Wednesday 12 September 2018

'अजि म्या कर्नाटकू पाहीला' (भाग पहिला)


बंगळूरू, इथं एका कार्यशाळेच्या निमित्ताने जायचं होतं. काम का तो बहाना था. घुमना-फिरना तो होना ही था. तब्बल नऊ दिवसांचा हा दौरा राहणार होता. मागचा, केरळ सफारीचा अनुभव चांगला होता. त्याप्रमाणेच ह्याही वेळी, विचारपूर्वक नियोजन केलं होतं. दक्षिण-पूर्व कर्नाटक मधून उत्तरेकडे जायचं, तिथून पश्चिमेला कोकण किनारपट्टीला आणि शेवट गोव्याच्या भोज्जाला शिऊन परतायचं. हां, गोवा मात्र निमित्ताला. एअर पोर्ट जवळ असल्याने. बंगळूरू-चित्रदुर्ग-हंपी-बदामी-ऐहोळे-पट्टाडकल-हुबळी-जोग-गोकर्ण-दाबोलीम (गोवा) असा 'अजि म्या कर्नाटकू पाहीला' करणार होतो.

आज सकाळीच मुंबई गाठायची होती. मुंबईहून बंगळूरूला विमानानं जाणार होतो. टॅक्सी साडेसहाला हजर होती. आदल्यादिवशी वेळेवर येण्याचं बजावून ठेवल्याचा परिणाम होता. महिन्यापूर्वी मुलाला-स्वराजला गोव्याला जाण्यासाठी ह्याच क्वीन ट्रॅव्हेल्सची टॅक्सी बुक केली होती. पठ्ठ्या पाऊण तास उशिरा आला होता. त्यात वाटेत 'ट्रॅफिक जॅम'. स्वराजची खूप धावपळ झाली होती. जेमतेम फ्लाईट मिळाली होती. त्यामुळे क्वीन्सवाल्याला दमातच घेतले होते. ह्यावेळी उशीर केलास, तर तुझ्या नावावर कायमची फुली.

आजचा ड्रायव्हरही चांगला वाटला. पण अबोल होता. तेही एक बरं म्हणा. गप्पांच्या नादात ... हो ते 'आंबेनळी घाटा'सारखं काही नको घडायला. छे विचारच नको असं म्हणत डोळे मिटून घेतले झोप येण्यासाठी. शेजारी मनिषाने एव्हाना डुलक्या मारायला सुरवात देखिल केली होती. बाईसाहेबांचं एक बरं आहे. कुठेही, कधीही झोप लागते. पण मला काही प्रवासात झोप लागतं नाही.त्या अबोल ड्रायव्हरने गाडी अगदी वेळेत पोहचवली. क्वीन्सला पुढची संधी मिळणार होती तर...



बंगळूरू विमानतळावरून पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी, आदर्श हॅमिल्टनला जाण्याकरिता टॅक्सी केली. टॅक्सी ड्राईव्हरने गाडीत गाणं लावलं होतं. त्यावर ठेका धरत स्वारी गाडी चालवत होती. आधी वाटलं कुठलंसं कन्नड गाणं असेल. मग कान देऊन ऐकल्यावर शब्द जरा ओळखीचे वाटले. चक्क मराठी गाणं ऐकत होता तो! पण चाल अगदी दक्षिणी पद्धतीची!! मग काय त्याच्याशी बोलायला सुरवात केली. ही अशी गाणी तिथे खास बनवली जातात, तिथल्या मराठी लोकांकरीता. खूप लोकप्रिय देखिल होतात त्यातली काही काही. असं तो सांगत होता.  हे सगळं त्या ''सैराट'' नंतरचं. नागराज मंजुळे बाबा’, हे काय करून ठेवलंत हो...उतरतांना ड्रायव्हरकडून-सतेज पाटील त्याचं नाव, मोबाईल मध्ये ती गाणी घेतली.

