Friday 30 April 2021

कोरोना भातुकलीतला

 

bhatukali


खोलीतल्या अंधारी कोपऱ्यात पडले होते मी, पाय दुडपून. किती तास झाले असतील? मी विचार करू लागले. तास काय, कितीतरी दिवस झाले असतील ... कितीतरी वर्ष... बहुदा.

खोलीतला काळामिट्ट अंधार माझ्या मनांत गच्च दाटून आला होता. विचार करण्याची शक्ती गोठून गेली होती. जखमेवरचं रक्त गोठल्यागत.

खिडकीच्या पलीकडून sss आवाज येत होता. बहुधा १०८ क्रमांकाची अँब्युलन्स असावी ती. दर अर्ध्या तासाने येत असतो हा आवाज. भीतीने अंगावर शहारा आला. घाईघाईने मी खिडकीची काच ओढायला गेले. बंदच होती ती. तरीही आवाज आंत कसा येतो मग? मी माझ्यावरच चिडले. का, माझ्या मनांत घर करून बसलाय हा अँब्युलन्सचा आवाज? कसलीतरी गूढ अनामिक भीती तयार करणारा?

थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले

कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले

कुठून तरी स्वर कानावर आले sss

कोण बरं गात असेल?

शब्द तर ओळखीचे वाटतायंत!

अचानक गाणं थांबलं.

दोन मिनिटांनी परत सुरु झालं.

 स्वप्न पाखरांचा ठाव तुझ्या माझ्या अंगणात

कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात

 थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले

कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले

अरे हे तर माझ्या खूप आवडीचं गाणं. माझ्या खूप जवळचं. हे तर वादळवाट सिरियलचं टायटल सॉंग! मी पटदिशी भानावर येते. अरे हि तर माझ्या मोबाईलची कॉलर ट्यून!!

माझे मोबाईलकडे लक्ष जाते. बिचारा बेडच्या साईड टेबलवर पडून होता कधीचाच. मी सावकाश हात पुढे करते. किती जड आहे हा हँडसेट? आधीपासूनच आहे का असा जड? का आत्ताच मला जाणवतोय?  

मी कॉल घेते. माझ्या नवऱ्याचाच कॉल.

अगं मनिषा दरवाजा उघड ना. केंव्हाचा ठोठावतोय मी. चहा तयार आहे. थर्मास ठेवलाय बघ दाराजवळ.

मी भानावर येते. मनातले लाईट्स पेटतात पट्कन. सकाळपासूनच, तर आहे मी इथं. आमच्याच बेडरूममध्ये. होम क्वारंटाईन! पाचच तर तास झालेत. कसले किती दिवस? किती वर्ष? माझंच मला खिन्न हसू येतं. ह्या पाच तासांत तर माझ्या मनाने किती किती झोके घेतले. किती किती हिंदोळे अनुभवले. आपण इतका का निगेटिव्ह विचार केला?

माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा रिपोर्ट आला म्हणून? इतके काय घाबरतोय आपण? मृत्यूची दहशत दस्तक देत असल्यासारखे! आजूबाजूला घडणाऱ्या मृत्यूंच्या थैमानाचे तांडव मला जाणवतेय का? परावाचं ते ऑक्सिजन गळतीचं प्रकरण. चोवीस जण गेले म्हणतात त्यात. ‘रेमडेसिव्हर’ औषध मिळालं नाही म्हणून कित्येक जण हॉस्पिटल्सच्या बेडवर दम तोडतायत. हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणून कित्येकांची वणवण होतेय. तर बेड मिळालाय, रेमडेसिव्हर औषधही मिळालंय, पण ऑक्सिजन नाही मिळत म्हणून कित्येकांची तडफड होतेय.

पण ... पण मी का उजळणी करतेय ह्या सगळ्याची? मरणाचे सोहळे दाराशी असल्यागत. फक्त कोव्हीड टेस्टच तर पॉझिटिव्ह आलीय. बाकी सगळं तर,.. तिथल्या तिथेच तर आहे! आपला नवरा आहे आपल्या पाठीशी भक्कमपणे. नातेवाईक, शेजारी पाजारी आहेत जवळ. ते काही नाही आपल्याला असं हताश होता काम नये.   

मी सावकाश दरवाजा उघडते. स्टीलचा थर्मास दिसतोय.

अगं बाई हा थर्मास कुठून सापडला ह्यांना? सात वर्षांपूर्वी, घेतला होता आपण. काश्मिर टूरला गेलो होतो तेव्हा! बरा सापडला ह्यांना. तसे हे, काही काही म्हणून विसरत नाहीत. आतल्या आत सुखद आठवणींचं मोरपीस फिरतं.

मी पुरती भानावर आलीय का आता? हलकेच चहाचा कप भरते मी. अगं बाई, माझा आवडता कप ठेवलाय ह्यांनी. गोल्डन नक्षीची बॉर्डर असलेला, मिल्की व्हाईट! कधी कधी ना, कित्ती काळजी करतात माझी!! एरवी सतत चिडचिड सुरु असते, थोडं मनाविरुद्ध झालं की. काही कळत नाही बाई ह्यांचं.  

चहाचा कप घेऊन मी खिडकीपाशी येते. खिडकीचा पडदा हलकेच बाजूला करते.

सोसायटीच्या पार्किंग मध्ये किलबिलाट ऐकू येतोय. चहाच घुटका घेत घेत मी लक्ष देऊन ऐकू लागतेय.

