हो! खरंच विचारतो आहे मी. तुम्हाला आयुष्याचा
कंटाळा आलाय का ? आर्थिक परिस्थितीने तुम्हाला जगणे नकोसे झाले
आहे ? किंवा काय किंवा काय ! मग नक्कीच तुम्ही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न किंवा किमान विचार तरी
करत असणार !!
मग तुम्ही थांबा आणि नक्की वाचा ... तुमच्यासाठीच तर लिहितो आहे ना.
झालं असं कि परवाच मी कोकणात गेलो होतो, कामानिमित्त. नाशिकहुन रत्नागिरीला जातांना साहजिकच लागतं बुवा चिपळूण. पण त्या आधी येतो, परशुराम घाट ! घाटातच आहे कि सवतसडा धबधबा. काय हे नाव ?
पण त्याच्याही आधी साधारण १ कि. मी. आधी, श्रीक्षेत्र परशुराम मंदिर फाटा येतो. आणि तिथेच आपला आजचा हिरो भेटू शकतो तुम्हाला. विश्वास जाधव नाव त्यांच. नावातच विश्वास ... असणारच कि स्वतःवर, नियतीवर आणि पोटच्या पोरांवर देखिल !!
काय करतो विश्वास तिथे ?
२० x १० ची टपरी चालवतो चहा नाश्त्याची. आणि हो उन्हाळ्यात माझं आवडीचं कोकम
सरबत सुद्धा. विश्वास शिकला किती हो ? जेमतेम सातवी नापास
...पण हुशारी बघा. व्यवसायासाठी जागा निवडलीय कोणती ? प्रसिद्ध
धबधबयाच्या जवळ... घाटातल्या वळणावर... जिथून खोल दरीतलं अद्भुत सौंदर्याचं दर्शन
... जगबुडी आणि वसिष्ठी नदीचा विलोभनीय संगम अगदी चित्रातल्यासारखा भासतो !
तर हा व्यवहार चतुर विश्वास गेली १७ वर्ष तिथे, न चुकता, न थकता, न कंटाळता करत आलाय व्यवसाय. ह्यात विशेष काय ? तुम्ही विचारलाच ना प्रश्न ?
सातवी नापास विश्वासचा मोठा मुलगा इंजिनीरिंग डिग्री, डिस्टिंगशन मध्ये मिळवून आज M. Tech. करतोय जर्मनीत ! आणि धाकटी मुलगी आहे M. B. B. S. च्या शेवटच्या वर्षाला ! गेली ना तोंडात बोटं !!
हे जेव्हा विश्वास मला अभिमानानं सांगत होता, त्यावेळी तो कर्तव्यपूर्तीच्या पट्टीत समाधानाच्या सुरात गात असावा असाच भास होत होता.
एका वडिलांना आपल्या मुलांच्या उत्कर्षापेक्षा अजून काय हवं असतं ? त्याच्या जिद्दीला माझा सलाम !
तेव्हा नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.
म्हणे आलाय जगण्याचा कंटाळा ...
anilbagul1968@gmail.com




No comments:
Post a Comment