Thursday 16 April 2020

सुखी संसाराचा मंत्र




तुमचं लग्न झालय? हो, मग हा लेख तुमच्यासाठीच.
काय म्हणता? तुमचं लग्न व्हायचय अजून? मग हा लेख तर तुमच्याचसाठी.
खानदेशी आहात? वर्‍हाडी? माणदेशी? मराठ्वाड्याकडचे? घाटावरचे की कोकणातले? तुम्ही कुठचेही असा, हा लेख खास तुमच्याचसाठीच !
असं काय करताय राव? ‘सुखी संसाराचा मंत्र’ सांगतोय की !!
सोळा आणे सत्य. चुकीचा ठरलो ना, तर सांगाल त्याच्या ढेंगे खालून जायची तयारी आहे आपली.
तर ऐका आणि तुम्हीच ठरवा.

शनिवारी रात्री, यथासांग ‘कार्यक्रम’ झालेला असल्याने, नवरोबा पलंगावर ‘सुशेगात’ होता. रविवारचे सकाळचे दहा झाल्याचे त्याच्या गावीही नव्हते. स्वैपाकघरात बायकोची लगीनघाई. पहाटे पाच वाजताच तिचे ‘मिशन ए पंगतभोजन’ सुरू झालेलं. त्यामुळे नवर्‍याचे अद्याप लोळत पडणं, तिला असह्य होत होतं. दर मिनिटागणिक तिच्या चिडचिडीला फोडणी मिळत होती. गॅसवर मटण रटरटत होतं, आणि तिच्या मनात संताप. ‘रश्या’ला शेवटची उकळी देऊन ती गॅस बंद करते आणि बेडरूमकडे मोर्चा वळवते.
‘’संसार सांभाळण्याचा ठेका जसा माझ्या एकटीचाच आहे. सण-वार, रीत-भात मीच पहायचे. पै-पाहुणे मीच जोडून ठेवायचे. तुम्ही मात्र खुशाल लोळत पडा.’’ बायको एका हाताने लाटणे फिरवत, तावातावाने बोलत होती. रणचंडिकेच्या अवतारातील तिच्या रूपात, जिभेवर मात्र सरस्वती खेळत होती.
आता नवरोबाची झोप, गोधडीच्या घडीतून अलगत कपाटात. घाईने तो बाथरूमचा आश्रय घेतो. शत्रूपक्षपासून बचाव करण्याकरीता, खंदकाचा आसरा घेतल्यागत. आजवरच्या अंनुभवातून बराच गनिमीकावा, नवरोबाने आत्मसात केलेला. शॉवरचं थंडगार पाणी त्याच्या डोक्यावर पडताच त्याच्या ‘डोस्क्यात’ प्रकाश पडतो. बायकोच्या ह्या अवतारामागच्या रहस्याचा, त्याला झटदीशी उलगडा होतो. आपली चूक त्याला उमगते. सपशेल माघार ! त्याचं धोरण ठरतं.
आजचा दिवस, बायकोच्या दृष्टीने खास होता. तिचा मावसभाऊ, बायका-मुलांसह दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित पाहुणा होता. भाऊ तिच्या हातच्या मटणाचा, फार चाहता होता. आणि अशा दिवशी नेमके आपण लोळत पडतो. आपल्यावर तर खास जबाबदारी होती, बाजारातून, ‘राणे डेअरीतून एक किलो आम्रखंड आणून द्यायची. ‘या खुदा, मै निकला गधा’, नवरोबा मनातल्या मनात, स्वतःला शिव्या घालतो. पैशाचं पाकीट, गाडीची किल्ली आणि कापडी पिशवी घेऊन सुमडीत कलटी मारतो.
त्याची ही नेहमीची खेळी, बायको चांगलीच ओळखून असते. तर तिकडे, ‘राणे डेअरी’तून आम्रखंड घेतल्यावरच, नवरोबा सुटकेचा निश्वास सोडतो. बायकोला खुश करण्यासाठी अजून काय करता येईल? तो विचार करतो आणि ‘मघई’ पान घेतो खास चांदीचा वर्ख लावलेलं.
इकडे घरी, बायकोच्या मावसभावाचं, त्याची बायको, मोठी मुलगी आणि धाकट्या मुलाचं आगमन झालेलं. बायको मोठ्या खुशीत त्यांचं स्वागत करते. ख्याली खुशाली होते. थोड्या वेळाने भाऊ नवरोबाची चौकशी करतो. मग काय बायकोची तक्रारीची ‘सीडी’ सुरू होते.
‘’मी आहे म्हणून हा संसार टिकून आहे. दुसरी कोणी असती ना, तर काही खरं नव्हतं.’’ अरे दादा तूच काही तरी समजावून सांग ह्यांना.’’
इतक्यात धापा टाकत नवरोबा हजर.
‘’सालेसाहेब आपले स्वागत असो.’’ आपल्यासाठीच खास आम्रखंड आणायला गेलो होतो. आपल्याच ताईच्या आज्ञेवरून ! आणि आपल्या ताईसाहेबांसाठी खास मघई पान. नवरोबा, मधाळ स्वरात बोलका पोपट होऊन जातो.