दुसऱ्या दिवशी आर्किटेक्चर व इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्रातील नवीन ट्रेंडह्या विषयावर ताज हॉटेल, बंगलोर येथे कार्यशाळा होती. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यातील, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आर्किटेक्ट, इंटेरिअर डिझायनिंग फर्म ह्यांचे प्रतिनिधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. नाशिक मधिल आमच्या संस्थेला, 'धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी'ला (डीआयडीटी), ‘मोस्ट प्रॉमिसिंग इंटेरिअर डिझाईन इन्स्टिट्यूटमहाराष्ट्र, ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले. डीआयडीटीच्या वतीने, मी स्वतः आणि मनिषा दोघांनी सदरचा पुरस्कार स्विकारला. असा पुरस्कार वगैरे मिळाल्याने स्वतः बद्दल, संस्थेबद्दल अभिमान वाटला. पण कार्यक्रम थोडा उशिरा सुरु झाला होता आणि मग लांबलाही. नंतर ताज हॉटेलमध्येच जेवण होतं. एव्हढ्या फाइव्ह स्टार हॉटेलचं जेवण, पण अजिबात आवडलं नाही बुवा. फारच फिक्कट वाटलं...




दुपारनंतर आमचा कर्नाटक दौरा खरा सुरु होणार होता. मग घाईघाईने टॅक्सी गाठली आणि चित्रदुर्गकडे कूच केलं. चित्रदुर्ग, खरतर जिल्ह्याचे ठिकाण. पण गाव लहानच त्या मानाने. इथं आमचा मुक्काम होता हॉटेल मौर्या यात्रीनिवासमधे. आपल्या एमटीडीसीसारखं, केसटीडीसीचं हे हॉटेल. साधंच पण टापटीप. आमच्या रूमच्या समोरच उभा किल्ला-चित्रदुर्ग फोर्ट. हॉटेलचे व्यवस्थापक कदममराठी. मोठा उमदा माणूस, अजिबात टिपिकल सरकारी बाबू वाटला नाही. पट्कन मैत्री झाली. त्यांच्याबरोबर प्रवासाच्या नियोजनाची रात्री चर्चा केली. त्यांनी काही सूचनाही केल्या.
दुसऱ्या दिवशी टॅक्सीची व्यवस्था करून देण्याचंही त्यांनी कबूल केलं. रात्री गप्पा संपता संपता म्हणाले, ''सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक सारखे किल्ला फिरून या, आलात की नास्ता तयार ठेवायला सांगतो. हां पण गाईड आवर्जून घ्या बरोबर’’.

दुसऱ्या दिवशी किल्ला बघायला गाईड- शिवकुमारला बरोबर घेतला. शिवकुमारचं इंग्रजी अगदीच कामचलाऊ. घोकून घोकून पाठ केल्यासारखं. नॉलेजही यथातथा!! किल्ला दाखवण्यापेक्षा स्वतःची फॅमिली स्टोरी सांगत होता बळे बळेच. त्याचा हा रागरंग पाहून अर्ध्यातच त्याला जय कर्नाटककेला. मग पाट्या वाचत वाचत मुशाफिरी सुरु ठेवली.




तर हा किल्ला चित्रदुर्गच काइथं मोठाले दगडशिळा अशा पद्धतीने आहेत की त्यातून विविध प्राण्यांची चित्रे आहेत असे वाटते. उदा. हत्ती, बेडूक वगैरे. हा चित्रदुर्ग, अठराव्या शतकात राजा मदाकेरी नायकाने बांधला. पुढे हैदरअलीने तिसऱ्या प्रयत्नांत तो जिंकला. हैदरअलीने, मदाकेरीला बंदी केलं आणि त्याची हत्या देखिल केली.

थोडं पुढे जाताच चक्क हिडींबा राक्षसणीचं मंदिर दिसलं. हे आमच्यासाठी नवलच होतं. पुढे कळलं, महाभारतातल्या हिडींबाचं, भारतात आणखीही एक मंदीर आहे. हिमाचलमधे कुठेतरी. असंही कळलं, इथंच हिडींबाभीमाच्या मुलाचा, घटोत्कचचा जन्म झाला होता.
फिरता फिरता भरपूर फोटो काढत होतो. दगडाधोंड्यांचे एव्हढे फोटो पहिल्यांदाच काढले. सुंदर देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, असं  महाराष्ट्राऐवजी ह्यालाच म्हणावं, इतके प्रचंड दगड. महाराष्ट्रात काळा कातळ असतो तर इथं पिवळा-सोनेरी.
किल्ला फिरून धापा टाकत खाली आलो, भरपेट नास्ता केला. आत्ताही कदम स्वतः जातीने हजर होते. कदमांनी पुढील पूर्ण दौऱ्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर बरोबर डीलपक्क केलं. दहा मिनिटांत बरोबरचे कपडे घेऊन येतो अस ड्रायव्हर म्हणाला. परत आला तोच, नाही म्हणून पडला, सगळ्या दौऱ्यासाठी. कदम म्हणाले हंपीपर्यंत न्या, तिथे मिळेल दुसरी टॅक्सी. निघालो.

