Thursday, 16 April 2020

एका लग्नाची पुढची गोष्ट ...






ही गोष्ट आहे मनिषाची, अहं मोरुच्या मनिषाची.
आता तुम्ही म्हणाल, ''हा मोरु कोण?''
अहो हा मोरु आहे आपला नेहमीचाच आवडता, गेल्या २९ वर्षांपासून अधून मधून भेटत राहणारा. फार पूर्वी 'मोरूच्या मावशी' बरोबर भेटलेला, 'टूरटूर करणारा 'ब्रह्मचारी'. 'गेला माधव कुणीकडे' विचारणारा, ‘चार दिवस प्रेमाचे’ गात, 'एका लग्नाची गोष्ट' सांगणारा. आजवर, जवळपास ११००० वेळा आपल्याला भेटला आहे तो ! 'साखर खाल्लेला माणूस', लब्बाड कुठचा !! बघा ना कसा 'गारुड' घालतो समोरच्यावर ! लग्नाच्या पुढच्या गोष्टीविषयी सांगायचं, तर त्याचीच गोष्ट सांगत बसलो. असो.

तर ही आहे, 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. तिसरी घंटा वाजली वाटतं. पडदा तर उघडतो, एका घराचा सेटही दिसतो, पण घरात कुणीच नाही !
आपली कविता मेढेकर (च्या मारी, हिचं वय वाढतच नाही का काय?) याहीवेळी 'मनिषा' बनून चक्क प्रेक्षकांमध्ये दिसते. परसदारी फिरत फिरत, गप्पा मारल्यासारखी संवाद साधतेय, तिच्या लाडक्या प्रेक्षकांशी ! अशा संवादातून कथानक पुढे न्यायची आयडीया भन्नाटच !!

नाटकाचा विषय खरं तर विनोदी नाही. तो आहे स्त्रियांच्या 'मेनॉपोझ' विषयीचा. चाळीशी ओलांडली की, सर्व स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या 'त्या' फेजनंतर, तिच्या भावविश्वात होणारी उलाघाल, स्त्रीत्व हरवून दुर्लक्षित पडल्याची भावना. नवऱ्याचं आपल्याविषयी आकर्षण संपणार, त्याचं आसपास लक्ष जाणार, ह्या विचारांनी, तिची होणारी चिडचिड. अशा काळात आपल्या जोडीदाराची साथ मिळायला हवी अशी तिची अपेक्षा. पण नवरा त्याच्या ऑफिसच्या ‘वर्कप्रेशर’ने कावलेला. संसाराच्या नव्या नवलाईच्या काळात तिच्या विषयी असणारं आकर्षण आता उरलेलं नाही. ह्यावर कळस म्हणजे, त्या घरात राहणारी मनिषाची, घटस्फोटीत मोठी बहीण ! आयुष्यात राम उरला नाही, त्यामुळे ‘दुखीकष्टी’ असल्याचं बेअरिंग छान पकडून राहणारी. हे बेअरिंग मात्र गळून पडतं ‘बियर’ची अक्खी बॉटल रिचवल्यावर ! असो. घटस्फोट ही आपल्या घराण्याची खानदानी परंपरा आहे, आणि ती आपल्याप्रमाणे मनिषानेही जतन करावी अशी तिची धारणा. तुमच्या घरात असं वातावरण असतांना, जे घडलं असतं ते इथे घडत नाही. कुठेही रडारड नाही, आदळआपट नाही.

लग्नाचा विसावा वाढदिवस, नवरा नेमका विसरतो. तो ऑफिस मधून घरी येतो तोचमुळी संतापून. मनीषाने ‘सेलेब्रेशन’ची केलेली तयारी वाया जाते. तिचा मूडऑफ होतो. बंगलोरला शिकण्यासाठी राहणारा मुलगा, तीला हयावरचा उपाय सांगतो. तो उपाय अमलात आणण्यासाठी ती मोरूच्याच ऑफिसात काम करणार्‍या सहकाऱ्यांकडून ‘गेमप्लॅन’ करते. तिच्या ह्या खेळीत मोरु अलगद अडकतो, आणि आपण नाटकात. प्रशांत दामले म्हटलं की गाणं ओघाने आलंच. तो ते हुकमीपणे गाऊन घेतो. संवादाच्या अचूक टायमिंगने तो हशा आणि टाळ्या भरपूर वसूल करून घेतो. अतुल तोडणकर देखिल ह्यात कमी पडत नाही. घरातली बायको म्हणजे चारचाकी गाडी. तिच्याबरोबर एखादी 'ऍक्टिव्हा' अर्थात एखादी मैत्रिण सोबत ठेवायची. मग माणूस बोअर होत नाही. तर 'ऍक्टिव्हा' मुळे सगळा भार एकट्या गाडीवर मग पडत नाही. मग बायकोही’ रीलॅक्स. अशी त्याची थेअरी.

आपल्याला बुवा ही थेअरी पक्की पटली. तुमचं काय?

anilbagul1968@gmail.com

या सुखांनो या ...






