Tuesday 11 September 2018

'मुंबई' - आठवणीत तुंबलेली ! (भाग - दोन )



मुंबईला लोक मायानगरी म्हणतात. खरंच आहे ते. मी vjti म्हणजे माझ्या कॉलेज मध्ये कमी आणि ह्या मायानगरीतच जास्त रमायचो.
नेरळ सारख्या खेड्यातून आलेला मी कॉलेज कुमार तरुण, मुंबाबापुरीत हरवून गेलो नसतो तर नवलंच. त्यात मला लहानपणापासूनच चित्रपटांचं आकर्षण. नेरळला रस्त्यावर चित्रपट दाखवले जायचे त्या वेळी. थिएटर वगैरे नसायचे, आजकालचे multi flex वगैरे कोसो दूर.


मुंबईत दादर जवळपास, चित्रा, शारदा मंदिर, आणि प्लाझा ही थिएटर्स असायची. त्यात प्लाझा म्हणजे लै भारी. ३० -३५ रुपये तिकीट असायचं बाल्कनीचं. 
प्लाझात पिक्चर बघणं खूप भारी वाटायचं त्यावेळी. मला आठवतंय 'हिंमतवाला' चित्रपट लागला होता, प्लाझात. ब्लॅक मध्ये ७० रुपये देऊन पहिला होता.


'हिंमतवाला' खरा तर साऊथचा हिंदीत रिमेक केलेला. मेलोड्रॅमॅटिक, बटबटीत. असं आज वाटतंय. पण जाम आवडला होता त्यावेळी. जितेंद्र आणि श्रीदेवी ही सुपरहिट जोडी. जितेंद्रचे पांढरे शुभ्र कपडे आणि पांढरे शुभ्र बूट. आज अंगावर काटा येतो, पण एकदा तरी घालावा असं कायम वाटायचं त्यावेळी. पण आईशपथ आजपर्यंत डेरिंग झाली नाही कधी पांढरी शुभ्र प्यान्ट घालायची, पांढरे बूट ... छे .. छे .

त्यानंतर ह्याच जोडीचा तद्दन बाजारू - 'जस्टीस चौधरी आला होता'; किमान ७ वेळा पाहीला असेल.
ते हंडे - तपेल्यांचे सेट, एकूणच बटबटीत सजावट, त्यात श्रीदेवीचा पिवळ्या, पांढऱ्या तंग कपड्यातला ओलेता पेहराव, मती गुंग व्हायची. 

मग एकदा, एका सिनिअर बरोबर गेलो होतो 'मेट्रो थियेटर' ला कोणता तरी इंग्लिश मुव्हीला. adult होती ती. डोरकीपर घेतंच नव्हता. आयकार्ड दाखव वगैरे खूप उद्योग केले तेव्हा त्याने आत सोडलं होतं.

एकूणच चित्रपट बघणं हा उद्योग तेव्हापासूनचा. आज बघतो फक्त मराठी .. ते हि multiflex मधे. त्यावेळी आठवतंय ... कॉलेज डेजला हॉस्टेल रोड वर पडद्यावर 'कारवा' पहिला होता - ब्लॅक न व्हाईट !!
एकूणच त्यावेळच्या चित्रपट पाहण्याच्या आवडीने आज, एक वेगळीचं प्रगल्भ जाणीव दिली म्हणा आयुष्याला !!!

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...