Tuesday 11 September 2018

देवभूमी केरळ, आणि केरळ मधला 'अंडरकरंट' !! (भाग एक)


पूर्वी म्हणजे गोऱ्या साहेबांचं राज्य असतांना, साहेबांना हिंदुस्तानातला उन्हाळा सहन होत नसे. म्हणून त्यांनी इथं उन्हाळ्यात देखिल थंड राहणारी ठिकाणं शोधली. तिथं सोयीसुविधा तयार केल्या. गोरा साहेब मग उन्हाळ्याच्या दिवसात तिथे जाऊन राहू लागला. आपला देश स्वतंत्र झाल्यावर,  गोऱ्यांची गरजेपोटी पडलेली हि प्रथा, आपण 'उन्हाळी पर्यटना'च्या नावे जपली. पर्यटन कंपन्यांमुळे  ही 'टूम ' चांगलीच  फोफावली. असो.


आम्ही देखिल नाशकातला प्रचंड उकाडा असह्य होऊन 'देवभूमी केरळ'ची सफर करून आलो. कोचीन, मुनार, कुमारकम, वरकला आणि तिरुअनंतपुरम असा सहा दिवसांचा दौरा होता, उत्तर केरळ ते दक्षिण केरळ ! मी माझी पत्नी मनिषा, मुलगा स्वराज आणि भाचा शंतनू असे प्रवासी
.



मुनार - टेकडीवरी चहाचे हिरवेगारमळे


मुनार म्हणजे केरळ मधील थंड हवेचं ठिकाण. समुद्रसपाटीपासून ५७०० मीटर वर. उंच उंच डोंगर, माथ्यावर हिरवा शालू लपेटल्यागत गर्द वनराईने नटलेले. मधूनच चहाचे मळे. भर उन्हाळ्यात १८ - २० डिग्री तापमान, कधी मधी पावसाच्या हलकेशा सरी ! मग ढगांचा पिंजलेला कापूस त्या डोंगर कड्यांवर खुळ्यागत रेंगाळलेला. सारं कसं शांत शांत .... घड्याळ्यातले काटे फिरवणारा, गडबड-गोंधळ अजिबात नाही. प्रदूषणाचा मागमूस नाही. निसर्गाच्या प्रसन्न पाऊलखुणा अवतीभवती. व्वा क्या बात है !!

दोन दिवसातल्या मुक्कामात भरभरून घेतला 'ऑक्सिजन' वर्षभराच्या भागदौडीला पुरेलसा ! सोबत चार-सहा फोटो, आठवणींच्या ठेव्याला लागतील म्हणूनसे !!

तिसऱ्या दिवशी सकाळी पोटभर न्याहारी करून निघालो 'कुमारकम'च्या दिशेने ... चार तासाचा मोटारीचा प्रवास.

हा प्रवास कमी अंतराचा , पण छोटया रस्त्यांमुळे जास्त वेळ घेणारा. रस्ते अरुंदच पण नेटके, साफ-स्वच्छ. मग आपण कंटाळत नाही इथं. रस्त्यावरची सगळीच वाहने जात राहतात शांतपणे, पोहोचायची कसलीच घाई नसल्यासारखी. कर्कश हॉर्न नाही, जीवघेणे ओव्हरटेक नाहीत. हा प्रवास आपल्याला आदिमाली, मथीरापिल्लै, कालुकडं, कालापुरा, पुत्थुपड्य, असा केरळच्या ग्राम्य भागातून, घेऊन जातो. मोटारीच्या काचेतून आपल्या डोळ्यांना दिसत राहतं, जुन्या कौलारू बंगलेवजा बैठ्या घरांचं दर्शन. घराच्या दर्शनी भागात रंगेबिरंगी फुलांची बाग, पोटच्या पोराच्या काळजीसारखी निगुतीने सांभाळलेली ! जुन्या कौलारू छताला गेरूचा हात दिलेला. घराला टुमदार गेट, त्यावर हौसेनी लावलेली छानशी पाटी.