फेसबुकाच्या भिंतीवरती खरडायचो काही-बाही. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया यायच्या, लिखाण आवडल्याच्या. मग एक दिवशी 'कोंडूर्‍याक गाऱ्हाणं' लिहिलं. माझ्या आवडत्या, तळकोकणातील प्रवासावरचं लिखाण होतं ते. खूप सारे लाईक्स मिळाले त्याला. माझं गाऱ्हाणं, कोंडूर्‍यापर्यंत पोहचलं की नाही कोणास ठाऊक? पण, 'महाराष्ट्र टाईम्स'पर्यंत मात्र नक्की पोहचलं. संपादक शैलेंद्रजी तनपुरे ह्यांचा अचानक फोन आला, ‘’सदर लिहायचंय तुम्हाला.’’

मी उडालो. खरं तर सुखावलो होतो, खोटं का बोला. आता प्रश्न होता, काय लिहायचं? सदराला नाव काय द्यायचं? एक मात्र नक्की होतं, जे लिहायचं ते हलकं फुलकं आणि खुसखुशीत हवं. त्यातून नाव सुचलं, जीरा बटर !

मग लिहिता झालो. लिहिता लिहिता सुचू लागलं. पण, माझ्या पक्क लक्षात होतं, लोकं आज-काल फारसं वाचत नाहीत म्हणून. मग ठरवलं हे लिहिलेलं टाकायचं, फेसबुकाच्या भिंतीवर. ‘नाशिक टूडे’ ग्रुपवर शेअर देखिल केलं. लाईक्स आणि कमेंट्स यायला लागले.

पण माझ्या आईची तक्रार होती, तिच्या पर्यन्त हे जात नाही अशी. माझ्या आईला वयोमानांनुसार अंधुक दिसू लागले आहे. तिचे वाचन त्यामुळे थांबले आहे. तिच्यासारखीच बहुतेक सार्‍या ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिति आहे. माझं लेखन त्यांच्या पर्यन्त पोहचवं, त्यांना वाचंनांनंद मिळवा म्हणून, निरनिराळ्या स्नेहींकडून वाचन करवून घेवून, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचे माझ्या आईसह, सार्‍यांनी कौतुक केले. माझी पत्नी मनिषा, स्नेही प्रज्ञा भोसले–तोरसेकर, मनिषा कोलते, आर्कि. स्मिता लहारे-कुलकर्णी, प्रा. सिद्धार्थ धारणे, नेहा खरे, मनिषा रतीलाल बागुल ह्या सार्‍यांचे त्याकरीता आभार. संगणक तज्ञ ओंकार गंधे सर आणि त्यांच्या टीमने हे सारे रेकॉर्डिंग केले होते, त्यांचेही आभार.

करियर यशस्वी होण्यासाठी योग्यवेळी ‘ब्रेक’ मिळणं, आवश्यक असतं. उशिरा का होईना, पण तो मिळाला, हेही नसे थोडके. त्याकरिता महाराष्ट्र टाईम्स, नाशिक, त्याचे संपादक शैलेन्द्रजी तनपुरे सर, क्रिएटिव्ह हेड, प्रशांत भरविरकर ह्यांचे खूप खूप आभार. लिखाणाला सतत प्रोत्साहन देणार्‍या, संतोष आणि चैत्रा हुदलीकर, विनायक रानडे ह्यांचेही आभार. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या वाचक स्नेहींचे मनापासून धन्यवाद !!

ह्या आभाराच्या कार्यक्रमात, ‘मूळ कथानका’चा शेवट सांगायचा राहिलाच ...

एकुलत्या एका लेकीचं-स्वरालीचं लग्न, यथासांग पार पडलं आहे. त्यामुळे नवरा–बायकोच्या संसाराची कहाणी सुफळ-संपूर्ण झाली आहे. पण बायकोला आता वेध लागलेत नातीच तोंड पाहायचे ! तर नवरोबाला त्याच्या गावी जायचंय !! सिंधुदुर्गातील, वेंगुर्ल्याजवळच्या ‘भोगव्या’ला, त्याला राहायचंय. तिथल्या लाल मातीचा मृद्गंगध, त्याला आता व्याकूळ करतोय. लाल जांभा खडकाचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटतोय. नारळी–पोफळीच्या बागा, आंबा–फणसाची, काजू करवंदाची झाडं, त्याला खुणावतायत. सकाळच्या न्याहारीला पांढरीफेक ‘घावानं’ त्याला खावीशी वाटतायत. पापलेट, रावस, बांगडा त्याच्या स्वप्नात येतात. ‘कोंबडीवडा’ खाण्याचे डोहाळे त्याला सुचतायत. कोकम सरबताची, सोलकढीची त्याला आताशा, तहान लागलीय. कुठल्याश्या अनामिक ओढीने, किनाऱ्याकडे सतत धाव घेण्याऱ्या लाटांची गाज, त्याला ऐकायची आहे. त्या निळ्या-हिरव्या पाण्यात त्याला डुंबायचंय, अगदी मनसोक्त ! पांढर्‍याशार वाळूंचे किल्ले त्याला बांधायचेत. त्याचं ‘स्वप्नातलं राज्य’ निर्माण करण्यासाठी !!

