Showing posts with label कथेच्या राज्यात. Show all posts
Showing posts with label कथेच्या राज्यात. Show all posts

Tuesday 11 September 2018

म्यॅडम, कम्प्लेंट प्लिज !


बरोबर सात वाजून एकतीस मिनिटांनी प्रा. अपर्णा जोगदंड घराबाहेर पडल्या. उजव्या खांद्यावर पर्स, हातात छत्री तर डाव्या  हातात टिफिन. झपझप पावले टाकत त्या 'डॉकयार्ड' बस स्टॉपच्या दिशेने चालू लागल्या.  त्यांच्या हिशोबाने त्या वेळेत घराबाहेर पडल्या होत्या आणि पुढल्या नऊ मिनिटांत त्या बस स्टॉप गाठणार होत्या. झालंही तसंच. सात वाजून चाळीस मिनिटांनी त्या तिथे होत्या.

इतक्यात मंत्रालयात अप्पर सचिव असणारी मीनल दुसाने पोहचली. तिला हाय - हॅलो करेतो, तिची '२४ लिमिटेड', ही थेट मंत्रालय गाठणारी बस आली देखील, अन मीनलला घेऊन पाठोपाठ भुर्रकन निघून गेली सुद्धा. मागे उरला, मीनलने फवारलेला ' ले मेरिडीन लेडी' परफ्यूमचा मंद अन मादक सुगंध.



तब्बल सात मिनिट उशिराने १९३ नंबरची 'कलिना कॅम्पस'कडे जाणारी, त्यांची डबल डेकर बस आली. प्रा. अपर्णा जोगदंड त्यात चढल्या. नेहमीप्रमाणे मांढरे-साबळे ही चालक-वाहक जोडी होती.  मुंबई विद्यापीठाचं तिकीट साबळेंकडून घेऊन त्या वरच्या मजल्यावर पोहोचल्या. वरच्या मजल्यावर मोजुन तीन-चार प्रवाशी असावेत. डावीकडच्या पुढून तिसऱ्या रांगेतील विंडो सीट वर जाऊन त्या बसल्या.

सावकाशपणे पर्समधून त्यांनी ''इरीक बेरेने''च ''गेम्स पीपल प्ले'' पुस्तक काढून वाचायला सुरवात देखील केली. तीसेक पाने वाचून झाली असतील, कलिना कॅम्पस जवळ आल्याची जाणीव त्यांना झाली. स्वतः च्या व्हिजिटिंग कार्ड्सचा बुकमार्क ठेऊन त्यांनी पुस्तक मिटले, पर्स मध्ये ठेऊन दिले. उतरण्याच्या तयारीने खालचा मजला गाठला. उतरता उतरता कंडक्टर साबळेला त्यांनी  उद्यापासून उशीर न करण्याविषयी बजावले.



विद्यापीठात पोहोचून ‘सायकोलॉजी’ डिपार्टमेंट गाठेस्तो आठ मिनटे उशीर झालाच. आजचा महिन्यातला दुसरा उशीर, अजून एक उशीर म्हणजे हाफ डे कट. त्यांची चरफड वाढू लागली. त्यांनी बेस्ट डिपार्टमेंट मध्ये मांढरे - साबळे जोडीची कम्प्लेंट करण्याचे निश्चित केले.

दिवसभर त्या तश्या अस्वस्थच होत्या. तशातच अस्वस्थतेला आणखी एक कारण होतं, त्यांचा पीचडीचा प्रबंध अद्याप पूर्ण व्हायचा होता. त्यांचे गाईड प्रा. डॉ. व्यास मूर्ती तितकंसं सहकार्य करत नव्हते. तश्या त्या नेट-सेट उत्तीर्ण होत्या. त्यामुळे पर्मनंट व्हायला तशी अडचण आली नव्हती. पण सिक्सथ पे मिळण्यासाठी पीचडी अनिवार्य होती.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सात एकतीसला त्यांनी घर सोडले. झपाझप चालत डॉकयार्ड बस स्टॉप गाठला. बस स्टॉप वर अपेक्षेप्रमाणे मिसेस दुसाने हजर होती. मंत्रालयात सेवन्थ पेची चर्चा असल्याचं मोठ्या टेचात सांगत होती. दिवाळी पूर्वीच एरिअर्स मिळतील. सिंगापूरचा प्लॅन आखातेय वगैरे वगैरे.  एवढ्यात चोवीस लिमिटेड आली म्हणून बरं, नाहीतर खरेदीचा देखिल प्लॅन सांगून झाला असता.

