Wednesday 5 December 2018

ह्या तेहेत्तीस कोटी देवांचं करायचं तरी काय ?

''धिक गांडीव धिक तृणिर !''
धारातीर्थी पडलेल्या अभिमन्यूचं पार्थिव मांडीवर ठेऊन शोक करणारी पांचाली, अर्जुनाकडे पाहून गरजली होती.
हे अर्जुना, हे धनुर्धारी, तुझ्या निष्णात धनुर्धारी असण्याचा आणि तुझ्या त्या गांडीव धनुष्याचा उपयोग काय ? जो माझ्या पुत्राचे प्राण वाचवू शकला नाही.
चक्रव्युहा मध्ये फसलेल्या अभिमन्यूच्या वीरमरणानंतरचा प्रसंग याद यावा असाच प्रसंग काल-परवा घडला आहे. उत्तरप्रदेशातल्या 'बुलंदशहर' येथे.




कोणा एका शेतकऱ्याच्या शेतात गाईचं मुंडकं सापडल्याची बातमी हा हा म्हणतां साऱ्या शहरात पसरली.
खऱ्या -खोट्याची कोणतीही शहानिशा नं करतां तरुणांची माथी भडकावण्यात आली.
अशा शेकडो माथेफिरुंचा जमाव जमला. जमाव हिंसक झाला, त्याने जाळपोळ सुरु केली.
त्यांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवरच त्या जमावाने हल्ला चढवला.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह ह्यांच्यावर गोळ्या झाडून चक्क हत्या करण्यात आली. आणि...

आणि अचानक, एक हसता-खेळता संसार उजाड झाला.
ही बातमी पाहतांना पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंहच्या पत्नीचा शोक पाहतांना मला त्या पांचालीची सय आली.
हे सगळं महाभारत घडलं त्या गाईमुळे ! पोटात तेहेत्तीस कोटी देव असणाऱ्या !!
शरयू नदीकाठी जन्म घेणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या भूमीत हे असलं गलिच्छ रामायण घडावं ?
रामाला वनवासात धाडण्यास कारणीभूत मंथरेला, अन त्या प्रकांड पंडित रावणाला देखील चीड आणू शकणारी ही घटना !
गाय ही केवळ उपयुक्त पशु आहे, असं पोटतिडकीने सांगणाऱ्या प्रखर हिंदुत्ववादी वीर सावरकरांचं आपण कधी ऐकणार आहोत ?
आणि म्हणूनच मला प्रश्न पडलाय - ह्या तेहेत्तीस कोटी देवांचं करायचं तरी काय ?
तुम्हीच सांगा आता.

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...