Sunday 27 October 2019


टेक्नोसॅव्ही होतांना ...


नव्वदीच्या वा नंतरच्या काळात जन्मलेल्या पिढीचं मस्त चालू असतं, नवनवीन 'गॅझेट्स' हाताळणं. नवनवीन ऍप वापरणं, नवीन टेक्नॉलॉजिशी जमवून घेणं. इ- कॉमर्सचे व्यवहार सफाईने करणं. पेटीएम, पे-फोन, गुगल-पे, ओला, उबर, स्वीग्गी, अमेझॉन इ. साऱ्या ठिकाणी डिजिटल मनी अगदी 'इझ'मध्ये फिरवत असतात. नेट बँकिंग, ऑन लाईन बिल भरणे, मनी ट्रान्स्फर इ. बँकेच्या माध्यमातून होणारे व्यवहार म्हणजे त्यांच्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ !

आताची 'जनरेशन' जन्माला आल्यावर, पीसी, लॅपि, पीडी, किंडल असे सारे शब्द अंगाईगीतासारखे ऐकत असते. त्यांच्या आयांना म्हणा, कुठलं अंगाईगीत यायला. पण ह्याच साऱ्या गोष्टी, सत्तरीच्या, ऐशीच्या दशकात जन्मलेल्या पिढीच्या दृष्टीने 'टफ टास्क'. वयाच्या पंचविशीत पहिल्यांदा कोंपुटर पाहिलेला. तो ही भला मोठा डेस्कटॉप. त्यापूर्वी कधीच कॉम्पुटरशी संबंध आलेला नाही. त्यानंतर आला 'पेजर'. नवीन जनरेशनला हा प्रकार, बहुधा माहिती नसणार ! मग ते ते फ्लॅट स्क्रीन मॉनिटर, टीव्ही आले. पूर्वीचे साधे मोबाईल, 'नोकिया' कंपनीचे, ह्या जनरेशननी मात्र पहिल्यांदा हाताळले. त्याचा उपयोग फक्त कॉल करणे व स्वीकारणे इतकाच. रेंजची फारच बोंब असायची.

मग खूप वर्षांनी ते 'नोकिया' कंपनीचे हँडसेट जाऊन, आधुनिक 'अन्ड्रॉईड' तंत्रज्ञानाचे 'सॅमसंग' वगैरे कंपनीचे हँडसेट बाजारात आले. आणि नोकीया कंपनी हे नवीन तंत्रज्ञान वापरात नसल्याने इतर कंपन्यांच्या स्पर्धेत बरीच मागे पडली, मार्केटमध्ये आऊटडेटेड तंत्रज्ञान वापरल्याने. जगण्याच्या मार्केटमध्ये आऊटडेटेड होऊन गायब व्हायचं नसेल तर, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावेच लागेल. त्याला आपलंसं करावंच लागेल, टेक्नोसॅव्ही व्हावं लागेल, हाच ह्या जुन्या जनरेशन करता धडा.
 
पण हे टेक्नोसॅव्ही होतांना ... थोडं काळजीपूर्व, थोडं सावधपणे. सोशल अकाउंट हॅक होणं, बँकेच्या अकाउंट मधून पैसे काढून घेतले जाणं, असे प्रकार आजूबाजूला घडतांना आढळतात. मागच्यास ठेच, पुढचा शहाणा ह्या न्यायाने काही गोष्टीत सजग असणं खूप आवश्यक. 'डूज आणि डोन्ट डूज' ह्यातली नियमावली नेमकेपणाने 'फॉलो' करणे हा पहिला नियम! जस की आपला ई-मेल अकाउंटचा पासवर्ड कुणाशी शेअर न करणं. एटीएम पिन कुणालाही नं सांगणं. मोबाईल सेट वऱ अपरिचित ऍप डाउनलोड न करणं. इ. गोष्टी प्राथमिक गरजेच्या.

शेवटी एकचं सांगणं, टेक्नोसॅव्ही होतांना ...
सावध हरणी सावध गं
करील कुणीतरी पारध गं
हे आपणाला सर्वांना परिचित असलेलं गाणं लक्षात असू द्या, म्हणजे झालं.


-----अनिल सुमति बागुल
anilbagul1968@gmail.com


No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...