त्याच्या ह्या ‘स्वप्नाच्या राज्यात’, कुणीच दुःखी-कष्टी नसेल. ‘चार घास खाण्यासाठी कुणीच तरसत नसेल. आनंदाच्या चार क्षणांनी मग आनंदभुवन तयार होईल. मग तुम्ही-आम्ही सारे गाऊ लागू ...
या सुखांनो या !

anilbagul1968@gmail.com

मोठं व्हायची घाई






क्राऊनिंग ग्लोरी :
‘अंदरसूल’च्या माळरानावर बाया बापड्यांची तोबा गर्दी लोटली होती. पिटातल्या तंबूत, उत्साह ओसंडून वहात होता. टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांचा पाऊस पडत होता. कार्यक्रमही तसाच होता म्हणा. 'पॅन एशिया पॅसिफिक सौंदर्य स्पर्धा' घेण्यात आली होती राव. असा कार्यक्रम घेणं म्हंजे, येऱ्या बगाळ्याचं कामच नाही. मौजे बुद्रुक अंदरसूल ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. सरपंच बकुळाताई आणि उपसरपंच बबनराव ह्यांचा मोठा पुढाकार होता त्यात. साऱ्या पंचक्रोशीत म्हणजे नगरसूल, कोल्पेवाडी, गुळवंच, दापूर, नांदूरशिंगोटे, इथे प्राथमिक फेर्‍या घेण्यात आल्या होत्या. आज तर ‘ग्रँड फिनाले’ होता. नामदार झोडगे-पाटील आणि नृत्यबिजली मंदाताई सातारकर जातीने हजर होते, प्रमुख पाहुणे म्हणून. नाशिकच्या ‘खर्जुले मळा’ इथं राहणार्‍या ‘मिसेस वर्ल्ड २०१९,’ ‘प्रियंका’ ह्या सेलेब्रिटी गेस्ट होत्या. स्पर्धेच्या शेवटी, विजेत्या तरुणींना मानाचा चंदेरी मुकुट, त्यांच्याच हस्ते प्रदान करण्यात आला.

पळा पळा कोण पुढे पळे तो :
डिसेंबर महिन्यातील एका रविवारची सकाळ. हवेत प्रचंड गारठा. त्याला न जुमानता शेकडो स्त्री-पुरुषांची सातपूरच्या महापालिकेच्या मैदानावर उपस्थिती. साऱ्यांच्या अंगावर पिवळ्या रंगाचे टी शर्ट्स. स्टेजवर मोठ्ठा फ्लेक्स, 'यलोथॉन रन' ! आठ जणींचा एक ग्रुप झुम्बा करतोय. समोरचे सारे त्याला 'फॉलो' करतायत. मग सूत्रसंचालक खूप साऱ्या सूचना देतो. कुठल्या 'एज ग्रुप' करीता, किती किलोमीटरची 'रन' आहे. सेल्फी पॉईंट कुठे आहे. सर्टिफिकेट्स आणि मेडल्स कुठून घ्यायची आहेत. मग ढोलपथक सलामी देतं. सेलेब्रिटी हिरवा झेंडा दाखवतात. मग पळापळ होते. सेल्फी पॉईंट्सवर मेडल आणि सर्टिफिकेट्ससह सेल्फी काढल्या जातात. ग्रुप फोटोसेशन होते. पटापट फेसबुकावर स्टेटस अपडेट होते. लाईक्स अन कमेंट्सचा मित्रपरिवाराकडून वर्षाव होतो.

पुरस्कार फिरस्कार :
जुन्या नाशकातील ‘तिळभांडेश्वर लेन’ इथलं, ‘दुर्गा मंगल कार्यालय’ आज तुडुंब भरलं होतं. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, अखिल भारतीय विविध लघुत्तम उद्योग संघटनेच्यावतीने, नऊ यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. ‘नवलघुत्तम उद्योजिका पुरस्कार’ असं पुरस्काराच नाव. एक पिटुकला मुमेंटो, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं पुरस्काराचं स्वरुप. एका पाठोपाठ, नऊ ‘पुरस्कारप्राप्त’ महिलांची घोषणा होते. त्यांच्याबद्दलची माहिती सूत्रसंचालक देत जाते. पूजनीय ‘अमुक महाराज’ पुरस्कार प्रदान करत जातात. महिला सक्षमीकरण, जेंडर इक्व्यलिटी, निर्भया, नारीशक्ती अशा शब्दांना घेऊन सारे भाषणे ठोकतात. 'सन्मानित नवदुर्गा'सोबत आयोजक छानसा फोटो काढून घेतात. मंडळाचा सेक्रेटरी, एक हुकमी बातमी तयार करतो. सगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयाकडे, एखादा उत्साही कार्यकर्ता ती पोहोचवतो.

पहिल्या प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे, अशा सौंदर्यस्पर्धा गल्लोबोळीत, होवू लागल्या आहेत. अतिशय सुमार दर्जाचं आयोजन, आणि आर्थिक देवाण-घेवाणावर आधारीत स्पर्धेचे निकाल. अपवाद सोडल्यास सगळीकडे हेच चित्र. दुसर्‍या प्रसंगात लिहिल्याप्रमाणे, अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या बहुतांशी उत्सवी प्रकारच्या असतात. खेळाचा प्रसार वगैरे दुय्यम, तर चमकोगिरीच अधिक. त्यातही आर्थिक नफ्याचं गणित सामवलेलं. तिसरा प्रसंग म्हणजे हमखास खेळला जाणारा हातखंडा प्रयोग. शहरात, जवळपास प्रत्येक सभागृहात रंगवला जात असतो अधून मधून. अशी पारितोषिके वाटतांना, अभ्यास करून निवड, वगैरे भानगडच नाही. हा, पण काही प्रतिष्ठेची पारितोषिके मात्र याला अपवाद.

