Thursday 22 April 2021

अंकुर अरोरा मर्डर केस

 

#ankuraroramurdercasereview

‘’क्योकी आप भगवान नही है!’’

‘’आय एम गॉड! मौत के मुहं से निकाला मैने ऐसे हजारो लोगोंको, जिन्हें तुम्हारा भगवान अपने पास बुला रहा था. मुझ मे उतनीही शक्ती है, जितनी उनमे है. 

‘’क्योकीं उस गॉड की गलती कि वजह से हजारो मरीज बिमार होते है और मैं उन्हे ठीक करता हूं. फिर भी आप उसे गॉड कहते हो और मैं एक ब्लडी डॉक्टर?’’

‘’नही. आय एम गॉड! हा मै ही गॉड हू!!’’

 

डॉ आस्थाना, डॉ रिया ह्या इंटर्न डॉक्टरवर बरसत असतो. फिल्मच्या क्लायमॅक्स मधला हा प्रसंग! समरसरसून केलेला अभिनय आणि तितकीच खणखणीत संवादफेक! के के सिंगने खूप ताकदीने उभा केलाय डॉ. अस्थाना. आपल्या वैद्यकीय ज्ञानाने, डॉक्टरी कौशल्याने, प्रथितयश सर्जन म्हणून प्रसिद्ध झालेला पण अहंकार ठसठसून भरलेला डॉ. अस्थाना आपल्या समोर जिवंत उभा केलाय त्याने.

 

सिनेमाचा प्लॉट सांगायचा तर हि आहे एक छोटीशीच गोष्ट. आताचा एकूणच वैद्यकीय व्यवसाय ... हो व्यवसाय, हा नीतिमत्तेचा, साधनशुचितेचा बोळा करून मेडिकल वेस्टच्या डब्यात कसा भिरकावून देतोय हे सांगणारी. डॉक्टर होतांना घेतलेल्या शपथेचा, नोबल प्रोफेशनच्या मास्कच्या आतून कसा गळा घोटला जातोय, हे दाखवणारी. 

 

अंकुर अरोरा हा सात आठ वर्षाचा मुलगा. पोटदुखीच्या त्रासाने हैराण झालेला. त्याची आई त्याला घेऊन येते हॉस्पिटलमध्ये, तपासणीला. हे हॉस्पिटल - 'शेखावत हॉस्पिटल' ह्या शहरातलं नामांकित हॉस्पिटल. प्रसिद्ध सर्जन डॉ. अस्थाना ह्यांच्यामुळे नावारूपाला आलेलं.

 

तर ... अपेंडिक्सचं निदान होतं. तिसऱ्या दिवशी ऑपरेशन ठरतं. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होऊ शकत होतं, पण एक दिवसाचा चार्ज वाढवण्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट ते करत नाही. हॉस्पिटल मध्ये असलेल्या दुसऱ्या एका इंटर्न डॉक्टरला, डॉ रोमेशला ते खटकतं. डॉ. अस्थाना त्याला त्यापाठीमागचा व्यवहार शिकून घे, असा सल्ला देतात. इंटर्न करतांना नुसतं वैद्यकीय शिक्षणच घ्यायचं नसतं, तर हॉस्पिटल मॅनेजमेंटचा व्यवहारही शिकायचं असतो असं देखील बजावतात.

 

ऑपरेशनच्या दिवशी सकाळी अंकुर चार बिस्किटे खातो, भूक असह्य झाल्याने. हि गोष्ट ड्युटी नर्स, डॉ. अस्थानांच्या निदर्शनास आणून देते. हू sss म्हणून ते हि गोष्ट उडवून देतात. ऑपरेशन कॅन्सल होणार नाही आपण बिस्किटांचा भाग ऑपरेशन करायच्या आधी काढून घेऊ असं बेफिकिरीने सांगतात. पण नेमकं हेच करायला ते विसरतात. ऑपरेशननंतर कॉम्प्लिकेशन होतात.  पेशंटला ऑक्सिजनची गरज भासते.  अंकुर कोमात जातो. दुसऱ्या दिवशी त्याचा जीव हि जातो.   

 

इंटर्न डॉ. रोमेशला हे पटत नाही. तो डॉ अस्थाना ह्यांना आपली चूक कबुल करण्याविषयी सांगतो. डॉ अस्थाना ह्यांच्या अहंकाराला ठेस पोहचते. डॉ. रोमेश इंटर्नशिप अर्धवट सोडून हॉस्पिटल मधून बाहेर पडतो.

 

तो येतो तडक अंकुरच्या आईच्या घरी. वस्तुस्थिती कथन करतो. मग उभा राहतो संघर्ष. न्याय मिळवण्यासाठीचा, त्यांनी दिलेल्या लढ्यातून. हि लढाई कायदेशीर. त्यात वकील महिला त्यांच्या साथीला. समदुःखी असणारी. पुत्रविरहाच्या वेदनांनी होरपळलेली. इथं अंकुरच्या आईचा - नंदिताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. टिस्का चोप्रानं, ह्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय.

 

शेवटी होतो सत्याचा विजय! डॉ अस्थानाचा अहंकाराचा फुगा, कोर्टाच्या निकालपत्राने टाचणी लावल्यासारखा टचकन फुटतो.

 

डॉक्टरांच्या रुपात देव बघण्याचे ते दिवस. डॉक्टरी पेशा एक नोबल प्रोफेशन असण्याचे ते दिवस. त्यामुळेच कदाचित, २०१३ साली रिलीज झालेली, 'अंकुर अरोरा मर्डर केस', हि फिल्म, फारशी नावाजली गेली नाही. 

 

कदाचित विक्रम भट ह्याने चुकीच्या काळात हि पटकथा लिहिली. किंवा आजच्या काळात ती लिहायला हवी होती. कारण आज जर हि फिल्म रिलीज होती तर सुपर डुपर ब्लॉक बस्टर ठरती!!

 

विशेषतः आजच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील (काही अपवाद वगळता) हॉस्पिटल्स मॅनेजमेंट आणि डॉक्टर्सच्या निषेधार्य वर्तनानंतर तर नक्कीच!

 

मला तर आवडली बुवा ही फिल्म. यु ट्यूब वर आहे उपलब्ध. तुम्ही ही आवर्जून पहा आणि सांगा काय वाटतंय ते!

 

© अनिल सुमति बागुल, नाशिक

anilbagul1968@gmail.com


No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...