नवरोबाची ही ‘गेम चेंजर’ खेळी, ‘काफी असरदार’ साबीत होते. घरातलं वातावरण एकदम बदलून जातं. मावसभावाला नवरोबाच्या कौतुकाचं कोण भरतं येतं.
‘’काही म्हण पण ताई, तू नशिब काढलंस. किती करतात तुझ्यासाठी दाजी !’’
नवरोबा मिश्किल नजरेने बायकोकडे कटाक्ष टाकतो. नवर्‍याच्या झालेल्या अनपेक्षित कौतुकाने तिचा चेहरा पाहण्यासारखा होतो.

तेव्हा, संसार सुखाचा होणं फारसं अवघड नाही. फक्त मौनात केव्हा राहायचं आणि केव्हा बोलका पोपट व्हायचं हे समजायला हवं !
हाच तर आहे, सुखी संसाराचा मंत्र !!

anilbagul1968@gmail.com

लॉन्ग ड्राईव्ह



रविवारची रम्य सकाळ. हवेत गुलाबी थंडी. वातावरण अगदी प्रसन्न ताजे. तोच ताजेपणा बायकोच्या टवटवीत चेहेर्‍यावर. प्रेमगीताची प्रफुल्ल गुणगुण. मनापासून स्वैपाक चाललेला. लसणीचं लाल तिखट, करून झालेलं. बटाटे उकडून त्याचा कुस्कुरा करून, निगुतीने त्यात आलं-मिरचीचा ठेचा घालून बारीकसे गोळे करून ठेवलेले. नवऱ्याने न्याहारीची फर्माईश करण्याचीच फक्त वाट. अखेर नवरोबा तिला विचारतोच.
''अगं बायको, दे पटकन काहीतरी. खूप भूक लागलीय.''

नवरोबा मुडात असला की तो तिला 'अगं बायको' अशी हाक मारतो. बायको मनातल्या मनांत अधिक खुश होते. ती ख़ुशी तिच्या हालचालीत दिसू लागते. सफाईने ती पहिला घाणा काढते. लालसर पिवळे चार बटाटवडे प्लेट मध्ये येतात. सोबत लाल तिखटाची चटणी.
''घ्या तुमचे आवडीचे बटाटवडे. संडे स्पेशल.’’ बायको.
नवरोबाची कळी खुलते. बटाटवडे म्हणजे त्याचा जीव की प्राण. अधाशासारखे तो खात राहतो. सातवा वडा चेपल्यावर तो तृप्तीचा ढेकर देतो.
‘’व्वा ss बायकोबा मजा आला.‘’ नवरोबा.
तो खूपच रंगात आला की बायकोला हमखास ‘बायकोबा’ म्हणतो.

‘हीच ती वेळ.’ बायको मनात म्हणते.
‘’अहो, ऐका ना. वातावरण कित्ती छान आहे ना. असं वाटतय ना, कुठेतरी मस्त फिरायला जावं. ए शिरू, जावूयात लॉन्ग ड्राईव्हला?’’ बायको लाडीक आवाजात विचारते.
सात बटाटावड्यांच्या आस्वादाने, सुखाच्या सातव्या ‘आसमान’वर असलेला नवरोबा, लगेच मान डोलावतो.

जव्हार घाटाचा निसर्गरम्य परिसर. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ. मधूनच कुठे कुठे रानफुले डोकावतायत. कधी पांढरी कधी पिवळी. कुठे रंगीत तेरडा फुलून आलेला. दूर कुठे डोंगरावर, मोत्याच्या माळा मिरवल्यासारखा एखादा पाण्याचा ओघोळ. निसर्गाच्या ह्या अनुपम रूपाने मूड खुलत गेलेला.

‘’चांदण्यात फिरतांना माझा धरिलास हात’’... आशाचा मखमली स्वर ‘होंडा सिटी’त डेकवर ऐकू येऊ लागला. नवरा-बायकोच्या मनात दिवसा-उजेडी चांदण्यांनी प्रेमाची पखरण घालायला सुरवात केली. सुमन कल्याणपुरकर सुमधुर आवाजात गात होत्या. ‘’केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर हा’’... दोघ्यांच्याही मनात संसारसुखाच्या गोड आठवणींचा मोर थुई थुई नाचू लागला. मग कधी लता, कधी किशोर येऊन गाऊ लागले. जगजीत सिंह स्वतः आले. ‘होशवालोंको खबर क्या’… गझल पेश करून गेले. दोघेही त्यात दंगून गेले. मग आठवणींची मैफल रंगू लागली. एक एक रम्य आठवणी अलगद उलगडू लागल्या.

