इंटर्न डॉक्टरवर बरसत असतो. फिल्मच्या क्लायमॅक्स मधला हा प्रसंग! समरसरसून केलेला अभिनय आणि तितकीच खणखणीत संवादफेक! के के सिंगने खूप ताकदीने उभा केलाय डॉ. अस्थाना. आपल्या वैद्यकीय ज्ञानाने, डॉक्टरी कौशल्याने, प्रथितयश सर्जन म्हणून प्रसिद्ध झालेला पण अहंकार ठसठसून भरलेला डॉ. अस्थाना आपल्या समोर जिवंत उभा केलाय त्याने.

 

सिनेमाचा प्लॉट सांगायचा तर हि आहे एक छोटीशीच गोष्ट. आताचा एकूणच वैद्यकीय व्यवसाय ... हो व्यवसाय, हा नीतिमत्तेचा, साधनशुचितेचा बोळा करून मेडिकल वेस्टच्या डब्यात कसा भिरकावून देतोय हे सांगणारी. डॉक्टर होतांना घेतलेल्या शपथेचा, नोबल प्रोफेशनच्या मास्कच्या आतून कसा गळा घोटला जातोय, हे दाखवणारी. 

 

अंकुर अरोरा हा सात आठ वर्षाचा मुलगा. पोटदुखीच्या त्रासाने हैराण झालेला. त्याची आई त्याला घेऊन येते हॉस्पिटलमध्ये, तपासणीला. हे हॉस्पिटल - 'शेखावत हॉस्पिटल' ह्या शहरातलं नामांकित हॉस्पिटल. प्रसिद्ध सर्जन डॉ. अस्थाना ह्यांच्यामुळे नावारूपाला आलेलं.

 

तर ... अपेंडिक्सचं निदान होतं. तिसऱ्या दिवशी ऑपरेशन ठरतं. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होऊ शकत होतं, पण एक दिवसाचा चार्ज वाढवण्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट ते करत नाही. हॉस्पिटल मध्ये असलेल्या दुसऱ्या एका इंटर्न डॉक्टरला, डॉ रोमेशला ते खटकतं. डॉ. अस्थाना त्याला त्यापाठीमागचा व्यवहार शिकून घे, असा सल्ला देतात. इंटर्न करतांना नुसतं वैद्यकीय शिक्षणच घ्यायचं नसतं, तर हॉस्पिटल मॅनेजमेंटचा व्यवहारही शिकायचं असतो असं देखील बजावतात.

 

ऑपरेशनच्या दिवशी सकाळी अंकुर चार बिस्किटे खातो, भूक असह्य झाल्याने. हि गोष्ट ड्युटी नर्स, डॉ. अस्थानांच्या निदर्शनास आणून देते. हू sss म्हणून ते हि गोष्ट उडवून देतात. ऑपरेशन कॅन्सल होणार नाही आपण बिस्किटांचा भाग ऑपरेशन करायच्या आधी काढून घेऊ असं बेफिकिरीने सांगतात. पण नेमकं हेच करायला ते विसरतात. ऑपरेशननंतर कॉम्प्लिकेशन होतात.  पेशंटला ऑक्सिजनची गरज भासते.  अंकुर कोमात जातो. दुसऱ्या दिवशी त्याचा जीव हि जातो.   

 

इंटर्न डॉ. रोमेशला हे पटत नाही. तो डॉ अस्थाना ह्यांना आपली चूक कबुल करण्याविषयी सांगतो. डॉ अस्थाना ह्यांच्या अहंकाराला ठेस पोहचते. डॉ. रोमेश इंटर्नशिप अर्धवट सोडून हॉस्पिटल मधून बाहेर पडतो.

 

तो येतो तडक अंकुरच्या आईच्या घरी. वस्तुस्थिती कथन करतो. मग उभा राहतो संघर्ष. न्याय मिळवण्यासाठीचा, त्यांनी दिलेल्या लढ्यातून. हि लढाई कायदेशीर. त्यात वकील महिला त्यांच्या साथीला. समदुःखी असणारी. पुत्रविरहाच्या वेदनांनी होरपळलेली. इथं अंकुरच्या आईचा - नंदिताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. टिस्का चोप्रानं, ह्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय.

 

शेवटी होतो सत्याचा विजय! डॉ अस्थानाचा अहंकाराचा फुगा, कोर्टाच्या निकालपत्राने टाचणी लावल्यासारखा टचकन फुटतो.