वाटेत एका ठिकाणी ड्राईव्हरने गाडी थांबवली. रस्त्याच्या डाव्या बाजूला पाणीच पाणी. उत्साहाने उतरलो पहायला. रस्त्याच्या कडेला ओळीने गाड्या लागल्या होत्या. जवळंच हारीने हातगाड्या लागल्या होत्या. कुठे गरम गरम चहा, तर कुठे मक्याची कणसं विकली जात होती. एखादा फेरीवाला साबणाच्या पाण्याचे फुगे उडवत होता. आमच्यासारखेच अनेक पर्यटक तुडुंब पाण्याचा साठा नजरेत साठवत होते. हे होतं  तुंगभद्रेचं बॅकवॉटर. यंदा वरुणराजाने या धरण परीसरात भागात कृपा केली होती. वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे एरवी शांत असणाऱ्या पाण्यात लाटा येत होत्या, समुद्रासारख्या. पाऊण तास रेंगाळलो आणि पुढे निघालो.




वाटेत रस्त्याच्या दोनही बाजूला असणाऱ्या टेकड्यांवर सुझलॉन कंपनीच्या  विंडमिल उभारलेल्या दिसल्या. आपले अजस्त्र बाहू वाऱ्याच्या झोतात, गरागरा फिरवत उगाचंच घाबरावतायत असं वाटत होतं.

संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोहचलो हंपीला. इथं गाडीतून बाहेर दिसणारं दृश्य फार भारी होतं. अगदी गोष्टीतल्या वर्णनासारखं! चित्रदुर्गला काल झलक पहिली होती, पण तो आता ट्रेलर वाटू लागला होता. आणि हा पिक्चर!! पिक्चर मात्र फारच हटके दिसत होता. सायंकाळी मुक्काम करून सकाळीच बघायचं ठरलं होतं. त्यामुळे मोह आवरला. 'हॉटेल क्लर्क'ला मुक्कामी गेलो. रिसेप्शन काउंटरवर चौकशी केली टूर प्लॅन साठी, तर त्याने पॅम्प्लेट दिले, अगदी अदबीने. चला काम झालं होत. आता चांगला गाईड मिळायला हवा होता. चित्रदुर्गचा कालचा अनुभव फारसा बरा नव्हता. पॅम्प्लेटवरच्या नंबरवर फोन केला.  माणूस पंधरा मिनिटांत हॉटेलमध्ये हजर. पण तो स्वतः काही येणार नव्हता गाईड म्हणून. त्याचा माणूस पाठवणार होता. ह्याच काम फक्त बुकिंग घ्यायचं. असे सहा गाईड त्याच्याकडे आहेत म्हणाला.

रात्री जेवायला शेजारचंच पिंक म्यॅन्गोगाठलं. हॉटेलकायच्या काय वेगळंच. भारतीय बैठक, मंद पिवळे दिवे. हो पण पिंक काहीच नाही आणि म्यॅन्गो देखिल नाहीत. सात आठ फॉरिनर्स ऐसपैस बसलेले. कन्नड गाणं लाउड लावलेलं. इथे मेनूकार्ड मधे तिबेटियन, मंगोलियन, इटालियन, मेक्सिकन आणि थायलंड अश्या वेगवेगल्या देशांच्या डिशेस.  त्यातला तिबेटियन रोल कबाब आणि मंगोलियन फ्राईड राईस मागवला. राईस चविष्ट होता पण कबाब फारच सुखे सुखे.

