Tuesday 22 January 2019

तुम्ही कधी निघणार अशा फेरफटक्याला ?


रविवारची आळसटलेली सकाळ असावी.
गोधडीत पहुडलेला देह असाच उबेला घट्ट धरून असावा.
बऱ्याच उशिराने अखेर मनानी तयारी दाखवावी, उगवलेल्या दिवसाला कवेत घ्यायला .
मग वाफळलेल्या कडक चहाचा मनासारखा आस्वाद घेऊन झालेला असावा.
अन न्याहारीला तर्रीदार झणझणीत मिसळ पेश व्हावी.
जिभेचे असे चोचले पुरवून हात धुतांना...
फुग्याला पिन टोचविच नां !
"आज रविवार आहे, आज मला कुठेतरी फिरवून आणच."
आठवडाभर मी घरातच आहे तू बिझी असतोस म्हणून.
खूप कंटाळलीय रे मी !
मातोश्रींचं म्हणणं वाजवी होतंच.
आता मला, माझा रविवारचा खास मूड, माझ्या 'होंडा सिटी'च्या डिक्कीत टाकावा लागणार तर...
आई कुठं जायचं तूच सांग, चॉईस तुझा.
चांदवडला जाऊ शकतो, रेणुका मातेचं मंदिर पहायला !
अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला 'रंगमहाल' पण आपण तिथे पाहू शकतो.
दुसरं ऑप्शन आहे सिन्नरचा.
इथं पाहता येईल बाराव्या शतकांतील गोंदेश्वर मंदिर, आणि गारगोटी संग्रहालय... दगडगोट्यांच.
रंगमहालाचं कसलं कौतुक मला मेलीला, आईने खास कोकणी सूर लावला होता तर.
इथं मला मेलीला डोळ्यांनी धड दिसत नाही अन रंगमहाल काय डोंबल बघायचं?
आणि तुझं म्हणशील तर खुप रंग उधळून झालेत की रे तुझे आजवर !
आता पन्नाशीत आजून काय उधळायचं, त्यापेक्षा दगडं बघाला जाऊ !!
मातोश्रीचा आदेश कोण डावलणार ?
अशावेळी सोबतीला कोण असावं?
विजय असला तर जास्त चांगलं.
त्याला फोन केला अन तो ही लगेच तयार झाला.
मग काय निघालो की !


























सिन्नरच्या अलीकडे माळेगाव 'MIDC' त आहे हे 'गारगोटी' संग्रहालय !
'MIDC'च्या प्लॉट मधे हे कसं काय?
असला शंकेखोर प्रश्न, पायातले बूट काढतानाचं डोक्यातून काढून टाकला.
प्रथमदर्शनीच 'भारतमाते'चं शिल्प मन मोहवणार !
डायनसोरची हाडं, कित्येक लाख वर्षापूर्वीचे हत्तीचे दात, पंधरा हजार वर्षापूर्वीचे लोह !!
लोणार सरोवराच्या निर्माणावेळाचे !!!
मग नऊ नवरत्ने, त्यांची उपरत्ने... सारी अद्भुत दुनिया !
'गारगोटी'... के. सी. पांडे ह्या अवलियाने जमवलेली ही अनमोल दगडांची दुनिया.
डोळे विस्फारणारी, अन अचंबित करणारी !
चालून चालून वृद्ध आईचं शरीर दमून गेलं होतं.
विजयनी सुचवलं मस्त चहा घेऊ आपण "वैशालीत".
इथे हा असा 'विजय' हुकमी वाटतो.
मग काय गरमा गरम चहानी ऊर्जा दिली हवीहवीशी.
निघालो मग 'गोंदेश्वर' जणू सर करायला.



सुमारे आठशे वर्षांपूर्वीची ही मंदिरं !
दख्खनी शैलीतली.
इतके वर्षे दुर्लीक्षित, पण आता गर्दीने व्यापलेली.
जणू 'प्री वेडिंग शूट'साठीच निर्मिती झाली की काय असं वाटावं.
गोन्देश्वरच्या विस्तीर्ण प्रांगणात सूर्य अस्ताला आलेला.
हलकेच कॅमेऱ्याने टिपला अन आईला विचारलं,
माते छान झालं ना सगळं ? निघायचं आता?
चला निघुयात. तसं तू चांगलं काहीतरी दाखवलं आहेस म्हणायचं !
तिच्या तृप्तीच्या सुरांनी, मीही सुखावलो.
एकुणात 'गब्बर खुस हुवा तो' !!
तुम्ही कधी निघणार अशा फेरफटक्याला ?

anilbagul1968@gmail.com

Friday 4 January 2019

जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है!