दोघांची झालेली पहिली भेट, त्याला आठवली. तिला, त्याने दिलेली पहिली भेट आठवली. मग साधेपणाने झालेले लग्न आठवले. जातीभिन्नतेमुळे नातेवाइकांनी फिरवलेली पाठ आठवली. मोजकेच, पण भक्कमपणे जवळ उभे राहिलेले स्नेही आठवले. कोकणात, त्याच्या गावी झालेला हनिमून दोघांना आठवला. पहिल्या रात्री वीज गेल्यावर, तिने हासडलेली शिवी आठवली. मग दोघेही मनमुराद हसले. त्यावेळी हसले होते अगदी तस्से. लग्नांनंतरचे, नव्या नवलाईचे दिवस आठवले. त्याने तिला, अपरिचित असलेलं कोकण दाखवलं. त्याने नंतर नाशिक पहिलं, अनुभवलं, आणि आपलंसही केलं. पुढे, स्वरालीच्या जन्माचा क्षण त्यांना आठवला. दोघांनाही भरून आलं. लाडाकोडात वाढलेली स्वराली, आता मोठी झालीय. तिच्या लग्नाचं आता बघायचय. विचाराने बायकोचे डोळे पाणावले. नवरोबाने हलक्या हातांनी बायकोला थोपटले. तिचे डोळे पुसले.

स्वरालीला कुठल्या जातीचा मुलगा पाहुयात? नवरोबाने तिला हलकेच प्रश्न केला. तिने त्याच्या चेहर्‍याकडे फक्त पहिलं. त्याने, तिच्या डोळ्यातलं वाचलं. जणू ती म्हणत होती, आपण पहिली होती का जात? सुखाने संसार करतोच आहोत ना? देवाने जन्माला घालताना, माणूस म्हणून घातले. तुम्ही, आम्ही, ह्या समाजाने, जाती-धर्माच्या, भेदाभेदाच्या भिंती उभ्या केल्या. त्या अमंगळ विचारांनी माणसामाणसात गट-तट पडले. उच्चनीचतेचे गंभीर कोडे तयार झाले. कधीही न उलगडणारे. आपण का अडकायचं त्यात?

आपल्याला फक्त, स्वरालीला समजून घेणारा, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा हवा. तिच्या संसाराचा प्रत्येक क्षण, सोहळा करणारा हवा. मग असुदे, कुठलीही त्याची जात !!

anilbagul1968@gmail.com

सोमवार पासून...


सोमवार पासून...


गोविंदनगरच्या ’चैत्र संतोष’ सोसायटीच्या आवारात बायको घामाघूम होत शिरते. पाठोपाठ नवरोबा. लिफ्ट बंद असल्याची ‘सुवार्ता’ सोसायटीचा वॉचमन तत्परतेने देतो. बायकोच्या चेहऱ्यावर लगोलग आठ्यांचं जाळं पसरतं. आता तीन मजले चढायचे. म्हणजे साठ पायऱ्या. सुखवस्तू झालेल्या बायकोला लिफ्टची सवय. व्यायाम, योगा, डायट, जॉगिंग आदी शब्द बायकोच्या शब्दकोषातून केव्हाच गायब झालेले. त्यामुळे वीस वर्षाच्या संसारानंतर संसारसुख देहावर व्यापून होतं. साठावी पायरी चढेतो तिची कोण फे फे उडालेली. हाश हूश करत, कपाळावरचा घाम पुसत ती सोफ्यावर फतकल मारते. तर रोजच्या जिने चढण्याच्या सवयीने नवरोबा अगदी आरामात तीन मजले चढून केव्हाच घरात आलेला.
‘’ह्या ''सोसायटीवाल्यांना कामं नकोत करायला. फुकटचे चेअरमन, सेक्रेटरी झालेत लेकाचे. आम्ही पैसे मोजतो मेंटेनन्सचे. चिंचोके नई काई !'' बायको भलतीच उखडली होती.
सावज आता शिकारीच्या टप्य्यात आलंय, नवरोबाने अचूक हेरलं.
''त्या सोसायटीवाल्याना दोष देते आहेस, पण स्वतःच्या देहाकडे पहा जरा. सगळीकडंनं, सुटली आहेस मैद्याच्या पोत्यासारखी ! चालण्याची सवय नाही राहिली, तीन जिने चढतांना फा फू होते आहे. चांगलं नाही लक्षण !!'' नवरोबाने अचूक बाण सोडून सावज जेरीस आणलं.
‘’माझ्याबरोबर रोज ‘आकाशवाणी’ शेजारच्या जॉगिंग ट्रॅकवर यायचं.’’
नवरोबाने दूसरा बाण सोडला. सावज आता पुरते गारद. मग संध्याकाळी दोघेही 'डिकॅथलॉन'मध्ये. दोन ट्रॅक सूट, एक स्पोर्ट शूज, टॉवेल, वॉटर बॉटलची उत्साहात खरेदी होते.