ऑर्डर देतांना बहुदा त्याला कळलं असावं आम्ही मराठी आहोत. पुढच्या पाच मिनिटांनी सैराटचं झिंगाटसुरु झालेलं. मालक एकदम प्रोफेशनल. पण कस्टमरफ्रेंडली. गिऱ्हाइकाला जे आवडेल ते द्याव, असा खाक्या असलेला. मजा आला.
आज सकाळी लवकरच जाग आलेली. संध्याकाळी गाडीतून पाहिलेली दगडांची ती अद्भुत दुनिया खुणावत होती. नऊच्या ठोक्याला गाईड हजर. चंद्रशेखर गुट्टी नाव त्याचं. प्रथम दर्शनी चांगला वाटला. दिवसभरात काय काय बघायचं त्याच्याशी चर्चा केली. म्हटलं जास्त चालण्याचे, उंच चढण्याचे पॉईंट्स पहिले करून घेऊ. रणरणत्या उन्हात नको. असंच करूया म्हणाला. हेमकुटा हिलपासून सुरवात करूया.




हेमकुटा हिल, ही अगदी छोटीशी टेकडी वजा जागा. हेमकुटा म्हणजे सोन्याने मढलेली वास्तू. टेकडीवरच्या पिवळ्या-जर्द शिळा जणू निसर्गाचं सोनंच. पण टेकडी चढल्यावर गाईड बोलेच ना. त्याने तिथे असलेल्या बाकांवर बसण्याची खुण केली. मग दीर्घ श्वास घेतला आणि सफाईदार इंग्रजीत सांगायला सुरवात केली. ''हजारो वर्षांपूर्वी, (काही लोक असं मानतात की समुद्रमंथनाच्या वेळी) ह्या भूभागात ज्वालामुखीचा प्रचंड विस्फोट झाला. त्याने इथल्या भूभागाची भयंकर उलथापालथ झाली. भूगर्भाच्या खालच्या स्तरातल्या दगडांच्या शिळा वर आल्या. अनेक ठिकाणी त्या एकमेकांवर ठेवल्या गेल्या. त्या ज्या स्थितीत ठेवल्या गेल्या, त्या तश्याच आजही हजारो वर्षा नंतरही टिकून आहेत. ह्याला आज भूगर्भशास्त्रानुसार 'वेट बॅलन्सिंग टेक्निक' असं मानतात. ह्याच टेक्निकचा वापर पंधराशे वर्षांपूर्वी 'चालुक्य'च्या काळात मंदिरे बांधताना स्थापत्य कलेत करण्यात आला.''

गाईडने परत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, चला...
एका भली मोठी गणपतीची मूर्ती असलेच्या मंदिरापाशी तो थांबला. ''चांगल्या कामाची सुरवात ''गणपती'' पूजनाने करतात, म्हणून ह्याच दर्शन पाहिलं. ह्याच नाव ''मस्टर्ड गणेशा''. नंतर आपण ''पीनट गणेशा'' मंदीर देखिल पाहणार आहोत. गणपतींची ही नावं त्या मूर्तीच्या पोटाच्या आकारावरून पडली आहेत.

आता आम्ही टेकडीच्या उंचावरती पोहोचलो होतो. वरून सभोवार दिसणारं, सारं काही अदभूत आणि अवर्णनीय! सोन्यासारखे चमचमणारे विरुपाख्य मंदिरांचे कळस, त्यापलीकडे तुंगभद्रा नदी, नदीपल्याड अंजनेरी डोंगर, डोंगरावर हनुमान मंदिर!! सभोवताली मोठमोठाल्या शिळा एकमेकांवर अलगद ठेवल्यासारख्या. कधीही पडतीलशा वाटणाऱ्या, तरीदेखील अविचलवर्षानुवर्षे, शतकानुशतके!!!

इथल्या अंजनेरी डोंगरावर हनुमान मंदिर आहे. हनुमानाचा जन्म इथे झाल्याचा गाईड सांगत होता. त्याला म्हणालो आम्ही नाशिकचे आहोत. आमच्या इथं त्रंबकेश्वर जवळ अंजनेरी डोंगर आहे. हनुमानाचा जन्म तिथे झालाय असं वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकत आलोय. हे ऐकून त्याने फक्त खांदे उडवले - 'गॉड क्नोज ', अशा अर्थाने.
थोडं पुढे जाताच सुमधुर आवाजातलं कन्नड भाषेतलं कसलंस स्तोत्र ऐकू येत होतं. फारसं समजत नव्हतं काही, पण प्रसन्न ऐकावंसं वाटत होतं. गाईड म्हणाला ललित स्तोत्रआहे. आवडलं असेल तर डाउनलोड करून घ्या, यूट्यूब वर आहे.