 

डॉक्टरांच्या रुपात देव बघण्याचे ते दिवस. डॉक्टरी पेशा एक नोबल प्रोफेशन असण्याचे ते दिवस. त्यामुळेच कदाचित, २०१३ साली रिलीज झालेली, 'अंकुर अरोरा मर्डर केस', हि फिल्म, फारशी नावाजली गेली नाही. 

 

कदाचित विक्रम भट ह्याने चुकीच्या काळात हि पटकथा लिहिली. किंवा आजच्या काळात ती लिहायला हवी होती. कारण आज जर हि फिल्म रिलीज होती तर सुपर डुपर ब्लॉक बस्टर ठरती!!

 

विशेषतः आजच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील (काही अपवाद वगळता) हॉस्पिटल्स मॅनेजमेंट आणि डॉक्टर्सच्या निषेधार्य वर्तनानंतर तर नक्कीच!

 

मला तर आवडली बुवा ही फिल्म. यु ट्यूब वर आहे उपलब्ध. तुम्ही ही आवर्जून पहा आणि सांगा काय वाटतंय ते!

 

© अनिल सुमति बागुल, नाशिक

anilbagul1968@gmail.com


Friday 16 April 2021

कोवीड १९ हे पँडेमिक नसून प्लांडेमिक आहे


CONTAGION


 कोवीड १९ हे पँडेमिक नसून प्लांडेमिक आहे. जाणीवपूर्वक निर्माण केलेलं एक षडयंत्र.

'डॉक्टर्स फॉर इन्फॉर्मशन' ह्या जर्मनीतल्या मेडिकल डॉक्टर्सच्या जवळपास ५०० च्या वर संख्येच्या ग्रुपने असा दावा केला आहे.
स्पेनमधल्या ६०० च्या वर संख्येने असलेल्या एक डॉक्टर्सच्या ग्रुपने - 'डॉक्टर्स फॉर ट्रुथ'ने देखील अशाच प्रकारचा दावा केला आहे.
ते असा दावा करतात कि covid १९ हि बनावट महामारी असून राजकीय फायद्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.
अमेरिकेत सुद्धा असाच दावा करणारी एक डॉक्युमेंट्री बनवण्यात आलेली असून त्याला जवळपास २७००० डॉक्टर्सनी सहमती दर्शिवली आहे.
जर्मनी, स्पेन व अमेरिकेतली हि सगळी डॉक्टर्स मंडळी, कशाच्या आधारावर म्हणतायत, कि कोविड १९ हि एक बनावट महामारी आहे?
ते ज्या आधारावर हा दावा करतायत त्यातले हे प्रमुख मुद्दे, जे तुम्ही विचारपूर्वक वाचले पाहिजेत.

१. सिस्टम आणि मेथड टू मेजर - कोविड १९, ह्या नावाने एक पेटंट रजिस्टर करण्यात आलं होतं, ते ही २०१५ साली. डच गव्हर्नमेंटच्या मदतीने रिचर्ड रॉथचील्ड ह्यांनी हि नोंदणी केलेली आहे. आता दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा.

२. चार वर्षांनंतर निर्माण होणाऱ्या ह्या आजाराला मोजण्याचं पेटंट चार वर्ष आधीच, १३ ऑक्टोबर २०१५ ला नोंदलं गेलं आहे.

३. २०१७ आणि २०१८ ह्या दोन वर्षाच्या काळात ह्या पेटंटच्या आधारे बनवलेल्या लाखो टेस्ट किट जगभरात वितरित केल्या गेल्या.

४. वर्ल्ड ईंटेग्रेशन ट्रेंड सोल्युशनच्या वेबसाईटवर ह्याचा उल्लेख असल्याचे ५ सप्टेंबर २०२० ला कुणाच्या तरी निदर्शनास आले. त्याने हा डेटा सोशल मीडियावर टाकला. लगेचच तो व्हायरल देखील झाला. ६ सप्टेंबर २०२० ला ह्याची दखल घेऊन 'वर्ल्ड ईंटेग्रेशन ट्रेंड सोल्युशनने', 'कोव्हीड १९ टेस्ट किट', असा उल्लेख काढून टाकून, त्या जागी 'मेडिकल टेस्ट किट' असा व्हेग उल्लेख केला. हे व्यापाराच्या पद्धतीत चुकीचे मानले जाते. मेडिकल किट ह्या नावाने काहीच स्पेसिफिक असा बोध होत नाही.

