Sunday 27 October 2019

डांगर, डुबुकवडे आणि डाळिंब्यांची उसळ




सैराट चित्रपटाने आंतरजातीय विवाहाचा मुद्दा, ऐरणीवर आणला. आंतरजातीय विवाह हा अधिकतर वेळेला वादाचाच मुद्दा असतो. बहुतेक वेळेला असे विवाह, हे पळून जाऊन झालेले असतात. त्यामुळे विरोध हे टोकाचे असतात. पण काही वेळेला असे विवाह ठरवून, दोन्ही बाजूच्या संमतीने, सहमतीने केले जातात. पुरोगामी महाराष्ट्रात हे प्रमाण तुलनेने अधिक असावे.

अशा लग्नानंतर मात्र चालीरीती, खान-पान पद्धती, भाषाशैली भिन्न असल्याने बरेचदा अनेक गमती जमती घडत असतात.

त्यातलीच एक गंमत ...


लग्न नुकतंच झालेलं. राजाराणीचा नवाकोरा संसार.
''संध्याकाळी जेवायला काय करू?''
सकाळी नवरा कंपनीत जातांना, दुपारच्या जेवणाचा डबा त्याच्या हातात देत बायकोने विचारले.
''चवळ्यांची आमटी, इंद्रायणी भात, कैरीचं लोणचं, उडदाचे पापड आणि डांगर!''
नवऱ्याने क्षणभर विचार करून उत्साहात कोकणी बेत सांगितला.

रात्री जेवायला बसतांना, आपल्या आवडीचा बेत म्हणून नवरा खुशीतच होता.
पानं वाढून झाली. त्याची नजर शोधू लागली.
''डांगर कुठंय?'' त्याचा प्रश्न.
''ही काय उजव्या हाताला डांगरची भाजी'', बायको समाजावणीच्या सुरात म्हणाली.
''अगं ही तर लाल भोपळ्याची भाजी आहे.'' नवरोबा.
''इथं नाशिकमधे ह्यालाच तर डांगर म्हणतात.'' बायको.
नवर्‍याचा साहजिकच वैतागून कपाळावर हात.
''अगं डांगर म्हणजे पापड लाटयायच्या आधी ज्या लाट्या बनवतात ना, त्याला कोकणात डांगर म्हणतात''. नवरोबाचा खुलासा.  
बायको मात्र खट्टू होते.


लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. जावईबापूंना सासरी आग्रहाचं निमंत्रण.
मोठ्या उत्साहात जावईबापू सपत्निक सासरी दाखल. लेक-जावई आले म्हणून सारं आनंदाचं वातावरण ! जेवणाला गोडा धोडाचं बनवलेलं. सासरेबुवांनी 'बुधा हलवाई'कडून श्रिखंड खास आणलेलं. मेहुण्यानं 'सोनाली दरबार'मधून खास 'मघई पान' आणून फ्रिजमधे काळजीने ठेवलेलं.
थोड्यावेळाने ताट वाढली जातात. जावईबापूंना आग्रहाने जेवायला बसविले जाते. 

पानात श्रीखंडाच्या वाटीबरोबरच अजूनही एक वाटी असते.
हे काय असावं जावईबापूंना प्रश्न पडलेला.
''जावईबापूं, श्रीखंडपुरी बरोबर डुबुकवडेही हाणा'. सासरेबुवांचा आग्रह सुरु होतो.
''डुबुकवडे आणखी वाढू का?'' सासूबाईंचा प्रश्न.
जावईबापू गप्प.
''वाढ गं, वाढ, त्यांना संकोच वाटत असेल, तू वाढ''. सासरेबुवा फर्मान सोडतात.
जावईबापूंच्या पानांत चार डुबुकवडे आणि दोन पळ्या आमटी वाढली जाते.
जावईबापू बायकोकडे पाहतात.
ह्यांना डुबुकवडे माहिती नसावेत, ते कसे खायचे ते कळत नसावं. हे पत्नीच्या लक्षात येतं.
ती जवळ जाऊन त्यांना समजावते.
माझं कसं डांगराच्यावेळी झालं होतं? तसं तुमचं डुबुकवड्यांचं झालंय.
फिट्टम फाट ! 

राजा राणीचा संसार, असा फिट्टम फाट करत फुलत असतो.
एके दिवशी, भल्या पहाटे नवरोबाचे मामा घरी येतात.
मामा थेट कोकणातून, दापोलीहून आलेले असतात.
हवा पाण्याच्या गप्पा होतात.
''सुनबाई, दुपारी जेवायला डाळिंब्यांची उसळ आणि तांदळाची भाकरी कर बरं!
बऱ्याच दिवसांपासून खाईन म्हणतो. आमच्या हिला आवडत नाही म्हणून माझ्या पानांत कधी येत नाही. मामांची फर्माईश.
नवरा कंपनीत अर्धा दिवसाची रजा घेणार असतो. पण अर्धा दिवस कामावर जाणं भाग असतं.
‘’येतांना किनई छानशी चार 'गणेश डाळींब' घेऊन या, मामांना मस्त उसळ खायचीय ना’’.बायको.

नवरोबा मान डोलावतो. हिला डाळिंब्यांची उसळ कशाची बनवतात, हे नक्की माहीत नसणार ! आता ही डाळींब सोलून त्याच्या दाण्यांची उसळ बनवणार. मामासमोर तिची फजिती होईल. नवर्‍याच्या डोक्यात फिट्टम फाट’, फिट्ट बसलेलं.
दुपारी, अर्ध्या दिवसाची रजा घेऊन, आठवणीनं चार 'गणेश डाळींब' घेऊन, नवरोबा येतो.
थोड्या वेळाने स्वयंपाक करून बायको पानं वाढते.
‘’वा शिरप्या नशिब काढलंस ! बायको सुगरण मिळाली हो !!
मस्त झालीय गं पोरी डाळिंब्यांची उसळ !!!’’ मामांची खुश होऊन कौतुकाची दाद.
फिट्टम फाट ! बायको नवर्‍याच्या कानात पुटपुटते.
‘’ऑन लाइन पार्सल मलाही मागवता येतं म्हटलं !!
मानेला झटके देत बायको लाडिकपणे विचारते, ‘’तुम्हाला देऊ डाळींब सोलून?’’.
तिच्या त्या गोडव्याने नवरोबा पार विरघळून गेलेला असतो.    

anilbagul1968@gmail.com



No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...