Friday 25 December 2020

दिवाळीचं पोस्त

 



हे का बरं करताय तुम्ही?

समोर बसलेल्या संतोष, विशाल, किशोर आणि ज्ञानेश्वर पैकी, विशालने विचारलं.
त्यांच्याशी बोलता बोलता मी नकळत भूतकाळात शिरलो होतो.


''मामी, दिवाळीचं पोस्त द्या!'' कुणाकडूनस आलेलं, बहुदा ग्रीटिंग कार्ड असणारं, पाकीट आईच्या हातात देत पोस्टमन हमखास मागणी करत असे. आम्ही भावंडं मात्र, कुणाकडून आलंय ग्रीटिंग ह्या उत्सुकतेपोटी ते पाकीट फोडण्यात दंग असायचो. सात -आठ ग्रीटिंग्स हमखास असायची दिवाळीला! मग पोस्टमनची चहा फराळाबरोबर 'पोस्त' देऊन पाठवणी केली जायची.


दिवाळीला पोस्टमन करीता 'पोस्त' द्यायची परंपरा मग अधिक संपन्न केली जायची आणखी कुणाकुणाकडून.
कधी बहुरूपी यायचा पोलीस बनून. काठी आपटत 'पोस्त' मागायचा. कधी दूधवाला, पेपरवाला, तर कधी बोहारीण.
लोक अपेक्षेने यायचे, आई कुणाला निराश करत नसे.


मी भानावर येतो. ते चौघे माझ्याकडे अजून पाहताच असतात. मी का बोलत नाही, हे पाहून बुचकळल्यासारखे.
''अरे तुम्ही चौघे, रोज एव्हढं छान काम करताय साफ सफाईचं, वाटलं दिवाळीच्या दिवसात तुमच्या बरोबर संवाद साधावा म्हणून.''


मग त्यांच्याशी गप्पा मारायला सुरवात केली फराळ करता करता. संतोष जेमतेम दहावी पास. तर ज्ञानेश्वर आणि विशाल बारावी पर्यंत. किशोरचा तर आय टी आय चा 'मशिनिस्ट'चा कोर्स झालेला. हे चौघे सफाई कामगार कंत्राटी. प्रत्येक प्रभागात तीस असे जवळपास सातशे कर्मचारी संपूर्ण नाशिक शहरात आहेत. नाशिकरोडला अजून व्यवस्था सुरु व्हायची आहे.


पहाटे सहा ते दुपारी दोन अशी ड्युटी. मात्र हजेरीसाठी साडेपाचलाच जमायचं. प्रत्येकजण घरून डबा घेऊन येतो. पहाटे साडेपाचला त्याच्या हाती डबा देणाऱ्या, त्या माऊलींना प्रणाम!


आठवड्याची एक दिवस सुट्टी. पण दसरा असो की दिवाळी, सणावाराला, अडीअडचणीला, आजारपणाला पगारी सुट्टी नाही.


''सफाई करतांना काय वाटतं रे तुम्हाला मी सहज त्यांना विचारले.''


''कामाचं काई वाटत नाही, पोटासाठी करणं आहेच. आम्ही छान साफ सफाई करतो परिसराची. पण दुसऱ्या दिवशी तेव्हढाच कचरा असतो रस्त्यावरती. लोकं अगदी सहजपणे फेकत असतात रस्त्यावरती केर-कचरा. अगदी मोठ्या मोठ्या चारचाकी गाड्यांतून फिरणारे सुशिक्षित लोक सुद्धा सर्रास फेकतात गाडीतून कचरा. बिस्लेरीच्या रिकाम्या बॉटल्स, रिकामे पॅकेट्स. तेव्हा संताप येतो, मग चरफड होते. आपण काहीच करू शकत नाही हे थांबवण्यासाठी, हे लक्षात येउन मग वाईट वाटतं.'' 


ज्ञानेश्वरने त्याची खदखद बोलून दाखवली. मग लक्षात आलं, हि एकट्या त्याचीच नसणार वेदना.  उरलेल्या सहाशे नव्यान्नव सफाई कामगारांचीही असणार! असो.


फराळानंतरच्या गरम गरम चहाने त्यांना आता चांगलीच तरतरी आली होती. उत्साहात ते उठले.
प्रत्येकाच्या हातात मग बायकोने फराळाचे पॅकेट ठेवले, त्यांच्या घरच्यांसाठी. आणि मी एक एक नोट.
मनातल्या मनात म्हणत, 'दिवाळीचं पोस्त.'  


anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...