Tuesday 11 September 2018

चहावाला ...नाशिकचा





चहावाल्यावर लिहायचा हा दुसरा प्रसंग. मागे कोकणातल्या परशुराम घाटातल्या चहावाल्यावर लिहिलं. ह्यावेळचा चहावाला नाशिकचा.
चहावाला पंतप्रधान झाल्यामुळे असे घडते आहे असे वाटत असेल तर तो निव्वळ योगायोग बरं का !!२००७ च्या मार्चमध्ये कॉलेजने (#didtcampus) नवीन जागा घेतली. मी अर्थात साईट सुपरवायझरच्या भूमिकेत शिरलो. बांधकामाचा अर्धवट आराखडा तयार होता. बाकीची कामे पूर्ण करून घ्यायची होती.गवंडी, मेस्त्री, बिगारी आणि मी. जोडीला योगेश अर्थातच होता. पहिल्याच दिवशी दुपारी सवयी प्रमाणे चहा हवासा वाटत होता, योगेशने बरोबर जाणलं. आणि घेऊन आला एका चहावाल्याला. हाच तो चहावाला.




चहावाले - ठाकरे काका

‘’हे ठाकरे काका’’, योगेशने ओळख करून दिली. ही त्यांची पहिली भेट. पन्नाशीच्या आसपासचे ठाकरे काका मितभाषी, शांत स्वभावाचे. मग गेली अकरा वर्षे, जवळपास रोज काका भेटत राहिले. दिवसातून दोन वेळेस चहा पाजीत राहिले. कधीमधी व्हायच्या चार दोन गोष्टी, कधी आपुलकीची चौकशी. कधी त्यांच्या मुलाच्या प्रगती बददल बोलायचे. मुलगा सरकारी नोकरीत रुजू झाल्याचे एक दिवस पेढे दिले. एक दिवस नवीन घराचे वास्तुशांतीचे आमंत्रण ! बोलणं व्हायचं मोजकंच, पण आतून असायचं. अकरा वर्षांचा ऋणानुबंध काल परवा संपला ...‘’दत्ता सर’’ नामक सद्गृहस्थाने, कॉलेजला चक्क यंत्र भेट दिलं... चहा कॉफीचं.

चहाच यंत्र

ठाकरेकाकांचा चहा बंद करावा लागला आपसूकच. पण मनाला चुटपूट लागून राहिली होती. आज शेवटच्या बिलाचा चेक देतांना, केला मग छोटेखानी कौतुक समारंभ. ठाकरेकाकांनी जपलेल्या प्रेमाच्या ऋणानुबंधातून उतराई होण्याचा निष्फळ प्रयत्न.

ठाकरे काकांचा सत्कार 
टोकन ऑफ APRICIEASHAN


‘यंत्र, मानवाचा शत्रू की मित्र?’ असा निबंधाचा विषय असायचा शाळेत असतांना. त्यावेळच्या माझ्या भूमिकेत आता मात्र बदल झालायं ! ‘यंत्र’ वापरायचीच असतील माणसाऐवजी, तर चहावाल्याचा देखिल रोबोट बनवावा ! वाट्याला येणारं वियोगाचं दुखः तरी नको !!

anilbagul1968@gmail.com
       

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...