Tuesday, 11 September 2018

प्रिय रेखा!




आज दहा ऑक्टोबर. आज तुझा वाढदिवस. तुझं वय किती असा फिजूल प्रश्न मी विचरणारचं नाही.पण तुझ्याशी बोलण्याच धाडस मात्र करणार आहे मी आज!!

तुझं पूर्ण नाव - रेखा जेमिनी गणेशन. हिंदी सिनेसृष्टीतील एकेकाळची आघाडीची नायिका. एक सदाबहार, खूबसूरत, गहिऱ्या डोळ्यांचं, गूढगर्भ व्यक्तिमत्व!

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी तू, बालकलाकार म्हणून एका तमिळ चित्रपटाद्वारे, आपल्या चित्रपट कारकिर्दीला प्रारंभ केलास. तर वयाच्या सतराव्या वर्षी नायिका म्हणून हिंदी चित्रपटाद्वारे पदार्पण केलंस. 'सावन भादो'  हा तुझा पहिला चित्रपट.

चित्रपट बॉक्स ऑफिस वर यशस्वी ठरला आणि तुझा त्यातला अभिनयही वाखाणला गेला. पण काळी - सावळी, ठेंगणी - ठुसकी, जाडगेली असंही हिणवलं गेलं तुला.

पण तू हार मानली नाहीस! कष्टसाध्य योगसाधनेतून तू आपल्या शरीराचा सौंदर्याचा अक्षरशः कायापालट केलास ! आपल्या हिंदी उच्चारात कमालीची सुधारणा केलीस. उर्दूचा लहेजा आत्मसात केलास. आणि मग आपल्या एके से एक अभिनयसंपन्न भूमिकांनी पुढची दोन दशके हिंदी सिनेसृष्टी गाजवलीस.

तुझा एक एक चित्रपट आठवून पाहता...प्रत्येक वेळी वेगळ्या धाटणीची, वेगळ्या शेड्सची भूमिका साकारतांना आपल्या अभिनयाचं नाणं तू  चोखपणे वाजवलंस. ''खूबसूरत' मधली अवखळ रेखा, 'खून भरी मांग '' मधली सुडाने पेटलेली रणरागिणी रेखा, ''उत्सव'मधली मादक सौंदर्यवती रेखा, 'मुकद्दर का सिकंदर' मधली प्रेमिका रेखा, 'घर'' मधली घरगुती गृहिणी रेखा ते थेट ''उमराव जान'मधली तवायफ रेखा ! प्रत्येक भूमिका तू  जगत आलीस . कवाली, मुजरा, शास्त्रीय नृत्य असो वा टिपिकल बॉलीवूड नाच, प्रत्येक प्रकारांत तुझी  पावले दमदारपणे थिरकली आहेत. तुझ्या  अभिनय कौशल्यावर प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर तर केव्हाच उमटली होती.   उमराव जान आणि खून भरी मांग साठी अभिनयाचं 'फिल्मफेअर' हि तुला  मिळालं. अनेक छोट्या मोठ्या पुरस्कारांसोबत भारत सरकारने तुला 'पद्मश्री'देऊन गौरवलं.

हिंदी सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बरोबर तुझी  जोडी जमली आणि मग मुकद्दर का सिकंदर, सुहाग, मि. नटवरलाल, अशा एक से एक हिट चित्रपटांचा ''सिलसिला'' सुरु झाला. नायक अमिताभच्या प्रेमात ''रील'' लाईफ मध्ये आकंठ बुडालेली तू  ''रिअल'' लाईफ मध्ये ही तशीच होतीस  का ? तुझ्या ''मन की बात'' काय असावी? प्रत्यक्षात जया भादुरीशी अमिताभ विवाह करता झाल्यावर ''तुझ्या '' भावना काय होत्या? कशाचीच उत्तरे आम्हाला  मिळाली नाहीत गं. आणि खरं सांगू त्याच्या उत्तरांची तितकीशी गरजही नाही वाटत आता.

पुढे विनोद मेहेराच्या अकाली मृत्यूनंतर कधीतरी तू, शशी अगरवाल ह्या उद्योगपतींशी लग्न केलंस. अवघ्या एका वर्षात  वैवाहिक जीवन संपुष्टयात आलं. तुझ्या पतीने आत्महत्या केली म्हणे! सगळंच गूढ, अतार्किक!!

आज आयुष्याच्या उत्तरार्धात, आपला जन्म दिवस साजरा करताना, रेखा जेमिनी गणेशनने  परमेश्वराकडे काय मागितलं असेल ?

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...