टेकडी, आता पलीकडच्या बाजूने उतरण्यास सुरवात केली. त्या सोनेरी कळस असलेल्या विरुपाक्ष मंदिराकडे आता आम्ही जाणार होतो. आजूबाजूला माकडांचा वावर वाढला होता. तीस एक तरी असावीत परिसरात. त्याला त्या माकडांबद्दल विचारलं. तो सांगू लागला कि इथं वर्षानुवर्षे माकडं आहेत. इथं केळी आणि ऊस हि दोन पिकं प्रामुख्यानं घेतली जातात. आणि त्यावर हि माकडं पोटं भरतात. शिवाय मंदिरातला प्रसाद असतोच. येणारे पर्यटक देत असतात काही-बाही. बाकी तसा त्यांचा त्रास नसतो काही.



इतक्यात एक सरडा दृष्टीस पडला. आश्चर्य म्हणजे भगव्या रंगाचा. मनात म्हटलं, सरडा हुशार आहे. परिस्थितीचा रंग बघून सरड्यासारखा रंग बदलाय त्याने.

हळूहळू मंदिर जवळ येत होतं. आता ललित स्तोत्राचा आवाज आता खणखणीत ऐकू यायला लागला होता. सातव्या शतकात, चालुक्याच्या काळात ह्या मंदिराची निर्मितीची सुरुवात करण्यात आली. विजयनगर साम्र्याज्यातील राजा देवराया (दुसरा) ह्याने भव्य शिव मंदिर उभारले. एकूण तीन मंदिरे इथे आहेत. पुढे राजा कृष्णदेवराय ह्याने सभामंडप आणि विजयस्तंभ उभारून त्यात काही भर घातली. ह्या सभापंडपात अतिशय स्वस्त दरात, धार्मिक पद्धतीने पूर्वीपासून विवाह केले जातात. अनेक गोर गरीब आणि धनिक लोक देखिल इथे लग्नबंधनात अडकण्यास, आजही पसंती देतात. ह्या वास्तूला वर्ल्ड हेरिटेज स्ट्रॅकचरअसा दर्जा मिळालेला आहे.




हे सर्व पाहण्यात आम्ही गुंग होतो. आमचा गाईड सगळं काही रंगवून सांगत होता. इतक्यात त्याने आमचे लक्ष एक मोठा ढोल दाखवून त्याकडे वळविले. हजारो वर्षा पूर्वीचा तो ढोल असल्याचे सांगितले. पण तो आता वापरात नाही म्हणाला. लगेच तुलनेने छोट्या, दुसऱ्या ढोलाकडे बोट करून तो म्हणाला, माझ्या लहानपणी मी हा ढोल आरतीच्या वेळी वाजवत असे.

त्या बदल्यात पुजारी मला प्रसादाचा लाडू देत असत. पण आता हा, देखिल कोणी वाजवत नाही. असं म्हणून त्याने स्वयंचलित ढोलकडे लक्ष वेधलं. आता हा वापरला जातो. आता आरती, मंत्र सगळंच रेकॉर्ड लावून. सांगतांना त्याचा स्वर किंचित खिन्न लागला होता.

काही क्षणांत त्याने स्वतःला सावरले. पूर्वीच्या उत्साहाने त्याने आम्हाला एका छोट्या मंदिराकडे नेले. हे पहा शिव-वैष्णव मंदिर. हे त्यावेळचे 'सोशल इंजिनीरिंग’. आम्हाला कळेना ह्यात कसलं 'सोशल इंजिनीरिंग'? आमच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे पाहून त्याने खुलासा केला. पूर्वी शैव आणि वैष्णव असे दोन पूजा पद्धतीचे दोन पंथ होते. त्यांच्यामध्ये शंकर आणि विष्णू ह्यांच्या श्रेष्ठत्वावरून प्रचंड वाद असत. अगदी शस्त्रे देखील उगारली जात. हे पाहून राजा कृष्णदेव रायने दोन्ही मूर्ती एकाच ठिकाणी स्थापून दोन्ही पंथात समेट घडवून आणला. सांगतांना गडी जोशात आला होता. मघाची खिन्नता तुंगभद्रेच्या पार पळून गेली होती. उत्साहात त्याने एका नंदीच्या मूर्तीजवळ आम्हाला नेले.