हाउस बोट  - कुमारकम 


कुमारकम हा 'वेम्बनंद' ह्या प्रशस्त लेकच्या  ब्याकवॉटरचा भाग. इथं पूर्ण दिवसाचा मुक्काम हाऊसबोटमध्ये, इंद्रप्रस्थम नावं होतं तिचं. तर आमची ही इंद्रप्रस्थम अगदी लांबलचक, तीन बेडरूम्स, किचन -डायनींग. वरचा मजला खास दर्शनी ग्यालरी सारखा. चहा -कॉफी, नास्ता, दोन वेळेचं जेवण -खास केरळीयन पद्धतीचं. ताजे ताजे मासे मायंदाळ. दिमतीला गोपी नावाचा सेवक. तोडकं मोडकं इंग्रजी समजू-बोलू शकणारा.  त्याच बरोबर खानसामा, हाऊसबोटीचा चालक अन त्याचा जोडीदार अशी 'इंद्रप्रस्थम'ची आमची टीम. दिवसभर शांतशा पाण्यातून सैर. सोबतीला अनेकविध पक्षी जसे की खंड्या, वूडपेकर, घारी, आणि बदकं देखिल. जेवणं ,आटोपल्यावर गाण्याच्या भेंड्या आणि पत्ते.  रात्री चांदण्या मोजता मोजता झोप कधी लागली कळलीच नाही. सकाळी चहा घेऊन गोपी आला त्यावेळी जाग आलेली.


ब्लुवॉटर बीच रिसॉर्ट


आजचा चौथा दिवस.  'ब्लुवॉटर बीच रिसॉर्ट', वारकला बीच हा पुढचे दोन दिवस आमचा पत्ता असणार होता. नावात बीच असलं तरी इथे बीच नावालाच. खरा बीच इथून चार मैलावर. हा पण वॉटर मात्र अगदी ब्लु, नावाप्रमाणे निळंशार ! स्वच्छ !! मिनी गोवा समजलं जाणारा वारकाला बीच तसा हटकेच डेस्टिनेशन. खरी गर्दी फिरंग्यांची ! गोव्यातल्या गर्दीला कंटाळून शांतपणा शोधायला आलेली.


आजची केरळ मधली शेवटची रात्र थेट राजधानीत, तिरुअनंतपुरम मध्ये. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. इथली फिरण्याची सुरुवात देवदर्शनानं (?) करायची ठरली. प्रश्नचिन्ह कशासाठी ते माझ्या जवळच्याना माहीत असणार आहे. भर उन्हात अनवाणी चटके खात पोहचलो देवाच्या दारी. पण हाय रे कर्मा. देवाची विश्रांतीची वेळ ... दरवाजे त्यामुळे नव्हते उघडलेले ... 'देऊळबंद' अशीच स्थिती ! मग निघालो चौर्यांशी लक्ष योनीतील काही खास प्राण्यांना भेटायला ... प्राणी संग्रालयात. रंगीबेरंगी वेगवेगळ्या जातीचे पोपट, पांढरे मोर, काकाकुवा, हरणं, तरस, भेकरं, मगरी, ऐसपैस पाणघोडे, रानगवे आणि शेवटी बिबट्या, पांढरे वाघ, पट्टेरी राजबिंडे वाघवाघिण जोडी आणि जंगलाचा राजा - रुबाबदार सिंह. त्या पिंजऱ्यात कैद असणारा राजा नावाप्रमाणे वागलेला पाहिला. सेल्फीच्या वेडानी झपाटलेली काही कार्टी त्याच्या पिंजऱ्यापुढे हल्लागुल्ला करत फोटोसेशन करत होते. वैतागलेल्या त्या राजाने अशी काही गर्जना केली की ती कार्टी पाय घेउन फर्लांगभर पळाली.

सहावा दिवस. सकाळपासून निघायच्या तयारीची लगबग. स्विमिंग पुलातून मुलांचा पाय निघत नव्हता. मोठ्या मीनतवारीने बायकोने त्यांना बाहेर काढले. यावरून सावरून एकदाचे निघालो देवभूमी केरळ सोडून ... नाशिकच्या दिशेने !

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...