दुसर्‍या दिवशी, पहाटे नवरोबा तयार होतो, जॉगिंग ट्रॅकवर जाण्यासाठी. बायको मात्र आळसावून लोळत पडलेली. जॉगिंगला जाण तिच्या चांगलच जिवावर आलेलं.
‘’शिरू तू जा, माझं आणि माझ्या मैत्रिणीचं-स्मिताचं ठरलंय. आम्ही रोज संध्याकाळी जाणार आहोत.'' लाडीक आवाजात बायको.
संध्याकाळी बायको ट्रॅक सूट चढवून, स्पोर्ट शूज घालून ऐटीत लिफ्टने खाली येते. खाली स्मिता तिच्या होंडा सिटीत, गाणी ऐकत वाट बघत असते.
‘’ए रूपाली, ऐक ना, ‘इंद्रप्रस्थं हॉल’ मध्ये साड्यांचा सेल लागलाय, उद्याचाच दिवस आहे. आत्ता जाऊयात? '' स्मिता.
रूपालीला देखिल मोह आवरत नाही. ‘इंद्रप्रस्थं हॉल’मध्ये बायकांची तुडुंब गर्दी. गर्दीत शिरून दोघी चार चार साड्या खरेदी करतात. ‘कित्ती फायद्याचा झालाय सौदा’ अशा अविर्भावात दोघांची पावलं तिथल्या फूड स्टॉलकडे आपसूक वळतात. एक एक प्लेट रगडा पॅटीस, एक एक प्लेट पाणीपुरी हादडून होते. मग दोघींना आपण जॉगिंगला जाण्यासाठी निघालो होतो ह्याची जाणीव होते.
‘’ए, स्मिता, ऐक ना. तशी ही कुठल्याही कामाची सुरवात शनिवारी करूच नाही. उद्या रविवारच आहे. आपण सोमवार पासून जाऊयात जॉगिंगला’’. बायको.
‘’ हो हो नक्की जावुयात सोमवार पासून.’’ स्मिता.
सोमवारी सकाळीच नवरोबा ऑफिस टूरवर निघून जातो, आणि जॉगिंगची ‘टूम’ बोंबलते.

एके शनिवारी बायकोच्या घरी मैत्रीणिंची किटी पार्टी असते.
''अय्या लिना कसली बारीक झालीयस, करतेस काय?'' शलाका विचारते.
‘’ए लिना, सांग ना, सांग. सगळ्या जणी गलका करतात.’’
‘’अगं मी ना, कीनई ‘कीटो डाएट’ फॉलो करते. दहा दिवसात सहा किलो वजन उतरवलं.’’ लिना.
मग लिना, ‘कीटो डायट प्लान’ आणि त्याचे फायदे, सगळ्यांना समजावते. एव्हाना बायकोने सातवा गुलाबजाम मटकावलेला असतो.
‘’ए रूपाली, आपण ही फॉलो करायचं ‘कीटो डाएट’?’’ स्मिता.
‘’हो नक्की करुयात, सोमवार पासून.’’ इति बायको.
असे अनेक सोमवार येतात नी जातात. कधी ‘कीटो डाएट’, कधी ‘जि. एम’ डायट तर कधी ‘दिक्षित डायट’, असे अनेक फंडे मार्केटमध्ये हवा करून असतात.
असे अनेक सोमवार येतात नी जातात. कधी ‘झुंबा’, कधी ‘पिलाटे’ तर कधी ‘योगा’ ह्याची क्रेझ मार्केटमध्ये जोरात असते. पण रूपाली सारखच बहुतांशी लोकांचं पक्क ठरलेलं असतं.
सोमवार पासून ...

--- अनिल सुमति बागुल

येडा है पर मेरा है




''तुम्हाला व्यवहारातलं कवडीचं कळत नाही. केलेत ना लाखाचे बारा हजार ! तरी बरं, मी नेहमी तुमच्या कानी-कपाळी ओरडत असते, झटपट श्रीमंतीच्या मागे लागू नका.’’
'स्टॉपलॉस' हीट झाल्यासारखी अचानक बायको नवर्‍यावर सुटली होती. बायकोच्या आवाजात तीव्र चढ-उतार होत होता. शेअर्सच्या चढ-उतारीत लाख रुपये गमावून बसलेला नवरोबा, मुकाट ऐकून घेत होता.