दिलबर... दिलबर...
गाडी निघाली होती नाशिकच्या दिशेने.
आणि वाजत होतं हे गाणं गाडीत !
जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है !
तोच तर अनुभव मनाच्या एका कोपऱ्यात गोळा करून निघालो होतो मी!!
तो माझा बालपणीचा काळ नव्याने ओतप्रोत अनुभवून तर झालं आज !!!
माझं घर, माझं गावं, माझे जिवाभावाचे मैतर, माझं आसपास, माझं भोवताल, सारं, सारं, नव्याने अनुभवून आज निघालो परतीला माझ्या कर्मभूमीकडे.
सासरी निघालेल्या माहेरवशीणीसारखं...
एका डोळ्यात समाधानाचे आसू अन एका डोळ्यात विरहाचे आसू .
माझं जुनं घर, 'स्वीट कॉटेज',पाडून तिथे चार मजली इमारत उभी पहिली. विस्थापित झाल्याचं फील जणू आला.
खरंच हा विकास असू शकतो? कित्येक मनांना, किती एक स्वप्नांना हे असं भकास करून??
कोकणातल्या त्या नाणार प्रकल्पातल्या माझ्या जीवलगांच्या उरातली सल जणू आज अनुभवली मी. 

ती नेरळ विद्या मंदिर शाळा, ते कुसुमेश्वर मंदिर, ती शितळादेवी, त्याबाजूचं ते विस्तीर्ण तळं, ती चक्री, ती मोटारटेकडी सारं सारं फिरलो.

पॅनोरमा पॉईंट आणि पेब किल्याचा तो प्रसिद्ध 'व्ही'ही कॅमेऱ्यात कैद केला. बटाटावडा खाण्यासाठी पार डिकसलला जाऊन आलो. 
जुन्या जीवलगांच्या संगतीने नवी शिदोरी बांधून घेतली. नव्या वर्षांला सामोरे जाण्यासाठी !
काय असेल नव्या वर्षात माझ्यासाठी?
सटविने काय लिहिलंय माझ्या भाळी...
हा पण... तिथल्या स्मशानभूमीत जाऊन दोन फोटो आणि एक सेल्फी पण काढला सेल्फीश होऊन. तिथला 'तो' बोर्ड वाचून शहारालोहीं किंचितसा !
अहं...

मगाशीच ऐकवलं ना गाणं ते तुम्हाला...
दिलबर ...दिलबर
जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है!
म्हणून तर जणू भेटून आलो होतो.
जीवन गाणं नव्याने गाण्यासाठी !!










Tuesday 11 December 2018

छिंदम आता तुमच्या छाताडावर बसेल ...


होय, छिंदम आता तुमच्या छाताडावर बसेल... आहे हिम्मत त्याला उतरवण्याची ?
सातशे -आठशे वर्षांपूर्वी तो चंगेज खान आला.. 
मग आला खिलजी ... पाठोपाठ निज़ाम अन मुघल ... 
मग आला बाबर अन मग अकबर 
असेच कोणीबाही येत राहिले.
त्यांनी तुम्हाला ओरबाडलं ... तुमचं घरदारही लुटलं. 
तुमच्या आया -बहिणींवर हात टाकला ... त्यांची अब्रूही लुटली. 
तुम्ही पाहत होतात षंढासारखे ! 
मग तुमच्या संसाराची अक्षरशः राख रांगोळी झाली. अन ...
अन, त्या राखेतून फिनिक्स पक्षासारखा उभा राहिला तो तुमचा आमचा शिवबा !
त्याने उभं केलं स्वराज्य !!
मग तुम्ही जगू लागलात अभिमानानं. 
मुलं बाळ रांगू लागलं आनंदानं. 
घरात लेकी सुना नांदू लागल्या सुरक्षितपणे. 
जणू आनंदवन उभं राहिलं.
ह्या शिवबाची थोरवी सांगायची सोडून तो छिंदम.. त्याला शिवी देत होता. 
आणि तुम्ही परत षंढाच्या भूमिकेत उभे...
मग तो उभा राहिला तुमच्या नाकावर टिच्चून नगरच्या निवडणुकीला ... 
त्यानं दाखवलं मग आमिष पैशाचं ... 
मग तुम्ही धावलात त्यामागे हपापल्यासारखे ... 
अन तो आला निवडून थाटात ...
आता तो बसेल तुमच्या छाताडावर
अन तुम्ही गुमान वाट पहात राहाल ... 
शिवबाने पुन्हा जन्म घेण्याची...

