इंदूरमध्ये राहणाऱ्या
सुयश दीक्षित ह्या पट्ठ्याने काल कमालच केली. इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये
एक मोकळा प्रदेश आहे, बिर ताविल नावाचा.
हा प्रदेश म्हणजे माझा नवा देश असल्याचे त्याने चक्क घोषित केलं राव ! नावही ठेवलं भाऊंनी ... ‘किंगडम ऑफ दीक्षित.
असे अनेक अवलिये असतात आजूबाजूला आपल्या. त्यांचे कारनामे सुरु
असतात. उजेडात आले की होतो आपण अचंबित !
दिवाळी पूर्वी असाच एक अवलिया
उजेडात आला ... प्रसाद निक्ते नाव त्याचं !
सह्याद्री आणि सातपुड्याच्या
घाटमाथ्यावर ७५ दिवस, १००० कि. मी. एकट्याने पायी चालत
होता हा माणूस.
अमोल यादव नावाच्या अशाच एका
अवलियाने इमारतीच्या टेरेस मध्ये विमान बनवलं.असंच कुणी सायकल वरून जगाला
प्रदक्षिणा घालू पाहतं, कुणी पाण्यावर योगा करण्याचा
विश्वविक्रम करत असतं. काल परवा अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या शीख आजीने वयाच्या
८० व्या वर्षी कसलीशी म्यॅरेथॉन स्पर्धा जिंकली.
हे असं काही करता येणं … किंबहुना असा विचार सुद्धा येणं, ह्याला जातकुळी वेगळीच असावी लागते. अशा लोकांचा डी एन ए काही वेगळाच असतो.
बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य आठवतं अशावेळी.
''वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, किंबहुना वेडी माणसंच इतिहास घडवतात !''
दुःख तेव्हा होतं जेव्हा आपल्याला
असं वेडं होता येत नाही ही जाणीव होते आणि आपला खुजेपणा उघडा पडतो त्यावेळी.
तरीही जगभरातल्या अश्या वेड्यांना माझा दिलसे सलाम !
''किंगडम ऑफ दीक्षित'' कि जय हो !!
anilbagul1968@gmail.com

No comments:
Post a Comment