Monday 24 September 2018

कारवां...



कारवां...
अ ह... आत्ताचा इरफानखानचा नाही. कारवां म्हटलं की तोच तो आरडीने धमाल संगीत दिलेला, नासीर हुसेनने कमाल डीरेक्ट केलेला. सत्तरच्या दशकातला. ह्याकारवांने माझ्या मनात पक्क घर केलं आहे, गेली कितीतरी वर्ष !

पिया तू अब तो आजा, दिलबर हा दिलबर, चढती जवानी मेरी चाल मस्तानी, कितना प्यारा वादा आणि सगळ्यात धमाल म्हणजे ... दैया हाय में ये कहाँ आ फसी. सगळी सुपरहिट गाणी. अरुणा इराणी, जितेंद्र आणि आशा पारेख तिघेही एकापेक्षा एक सरस डान्सर. सत्तर एमएमचा पडदा व्यापून एकशे ऐशी मिनिटे अथक नाचत असतात चित्रपट संपेपर्यंत.

हे 'कारवां'चं गारुड माझ्या लहानपणीच सुरु झालेलं. मला आठवतंय चौथी-पाचवीत असेन मी बहुदा. नेरळलास्वीट कॉटेजमधे आम्ही रहात असू. आमच्या शेजारी म्हणजे अलकाताईच्या घरी मी नेहमी जात असे खेळायला. त्यांच्याकडे एल पी रेकॉर्ड वाजवण्याचा ग्रामोफोन होता सोनेरी रंगाचा ! काळ्या कुळकुळीत रंगाच्या तबकड्या (रेकॉर्ड्स) असायच्या. मधोमध लाल रंगाचा कागद असायचा. त्यावर एच. एम. व्ही. कंपनीचा लोगो आणि नाव. लोगो, तोच तो, कुत्रा बसून गाणं ऐकतोय असं चित्र असलेला. एच. एम. व्ही. कंपनी भारतीय संगीत क्षेत्रात अग्रेसर होती त्याकाळात.


तर ती तबकडी खालच्या वर्तुळाकार फिरत्या बेसवर अलगद बसवायची, मग तबकडीवर असलेल्या रेघेवर काळजीपूर्वक पिन ठेवायची. पिन ठेवतांना जागा जरा जरी चुकली तर काचेवर ओरखडे ओढल्यासारखा आवाज व्हायचा. त्याचा परिणाम म्हणजे गाण्यात खरखर यायची. मला हे काम नाही जमायचं. त्यामुळे मी स्वतः गाणं लावायची रिस्क घ्यायचो नाही. मग गाणं लावायचं असलं की अलाकाताई लागायची. तीही लावून द्यायची प्रेमाने.


लहानपणीचा हा 'कारवां’, सिलसिला पुढे माझ्या कॉलेजात आला माझ्याबरोबर. पूर्वी रस्त्यावर पडद्यावर पिक्चर दाखवले जायचे रात्रीच्या वेळेला. गणपतीच्या उत्सवात कॉलेजच्या होस्टेल कॅम्पसमधेही असे पिक्चर दाखवले जायचे. माझ्या कॉलेजच्या पहिल्याच वर्षी, हा 'कारवांदाखवला गेला. 'कारवांचित्रपट तेव्हां पहिल्यांदा पाहीला. लहानपणी त्याच्या गाण्यांच्या प्रेमात होतो आणि आता चित्रपटाच्या. पिक्चर एन्जॉय करणं म्हणजे काय असतं त्याचा मस्त अनुभव घेतला त्यावेळी. पाहणारे सगळेहोस्टेलाईट स्टुडंट’. गाणं सुरु झालं, की शिट्यांचा पाऊस सुरु व्हायचा. काही ग्रुप हात वर करून फक्त चीत्कारायचे. काहींचा ढिनच्यॅक नाच सुरु व्हायचा. हा उन्माद एव्हढा, की गाणं संपायच्या क्षणी ओरडा व्हायचा वन्स मोअर, वन्स मोअर ! प्रत्येक गाणं दोन दोन वेळेस ऐकलं पोरांनी. रात्री नऊला सुरु झालेला पिक्चर पहाटे एक पर्यंत चालला.


गंमत इथंच संपत नाही. मध्यंतरीव्हिएतनामला गेलो होतो फिरायला, तिथेही होतंच 'कारवां'चं गारुड जोडीला. ‘होचिम्हीनह्या तिथल्या राजधानीतला प्रसंग. रात्री 'व्हेस्पा ऍडव्हेंचर टूर' एन्जॉय करत होतो. सायगांव (होचिम्हीन) शहरात वेस्पा स्कुटर्स वरुन फिरायचं सहा-सातच्या ग्रुपनी. त्यावेळी वेगवेगळ्या हॉटेल्समधे घेऊन जातात तिथे. माझ्याबरोबर एक जर्मन आणि एक ब्रिटिश कपल होतं. असच एका रेस्टोरंन्टमधे जेवण चालू होतं साग्रसंगीत. हो म्हणजे गाणी ऐकत. प्रत्येकानं आपापल्या आवडीचं गाणं ऐकवायचं आणि सांगायचं, ह्या गाण्याला स्वतःच्या आयुष्यात काय स्थान आहे, असं. शेवटी माझी पाळी आली. मग मी माझा मोबाईल काढला आणि हॉटेलच्या सिस्टमला जोडला, अन गाणं सुरु केलं ....

दैया हाय में ये कहाँ आ फसी
हाय रे फसी, कैसे फसी
रों आवे ना, आवे हसी
पापे बचालो तुषि

ह्या गाण्याला माझ्या आयुष्यात काय स्थान आहे तेच मी त्यांना सांगितलं, जे आताच तुम्हाला मी सांगतोय ! त्या लोकांना गाण्याचे बोल काय कळले माहीत नाही, पणपंचामदानी त्यांनाही ठेका धरायला लावलाच !! आणि विशेष म्हणजे ह्या गाण्यानी, तिथेही वन्स मोअर घेतलाच.

सारेगामा कारवासिस्टम असेलच ना तुमच्याकडे? मग ऐका गाणी आणि तुम्हीही अनुभवा गारुडकारवांचं !

anilbagul1968@gmail.com



No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...