anilbagul1968@gmail.com

लाल फितीचा कारभार - अर्थात रेडटेप !!




शासन व्यवस्था आणि तिचा एकूण कारभार, ह्याचं वर्णन एका वाक्यात कसं करता येईल ? 
तर सरकारी काम म्हणजे फायलींचा वर्षानुवर्षे रेंगाळणारा प्रवास  !
म्हणजेच लाल फितीचा कारभार - अर्थात रेडटेप !!

नको असलेल्या फायली, कधी त्यात अडकल्या जातात. कधी जाणीवपूर्वक अडकविल्या जातात.
तर हव्या असलेल्या फायली नको तितक्या जलदगतीने प्रवास करत पुढे दामटल्या जातात.
कारण काय तर ..
लालची  राजकारणी, धनदांडगे व्यापारी आणि भ्रष्ट नोकरशहा ह्यांच्या अभद्र युतीचा 'वेस्टेड इंटरेस्ट' त्यात असतो.

पण त्यांना हवी असलेली फाईल जर कोणी नोकरशहा जाणीवपूर्वक दाबून ठेवत असेल तर ?
तर ... संघर्ष अटळ असतो.  अन कधी कधी तो 'टोकदार'ही होत जातो.

हाच टोकदार संघर्षाच्या, दमदार लढ्याचा विषय आहे, 'रेडटेप' ह्या  पत्रकार अभिजित कुलकर्णी ह्यांच्या नव्या कोऱ्या कादंबरीचा. प्रस्तुत कादंबरी ही लेखकाची पहिलीवहिली साहित्यनिर्मिती आहे, हे पाहून अचंबित व्ह्यायला लागतं, हि वस्तुस्थिती.

मराठी वाडःमयात, एकूणच राजकारण ह्या विषयावरील, त्यातही शहरी राजकारणावर बेतलेल्या कादंबऱ्या तश्या हातावर मोजण्याइतक्या. त्यातही महत्वाच्या, 'आज दिनांक' ,'सिंहासन' आणि पडघम-'अस्वस्थ दशकाची डायरी ह्याच. त्या मांदियाळीत ही रेडटेप ह्यापुढे असेल असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

कादंबरीचा नायक, बांद्र्याचा जिल्हाधिकारी महेश राऊत,  ह्या संघर्ष लढ्यातले मुख्य पात्र. तर दै. प्रखरचा वृत्तसंपादक जया आणि त्याचा सहकारी अभि ह्या लढ्यातले त्याचे साथिदार. ह्यांचा लढा आहे तो प्रामुख्याने महसूल मंत्री कदम, आरोग्यमंत्री घोरपडे, ह्यांच्याशी. मंत्रालयातले चीफ सेक्रेटरींच्या मार्फत महेशला पायबंद करण्याच्या प्रयत्नात ते असतात. जोडीला मुख्यामंत्री, सांस्कृतिक मंत्री रोकडे, कदमांच्या उजवा हात सुरेश नाईक आणि महेशचा बॅचमेट रासकर आणि माहिती जनसंपर्क अधिकारी वर्षा.