बस यायला जसजसा उशीर होऊ लागला तशी त्यांची चिडचिड सुरु झाली. तब्बल बारा मिनिटे उशिरा आज बस आली होती. बस मध्ये चढता चढता त्यांनी ड्रायव्हर मांढरे कडे रागाने पहिले. तो आपल्याच नादात दिसला. त्यांची चिडचिड आणखी वाढली. वरच्या मजल्यावर कंडक्टर साबळे भेटला. तिकीट काढता काढता तिने बस उशिरा येण्याचा विषय काढलाच. मांढरे बद्दल देखील बोलणं झालं.

आता त्यांना मांढरेच्या बेफिकीरीचा उलगडा झाला. आज गटारी आहे त्यामुळे मांढरे सकाळपासूनच ... शी sss त्यांना भयंकर शिसारी आली आणि त्यांची चिडचिड वाढू लागली. पर्समधून पटकन इनो तोंडात टाकून त्यांनी पाण्याचा मोठा घोट गिळला.

विद्यापीठात शिरता शिरता त्यांना वातावरणात एकदम बदल जाणवला. वास्तविक तब्बल एकवीस मिनिटे उशीर झाला होता. लेटमार्क नक्की होता. पण एचओडी प्रा. डॉ. देवबागकरांनी त्यांच हसून स्वागत केलं. त्यांना घेऊन ते परीक्षा विभागात आले , म्हणाले ‘’आपल्या शिरावर आता विद्यापीठाची अब्रू वाचवण्याची संधी आहे. तुमच्या सारख्या अनुभवी प्राध्यापकांनी ती पार पडली पाहिजे. तातडीने आपल्याला पेपरतपासणी पूर्ण करायची आहे.’’

आता त्यांना सगळा उलगडा झाला. कुलगुरू प्रा. संजय देशपांडेच्या एका निर्णयामुळे परीक्षेचे निकाल लांबले होते. कुलगुरू सक्तीच्या रजेवर होते.  पेपर तपासणीच्या खटाटोपासाठी देवबागकारांची साखरपेरणी होती तर...

त्यांची चिडचिड वाढू लागली. तशात त्यांना ड्रायव्हर मांढरे आठवला. कंडक्टर साबळेचे शब्द आठवले. ‘’आज गटारी अमावस्या.’’  त्यांना प्रचंड शिसारी आली.

दुसऱ्या दिवशी त्यांनाच चार मिनिटे उशीर झाला. झपझप पावले टाकीत त्या बसस्टॉपपाशी आल्या. मिसेस दुसाने दिसत नव्हत्या. चोवीस लिमिटेड येऊन गेली असावी. त्यांनी घड्याळात पहिले. सात वाजून सत्तावन्न मिनिटे. तब्बल सतरा मिनिटे उशीर. आज मात्र लेटमार्क लागणार. हाफ डे कट. रोज रोज देवबागकार पावत नसतो.

तेव्हढ्यात  बस आली. रागानेच त्या बस मध्ये चढल्या. रागाने मांढरेकडे पाहून बोलणार इतक्यात तोच बोलला.''वो बाई माझी कम्प्लेंट कराच तुम्ही.'' ती अवाक. 

कंडक्टर साबळेच तेच, ताई तुम्ही कम्प्लेंट कराच. त्यांना कळेना काय चाललंय?मग साबळेंनीच सविस्तर खुलासा केला. मांढरेचा मेहुणा मुंबई महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर होता. देवनार डम्पिंग ग्राउंडचं कसलं तरी मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं होतं. तिथे सुपरवायझर म्हणून त्याला मांढरे हवा होता. म्हणून तो मांढरेच्या मागे होता. नोकरी सोड असा त्याचा आग्रह होता. पण मांढरेला नोकरी सोडायची नव्हती. काही कारणाने तात्पुरतं निलंबन झाल तर अर्ध्या पगारात घरी राहता येणार होतं, चौकशीचा फार्स संपेतो.

कोणीतरी त्याची सिरिअस कम्प्लेंट केली तर त्याला हवंच होतं. प्रा. जोगदंडनी ती करावी असं त्याला वाटत होतं.

