Wednesday 9 August 2017

मांजा …




का कुणास ठाऊक, पण मी सोडून सगळे त्याला 'मांजा' म्हणायचे. का ते मला अजुनही कोडंच आहे. तसं त्याचं शाळेतलं नाव संजय. माझ्यासाठी तो संजा. कदाचित त्याचाच झाला असावा, मांजा !

संजा, हा माझा खरं तर शेजारी. दोघांच्याही घराची एक भिंत सामायिक. इतका सख्खा शेजार ! पण ती भिंत म्हणचे आमच्या दोघांच्याही आर्थिक परिस्थितीने,  आमच्या दोनही कुटुंबात उभी केलेली दिवार.

संजा एकुलता एक, साहजिक लाडाकोडात वाढलेला. आम्ही चौघे भावंडं, जणू एकावर एक फ्री ! त्यामुळे कसले लाड आणि कसले कौतुक ! मी तसा लहानपणापासूनच थोडासा अबोल, थोडासा शामळू. लाडाकोडाने म्हणा का उपजत म्हणा, संजा वागायला तसा एकदम बिनधास्त, बेफिकीर. मला आठवतोय, तो प्रसंग

आम्ही सगळे दिवाळीच्या सुट्ट्यातल्या एके दिवशी पायी फिरायला निघाले होतो माथेरानला. चालता चालता टूम निघाली पिक्चरच्या सीनची ऍक्टिंग करून दाखवायची. एक एक जण करत होता. दिल्या झाला, पक्या झाला आणि आता पाळी होती संजाची. अचानक त्याने बिअरची बॉटल कुठूनशी काढली. तोंडाला लावून पिण्याची ऍक्टिंग करत त्याने 'शराबी' पिक्चरचा सीन करूनही  दाखवला. सीन संपल्यावर टाळ्या वाजवायच भान कुणातच नव्हतं. सगळे त्या बियरच्या बॉटलने अवाक झालेले !

तशा गावात संजाच्या ओळखी पाळखी भरपूर. सगळे का कोण जाणे त्याला दबकून असायचे. पुढच्याच वर्षी मी कॉलेज कुमार झालो, ते ही संजाच्याच कॉलेज मध्ये. माझ्या कॉलेजच्या पहिल्याच दिवशी संजा मला कॉलेज फिरवत होता. रुबाब तर असा होता जणू ते कॉलेज त्याचंच होतं. कॉलेजचा स्टाफ, प्राध्यापक, गेला बाजार तो कँटीनवाला सगळ्यांशी त्याची कोण सलगी. कॅन्टीन मध्ये त्याची उधारी चालायची म्हणतात. मला प्रश्न, संजा कॉलेजमध्ये कधीपासून यायला लागला, त्याच्या इतक्या ओळखी कधी झाल्या. मी अवाक होऊन तोंडात बोट घालायचं तेव्हढा बाकी होतो.

पुढे मी इंजिनिअरिंग केलं, त्याने रडत खडत कसंबसं बीकॉम केलं. मग मला काही काळ त्याची जिरवल्याचा फील आला होता. पण तो माझा भ्रम होता हे काही दिवसात सिद्ध झालं . झाल असं कि मी कुठल्याश्या छोट्या  कंपनीत रुजू झालो, तोच खबर आली संज्याने 'हाफकिन इन्स्टिट्यूट' जॉईन केल्याचीनंतर कुठल्याश्या बँकेत आणि मग एका इन्शुरन्स कंपनीचा जनरल मॅनेजर झालाइन्शुरन्स काढणं त्याच्या बोलबच्चन मुळे त्याला कधीच जड  झालं नसावं. शक्य असतं तर त्याने स्वर्गातल्या इंद्रालाही मेडिक्लेम पॉलिसी विकली असती.

संजाने पुढे पळून जाऊन लग्न केलं. साऊथ मधली हिरोईन होती म्हणतात. त्याबद्दल त्याला डी गॅंग कडून धमकी देखील आली होती म्हणे. खरं खोटं तोच जाणे ! त्याच सगळंच अतर्किक असायायचं म्हणा.

परवा वीस वर्षांनी अचानक त्याचा फोन आला, काय रे कसा आहेस? रविवारी माझ्या कंपनीचा दहावा वर्धापन दिन आहे. ‘ताजला कार्यक्रम आहे. मुख्यामंत्री येणार आहेत. तू पण नक्की ये !
मी पुंन्हा अवाक !!

'मांजा' नावाचा मराठी पिक्चर सुद्धा आलंय. मला शंका नाही, खात्री आहे; संजाचच काहीतरी असणार ...

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...