Monday 26 April 2021

अंगेटी


 

angeeti

तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात, एक 'फिरदोस' असतेच असते. आणि बहुधा प्रत्येक फिरदोसच्या मनात देखील. आपल्या मनातली 'फिरदोस' नाही गवसली... तर देतो आपण सोडून तिला. अन कालांतराने विसरूनही जातो. राख होते आठवणींची त्या.

 

पण त्या फिरदोसच्या मनातल्या फिरदोसचं काय?

ती शोध घेतंच राहते. कारण तिच्या मनात, तोवर त्या शोधाची आग तयार झालेली असते.

तीच ही अंगेटी - विस्तव, जाळ, फायर वा शेकोटी

 

जगायचं कशासाठी? हे जितकं महत्वाचं, तितकंच तर महत्वाचं असतं, ते जगायचं कसं?

कविवर्य मंगेश पाडगावर तर छान सांगून गेलेत... 

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?

 

आपल्या ह्या कथेतल्या ‘फिरदोस’ला देखील कण्हत कण्हत जगायचं नाहीये. तिला आनंदात गाणं गात गात जगायचंय. हि फिरदोस राहतेय जम्मूतल्या कुठल्याश्या खेड्यात. एका मुस्लिम कुटुंबात. नवरा, सासरा आणि लहानग्या मुलीसह.

 

कथा घडतेय नव्वदीच्या दशकात. स्त्री स्वातंत्र्याचा डंका तितकासा जोरात वाजलेला नाहीये. आणि मुस्लिम कुटुंबातल्या स्त्रीचा बुरखा तर किंचितही बाजूला झालेला नाहीये. त्यात फिरदोसचा सासरा, मौलवी आणि गावच्या मशिदीच्या कमिटीचा मेम्बर. स्वाभाविकच पुराणमतवादी. स्त्री स्वातंत्र म्हणजे स्वैराचार ह्याची पक्की खूणगाठ बाळगणारा. त्यामुळे साधा टिव्ही देखील आणू देत नाहीये तो घरात.

 

तर नवरा त्याच्या अबूच्या शब्दाबाहेर जाण्याची जुर्रत नसलेला. साहजिकच फिरदोसची कुतरओढ होतेय. तिला आस लागली आहे, बाहेरच्या मोकळ्या आकाशाची. त्या आकाशात तिला मुक्त विहार करायचाय. तिच्या नवऱ्याला, हमीदला मात्र, तिचे हे विचार बालिश वाटत असतात.

 

अशातच घरी येतो शाहिद. हमीदचा जुना मित्र. पंजाब प्रांतात ठेकेदार असणारा. बऱ्यापैकी श्रीमंत शाहिद, थोडंफार जग पाहिलेला. त्यामुळे विचाराने परीपक्व. जीवन जगण्याची कला अवगत असलेला.

सुरवातीला फ़िरदोसला तो तितकासा आवडत नाही. विशेषतः तिला अर्धवस्त्र पाहिल्यावर त्याचं अंगचटीला येणं, ह्याचा तिला तिटकारा आलेला. त्याचे तिला सततचे येणारे फोन, तिला नकोसे वाटणारे. त्याला विरोध करता करता, तिला त्याच्या बरोबर फिरण्याची उर्मी होते. हि इच्छा वासनेचा लवलेश नसणारी. स्त्री स्वातंत्रतेच्या शोधातली. मुक्ततेचा मार्ग शोधू पाहणारी.

 

अखेर एकदाचा ती मनाचा हिय्या करते. ती त्याच्याबरोबर घराबाहेर पडते. त्याच्या गाडीतून फिरून येते. मोकळा श्वास घेते. मनमोकळं खळखळून हसून घेते.  एवढंच नाही तर त्याच्याबरोबर सिगारेटचा कश देखील अनुभवते. 

 

तिच्या वागण्यातला बदल हमीदने टिपलेला. अबूच्या दबावाखाली त्याची होणारी घुसमट. त्यातून त्याला आलेली असह्यता. हि त्याचीही एक बाजू. तो आत्महत्येचा प्रयत्न करू पाहतो. पण बायको-मुलीवर, संसारावर असणारं प्रेम त्याला ते करू देत नाही.

 

मग तो सरळ शाहिदकडे जातो. त्याच्या संसारातुन त्याने निघून जावं, असं शांतपणे शाहिदला विनवतो. परिपक्व शाहिद त्याला तसं वचन देतो. त्याप्रमाणे तो पंजाबला निघून जातो. पण हे का घडलं? ह्यावर विचार नक्की कर, असं जातांना आग्रहाने सांगून जातो.

 

आता हमीद फ़िरदोसबरोबर नव्याने संसार मांडू पाहतोय. तिला अधिकचा वेळ देऊ लागतोय. तिला हवी असणारी स्पेस देऊ पाहतोय.

 

आणि एके दिवशी त्याने बाजारात जाऊन टीव्ही खरेदी करून आणलाय, अबूच्या विरोधाला न जुमानता. ते पाहून फ़िरदोसच्या चेहऱ्यावर ख़ुशी आहे. तिची फिरदोस तिला आता गवसणार ह्याची तिला खात्री झालेली असते!

 

नव्वदीच्या दशकातली हि कथा, आजच्या प्रत्येक स्त्रीनं पडद्यावर अवश्य पहावी अशीच. अन प्रत्येक स्त्रीने का पाहावी? हे समजून घेण्यासाठी, प्रत्येक पुरुषाने देखील पाहावी अशीच. लेखक दिग्दर्शकाने कोणताही अभिनावेश न आणता अतिशय शांतपणे, सरळ धोपटपणे, सहजपणे, पण प्रवाहीपणे मांडलेली आहे.

 

मुस्लिम समाजातल्या सामाजिक आणि धार्मिक बंधनांमुळे स्त्रीच्या आयुष्याची होणारी घुसमट दाखवणारा हा चित्रपट. मुस्लिम समाजातल्या स्त्रीला आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्याचा मुक्त विचार मांडणारा. विशेष नमूद करण्याची बाब ही की, ह्याचे लेखक, दिग्दर्शक आणि काम करणारे बरेचसे कलाकार हे मुस्लिम धर्मिय आहेत. सर्व प्रमुख पात्रांची कामे यथायोग्य. 'फिरदोस', रितू राजपूत तर लाजवाब.  

जाता जाता थोडंसं:

सिनेमाच्या पोस्टरवरून आणि नावावरून अधीर होऊन, आज रात्रीच कोणी हा चित्रपट पाहणार असेल तर ... नंतर माझ्यावर खापर फोडू नका.

मी हि पोस्टर बघुनच शेमारूवर सिनेमा पहिला होता, खोटं का बोला.

 

anilbagul1968@gmail.com

#Shemaroome #angitheemoviereview  

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...