त्यांच्यासाठी हे सगळं चीड आणणारं होतं. त्यांची चिडचिड सुरु झाली. बीपी वाढल्याचं त्यांना जाणवू लागलं.  त्यांना डोळ्यासमोर मस्टर दिसू लागलं. प्रा. देवबागकार हातात छडी घेऊन मस्टर पाशी उभेच आहेत असा भास होऊ लागला. त्यांच्या उशिरा येण्यामुळे पेपर तपासणी लांबली आहे. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे. नवीन कुलुगुरु डॉ. चहांदे पत्रकारांना सांगतायत असा त्यांना भास होऊ लागला. सगळं काही गर-गर फिरतंय असं वाटू लागलं.

अचानक डोळ्यापुढे अंधारी आली.त्या उभ्या उभ्याच कोसळल्या. साबळेंनी आणि बाजूच्या प्रवाशांनी त्यांना कसबस  धरलं. सीट वर बसवलं. कुणीतरी पाण्याच्या बाटलीतून पाणी घेऊन त्यांच्या चेहेऱ्यावर मारलं.

ह्या सगळ्या गोंधळात मांढरेच लक्ष विचलित झालं. मोठ्ठा आवाज झाला कसलातरी. बस हेलकावे घेत कशावर तरी जोरात आदळली. प्रवाशांचा एकच गलका सुरु झाला. प्रचंड आरडाओरड झाली. प्रा. जोगदंडना पुढचं काही कळण्याच्या आत त्यांची शुद्ध हरपली होती.

आज सोमवार. आठवड्याचा पहिला दिवस. मोठ्या उत्साहानं प्रा. जोगदंड  घराबाहेर पडल्या त्याही अगदी वेळेवर. बसस्टॊप वर पोहचल्या त्याही वेळेत. मीनल दुसाने मात्र नव्हती. कदाचित सिंगापूरला गेली असेल असा विचार करून प्रा. जोगदंड निश्चिन्त झाल्या.

बरोबर सात वाजून एकेचाळीस मिनिटांनी त्यांची १९३ नम्बरची बस आली. ड्रायव्हर मांढरे ने चक्क हसून स्वागत केलं. हे जरा विचित्रच वाटलं त्यांना. कसल्या एव्हढ्या खुशीत असणार मांढरे? त्याची चौकशी चालू झाली का? कुणी केली असेल त्याच्या विरोधात कम्प्लेंट? त्या विचारात पडल्या.

इतक्यात त्यांना साबळे दिसला? त्यांनी साबळेंकडे मांढरे बद्दल विचारलं. साबळे जोरजोरात हसायला लागला. त्यांना हेही विचित्र वाटलं. ह्यापूर्वी साबळेंना असं जोरजोरात हसताना त्यांनी कधी पाहिलं नव्हतं. हसता हसता साबळे पुटपुटला, त्या दिवशी झाला ना मोठा अक्सिडन्ट ! आता मांढरेला निलंबन व्हायची गरज नाही.

प्रा. जोगदंड बुचकळ्यात पडल्या. त्यांना कळेचना. एव्हढ्यात साबळेंनी त्यांना मांढरेच्या पायाकडे बोट दाखवलं.

प्रा. जोगदंड ह्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांच्या अंगावरून भीतीने सर्रकन काटा आला. त्यांचं शरीर शहारलं.  त्यांना...  मांढरेचे पायच दिसत नव्हते. त्याजागी पांढरं पांढरं धुरकट काहीसं दिसत होतं. 

बसल्या जागेवरून त्यांनी साबळेंकडे पाहीले. साबळे गूढ हासत होता. त्यांचं लक्ष साबळेंच्या पायाकडे गेलं. त्यांना साबळेचेही पाय दिसेनात. त्याजागीही पांढरं पांढरं धुरकट काहीसं … बाप रे हा पण !

जीवाच्या आकांताने त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. पण तोंडातून शब्द फुटेना. त्यांनी आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न केला. सारे प्रवासी तिच्याकडे बघून गूढ हसतायत असा तिला जाणवलं. त्यांचं लक्ष त्यांच्या एकेकाच्या पायाकडे जसं जसं जात होतं तश्या त्या भीतीने आणखी हादरत होत्या.  प्रत्येकाच्या पायात पांढरं पांढरं धुरकट काहीसं …

म्हणजे त्यादिवशीच्या त्या अक्सिडन्टमध्ये सगळेच ... मग चमकून त्यांनी स्वतःच्याच पायाकडे पाहिलं...त्यांना स्वतःचेही पाय दिसत नव्हते. त्या धक्याने त्या तिथेच कोसळल्या.

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...