हा 'त्रिकाल नंदी'. हा इतरांपेक्षा वेगळा आहे. ह्याला तीन तोंडे आहेत. पूर्वी हा मुख्य देवळात स्थापन केला होता. पण कालांतराने ह्यातील एका तोंडाचा काही भाग तुटला. आणि पूजेसाठी अखंड मूर्ती लागते, खंडित चालत नाही. म्हणून मंदिरातून हलवून त्याला इथं ठेवलंय. 'त्रिकाल नंदी'ची तीन तोंडे म्हणजे अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे त्रिदेव असं पूर्वी मानला जायचं. हा, पण माझं म्हणणं वेगळं आहे. असं म्हणून त्याने आमच्याकडे पाहीले. भुवई उडवत त्याने प्रश्नार्थक चेहरा केला. आमच्या कडून उत्तर येत नाहीसे पाहत तो म्हणाला, तीन तोंडे म्हणजे तीन काळ-त्रिकाल! भूत, वर्तमान, आणि भविष्य काळ!! तुटलेल्या तोंडाला तुम्ही भूतकाळ मानलेत, त्या पासून काही शिकलात तर तुमचा वर्तमान आणि भविष्य सुरक्षित असेल. काय छान बोलून गेला होता तो!

आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापाशी आलो होतो. दर्शनासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. आम्हाला रांगेत उभे न करता, पठया विरुद्ध बाजूने गाभाऱ्यात शिरू पाहत होता. पुजारीही कन्नड भाषेत, अगम्य शब्दात त्याच्यावर खेकसला. त्यावर गाईडने काहीतरी उत्तर दिलं. आमचा प्रवेश सुकर झाला. हे बहुदा त्यांचं रोजचंच असावं.




मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणेला मागच्या बाजूस गेलो. इथं मूर्तीच्या बरोबर मागे छपरामधून सूर्यप्रकाश खाली जमिनीवर येत होता. त्याने आम्हाला थांबवले. मनिषाला म्हणाला हात जोडा. ते हात त्याने त्या प्रकाशाच्या झोताच्या जवळ धरण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य ! हात जोडलेल्या मनिषाच्या चेहऱ्यावर प्रकाशझोत गेला. असा भास होत होता की तिने हातात पणती धरली असून त्याच्या ज्योतीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पसरून चेहरा उजळला आहे. व्वा लाजवाब !! तो क्षण मोबाईल च्या कॅमेऱ्यात टिपण्यास अजिबात विसरलो नाही.

आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो होतो. गाभाऱ्याच्या बाहेर येतांना त्याने, त्या मघाच्या पुजाऱ्याला पंचवीस रुपये दक्षिणा देण्यास सांगितलं. हि अशी सेटिंग होती तर!
आता गाभाऱ्याच्या दरवाजाकडे बोट करून त्याने आम्हाला त्यावरचं नक्षी- काम बारकाईने बघण्यास सांगितले. ह्यात काही खटकतं आहे का?  त्याच्या प्रश्नावर आम्ही अधिक बारकाईने पाहू लागलो. मूळ चित्रापेक्षा निळा रंग वेगळा वाटला. काही न बोलता तो आम्हाला मंदिरा बाहेर घेऊन आला. कळसाकडे बोट करून त्याने परत तसाच प्रश्न केला. ह्यात काही खटकतं आहे का? हे पाहणं थोडं अवघड. डोक्यावर टळटळीत ऊन, कळस वीस मीटर उंच. फार काही नीट दिसेना.

मग एका ठिकाणी बोट करून तोच म्हणाला,'' ह्या मंदिरावरचं हे ब्रिटिश आक्रमण. स्वातंत्रपूर्व काळात मंदिर दुरुस्ती करतांना ब्रिटिशांनी, ह्या कळसावर व्हिकटोरीय राणीची प्रतिमा लावली आहे. आणि आत गाभाऱ्यावर निळा रंग देऊन, दोन अँजेल देखिल कोरलेत. निव्वळ खोडसाळपणा, दुसरं काय''. सांगतांना त्याचं रक्त तापल्याचं जाणवत होतं.