त्यानंतर बरेच दिवस, नवरोबा गप्पं गप्पं असायचा घरी असला की. पण झटपट पैसे कमवण्याची त्याची 'खाज' त्याला फार काळ चूप ठेवेना. एके दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली 'ती' जाहिरात त्याने पाहिली. ’दोन वर्षात दामदुप्पट.' त्वरीत भेटा, श्रि. जिग्नेश ठक्कर - समृद्धी फायनान्स. नवरोबाचे डोळे लकाकतात. पन्नास हजार जर आपण गुंतवले तर दोन वर्षात लाख रुपये होतील. शेअर मार्केटमध्ये झालेला लॉस भरून काढता येईल. बायकोची बोलती बंद करण्याचा चांगला चान्स आहे, नवरोबा विचार करतो.

‘समृद्धी फायनान्स’च्या कार्यालयात नवरोबा भर दुपारी, रणरणत्या उन्हात पोहोचतो. दरवाज्यावरचा गुरखा, ‘सलाम शाब जी’ असं म्हणत, कमरेत झुकून त्याला कुर्निसात करतो. मग मोठ्या अदबीने काचेचा भला मोठा दरवाजा उघडून देतो. नवरोबाला इथंच जाम भारी वाटलेलं असतं. ‘एसी’ची थंडगार झुळूक त्याला भलतीच सुखावून जाते. तिथल्या पांढर्‍या शुभ्र गुबगुबीत सोफ्यावर तो विराजमान होतो.
‘’नमस्कार सर, मी मिस पारूल, मी आपली काय सेवा करू शकते?’’
रिसेप्शन काउंटरवरची तरुणी, मधाळ आवाजात नवरोबाला विचारते. अंगावरून मोरपीस फिरल्याचा त्याला भास होतो. तो तिला ’दोन वर्षात दामदुप्पट’ या जाहिरातीचं कात्रण दाखवतो. ती हसून मान डोलवते.

‘’या माझ्याबरोबर.’’ असं म्हणत मिस पारूल, नवरोबाला एका ऐसपैस आणि पॉश केबिनमध्ये घेऊन जाते. तिथे त्याची ओळख मायरा मॅडमशी करून देऊन निघून जाते.
‘’अगदी योग्य जागी आलात सर !, लोकं, शेअर मार्केटमध्ये लाखाचे बारा हजार करतात, पण आम्ही बारा हजाराचे लाख रुपये करतो. आमचे जिग्नेश सर फार एक्स्पर्ट आहेत शेअर मार्केट मधले. ही इज जिनियस जेम ! डोन्ट वरी मि. शिरीष, जस्ट इन्वेस्ट टेन लैखस अँड जस्ट फर्गेट ! आम्ही चेकने पैशे घेतो आणि चेकने परत देतो तेही डबल !! टोटल ट्रान्स्परन्सी !!! नवरोबाची अवस्था ‘हिप्नोटाइज’ झाल्यासारखी. आपसूक तो लाख रुपयाचा चेक, सही करून मायरा मॅडमकडे सोपवतो.

नवरोबा रात्रभर, पैसे दामदुप्पट झाल्याचे स्वप्न पाहत असतो. सकाळी मोठ्या उत्साहाने उठतो. चहा पिता पिता समोरचे दैनिक वाचायला घेतो. पेपरमधल्या हेड लाइनने तो जाम हादरून जातो. त्याचं अंग थरथरतं हीव भरल्यागत. त्याची ही अवस्था बायको मघापसून बघत असते. बायको त्याच्या जवळ येते. त्याच्या कपाळावर हात ठेवते. तिच्या हाताला चटका जाणवतो. नवरोबाला सटसटून ताप भरलेला असतो. ती त्याला जवळ घेताक्षणी तो स्फुंदून स्फुंदून रडायला लागतो. बराच वेळ ती त्याला रडू देते अन थोड्या वेळाने कारण विचारते. नवरोबा रडता रडता तो पेपर पुढे करतो आणि बोटाने ‘ती’ बातमी दाखवतो.
‘समृद्धी फायनान्स’ कार्यालयाला टाळे, संचालक फरार. हजारो लोकांचे गुंतवलेले कोट्यवधी रुपये बुडाले.
आता बायकोला उलगडा होतो. झटपट पैशाच्या मोहापाई, नवरोबाने पुन्हा ‘लाखाचे बारा हजार’ केले तर ! ती नवरोबाकडे रागाने पहाते. त्याच्या भोळ्या भाबड्या चेहेर्‍यावर अपराधी भाव पसरलेला, आणि डोळ्यांत मूर्तीमंत कारुण्य !! तिला भडभडून येतं. अचानक तिला ‘कुरकुरे’ची जाहिरात आणि त्याची टॅगलाईन आठवते, ‘’तेढा है पर मेरा है.’’