वरील तीनही प्रसंग, थोड्याबहुत फरकानुसार, आपल्या आजूबाजूला घडतांना, आज दिसतात. मात्र अशा प्रसंगात एक साम्य असते, ‘मागणी तसा पुरवठा’ ! आज प्रत्येकाला, सर्वांच्या अधिक पुढे जायचं आहे. सर्वांपेक्षा अधिक मोठं व्हायचं आहे. तेही अगदी 'हुक ऑर क्रूक' !! मग त्यासाठी, काहीही मोजायची प्रत्येकाची तयारी !!! मग याचा फायदा, आयोजक उचलतात, आर्थिक हितसंबंध जोपासतात. फसवणुकीचे अनेक प्रकार यात घडतात.

यशस्वी होण्याच्या स्पर्धेत, सर्वस्व पणाला लावून धावतांना, थांबायची गरज असेल तर, ते नेमकं कधी आणि कुठे? हे कळायला हवं. काय मिळवायचंय? हयापेक्षा ते का मिळवायचंय? ह्याचा सजगतेने विचार, हा व्हायलाच हवा.

anilbagul1968@gmail.com

लेक माझी अभिमानाची




हैदराबादच्या ‘डॉ. प्रियांका रेड्डी’ प्रकरणाची बातमी सगळीकडे फ्लॅश होते. बायकोच्या पोटात धस्स होतं. स्वराली, सध्या हैदराबाद इथंच राहते. हैदराबादच्या एका आयटी कंपनीत ‘प्रोग्रॅमर’ म्हणून, नुकतीच ती जॉइन झाली होती. तिच्या सुरक्षेच्या काळजीने, बायकोची घालमेल सुरू होते. ती तातडीने, स्वरालीला फोन लावते. तिचा मोबाईल ‘स्विच ऑफ’ असतो. ती आणखी अस्वस्थ होते. ती लगेच नवरोबाला कॉल करते. नवरोबाही ‘त्या’ बातमीने, किंचितसा हललेला होताच, पण वरकरणी काळजीचं कारण नसल्याचं तो बायकोला भासवतो. तू चिंता करू नकोस, मी कंपनीच्या नंबरवर कॉल करतो. तो तिला दिलासा देतो. कंपनीच्या गेटमधून शिरतानांच, मोबाईल जमा करण्याची ‘कंपनी पॉलिसी’ असल्याचे नवरोबाला, फोनवर कळते.

मग संध्याकाळी, ते दोघे स्वरालीला फोन करतात. फोन लागतो पण कॉल घेतला जात नाही. व्होडाफोनवाली बाई काहीतरी, 'तेलगू’त सांगत राहते. ऑफिसमधल्या नायडू मॅडमला 'त्याचा' अर्थ, नवरा फोन करून लगेच विचारतो.
''अहो, तुमची मुलगी कॉल घेत नाहीये, नंतर कॉल करा, असं ‘तेलगू’त सांगत असतील. '' इति नायडू मॅडम.
आता मात्र, नवरा-बायकोचा धीर सुटतो. दोघेही थेट हैदराबाद गाठण्याची तयारी करतात. इतक्यात नवरोबाला फोन येतो.

‘’इज इट मि. शिरीष? आय अॅम महेश बाबू–पोलिस कमिशनर ऑफ हैदराबाद. टॉक विथ यूवर ब्रेव्ह डॉटर. शी हॅज डन अ ग्रेट जॉब !’’

काय चाललंय काहीच कळेना नवरोबाला. बायको तर अधिकच धास्तावलेली, पोलिसांचा फोन आहे कळल्यावर.
‘’पपा मी स्वराली बोलतेय. काळजी करु नका, मी सुखरुप आहे. मम्मीला लगेच सांगा. ती काळजीत असेल.'' स्वराली.

''अगं पण झालंय तरी काय? तू पोलीसस्टेशनला कशी? ते पोलिस कमिशनर, तुला ब्रेव्ह डॉटर का म्हणाले?'' आणि तू फोन का नाही घेतलास? नवरोबाची घाईघाईने प्रश्नांची सरबत्ती.

पुढे अर्धा तास, स्वराली बोलत होती आणि नवरा-बायको, मोबाईल स्पिकरवर ठेवून ऐकत होते.

