Sunday 27 October 2019

धोड्यांब्याच्या बेबी आत्याची छोटी





केवळ सहा नातेवाईक असणारा, पुण्यात भावाकडे राहून इंजिनीअर झालेला, कोकणस्थ नवरोबा. नाशकात नोकरी निमित्ताने आलेला, आंतरजातीय विवाह स्वतः ठरवून, करून मोकळा झालेला. पण बायकोच्या सख्या-चुलत नातेवाइकांनी आणि इथल्या खेडेगावच्या चित्र-विचित्र नावांनी पुरता भंजाळलेला.

आंतरजातीय विवाह केलेल्या, नवरा-बायकोच्या संसारातील आणखी एक गम्मत ....

मे महिन्यातली सायंकाळ. मस्त वारा सुटलेला. औरंगाबाद रोडवरच्या कुठल्याश्या मंगल कार्यालयाच्या हिरवळीवर, नवरोबा सपत्निक उभा. झकास लायटिंग. मराठी भावगीतांचा वाद्यवृंद मेंदीच्या पानावर. गायक – गायिका तळमळीने गातायत. अष्टविनायक चित्रपटातलं 'ते' गाणं.
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
पण गाण्यांकडे कुणाचंही लक्ष नाही. सारे गप्पा मारण्यात, विनोदावर हसण्यात, एकमेकांना टाळ्या देण्यात दंग.

खेडलेझुंगेच्या धाकट्या मावशीच्या मुलीचं लग्न. ‘’जवळचं लग्न आहे. आपल्याला जावच लागेल.’’ बायको. खेडलेझुंगे नावाचं गाव असतं, हेच माहीत नसलेल्या नवरोबाला धाकटी मावशी कुठून आठवणार? पण लग्न होऊन आता दोन वर्ष झालेली.

‘’तुम्हाला व्यवहारातलं कवडीचं कळत नाही’’, हे बायकोचं ठाम मत, एव्हाना त्याला पूर्णपणे पटलेलं. त्यामुळे बायको बरोबरची त्याची वरात नेहमीचीच ठरलेली. तशीच आजचीही.

गोरज मुहूर्तावरचं लग्न. पण पत्रिकेतला मुहूर्त नावालाच असल्यासारखा. नवरोबाला ह्याचं फारच नवल. कोकणात, पुण्यात लग्नाचा मुहूर्त म्हणजे, स्टॅं. टा. - स्टॅंडर्ड टाईम. भटजीबुवांची किती धांदल असायची.

‘’मुलीच्या मामांनी नवर्‍या मुलीला ताबडतोब घेऊन. मुहुर्त जवळ आलाय.’’ असा पुकारा असतो तिथे. 

इथं सारं निवांत. नवर्‍या मुलाची वरात यायला अजून किमान अर्धा तास लागेल, अशी माहिती बायकोनी दिलेली. आजूबाजूला तुडुंब गर्दी. नवरोबाच्या मनी आश्चर्य ! ह्यांचे एव्हढे नातेवाईक आहेत ?

कोकणात मामा आणि मामी. त्यांना मुलबाळ नाही. पुण्यात, सदाशिव पेठेत राहणारा मोठा भाऊ विवेक, त्याची बायको अंजली आणि त्यांची मुलगी वीणा. हे सोडले तर त्याला सहावा नातेवाईक नाही, बायको सोडून. इथं तर कुंभमेळाच भरलाय जणू.

इतक्यात एकजण त्यांच्या दिशेने येतो.
''हा विजय. माझ्या चुलत काकीचा - नंदा काकीचा धाकटा''.
‘’ही मंदाक्का. वडाळीभोईच्या ताई आज्जीची थोरली’’.
मग हा अमुक, अन ती तमुक असं करत, बायको डझनभर नातेवाईकांची ओळख करून देत रहाते.

''अय तायडे, ईठं पाय ना, माझी दे की दाजींशी ओळख करून.''
पांढर्‍याफेक धोतर टोपीतला, एक काळाकुट्ट इसम त्या दोघांच्या दिशेने उत्साहात येतो. त्यांच्या पाठोपाठ जाडगेली ठुसकीशी बाई पाय फरफटत येते. आल्यासरशी बायकोला घट्ट मिठी मारते. आसवांचा हुकमी मारा मग दोघांच्या डोळ्यातून सुरु होतो. नवरोबा हैराण. आजवर कधीही न पाहिलेली दोन माणसं त्याच्या समोर. यत्किंचितही ओळख नसणारी. त्यातला पुरुष, बायकोला तायडे तायडे म्हणतोय आणि बाई चक्क बायकोला जवळ घेऊन अश्रू ढाळतेय ! आसवांची गर्दी ओसरल्यावर बायको भानावर येते. पदरानं डोळे पुसल्यासारखे करत त्या दोघांची ओळख करून देते.

‘’हे दौलतअप्पा. माझे सख्खे-चुलत मामा. सुकेणेचे शांतारामतात्या नै का, त्यांचे हे आत्येभाऊ, पिंपळस रामाचे इथं असतात.’’

सुकेणे कुठे आहे? ह्या भूगोलात नवरोबा हरवलेले. त्यामुळे 'कुटुंब इतिहास ऑप्शन'ला टाकल्यागत. नवरोबाची ही गडबड, बायकोच्या लक्षात येते. 

‘’अरे सुकेणे म्हणजे कसबे सुकेणे. हिराबाईची धाकटी नै का दिलीय तिथं होळकरांना?’’
नवरोबाने समजल्यागत मुकाट मान हलविली. हे सख्खे-चुलत काय असतं? ह्यानं तो आधीच गोंधळलेला !

''अय तायडे, अगं हिची बी ओळख करून दे ना.’’ दौलतअप्पा.
‘’अय्या, राहिलच की !’’
‘’अगं हे माझे मिस्टर शिरीषराव.’’
‘’आणि हो, ही धोड्यांब्याच्या बेबीआत्याची छोटी !’’
नवरोबा आता पुरते गारद !!

anilbagul1968@gmail.com


-


No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...