ती नवरोबाला आणखी जवळ घेते आणि त्याच्या कानात पुटपुटते,’’ येडा है पर मेरा है !!’’

anilbagul1968@gmail.com

मन मनास उमगत नाही, आधार कुठे शोधावा



कुठून सुरवात करायची ह्या सुन्न मनाने?
अंतरा आणि मुखडा तर सर्वांनाच याद असतो गाण्याचा. जन्म आणि मृत्यु लक्षात असल्यासारखा. पण जगण्याच्या मधल्या ओळींचं काय? त्या तुम्ही कश्या म्हटल्या त्यावरच तर ठरतं, तुमच्या वन्समोअरचं.

पण मला पूर्ण खात्री आहे, आज जरी तुझं गाणं थांबलं असलं, तरी गाण्याचा आणि जगण्याचा वन्स मोअर तुला नक्की मिळणार आहे. जगण्याची तुझी मैफिल पूर्ण भरात आली असतांना, रसिकांचा रसभंग करण्याची इच्छा त्या नियतीला तरी कशी असणार?

काल परवाचीच तुझी पोस्ट, फेसबुकवरची. विचारत होतीस साऱ्या दोस्तांना, कोणते चॉकलेट्स आणू अमेरिकेतून तुमच्यासाठी? मी नकळत लिहून गेलो,त्या पैकी काही नको मला, तुझा आवाज देता आला तर बघ.आज माझं मन मलाच खातय. आवाज असा कुणी कुणाला देऊ शकतो का? किती हा माझा मूर्खपणा.

तुझा मखमली आवाज, हे नियतीने तुझ्या पदरात टाकलेलं अमूल्य दान होतं. माझ्या फाटक्या झोळीत ती भेट कशी मावणार होती?
जगण्यातली तुझी सळसळ, स्वतःला सिद्ध करण्याची प्रचंड उर्मी, अफाट परिश्रमाची तयारी, आणि झोकून देण्याची वृत्ती. ह्या साऱ्या गोष्टी कुठल्या कुठे घेऊन गेल्या तुला. तुझ्या मधुर आवाजाची गोडी, रसिक मनांत पाझरायला आताशा सुरवात झाली होती. मन धागा धागा म्हणत किती माणसं जोडलीस सहजपणे.

कितीकांची मने रिझवलीस तू मेंदीच्या पानावर गाऊन. पिंगा ग पोरी पिंगा गात कित्येक रसिकांना तुझ्या गाण्याभोवती पिंगा घालायला तू भाग पाडलस.
अशी जीवन गाण्याची मैफील ऐन भरात असतांना, तानपुऱ्याची तार तुटल्यासारखी तू अचानक, मैफिल सोडून का जावस?
बघ कुठून तरी दूरवरून तुझेच स्वर माझ्या कानात रुंजी घालतायत.
रात बाकी, बात बाकी, होना है क्या... हो जा ने दो!!

तुझी अखेरची पालखी निघतांना, तिचे भोई होतांना मी मात्र नकळत गुणगुणतोय....
मन मनास उमगत नाही
आधार कुठे शोधावा?

anilbagul1968@gmail.com

Saturday 9 November 2019

फॅशनची ऐशी की तैशी



‘सुशेगात’ सुरू असतो दोघांचा, अहं, स्वरालीच्या जन्मानंतर आता तिघांचा संसार. लग्नानंतर आपल्या बायकोला ‘मॉडर्न’, फॅशनेबल बनवायचंच, असं नवरोबाने केव्हाच ठरवलेलं. पण संसार सोईला लागता लागता, तब्बल बारा वर्षे उलटून गेलेली. ‘हीच ती वेळ’ असं नवरोबा आता ठरवतो. प्रथम सेट अप बॉक्स मध्ये ‘f’ चॅनेल सुरू करतो. ‘फेमिना’, ‘फिल्म फेयर’ मॅगझिन्स घेऊन येतो. शहरात कुठे एखादा ‘फॅशन शो’ असेल तर बायकोला घेऊन जातो. एकुणात तिच्यात ‘फॅशन सेन्स’ कसा तयार करता येईल, ह्यासाठीचा त्याचा आटापिटा सुरू असतो.

एखाद्या रविवारी, मग बायकोला घेऊन मॉलमध्ये खरेदीला जाणं ठरलेलं. तिच्यासाठी गॉगल्स, वेगवेगळ्या लिपस्टिक्स, नेल्पेंट्स, आर्टिफिशल ज्वेलरी, असं काही खरेदी, अगदी उत्साहात करणं आलच. एव्हढं करूनही बायको तिच्या भूमिकेवर ठाम. स्लीवलेस कपडे घालणं, जीन्स पॅंट घालणं म्हणजे तिच्या लेखी घोर पाप ! हाय हिल्स सँडल्स घातल्या की लोकं नावे ठेवतील हे तिचं मत.