झालं होतं असं ...
स्वराली, संध्याकाळी कंपनीतून घरी येतांना टॅक्सिवाल्याने तिची छेड काढण्याचा प्रयन्त केला होता. स्वराली, टॅक्सित एकटीच होती. पण ती घाबरली नाही. प्रसंगावधान राखून तिने हुशारीने, टॅक्सिवाल्याला टॅक्सी थांबवायला भाग पडली. टॅक्सी थांबताच, तिने खाली उतरून त्याची धुलाई करायला सुरवात केली. धुलाई करतांनाच ती ‘हेल्प हेल्प’ असं ओरडत राहिली. ते ऐकून गर्दी गोळा झाली. इतक्यात पोलीस आले. आणि साऱ्यांची वरात पोलीस स्टेशनला. ‘पोलिस कमिशनर’ महेश बाबू ह्यांना सारी हकीकत कळली. त्यांनी स्वरालीचं तोंड भरुन कौतुक केलं. तिच्यासारखं प्रसंगावधान आणि धाडस इतरांनी दाखवलं, तर ‘महिला अत्याचार’ नक्कीच कमी होतील, असंही ते म्हणाले.

‘’पपा थँक्स. हे तुमच्या दोघांमुळे शक्य झालं. तुम्ही आणि ममीने माझ्यावर जे संस्कार केलेत, मला वागण्याची मोकळीक दिलीत, मुलगी म्हणून बंधनात नाही ठेवलत, माझ्यावर विश्वास ठेऊन एकटीला हैदराबाद इथं राहू दिलंत, त्यामुळे मला आत्मविश्वासाचं बळ मिळालं. आणि मग, आत्मसन्मासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. आणि पपा ह्या सगळ्या भानगडीत फोन नाही घेऊ शकले.’’ स्वराली.

ते सारं ऐकताच नवरा-बायकोचा जीव भांड्यात पडतो. अभिमानाने उर भरुन येतो. ''बघ, आपली लेक किती धाडसी आहे ते. आणि तू, विनाकारण तिची काळजी करत राहतेस !!'' नवरा, स्वरालीचं कौतुक करत बायकोला म्हणाला.

इतक्या वेळ लेकीच्या काळजीने, रडकुंडीस आलेली बायको, एकदम वेगळाच पवित्रा घेते.
''हूं SSS आहेच मुळी माझी लेक धाडशी. अभिमान आहे मला तिचा ! गुणांची पोर ती !!
हो, पण तुम्ही नका फुशारक्या मारु. ती तुमच्यावर नाही, माझ्यावर गेलीय म्हणून अशी आहे. तुम्ही ते ‘अळूचं फदफदं’ खाणारे, तुम्हाला मेला, एक उंदीर मारता येत नाही.'' बायको फणकारते.

anilbagul1968@gmail.com

सुखी संसाराचा मंत्र




तुमचं लग्न झालय? हो, मग हा लेख तुमच्यासाठीच.
काय म्हणता? तुमचं लग्न व्हायचय अजून? मग हा लेख तर तुमच्याचसाठी.
खानदेशी आहात? वर्‍हाडी? माणदेशी? मराठ्वाड्याकडचे? घाटावरचे की कोकणातले? तुम्ही कुठचेही असा, हा लेख खास तुमच्याचसाठीच !
असं काय करताय राव? ‘सुखी संसाराचा मंत्र’ सांगतोय की !!
सोळा आणे सत्य. चुकीचा ठरलो ना, तर सांगाल त्याच्या ढेंगे खालून जायची तयारी आहे आपली.
तर ऐका आणि तुम्हीच ठरवा.