मंदिर परीसराबाहेर, समोर एक खूपसं पाणी असलेला तलाव होता. त्याला असंख्य पायऱ्या. हा आयताकृती तलाव म्हणजे 'पूष्करणी'. हा तलाव भरला कि ह्यातलं पाणी तुंगभद्रा नदीत सोडतात. चला आता आपण तुंगभद्रा नदी पाहुयात.
आम्ही नदीपाशी पोहचलो. पाण्याने तुडुंब भरलेली तुंगभद्रा विलोभनीय दिसत होती. मनात आलं ही अशीच वर्षानुवर्षे 'त्रिकाल' वाहत राहणार 'शिवाला' साक्ष ठेवत.
एव्हाना ऊन डोक्यावर आलं होतं. पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. गाईडच्या ते लक्षात आलं असणार. घाईने तो म्हणाला आता मी तुम्हाला छानश्या हॉटेलमधे घेऊन जातो. जाता जाता आणखी एक मंदिर पाहून जाऊ, वाटेतच लागेल.
सकाळच्या मस्टर्ड गणेशा बरोबरचा, हा 'पीनट गणेशा'. मस्टर्ड गणेशाची मूर्ती अवाढव्य त्यामानाने मंदिर लहान होतं, इथं त्याच्या उलट! मंदिर उंचीने आणि आकाराने अवाढव्य तर मूर्ती तुलनेनी खूपच लहान. पण मंदिरातले खांब छान कलाकुसरीने नटलेले.

एकदाचं हॉटेल गाठलं. नाव 'म्यॅन्गो ट्री'. ह्याही हॉटेलच्या नावात परत 'म्यॅन्गो’. कालच्याच 'पिंक म्यॅन्गो'ची नेक्स्ट एडिशन. इथं मात्र इंडियन फूड मिळालं. तुडूंब जेवण केलं.



आता आम्ही जाणार होतो 'विजय-विठ्ठल मंदिर' परिसराकडे. 'म्युझिकल पिलर्स'साठी हे मंदिर प्रसिद्ध. इथला 'स्टोन चॅरिएट', फोटोग्राफर्सच्या खास आवडीचा.
आमची कार त्या परिसरात आल्यानंतर गाईडने एका ठिकाणी थांबायायला सांगितलं. तिथून पुढे गाडी नेता येणार नव्हती. तिथून पुढे मंदिरापाशी जाण्याकरीता वेगळी व्यवस्था होती. बॅटरी ऑपेरेटेड गाडीने तिकीट घेऊन जावं लागणार होतं.

इथं लक्षात आलं, इथं पूर्ण महिला-राज आहे. तिकीट देणारी, गाडी चालवणारी दोघीही स्थानिक तरुणी होत्या. अशा सहा एक जोड्या असाव्यात. फार उत्साहात त्यांचं काम चालू होतं. अशाच एका गाडीने आम्हाला मंदिरापाशी पोहोचवलं. त्या उत्साही ड्रायव्हर तरुणीला म्हणलं, तुझा फोटो काढायचाय, तर तिने छान पोझ देऊन फोटो काढू दिला.

आता आम्ही मंदिर परिसरात पोहोचलो होतो. आत शिरताच काहीतरी छान बघायला मिळणार ह्याची खात्री पटली. मुख्य विठ्ठल मंदिर, संगीत सभागृह, नृत्य सभागृह आणि भजन सभागृह अशा चार वास्तू. विजयनगर साम्राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाच्या साक्षीदार! इथं सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतांनाच वातावरण कसं असेल हाही विचार आला आणि अंगावर रोमांच उभे राहिले. ह्या विचारातून मला गाईड गुट्टीने बाहेर काढले.

चला आपण आता विठ्ठल मंदिर पाहू. आत शिरताच गाभाऱ्यात डोकावलो. इथं तर मूर्तीच नाही. मग तो सांगू लागला, परकीय आक्रमणाच्या वेळी इथली मूर्ती नष्ट केली गेली असावी अशी एक शक्यता. पण दुसरी शक्यता मला योग्य वाटते. म्हणे की, इथल्या पुजाऱ्यांनीच सुरक्षितता म्हणून मूर्ती स्वतःहाच काढून दुसरीकडे नेली असावी.
असं म्हणतात की पंढरपूरला जी विठ्ठल मूर्ती आज आपण पाहतो ती हिच. तो हेही म्हणाला की ह्याला प्रमाण, तुमचे मराठीतले 'कानडा राजा पंढरीचा', 'कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकू' हे प्रसिद्ध अभंग. त्याचं मत आम्हाला पटत होतं.