आज आपण जोर लावून शेवटचा प्रयत्न करुयात, असं नवरा एके दिवशी ठरवतो. बायको आंघोळीला बाथरूममध्ये असते. बेडवर नेसायची साडी-ब्लाऊजची जोडी ठेवलेली असते. नवरा कातरीने ब्लाऊजचे हात कलम करून टाकतो आणि बायकोला जबरदस्तीने ते घालायला लावतो. मग ‘हाय हिल्स सँडल्स’ची जबरदस्ती. मग 'रॅम्प वॉक' करत नवरा बायकोची जोडी खरेदीसाठी मेन रोडवर ! हाय हिल्सची सवय नसल्याने बायकोची तारांबळ उडालेली. तर डार्क काळ्या रंगाच्या गॉगलमुळे समोरचे अंधुक दिसत असावे. एव्हढ्यात धपकन बायको रस्त्यावर आपटते. त्या दिवसापासून नवरोबाचा कानाला खडा ! 

एके दिवशी नवरोबाचा भाऊ विवेक त्याची पत्नी अंजली त्यांच्या घरी नाशिकला येणार असतात. नवरोबाला कोण आनंद होतो. उत्साहाने तो बायकोशी चर्चा करतो, ते आल्यावर काय काय करायचं त्याबद्दल. मग दुसर्‍या दिवशी सकाळी नवरोबाची लगबग सुरू होते. घाईघाईने तो आवरून तयार होतो. बायकोची मात्र अद्याप सकाळ झालेली नसते. नवरोबाची मनातून चिडचिड सुरू होते, मात्र तो चकार शब्द काढत नाही.

इतक्यात दरवाजाची बेल वाजते. नवरोबा दरवाजा उघडतो. भाऊ आणि वाहिनी उत्साहाने घरात शिरतात. नवरोबा चटकन एका बदलाची मनोमन नोंद घेतो. एरवी पुण्यात सदाशिवपेठीच्या घरात शिस्तीत राहणारे, वागणारे ते, इथं वेगळ्याच मूड मध्ये ! पेहरावापासून बोलण्यात एक वेगळाच सैलपणा. विवेक पानाफुलांच्या डिझाईन्स असलेल्या रंगेबेरंगी हाफ शर्टमध्ये. खाली चक्क बर्मुडा, तीही लाल भडक रंगाची. आणि वहिनीची तर आणखी कमाल, थ्रि–फोर्थ ग्रीन लेगिन्स आणि वर लेमन यलो कलरचा टॉप, हाल्टर नेकचा ! नवरोबा आश्चर्याने पाहू लागतो, बायको तर अवाक !!
‘’अरे शिरीष, दिवाळीत गोव्याला गेलो होतो, तिथूनच येतोय !’’
त्या दोघांचे असे चेहरे पाहून विवेक घाईघाईने खुलासा करतो.
‘’आणि वाहिनी, जेवण बनवायच्या भानगडीत पडू नकोस, आपण सुला वाईन्सला जावूयात, अंजलीला कधीची वायनरी पहायचीय !’’ इति विवेक.

हे सगळं बघून, ऐकून नवरोबा एका वेगळ्याच धुंदीत जातो. जीन्स–टीशर्ट घालून, वरुन छानसा सेंटचा फवारा उडवून, तयार होऊन बाहेर हॉलमध्ये येतो. भाऊ आणि वाहिनीसोबत गप्पा मारू लागतो. थोड्यावेळाने बायको बेडरूम मधून तयारी करून बाहेर येते. हिरव्या रंगाची काठपदरी सेमी सिल्क पैठणी, केसांचा अंबाडा, कपाळावर लालचुटुक चंद्रकोर. ‘हळदी कुंकुवा’ला निघल्यासारखी तिची ती तयारी पाहून नवरोबाची चरफड होते. बायको त्याच्याकडे पहाते, कशी दिसते आहे ते सांग ह्या अर्थाने. नवरोबा नाइलाजाने होकारार्थी मान हलवतो. पण ही ‘फॅशनची ऐशी की तैशी’ पाहून मनातल्या मनांत हासडतो, एक खास कोकणी शिवी!

anilbagul1968@gmail.com



Tuesday 5 November 2019

सुख म्हणजे नक्की काय असतं ?



बालाजी मंदिरात पोहोचेतो अंधार दाटून आला होता. पण घड्याळी काटा तर सायंकाळचे पाच वाजल्याचे सांगत होता. अचानक जोराचा वारा सुटला अन आभाळात वीजा चमकू लागल्या. झिम्माड पाऊस येणार हे सांगायला, कोणा ज्योतिष्याची आता गरज नव्हती. होतही तसंच ! थोड्या वेळानं पावसाचा जोर किंचित कमी होतो. मग दोघं कसबसं मंदीर गाठतात.