शनिवारी रात्री, यथासांग ‘कार्यक्रम’ झालेला असल्याने, नवरोबा पलंगावर ‘सुशेगात’ होता. रविवारचे सकाळचे दहा झाल्याचे त्याच्या गावीही नव्हते. स्वैपाकघरात बायकोची लगीनघाई. पहाटे पाच वाजताच तिचे ‘मिशन ए पंगतभोजन’ सुरू झालेलं. त्यामुळे नवर्‍याचे अद्याप लोळत पडणं, तिला असह्य होत होतं. दर मिनिटागणिक तिच्या चिडचिडीला फोडणी मिळत होती. गॅसवर मटण रटरटत होतं, आणि तिच्या मनात संताप. ‘रश्या’ला शेवटची उकळी देऊन ती गॅस बंद करते आणि बेडरूमकडे मोर्चा वळवते.
‘’संसार सांभाळण्याचा ठेका जसा माझ्या एकटीचाच आहे. सण-वार, रीत-भात मीच पहायचे. पै-पाहुणे मीच जोडून ठेवायचे. तुम्ही मात्र खुशाल लोळत पडा.’’ बायको एका हाताने लाटणे फिरवत, तावातावाने बोलत होती. रणचंडिकेच्या अवतारातील तिच्या रूपात, जिभेवर मात्र सरस्वती खेळत होती.
आता नवरोबाची झोप, गोधडीच्या घडीतून अलगत कपाटात. घाईने तो बाथरूमचा आश्रय घेतो. शत्रूपक्षपासून बचाव करण्याकरीता, खंदकाचा आसरा घेतल्यागत. आजवरच्या अंनुभवातून बराच गनिमीकावा, नवरोबाने आत्मसात केलेला. शॉवरचं थंडगार पाणी त्याच्या डोक्यावर पडताच त्याच्या ‘डोस्क्यात’ प्रकाश पडतो. बायकोच्या ह्या अवतारामागच्या रहस्याचा, त्याला झटदीशी उलगडा होतो. आपली चूक त्याला उमगते. सपशेल माघार ! त्याचं धोरण ठरतं.
आजचा दिवस, बायकोच्या दृष्टीने खास होता. तिचा मावसभाऊ, बायका-मुलांसह दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित पाहुणा होता. भाऊ तिच्या हातच्या मटणाचा, फार चाहता होता. आणि अशा दिवशी नेमके आपण लोळत पडतो. आपल्यावर तर खास जबाबदारी होती, बाजारातून, ‘राणे डेअरीतून एक किलो आम्रखंड आणून द्यायची. ‘या खुदा, मै निकला गधा’, नवरोबा मनातल्या मनात, स्वतःला शिव्या घालतो. पैशाचं पाकीट, गाडीची किल्ली आणि कापडी पिशवी घेऊन सुमडीत कलटी मारतो.
त्याची ही नेहमीची खेळी, बायको चांगलीच ओळखून असते. तर तिकडे, ‘राणे डेअरी’तून आम्रखंड घेतल्यावरच, नवरोबा सुटकेचा निश्वास सोडतो. बायकोला खुश करण्यासाठी अजून काय करता येईल? तो विचार करतो आणि ‘मघई’ पान घेतो खास चांदीचा वर्ख लावलेलं.
इकडे घरी, बायकोच्या मावसभावाचं, त्याची बायको, मोठी मुलगी आणि धाकट्या मुलाचं आगमन झालेलं. बायको मोठ्या खुशीत त्यांचं स्वागत करते. ख्याली खुशाली होते. थोड्या वेळाने भाऊ नवरोबाची चौकशी करतो. मग काय बायकोची तक्रारीची ‘सीडी’ सुरू होते.
‘’मी आहे म्हणून हा संसार टिकून आहे. दुसरी कोणी असती ना, तर काही खरं नव्हतं.’’ अरे दादा तूच काही तरी समजावून सांग ह्यांना.’’
इतक्यात धापा टाकत नवरोबा हजर.
‘’सालेसाहेब आपले स्वागत असो.’’ आपल्यासाठीच खास आम्रखंड आणायला गेलो होतो. आपल्याच ताईच्या आज्ञेवरून ! आणि आपल्या ताईसाहेबांसाठी खास मघई पान. नवरोबा, मधाळ स्वरात बोलका पोपट होऊन जातो.

नवरोबाची ही ‘गेम चेंजर’ खेळी, ‘काफी असरदार’ साबीत होते. घरातलं वातावरण एकदम बदलून जातं. मावसभावाला नवरोबाच्या कौतुकाचं कोण भरतं येतं.
‘’काही म्हण पण ताई, तू नशिब काढलंस. किती करतात तुझ्यासाठी दाजी !’’
नवरोबा मिश्किल नजरेने बायकोकडे कटाक्ष टाकतो. नवर्‍याच्या झालेल्या अनपेक्षित कौतुकाने तिचा चेहरा पाहण्यासारखा होतो.

तेव्हा, संसार सुखाचा होणं फारसं अवघड नाही. फक्त मौनात केव्हा राहायचं आणि केव्हा बोलका पोपट व्हायचं हे समजायला हवं !
हाच तर आहे, सुखी संसाराचा मंत्र !!

anilbagul1968@gmail.com

लॉन्ग ड्राईव्ह



रविवारची रम्य सकाळ. हवेत गुलाबी थंडी. वातावरण अगदी प्रसन्न ताजे. तोच ताजेपणा बायकोच्या टवटवीत चेहेर्‍यावर. प्रेमगीताची प्रफुल्ल गुणगुण. मनापासून स्वैपाक चाललेला. लसणीचं लाल तिखट, करून झालेलं. बटाटे उकडून त्याचा कुस्कुरा करून, निगुतीने त्यात आलं-मिरचीचा ठेचा घालून बारीकसे गोळे करून ठेवलेले. नवऱ्याने न्याहारीची फर्माईश करण्याचीच फक्त वाट. अखेर नवरोबा तिला विचारतोच.
''अगं बायको, दे पटकन काहीतरी. खूप भूक लागलीय.''

नवरोबा मुडात असला की तो तिला 'अगं बायको' अशी हाक मारतो. बायको मनातल्या मनांत अधिक खुश होते. ती ख़ुशी तिच्या हालचालीत दिसू लागते. सफाईने ती पहिला घाणा काढते. लालसर पिवळे चार बटाटवडे प्लेट मध्ये येतात. सोबत लाल तिखटाची चटणी.
''घ्या तुमचे आवडीचे बटाटवडे. संडे स्पेशल.’’ बायको.
नवरोबाची कळी खुलते. बटाटवडे म्हणजे त्याचा जीव की प्राण. अधाशासारखे तो खात राहतो. सातवा वडा चेपल्यावर तो तृप्तीचा ढेकर देतो.
‘’व्वा ss बायकोबा मजा आला.‘’ नवरोबा.
तो खूपच रंगात आला की बायकोला हमखास ‘बायकोबा’ म्हणतो.