मग त्याने आम्हा दोघांना विचारलं,’’ब्रेक डान्स म्हटलं की कुणाच नाव आठवतं? मनिषा पट्कन म्हणाली ‘’ मिथुन’! मी ही मान डोलावली. गाईड गुट्टी समाधानी नव्हता. त्याच्याही आधी? मोअर फेमस? मी म्हणालो मायकेल जॅक्सन. त्याने मान डोलावली. आपण समजतो ब्रेक डान्सहा नृत्यप्रकार विदेशी लोकांकडून आपण शिकलो. पण तसं नाहीये. इथंच फार पूर्वी आपले लोकं तो डान्स करत असत. आम्ही पूर्ण गोंधळून गेलो होतो. मग आमच्या लक्षात आलं. ह्याची काहीतरी ट्रीक आहे. हा नक्की काहीतरी दाखवणार. त्याची हि स्टाईल एव्हाना आमच्या परिचयाची झाली होती. मग तो आम्हाला एका खांबाजवळ घेऊन गेला. त्यावर एका नर्तिकेचं चित्र कोरलं होतं नाचतांनाचं. आणि तिचा तो नृत्यप्रकार चक्क आताचा ब्रेक डान्सचं! आम्ही गुट्टीला हसून दाद दिली. माणूस अगदी मार्मिक बोलायचा.

आता उत्सुकता होती ते 'म्युझिकल पिलर्स' पाहण्याची. पाहतो तो काय, ते खांब जिथे होते त्या संगीत सभागृहात जाण्यासाठी मज्जाव. ASI (ऑर्चिलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) ची आदेशवजा पाटी, जोडीला सुरक्षारक्षक.




काही वर्षापूर्वी 'म्युझिकल पिलर्स'चं रहस्य शोधून काढण्याकरिता एक दोन खांब तिथून बाहेर काढले लोकांनी. पण त्यांना शोधता आलंच नाही रहस्य. पण म्हणून आतून पाहण्याकरिता बंदी. अजून काही पडझड होऊ नये म्हणून. मन खट्टू झालं. गुट्टी म्हणाला डोण्ट वरी, आय विल ट्राय माय बेस्ट. मग हळूच आम्हाला वास्तूच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिथे सुरक्षारक्षक नव्हता. दबक्या पावलांनी तो वर चढला, म्युझिकल पिलर्सपाशी हात पोहचेतोवर. मग आमच्याकडे खूण करत नीट कान देऊन ऐकण्यास सांगितले. चारही पिलर्सवर एकामागोमाग बोटे आपटली. अहो आश्चर्यम, मंजुळ नादस्वर ऐकू आले. स्थापत्यकलेतील सौंदर्य! ज्याने हे बनवले असेल, त्या कारागिराला मनोमन वंदन केले.

गुट्टीने मग आणखी एक ट्रिक दाखऊन कमाल केली. म्हणाला तुमचा एक मोबाईल द्या माझ्याकडे. मनीषाने लगेच दिला. त्याने मग त्यातला कॅमेरा

ऑन केला. आता मी सांगतो तश्या पटापट हालचाल करायच्यात आणि सांगेन त्या पोझिशनला जाऊन उभं रहायचं जोडीने. त्याने खुणा केल्यावर आम्ही त्या त्या जागी उभे रहायचो, तो पट्कन क्लिक करायचा. तिसऱ्यावेळी क्लिक केल्यावर त्याने जवळ बोलावले. आम्ही मोबाईल मध्ये पाहू लागलो. एकाच फोटोत, आम्ही दोघं, तीन ठिकाणी उभे! गुट्टीला मनापासून दाद दिली.

एव्हाना सायंकाळचे पाच वाजून गेले. परिसर बंद व्हायची वेळ झाली. सुरक्षारक्षकांच्या खुणेच्या शिट्ट्या वाजू लागल्या अन नाईलाजाने परतावे लागले. गाईड चंद्रशेखर गुट्टीने सकाळपासून खूप छान माहिती दिली होती. अतिशय सभ्य आणि सरळ मनाचा वाटला तो. त्याचे आभार मानले आणि त्याला निरोप दिला.

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...