व्यंकट रमणा हर गोविंदा ! व्यंकट रमणा हर गोविंदा !! उजव्या हाताने धूप-आरतीचे तबक फिरवत, डाव्या हाताने सफाईने घंटा हलवत पुजारी बालाजीच्या नावाचा गजर करीत असतो. बाहेर धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे त्याला भान नसावे, इतका तो तल्लिन झालेला असतो. दर्शन घेऊन दोघही तिथं असणाऱ्या बोर्डाकडे वळतात.

दिवाळी निमित्ताने दहा दिवस वेगवेगळ्या पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या. कुंकुमार्चन, पुष्पांजली, फलार्पण वगैरे. शेवटच्या दिवशी काय? दोघही ते उत्सुकतेने पाहू लागले. मिष्टान्नार्पण...

नवरोबाने पुजाऱ्याला विचारले, हे कसं असतं?
‘’हजार लाडवांचा भोग बालाजीला अभिषेक म्हणून चढवायचा ! लाडू मात्र साजूक तुपातले हवेत !!’’ पुजारी उत्तरला.
त्याने पत्नीकडे पाहिले तर तिने मानेनेच नकार दर्शवला. मग दोघेही निघाले, तो विषय तिथेच सोडून.

पत्नीचा वाढदिवस जवळ आला होता. नवरोबा दरवर्षी तिला सरप्राईज गिफ्टदेत आला आहे. पण ह्या वर्षी कसं करायचं? त्याला काहीच सुचत नव्हतं. मित्र मंडळींना जमवून, छानशी पार्टी तर नेहमीचीच. पण ह्यावेळी काहीतरी वेगळं व्हावं, असं सारखं त्याला वाटत होतं.
    
अचानक नवरोबाला नितीनचा फोन येतो. नितिन सोनावणे एक एनजीओचालवतो. पेठसुरगाणा भागात, त्याची संस्था, आदिवासी लोकांकरिता काम करते. त्याच्याशी नवरोबाचं बोलणं होतं, सहज इकडचं-तिकडचं. फोन खाली ठेवल्यावर त्याला एकदम क्लिक होतं.  बायकोच्या वाढदिवशी, आपण जाऊयात का एखाद्या आदिवासी पाड्यावर? दुर्गम अशा भागात, जिथे सहसा मदत पोहचत नाही अशा ठिकाणी !

वा sss ही आयडिया, त्याची त्यालाच भारी आवडलेली असते. नितिनशी परत बोलणं होतं. हरसूलपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या वांदरपाडाइथं जा असं त्याचं सांगणं. तिथला माणूस जोडीला द्यायची व्यवस्था, तो करून देऊ शकत असतो.

चला, काहीतरी चांगलं आणि हटके करायाची संधी मिळाली होती. तो उत्साहाने कामाला लागतो. तो बायकोला ही कल्पना सांगतो. घरात वापरात नसलेले बरेच कपडे असतील, ते घेऊन जाऊ तिथे. बायको म्हणते, दिवाळीचा फराळ आणि काहीतरी गोडधोड घेऊन जावूयात. अनायासे दिवाळी आहे, सण साजरा करूयात त्यांच्यासोबत.

हरसूलला नितिनने सांगितलेला माणूस उत्तम बोरसेत्यांना भेटतो. त्याला जोडीला घेऊन ते निघतात. वांदरपाडाहरसूल पासून पाच किलोमीटर अंतरावर. पोहोचेतो दुपारचा एक वाजतो. ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच जाणवत असतो. पण दोघेही उत्साहात असतात. घामाघूम होत ते पाड्यावर पोहचतात. उत्तमच्या घरापाशी बाया-बापड्या, पोरासोरांची ही गर्दी !

बरोबरचे कपडे उत्तमच्या ताब्यात वाटपासाठी देतात. आणि खायचे फरळाचे जिन्नस, घाईघाईने बाहेर काढून वाटू लागतात. लहानगी लेकरं अगदी तुटून पडतात त्यावर. फार भुकेलेली असावीत. मग बायको केशरी रंगाचे बुंदीचे लाडू बाहेर काढते, छान साजूक तुपातले. त्या लाडवांची रास पाहून साऱ्यांचे डोळे विस्फारतात ! पटापट सगळ्यांना दोन दोन लाडू देतात. लाडवाच्या प्रत्येक घासागणिक त्या लहानग्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद द्विगुणित होतांना त्यांना जाणवतो. नवरोबा बायकोकडे पाहून विचारतो, कसं वाटतंय?

‘’बालाजीला मिष्टान्नार्पण... केल्यासारखं वाटतंय ! साजूक तुपातल्या लाडवांचा ह्याच्याहून काय वेगळा असतो अभिषेक !!’’ बायकोच्या चेहर्‍यावरचे समाधानाचे प्रसन्न भाव पाहून नवरोबा सुखावतो. वाढदिवस सत्कारणी लागल्याच्या आनंदात, मग बायकोही सुखाने नवरोबाचा हात हाती धरते.

anilbagul1968@gmail.com



वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...