‘हीच ती वेळ.’ बायको मनात म्हणते.
‘’अहो, ऐका ना. वातावरण कित्ती छान आहे ना. असं वाटतय ना, कुठेतरी मस्त फिरायला जावं. ए शिरू, जावूयात लॉन्ग ड्राईव्हला?’’ बायको लाडीक आवाजात विचारते.
सात बटाटावड्यांच्या आस्वादाने, सुखाच्या सातव्या ‘आसमान’वर असलेला नवरोबा, लगेच मान डोलावतो.

जव्हार घाटाचा निसर्गरम्य परिसर. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ. मधूनच कुठे कुठे रानफुले डोकावतायत. कधी पांढरी कधी पिवळी. कुठे रंगीत तेरडा फुलून आलेला. दूर कुठे डोंगरावर, मोत्याच्या माळा मिरवल्यासारखा एखादा पाण्याचा ओघोळ. निसर्गाच्या ह्या अनुपम रूपाने मूड खुलत गेलेला.

‘’चांदण्यात फिरतांना माझा धरिलास हात’’... आशाचा मखमली स्वर ‘होंडा सिटी’त डेकवर ऐकू येऊ लागला. नवरा-बायकोच्या मनात दिवसा-उजेडी चांदण्यांनी प्रेमाची पखरण घालायला सुरवात केली. सुमन कल्याणपुरकर सुमधुर आवाजात गात होत्या. ‘’केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर हा’’... दोघ्यांच्याही मनात संसारसुखाच्या गोड आठवणींचा मोर थुई थुई नाचू लागला. मग कधी लता, कधी किशोर येऊन गाऊ लागले. जगजीत सिंह स्वतः आले. ‘होशवालोंको खबर क्या’… गझल पेश करून गेले. दोघेही त्यात दंगून गेले. मग आठवणींची मैफल रंगू लागली. एक एक रम्य आठवणी अलगद उलगडू लागल्या.

दोघांची झालेली पहिली भेट, त्याला आठवली. तिला, त्याने दिलेली पहिली भेट आठवली. मग साधेपणाने झालेले लग्न आठवले. जातीभिन्नतेमुळे नातेवाइकांनी फिरवलेली पाठ आठवली. मोजकेच, पण भक्कमपणे जवळ उभे राहिलेले स्नेही आठवले. कोकणात, त्याच्या गावी झालेला हनिमून दोघांना आठवला. पहिल्या रात्री वीज गेल्यावर, तिने हासडलेली शिवी आठवली. मग दोघेही मनमुराद हसले. त्यावेळी हसले होते अगदी तस्से. लग्नांनंतरचे, नव्या नवलाईचे दिवस आठवले. त्याने तिला, अपरिचित असलेलं कोकण दाखवलं. त्याने नंतर नाशिक पहिलं, अनुभवलं, आणि आपलंसही केलं. पुढे, स्वरालीच्या जन्माचा क्षण त्यांना आठवला. दोघांनाही भरून आलं. लाडाकोडात वाढलेली स्वराली, आता मोठी झालीय. तिच्या लग्नाचं आता बघायचय. विचाराने बायकोचे डोळे पाणावले. नवरोबाने हलक्या हातांनी बायकोला थोपटले. तिचे डोळे पुसले.

स्वरालीला कुठल्या जातीचा मुलगा पाहुयात? नवरोबाने तिला हलकेच प्रश्न केला. तिने त्याच्या चेहर्‍याकडे फक्त पहिलं. त्याने, तिच्या डोळ्यातलं वाचलं. जणू ती म्हणत होती, आपण पहिली होती का जात? सुखाने संसार करतोच आहोत ना? देवाने जन्माला घालताना, माणूस म्हणून घातले. तुम्ही, आम्ही, ह्या समाजाने, जाती-धर्माच्या, भेदाभेदाच्या भिंती उभ्या केल्या. त्या अमंगळ विचारांनी माणसामाणसात गट-तट पडले. उच्चनीचतेचे गंभीर कोडे तयार झाले. कधीही न उलगडणारे. आपण का अडकायचं त्यात?

आपल्याला फक्त, स्वरालीला समजून घेणारा, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा हवा. तिच्या संसाराचा प्रत्येक क्षण, सोहळा करणारा हवा. मग असुदे, कुठलीही त्याची जात !!

anilbagul1968@gmail.com

सोमवार पासून...


सोमवार पासून...