''ए मीनल नेहमीची भातुकली नै काही! आपल्याला किनई, आज कोरोनाची भातुकली खेळायचीय!!'' सई

''अगं सई sss कोरोनाची भातुकली म्हणजे गं काय?'' मीनल

''अगं हे बघ ही गाथा, समजूया हिला कोरोना झालाय!'' सई

''चालेल मला कोरोना झाला तरी. आता काही होत नाही त्याने, डॉक्टरकाकांनी सांगितलेलं ऐकलं तर.'' गाथा   

''ए मग आपण तिला लांब ठेवुयात, माझ्या पप्पांना ठेवलं होतं तसं!'' सई

''हो हो गाथा ते काय असतं तसं होम कोरण्ट असणार.'' मीनल

''अगं सई त्याला होम क्वारंटाईन म्हणतात. माझ्या आईच्या तोंडून मी ऐकलंय गं.'' गाथा

''बरं बरं गाथा, तू ते होम क्वारंटाईन. तुझ्या बेडरूमपाशी आम्ही तुझं जेवण ठेवणार. तू कुण्णाला कुण्णाला शिवायचं नाही. कळलं का? नाहीतर कोरोना स्प्रेड होतो.'' मीनल

चहाचे घुटके घेत घेत मी दंग झाले होते त्यांच्या खेळण्यात. 

 इतक्यात अँब्युलन्सचा आवाज येतो. तिच ती! १०८ क्रमांकाची!! आवाज आता आणखी तीव्र होतोय. मी दचकतेय. घाबरतेय. आता अँब्युलन्स सोसायटीच्या गेटमधून आत येऊ लागलीय. कुणाकडे आली असावी अँब्युलन्स? नक्की कोण गेलं असेल? त्या 'बी विंग' मधल्या सुमनच्या सासूबाईं तर नाही? ना sss ही. गेल्याच आठवड्यात त्यांना ऍडमिट केलं होत. सिटी हॉस्पिटलला. आय सी यू मध्ये होत्या म्हणे त्या. त्या तर नसतील? अंगाला नुसता कंप सुटलाय. दरदरून घाम पण येतोय. अरे बापरे घशाला कोरड पण पडलीय. मला श्वास घ्यायला त्रास होतोय का? ऑक्सिमीटर कुठंय? पहिले ऑक्सिजन लेव्हल चेक करूयात. हं ठीक आहे.

माझ्या मनाचा खेळ सुरु झाला. हल्ली ना असंच होतं. मन चांगला विचार करतच नाही. मी तरी काय करणार? आजूबाजूला जे घडतंय, तेच तर आपलं मन टिपतं. टिपकागदासारखं!  ह्या टीव्हीवर, पेपरात ज्या बातम्या सततच्या येतायंत त्यांनीच तर पसरलीय ही सगळी निगेटिव्हिटी!!  हे हे सगळे टीव्ही चॅनेल्स बंद केले पाहिजेत. त्यापेक्षा आपणच नाही बघू, त्या बातम्या फितम्या.

मनात विचारांचे चक्र भिरभिरतंय? का आपल्याया गरगरतंय? छे पहिले मोकळा श्वास घेवूयात. अचानक मी भानावर येते, खालच्या पोरींच्या गलक्याने.

हे काय? त्या अँब्युलन्स मधून कोण उतरतंय?

''ए पुष्करची आज्जी आली, पुष्करची आज्जी आली.'' सई

''ए माझी आज्जी बरी झाली, माझी आज्जी बरी झाली.'' पुष्कर

''ए पुष्कर, तू हि ये आता आमच्यात खेळायला.'' गाथा

''ए पण सई, आता कोरोनाची भातुकली नाही खेळायची.'' मीनल

''मग काय खेळायचं?'' गाथा

''ए पण आता डॉक्टर डॉक्टर खेळुयात.'' मीनल 

''चालेल, आपण कोव्हीड सेंटर चालवूयात, माझी आज्जी ऍडमिट होती तसं.'' पुष्कर 

''ए अगं मी ऐकलंय कोव्हीड सेंटरमध्ये ऑक्सिजनचे बेड्स नसतात. आणि हॉस्पिटल्सना ऑक्सिजन सिलेंडर्स नाही मिळत. पुष्कर खरं आहे का?'' गाथा

''अगं पण ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स का लागतात? माझी सायन्सची टीचर सांगायची की झाडांमधून ऑक्सिजन मिळतो. मग आपण भरपूर झाडं लावली पाहिजेत, आपल्या सोसायटीच्या अंगणात.'' सई

''आपण त्यापेक्षा व्हॅक्सिनेशन सेंटर चालवूयात का? माझ्या डॅडनी आजच व्हॅक्सिनचं इंजेक्शन घेतलंय. ते म्हणत होते, सगळ्यांनी घेतलं तर कोरोना फिरोना जाईल कुठल्या कुठे पळून.'' मीनल

''त्या चायना फियनाला देऊ पाठवून!'' पुष्कर

सगळे खो खो हसतात, एकमेकांना टाळी देत.

खेळ त्या वेळापुरता संपतो. मुले पांगतात. आपापल्या घरी जातात. माझ्याही मनातले निगेटिव्ह विचार पांगलेले असतात. मी उत्साहाने माझ्या घरात परत येते. आता न्यू नॉर्मल व्हायचं. फ्रेश जगायचं. मी मनोमन ठरवते. उत्साहाने मी ह्यांना फोन करते.

''अहो व्हॅक्सिनसाठी पहिले तुमचा नंबर लावा आणि मी बरी झाले कि माझा पण. त्या कोरोनाला चायना फियनाला पाठवून द्यायचंय आपल्याला.''

anilbagul1968@gmail.com


1 comment:

  1. वा! सुंदर लिहिलंय, चायना फियना मस्त

    ReplyDelete

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...