५. ह्या शिताफीत एक गोष्ट राहून गेली, ती म्हणजे ह्या टेस्ट किट चा प्रॉडक्ट्स कोड नंबर. HS code 30015. हा कोड WHO (world health organization) आणि WCO (world customs organization) ह्यांनी बनवलेला आहे. त्या अनुसार हा प्रॉडक्ट्स कोड म्हणजे कोव्हीड १९ टेस्ट किट.

६. यूएस, युरोप, चीन आणि काही निवडक देशांनी ह्याच दरम्यान कोव्हीड १९ टेस्ट किट एक्स्पोर्ट करायला सुरवात केली. परत एकदा दीर्घ श्वास घ्या आणि लक्षात घ्या अजून कोव्हीड १९ ची जगाला ओळख सुद्धा झालेली नसताना त्या रोगावरील टेस्ट किट उत्पादित करून जगभरात विकले जाऊ लागले होते, दोन वर्षे आधीच!

७. आणखी एक धक्कादायक बाब समोर आली, जी ह्या सर्वांवर कडी करणारी ठरली. वर्ल्ड बँकांच्या मते कोव्हीड १९ हा प्रि प्लॅन प्रोजेक्ट असून तो २ एप्रिल २०२० ला सुरु करण्यात आला आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याची तारीख नोंदवली गेलीय ३१ मार्च २०२५. !! आता बोला.

८. सुप्रसिद्ध अमेरिकन फिजिशियन ऍंथोनी फौची ह्यांनी २०१७ मध्ये एक धक्कादायक विधान केले होते. आणि दुर्दैवाने ते पुढे खरे देखील ठरले. काय म्हणाले होते ते? नीट वाचा.
''अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकीर्दीत एक आश्चर्यकारक उद्रेक होणार आहे!'' हा होता कोव्हीड १९ ह्या विषाणूने पसरवलेला कोरोना हा रोग!!

९. आता पाहुयात बिल आणि मेलिंडा गेट्स ह्यांच्या विधानांकडे! काय म्हणाले होते ते? २०१८ च्या सुमारास बिल गेट्स ह्यांचा असा दावा होता कि, 'जग एका महामारीच्या उंबरठ्यावर आहे, आणि पुढल्या दशकभरात ते शक्य आहे!' मेलिंडा गेट्सने त्याला अधिकची पुस्ती जोडली होती, ती अशी कि, 'जनुकीय तंत्रज्ञानाने बनवलेल्या व्हायरसमुळे हे घडणार आहे. '

१०. सर्वात धक्कादायक बाब घडली ती १८ ऑक्टोबर २०१८ ला. जॉन हॉपकिन फाउंडेशनला सोबत घेऊन, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने, ह्या दिवशी आयोजित केलेला 'इव्हेंट २०१' हे चर्चासत्र. पुढच्या दशकभरात जगाला एका 'पँडेमिक सिच्युएशनला' तोंड द्यावं लागणार असून त्यासाठी आपणाला सज्ज राहायला हवं. अशा भूमिकेतून हया चर्चासत्राचे आयोजन, न्युयार्क येथे करण्यात आले होते.

११. ह्या ‘इव्हेंट २०१’ नंतर बिल गेट्सने केलेलं एक ट्विट आश्चर्य निर्माण करत नाही तर ह्या सगळ्या प्रिप्लॅन्डला पुष्टी देणारं आहे. काय ट्विट होतं ते? ''पुढच्या वर्षातील जागतिक आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात आनंददायक काय असेल तर ते म्हणजे - लस!'

१२. वर उल्लेख केलेल्या ऍंथोनी फौची ह्यांनी वुहान मधल्या एका संशोधन लॅबला, 'वुहान व्हायॉलॉजी इन्स्टिटयूट'ला ४.५ मिलियन डॉलर डोनेट केले.

१३. फिल्म 'डेड प्लाग' सारख्या अनेक फिल्म्स या दरम्यान तयार होत होत्या ज्या पँडेमिक ह्या विषयावर होत्या.
१४.९ सप्टेंबर २०११ रोजी रिलीज झालेली फिल्म ‘CONTAGION’.
स्कॉट बर्न्सने लिहिलेली पटकथा, आजच्या कोरोना काळातील सर्व घटनांचं जणू रिप्लिका असावे असं वाट्त राहतं ही फिल्म पहातांना.

महत्वाची सूचना: कोरोना विषयी कोणतेही गैरसमज पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मी जे वाचलं (वेबसाईटवर), जे पाहिलं (फिल्म मध्ये) ते फक्त मी लिहलं आणि आपल्यासमोर मांडलं.
फिल्म ची लिंक :https://youtu.be/IEAfVDaf1hM

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...