गोविंदनगरच्या ’चैत्र संतोष’ सोसायटीच्या आवारात बायको घामाघूम होत शिरते. पाठोपाठ नवरोबा. लिफ्ट बंद असल्याची ‘सुवार्ता’ सोसायटीचा वॉचमन तत्परतेने देतो. बायकोच्या चेहऱ्यावर लगोलग आठ्यांचं जाळं पसरतं. आता तीन मजले चढायचे. म्हणजे साठ पायऱ्या. सुखवस्तू झालेल्या बायकोला लिफ्टची सवय. व्यायाम, योगा, डायट, जॉगिंग आदी शब्द बायकोच्या शब्दकोषातून केव्हाच गायब झालेले. त्यामुळे वीस वर्षाच्या संसारानंतर संसारसुख देहावर व्यापून होतं. साठावी पायरी चढेतो तिची कोण फे फे उडालेली. हाश हूश करत, कपाळावरचा घाम पुसत ती सोफ्यावर फतकल मारते. तर रोजच्या जिने चढण्याच्या सवयीने नवरोबा अगदी आरामात तीन मजले चढून केव्हाच घरात आलेला.
‘’ह्या ''सोसायटीवाल्यांना कामं नकोत करायला. फुकटचे चेअरमन, सेक्रेटरी झालेत लेकाचे. आम्ही पैसे मोजतो मेंटेनन्सचे. चिंचोके नई काई !'' बायको भलतीच उखडली होती.
सावज आता शिकारीच्या टप्य्यात आलंय, नवरोबाने अचूक हेरलं.
''त्या सोसायटीवाल्याना दोष देते आहेस, पण स्वतःच्या देहाकडे पहा जरा. सगळीकडंनं, सुटली आहेस मैद्याच्या पोत्यासारखी ! चालण्याची सवय नाही राहिली, तीन जिने चढतांना फा फू होते आहे. चांगलं नाही लक्षण !!'' नवरोबाने अचूक बाण सोडून सावज जेरीस आणलं.
‘’माझ्याबरोबर रोज ‘आकाशवाणी’ शेजारच्या जॉगिंग ट्रॅकवर यायचं.’’
नवरोबाने दूसरा बाण सोडला. सावज आता पुरते गारद. मग संध्याकाळी दोघेही 'डिकॅथलॉन'मध्ये. दोन ट्रॅक सूट, एक स्पोर्ट शूज, टॉवेल, वॉटर बॉटलची उत्साहात खरेदी होते.

दुसर्‍या दिवशी, पहाटे नवरोबा तयार होतो, जॉगिंग ट्रॅकवर जाण्यासाठी. बायको मात्र आळसावून लोळत पडलेली. जॉगिंगला जाण तिच्या चांगलच जिवावर आलेलं.
‘’शिरू तू जा, माझं आणि माझ्या मैत्रिणीचं-स्मिताचं ठरलंय. आम्ही रोज संध्याकाळी जाणार आहोत.'' लाडीक आवाजात बायको.
संध्याकाळी बायको ट्रॅक सूट चढवून, स्पोर्ट शूज घालून ऐटीत लिफ्टने खाली येते. खाली स्मिता तिच्या होंडा सिटीत, गाणी ऐकत वाट बघत असते.
‘’ए रूपाली, ऐक ना, ‘इंद्रप्रस्थं हॉल’ मध्ये साड्यांचा सेल लागलाय, उद्याचाच दिवस आहे. आत्ता जाऊयात? '' स्मिता.
रूपालीला देखिल मोह आवरत नाही. ‘इंद्रप्रस्थं हॉल’मध्ये बायकांची तुडुंब गर्दी. गर्दीत शिरून दोघी चार चार साड्या खरेदी करतात. ‘कित्ती फायद्याचा झालाय सौदा’ अशा अविर्भावात दोघांची पावलं तिथल्या फूड स्टॉलकडे आपसूक वळतात. एक एक प्लेट रगडा पॅटीस, एक एक प्लेट पाणीपुरी हादडून होते. मग दोघींना आपण जॉगिंगला जाण्यासाठी निघालो होतो ह्याची जाणीव होते.
‘’ए, स्मिता, ऐक ना. तशी ही कुठल्याही कामाची सुरवात शनिवारी करूच नाही. उद्या रविवारच आहे. आपण सोमवार पासून जाऊयात जॉगिंगला’’. बायको.
‘’ हो हो नक्की जावुयात सोमवार पासून.’’ स्मिता.
सोमवारी सकाळीच नवरोबा ऑफिस टूरवर निघून जातो, आणि जॉगिंगची ‘टूम’ बोंबलते.

एके शनिवारी बायकोच्या घरी मैत्रीणिंची किटी पार्टी असते.
''अय्या लिना कसली बारीक झालीयस, करतेस काय?'' शलाका विचारते.
‘’ए लिना, सांग ना, सांग. सगळ्या जणी गलका करतात.’’
‘’अगं मी ना, कीनई ‘कीटो डाएट’ फॉलो करते. दहा दिवसात सहा किलो वजन उतरवलं.’’ लिना.
मग लिना, ‘कीटो डायट प्लान’ आणि त्याचे फायदे, सगळ्यांना समजावते. एव्हाना बायकोने सातवा गुलाबजाम मटकावलेला असतो.
‘’ए रूपाली, आपण ही फॉलो करायचं ‘कीटो डाएट’?’’ स्मिता.
‘’हो नक्की करुयात, सोमवार पासून.’’ इति बायको.
असे अनेक सोमवार येतात नी जातात. कधी ‘कीटो डाएट’, कधी ‘जि. एम’ डायट तर कधी ‘दिक्षित डायट’, असे अनेक फंडे मार्केटमध्ये हवा करून असतात.
असे अनेक सोमवार येतात नी जातात. कधी ‘झुंबा’, कधी ‘पिलाटे’ तर कधी ‘योगा’ ह्याची क्रेझ मार्केटमध्ये जोरात असते. पण रूपाली सारखच बहुतांशी लोकांचं पक्क ठरलेलं असतं.
सोमवार पासून ...

--- अनिल सुमति बागुल

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...