Tuesday 11 September 2018

अजिंक्यताऱ्याला जेव्हा, तेव्हाही जाग येत नाही ...













मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही नासूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना ? सांगा, सांगा ना आबासाहेब !

. संभाजी राजें मालिकेतील वाक्य मनाशी घोळवत मी त्या रात्री, त्या ऐतिहासिक क्षणी, इकडे झोपेच्या आधीन झालो.

इकडे नवरात्रीच्या नऊ रात्री सरल्या होत्या. . टा. बरहुकूम नमूद केलेले नऊ रंग दौलतीच्या सुवासिनींनी यथासांग साजरे करून झाले. उद्या दसरा अर्थात विजयादशमी ! हेमलंबी नाव सांवत्सरे अश्विन शुद्ध अमुक शके तमुक ....

सायंकाळी राजवाड्याच्या मुख्य चौकात प्रथेनुसार सोने लुटायचे अन ... सीमोल्लंघनाकरिता राजवाड्याबाहेर पडून कूच करायचे ...

पुढे नेमकें करायचे काय ?
हाच तिढा, अजिंक्यताऱ्याच्या दोन टोकांवरील, दोन राजवाड्यातील, प्रत्येकी एका शयनगृहातील, प्रत्येकी एका राजाला सोडवता येत नव्हता. विचारांची चक्रे चंदेरी चषकांच्या वाढत्या संख्येनुसार अधिक जोरांत फिरत होती. दसऱ्याच्या दिवशी सोनंही लुटलं गेलं पाहिजे. (बाजारभाव बत्तीस हजारांवर पोहोचल्याची खाजगी दालनांतून पक्की खबर होती.) अन सीमोल्लंघन ही झालं पाहिजे. यावर्षीही हातून काही घडलं नाही तर काही खरं नाही. रयतेची आणखी नाराजी आता परवडणार नाही.

दोघाही राजांनी चंदेरी चषक दाणकन खाली लाकडी मेजावर आदळला. स्वतःशीच पुटपुटले बस आता ठरलं  आणि ओरडले ...  चला आताच कूच करायचं ! दोघांचेही सेवक चपापले. त्यांनी भिंतीवरील घड्याळाकडे पाहून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. आजच सकाळी खुद्द थोरल्या बारामतीकर साहेबानी चावी देऊनही घड्याळ नेहमीप्रमाणेच बंद होते. मग त्यांनी चषकांच्या संख्येनुसार अंदाज बांधला. परिस्थितीचं 'गांभीर्य' एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होतं.

मग हाकारे दिले गेले, पुकारे झडले. निष्ठावंतांची जमवाजमव झाली. लाठ्या-काठ्या, सोडावॉटरच्या बाटल्या, हौकीस्टिक आदी शस्त्रे जमवण्यात आली. शेकडोंच्यावर समर्थक जमले. झिंदाबाद-मुर्दाबादच्या घोषणा झाल्या. एव्हाना खुद्द राजे शयनगृहाच्या बाहेर ताठ मानेने, दमदार पावले टाकीत आले. मग राजांच्या विजयाच्या घोषणा झाल्या. राजांनी हात उंचावला, बरं कारे .. हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे. आपल्याला तो पकडयायच हवा ! हवा का नाय ? सारे भरवल्यागत एकसुरात ओरडले, होय राजे होय !! अन बघता बघता धुराळा उडाला. 'टाटा सफारी' म्हणू नका. 'फॉर्च्युनर' म्हणू नका. ताफा निघाला. फौजा कूच करत्या झाल्या. प्रत्येक मावळ्याच्या डोक्यात एकच विचार, बहलोलखानास गर्दीस मिळवण्याविना राजांना तोंड दाखवायचं नाही.

इकडच्या वाड्यातील दृश्यांचं रिपीट टेलिकास्ट तिकडच्या वाड्यात देखील. मग काय तिकडचाही फौजफाटा निघाला.

सातारा शहराच्या दक्षिणेकडे, दिल्ली दरवाज्या जवळील 'टोल नाक्या'वर दोनही फौजा आपसांत भिडल्या. तुंबळ युद्ध सुरू झाले. गर्दीत कुणाचाच पायपोस कुणाला लागेना. अखेर दोनही फौजातींल दोन स्मार्ट मावळ्यांनी आपसांत मांडवली केली. टोलनाक्यावरील प्रत्येकी एक संगणक आणि एक खुर्ची आणि काही चिल्लर ताब्यात घेतली. (अर्थात रोकड दोघांच्याही जनधन खात्यात जमा होणार हे सुज्ञास सांगणे हवे काय?) मग दोघांनीही आपापल्या सेनेच्या विजयाच्या घोषणा दिल्या. फत्ते झाली. राजांची जीत झाली.
दोनही फौजा विजयी आवेशात अजिंक्यताऱ्याच्या दिशेने रवाना झाल्या. दोनही राजांनी ख़ुशी जाहीर केली.
सेवकांना, कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहाराची सोय करण्याचे फर्मान सोडले. मग दोघेही मोठ्या आनंदात शयनकक्षात निघून गेले.

इकडे त्याच ऐतिहासिक क्षणी झोपी गेलेल्या माझ्या स्वप्नात ... थोरल्या महाराजांच्या सुरतेवरील स्वारीचं रिपीट टेलिकास्ट सुरु होतं. महाराजांच्या  त्या पराक्रमाने भारावून मी त्यांना मुजरा घालणार इतक्यात ... मी जागा झालो, टीव्ही वरच्या ब्रेकिंग न्यूजने ...

काल रात्री साताऱ्याच्या टोलनाक्यावर दोन टोळक्यात राडा ! टोलनाक्याच्या ताब्यावरून, दोन राजे समर्थक आपसांत भिडले !!
खबर ऐकून अवघा महाराष्ट्र जणू धन्य धन्य होत होता अन ...
अजिंक्यताऱ्याला तेव्हाही जाग आलेली नव्हती.

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...