प्रत्येक पात्रबरोबरचे संवाद लेखकाने खुमासदारपणे रंगवल्यामुळे ती जिवंत वाटू लागतात. हे सारं इतकं जमून आलंय की वाचकांनी त्या पात्रांना आपल्या आसपास शोधल्यास नवल वाटू नये. त्यातही 'वर्षा ' इतकी फर्मास उभी राहिली आहे त्याला तोड नाही ! तीच अघळ-पघळ अन प्रसंगी लाडिक बोलणं, तिची वेशभूषा, प्रसंग निभावून नेण्याची हातोटी लाजवाब !!  अशी 'वर्षा' जवळपास प्रत्येक ऑफिस मध्ये असू शकते, असं वाटावं इतकी हि 'वर्षा' चपखल उभी राहिली आहे.

बान्द्रातील सरकारी वसाहतींचा पुनर्विकास आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. सदरची फाईल ही जिल्हाधिकारी महेश राऊत ह्यांच्याकडे आहे. ती त्यांनी मंजूर करून लवकर मंत्रालयात पाठवावी ह्यासाठी शासनातील एक लॉबी प्रयत्नशील आहे. चीफ सेक्रेटरी हे महेशवर दबाव आणत आहेत. महसूल मंत्री कदम ह्यंची त्याकरिता चरफड सुरु आहे.  ह्या प्रस्तावातील काळबेरं,  हे महेशने ओळखले आहे. बिल्डरलॉबीचा कावा त्याच्या लक्षात आला आहे. त्याच्या प्रामाणिक मनाला ही गोष्ट पटलेली नाहीये. कोणत्याही परस्थितीत हा डाव त्याला हाणून पाडायचंय. त्यासाठी कोणताही दबाव झुगारून द्यायची त्याची मानसिक तयारी झालीये. आणि मग सुरुवात होते रंगतदार खेळाला...

हा खेळ आहे दोन प्रवृत्ती मधला. पैश्याच्या लालसेपोटी वखवखलेली बिल्डर लॉबी, नीती-अनीतीची कोणतीही चाड नसणारे राजकारणी आणि सहज विकले जाणारे सरकारी बाबू ही अभद्र युती पटाच्या एका टोकाला. तर, प्रामाणिक सरकारी अधिकारी आणि तत्वनिष्ठ पत्रकार पटाच्या दुसऱ्या टोकाला. दोन्हीकडून दुसऱ्याला मात देण्यासाठी चाली खेळल्या जातात. प्याद्यांचा वापर केला जातो. शेवटी बाजी कोण मारतं?

कथा पुढे सरकतांना राजकारण्यामधल्या परस्परांमधला शह-काटशह, नोकरशाही मधला सुप्त संघर्ष ह्याच बरोबरीने वृत्तपत्राजगतातील पत्रकारामधील कुरघोडी ह्या पटलावर नेमकेपणाने येतात.

शेवटच्या क्लायमॅक्समध्ये महेशला जाळ्यात ओढण्यासाठी लावलेल्या 'हनीट्रप'चं वर्णन फारच रंजक झालं आहे. त्यात आपला कथानायक गुंतू नये, अशी भावना वाचताना प्रत्येक वाचकाची होणार ह्यात शंका नाही.

कोणत्याच खेळीला महेश हार पत्करत नसल्याचे पाहून हताश झालेले वरिष्ठ अपेक्षेप्रमाणे महेशची बदली करतात. त्याही परिस्थितीत महेश लढा चालू ठेवतो.  त्या करीता मंत्रालयातल्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांचीही  त्याला साथ मिळते. त्या सर्वांनी मिळून आखलेला  प्लान एका अर्थाने यशस्वी होतो.

मुदलात सशक्त कथाबीज, ओघवती भाषा, घटनांचा वेग, ठसठशीत पात्रे, त्यांच्यातले खुमासदार संवाद, टोकदार संघर्ष, त्याकरीता रचलेले डावपेच ह्या साऱ्यामुळे कादंबरी वाचनीय आणि दर्जेदार झालीये. अभिजित कुलकर्णी ह्यांची हि साहित्यकृती म्हणजे पदार्पणातच ठोकलेले शतक ठरावे. त्यात मेहता पब्लिशिंग सारख्या विख्यात प्रकाशन संस्थेने निर्मिती करतांना कुठेही कसर ठेवली नाहीये. त्यामुळे ही कादंबरी 'बेस्ट सेलर ' ठरल्यास आश्चर्य वाटू नये.

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...