Tuesday 22 January 2019

तुम्ही कधी निघणार अशा फेरफटक्याला ?


रविवारची आळसटलेली सकाळ असावी.
गोधडीत पहुडलेला देह असाच उबेला घट्ट धरून असावा.
बऱ्याच उशिराने अखेर मनानी तयारी दाखवावी, उगवलेल्या दिवसाला कवेत घ्यायला .
मग वाफळलेल्या कडक चहाचा मनासारखा आस्वाद घेऊन झालेला असावा.
अन न्याहारीला तर्रीदार झणझणीत मिसळ पेश व्हावी.
जिभेचे असे चोचले पुरवून हात धुतांना...
फुग्याला पिन टोचविच नां !
"आज रविवार आहे, आज मला कुठेतरी फिरवून आणच."
आठवडाभर मी घरातच आहे तू बिझी असतोस म्हणून.
खूप कंटाळलीय रे मी !
मातोश्रींचं म्हणणं वाजवी होतंच.
आता मला, माझा रविवारचा खास मूड, माझ्या 'होंडा सिटी'च्या डिक्कीत टाकावा लागणार तर...
आई कुठं जायचं तूच सांग, चॉईस तुझा.
चांदवडला जाऊ शकतो, रेणुका मातेचं मंदिर पहायला !
अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला 'रंगमहाल' पण आपण तिथे पाहू शकतो.
दुसरं ऑप्शन आहे सिन्नरचा.
इथं पाहता येईल बाराव्या शतकांतील गोंदेश्वर मंदिर, आणि गारगोटी संग्रहालय... दगडगोट्यांच.
रंगमहालाचं कसलं कौतुक मला मेलीला, आईने खास कोकणी सूर लावला होता तर.
इथं मला मेलीला डोळ्यांनी धड दिसत नाही अन रंगमहाल काय डोंबल बघायचं?
आणि तुझं म्हणशील तर खुप रंग उधळून झालेत की रे तुझे आजवर !
आता पन्नाशीत आजून काय उधळायचं, त्यापेक्षा दगडं बघाला जाऊ !!
मातोश्रीचा आदेश कोण डावलणार ?
अशावेळी सोबतीला कोण असावं?
विजय असला तर जास्त चांगलं.
त्याला फोन केला अन तो ही लगेच तयार झाला.
मग काय निघालो की !


























सिन्नरच्या अलीकडे माळेगाव 'MIDC' त आहे हे 'गारगोटी' संग्रहालय !
'MIDC'च्या प्लॉट मधे हे कसं काय?
असला शंकेखोर प्रश्न, पायातले बूट काढतानाचं डोक्यातून काढून टाकला.
प्रथमदर्शनीच 'भारतमाते'चं शिल्प मन मोहवणार !
डायनसोरची हाडं, कित्येक लाख वर्षापूर्वीचे हत्तीचे दात, पंधरा हजार वर्षापूर्वीचे लोह !!
लोणार सरोवराच्या निर्माणावेळाचे !!!
मग नऊ नवरत्ने, त्यांची उपरत्ने... सारी अद्भुत दुनिया !
'गारगोटी'... के. सी. पांडे ह्या अवलियाने जमवलेली ही अनमोल दगडांची दुनिया.
डोळे विस्फारणारी, अन अचंबित करणारी !
चालून चालून वृद्ध आईचं शरीर दमून गेलं होतं.
विजयनी सुचवलं मस्त चहा घेऊ आपण "वैशालीत".
इथे हा असा 'विजय' हुकमी वाटतो.
मग काय गरमा गरम चहानी ऊर्जा दिली हवीहवीशी.
निघालो मग 'गोंदेश्वर' जणू सर करायला.



सुमारे आठशे वर्षांपूर्वीची ही मंदिरं !
दख्खनी शैलीतली.
इतके वर्षे दुर्लीक्षित, पण आता गर्दीने व्यापलेली.
जणू 'प्री वेडिंग शूट'साठीच निर्मिती झाली की काय असं वाटावं.
गोन्देश्वरच्या विस्तीर्ण प्रांगणात सूर्य अस्ताला आलेला.
हलकेच कॅमेऱ्याने टिपला अन आईला विचारलं,
माते छान झालं ना सगळं ? निघायचं आता?
चला निघुयात. तसं तू चांगलं काहीतरी दाखवलं आहेस म्हणायचं !
तिच्या तृप्तीच्या सुरांनी, मीही सुखावलो.
एकुणात 'गब्बर खुस हुवा तो' !!
तुम्ही कधी निघणार अशा फेरफटक्याला ?

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...